नवीन लेखन...

महाकाय देवमासा

या प्राचीन आणि प्रचंड देवमाशाच्या अवशेषांचा शोध २०१० साली लागला. इका वाळवंटातील, समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका छोट्या टेकाडीच्या कडेला, पृष्ठभागापासून सुमारे तीस मीटर खोलीवर सापडलेले हे प्रचंड आकाराचे अवशेष म्हणजे, निव्वळ दगड असल्याचं मत काही संशोधकांनी सुरुवातीला व्यक्त केलं होतं. मात्र या दगडांची अधिक तपासणी केल्यानंतर, हे दगड नसून ते एखाद्या प्रचंड प्राण्याचे जीवाश्म असल्याचं निश्चित झालं. साहजिकच या जागेच्या रीतसर उत्खननाला सुरुवात झाली. या जीवाश्मांवर मातीबरोबरच ज्वालामुखीतली राखही जमा झाली होती. हे सर्व थर दूर केल्यानंतर, या प्राण्याचे तेरा मणके, चार बरगड्या आणि श्रोणीच्या हाडाचा एक तुकडा तिथं सापडला. सापडलेले सर्व मणके आकाराने अतिशय मोठे आणि वजनदार असून, या सर्व मणक्यांचा आकार मोठ्या पिंपाएवढा आहे. यांतला एक मणका तर सुमारे दोनशे किलोग्रॅम वजनाचा आहे. हे मणके इतक्या मोठ्या आकाराचे आणि वजनदार असल्यानं, प्रत्येक मणका हलवण्यासाठी तीन ते चार माणसं लागत होती, तसंच ते उचलण्यासाठी खेचीचा वापरही करावा लागत होता. प्रत्येक मोहिमेत फारतर दोनच मणके तिथून बाहेर नेता येत होते. त्यामुळे हे उत्खनन दशकभर चाललं. या दशकभरात इथं सुमारे वीस मोहिमा पार पडल्या.

पुढील संशोधनासाठी हे सर्व जीवाश्म, पेरूची राजधानी असणाऱ्या लिमा या शहरातल्या, ‘म्यूझिअम ऑफ नॅचरल हिस्टरी’ या संग्रहालयामध्ये हलवण्यात आले. तिथे या जीवाश्मांची काटेकोरपणे वजनं-मापं घेतली गेली, तसंच त्यांच्या पृष्ठभागाची आणि अंतर्भागातून घेतलेल्या नमुन्यांची सूक्ष्मदर्शकाद्वारे तपशीलवार निरीक्षणं केली गेली. या जीवाश्मांचा काळ कळण्यासाठी, या जीवाश्मांवर जमा झालेल्या ज्वालामुखीतल्या राखेचे नमुने घेऊन त्यांचं विश्लेषण केलं गेलं. या सर्व अभ्यासानंतर, हा प्रचंड प्राणी म्हणजे चार कोटी वर्षांपूर्वीची, देवमाशाची आतापर्यंत अज्ञात असलेली एक प्रजाती असल्याचं स्पष्ट झालं. या जीवाश्मांच्या अभ्यासावरून, विशेष प्रारूपांद्वारे त्या देवमाशाचा आकार कसा असावा, त्याचं वजन किती असावं याचा अंदाज बांधला गेला. तसंच या हाडांची इतर ज्ञात जलचरांच्या हाडांशी तुलना करून, त्यावरून या देवमाशाचं तपशीलवार चित्र उभं केलं गेलं. जिओवानी बायानुची आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभं केलेलं, या देवमाशाचं हे चित्र विस्मयजनक होतं! हा देवमासा आकारानं आजच्या निळ्या देवमाशापेक्षा थोडासाच लहान असला तरी, त्याचं वजन मात्र निळ्या देवमाशापेक्षा खूपच अधिक असण्याची शक्यता दिसून आली. सर्वसाधारण निळे देवमासे हे सुमारे पंचवीस मीटर लांबीचे असतात आणि त्यांचं वजन दीडशे टनांच्या आसपास असतं. याउलट हा देवमासा जरी वीस मीटर लांबीचा असला तरी, त्याचं वजन सुमारे ३४० टनांपर्यंत असण्याची शक्यता दिसून येत होती. सर्वसाधारणपणे देवमासे हे लांबट आकाराचे असतात, परंतु हा अवाढव्य देवमासा मात्र अतिशय फुगीर आकाराचा होता. या प्राण्याच्या सांगाड्याचंच एकूण वजन पाच ते आठ टन असावं. म्हणजे निळ्या देवमाशाच्या सांगाड्याच्या वजनापेक्षा दुपटीहून अधिक!

या देवमाशाची हाडं ही अतिशय घन स्वरूपाची आहेत. अशी घन आणि वजनदार हाडं ही, उथळ पाण्यात वावरणाऱ्या जलचरांची असतात. त्यामुळे हा देवमासा किनाऱ्यापासून जवळच्याच उथळ समुद्रात वावरणारा जलचर असण्याची शक्यता वाटते. हा देवमासा आपल्या अवाढव्य शरीरामुळे अतिशय हळू पोहत असावा व त्यामुळे तो आक्रमक स्वरूपाचा नसावा. या देवमाशाशी साम्य असणारे आजचे देवमासे, डॉल्फिन, शिंशुक हे सर्व जलचर मांसाहारी असल्यानं, हा देवमासासुद्धा मांसाहारी असावा. मात्र हळू पोहणारा हा देवमासा प्रत्यक्ष पाण्यात मिळणाऱ्या खाद्यापेक्षा, समुद्राच्या तळाशी मिळणाऱ्या खाद्यावर जगत असावा. त्याच्या आहारात सागरी गवत, तसंच कवचधारी प्राणी, कृमी, इत्यादींचा समावेश असावा. मात्र जोपर्यंत त्याच्या जबड्याचे किंवा दातांचे अवशेष सापडत नाहीत, तोपर्यंत याबद्दल निश्चित काही सांगता येत नाही. या देवमाशाच्या ज्ञात नातेवाईकांच्या स्वरूपावरून, या देवमाशाचं डोकं त्याच्या शरीराच्या तुलनेत खूपच लहान आकाराचं असावं, असा तर्क या संशोधकांनी मांडला आहे.

जिओवानी बायानुची आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देवमाशाच्या प्रजातीला, तूर्तास ‘पेरूसेटस कलोझस’ (पेरूतला प्रचंड देवमासा) हे नाव दिलं आहे. आजचे देवमासे, डॉल्फिन, शिंशुक हे सर्व ज्या सेटॅशिआ या गणातले आहेत, त्याच गणातला हा देवमासा असावा. या गणातले प्राणी हे प्रथम जमिनीवर उत्क्रांत झाले आणि कालांतरानं पाण्यात शिरले. हा देवमासा ज्या चार कोटी वर्षांपूर्वीच्या काळात अस्तित्वात होता, तो काळ आजच्या देवमाशांचे पूर्वज निर्माण होण्याच्या, वीस-पंचवीस लाख वर्षांच्या अगोदरचा काळ आहे. या देवमाशाला पुढचे पाय तर आहेतच, परंतु काहीसे अपूर्ण विकसित झालेले मागचे पायही आहेत. देवमासे पाच कोटी वर्षांपूर्वी ज्या चार पायांच्या सस्तन प्राण्यापासून उत्क्रांत झाले, त्याच प्राण्याच्या मागच्या पायांचे हे अवशेष असावेत. हा देवमासा ज्या काळात होऊन गेला, तो काळ खाद्यान्नाच्या दृष्टीनं भरभराटीचा होता. त्यामुळे या देवमाशांच्या शरीरानं, उत्क्रांतीद्वारे इतका प्रचंड आकार धारण केला असावा. त्यानंतरच्या काळात खाद्यान्नाची उपलब्धता कमी झाल्यानंतर मात्र, देवमाशांच्या अशा प्रकारच्या वाढीवर बंधनं आली असावीत व त्यांची उत्क्रांती खुंटली असावी. त्यामुळे नंतरच्या काळात देवमाशांच्या उत्क्रांतीनं वेगळा मार्ग पत्करला असावा आणि त्यातूनच आजच्या देवमाशांचे, तसंच डॉल्फिन आणि शिंशुकांचे पूर्वज निर्माण झाले असावेत.

इका वाळवंटातलं, देवमाशाचं हे उत्खनन अजून पूर्ण झालेलं नाही. जिओवानी बायानुची आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या देवमाशाचे आणखी अवशेष सापडण्याची शक्यता वाटते आहे. हा देवमासा ज्या टेकाडीच्या एका कडेवर सापडला, त्या टेकाडीकडेच त्याचं शरीर रोखलेलं होतं. त्यामुळे त्या टेकडीखाली त्याचे आणखी अवशेष असू शकतील – आणि त्यात कदाचित त्याच्या डोक्याकडचा भागही असू शकतो. हे सर्व अवशेष सापडणं, महत्त्वाचं आहे. कारण हे सर्व अवशेष सापडल्यानंतरच, आतापर्यंतच्या या ज्ञात अशा सर्वांत प्रचंड वजनाच्या प्राण्याचा आकार नक्की कसा होता, हे स्पष्ट होईल.

(छायाचित्र सौजन्य – Alberto Gennari/Giovanni Bianucci)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..