नवीन लेखन...

गिरनार व नवनाथ गुरू शिष्य

दतात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे गिरनार आसे मानले जाते. दहा हजार पायर्‍या चढुन तिथे जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे.

भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दतभक्तांची श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. पुराणांमध्ये याचा श्र्वेताचल, श्र्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो.

पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ पाच कि मी अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे चार योजना म्हणजेच 16 गावांपर्यत आहे. सुमारे 28 चौ कि मी ने व्यापलेला गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी जगताने संपन्न, विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे. ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न झालेली आहे. आजही अनेक जण गिरनार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्र्चर्येला बसलेले आढळून येतात.

गिरनार पर्वताच्या पायथ्याला (गिरनार तलेठी) भगवान महादेव मंदिर ,मृगी कुंड,लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला हजारो साधूं संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. तेथील मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला उतरतात.

अशी एक आख्यायिका आहे. कि त्या साधूमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगी कुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा,निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा, असे अनेक आखाडे आहेत . त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे. आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालले आहे. गुरु शिष्य ( नाथ परंपरा ) येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे “प्रसाद” घेतला जाईल याकडे स्वत शेरनाथ बांपूचे कटाक्ष लक्ष असतो.

लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि मी आत जंगलाच्या दिशेने दुसरे एक संत श्री काश्मिरी बापूंचा आश्रम आहे श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे दिडशे वर्षेच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे,याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने प्रवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे.

गिरनार पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या भगवान दत्तात्रयांच्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असतेच सुमारे दहा हजार पायर्‍यावर हे स्थान आहे . वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायर्‍या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरवात करतात.

दोन हजार पायर्‍यांवर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो. हेही एक सिध्द स्थान आहे. २२५० पायर्‍यांवर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला “माली परब” घाट येतो. तेथे रामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे. २,६०० पायर्‍यांवर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे साडेतीन हजार पायर्‍यांपाशी प्रसूती बाई (देवी) चे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा , संतोषी माता, काली माता,वरूडी माता,खोडीयार माता , अशी छोटी छोटी मंदिरे आहेत.

बाजूला जैन मंदिर येते.  मुख्य मंदिर नेमिनाथचे आहे. अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथा हे 22 वे जैन तीर्थकर होय. या मंदिरातून थोड्या पायर्‍या उतरल्यावर जैन धर्मातले पाहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकसुरी कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत.

थोडे पुढे गेल्यावर गौ मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते. येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतरण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ ,भाविक,साधू बैरंगी या मार्गांने येतात अथवा जातात. या मार्गांवर कूठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे, डोलावाले नसल्यामुळे बर्‍याचजणांना हा मार्ग माहित नाही.

गौ मुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायर्‍यांवर “अबाजी टुंक” येते. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला म्हणुन हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो. होळी पौर्णिमा अथवा नवरात्रीलाच तो उघडतात. हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे. येथून पुढे पाचशे पायर्‍या चढल्यावर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते. गिरनार पर्वतवरील सर्वांत उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून ३,६६६ फुटावर हे स्थान येते .

नवनाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्र्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे अशी भाविकांची धारणा आहे बाजूलाच गुरु गोरक्षनाथांची धुनी आहे व याच स्थानावर गुरु गोरक्षनाथांनी सिध्दांना उपदेश केला.  बाजूलाच नवनाथानां गुरु दत्तात्रेयानी यांचा ठिकाणी गुरु मंत्र दिला होता.

बाजूलाच एक पाप पुण्याची खिडकी ( बारी ) आहे म्हणजे एक छोटा बोगदा आहे. एका बाजूने त्यात आत शिरायचे व दुसर्‍या बाजूने सरपटत बाहेर पडायचे. या स्थानावर गेली बारा वर्षे मंदिराची व्यवस्था बघणार्‍या मंहत सोमनाथ यांचा दत्त संप्रदायातील ” सेवा” या शब्दावर नितांत विश्वास आहे. इतक्या दुर्गम स्थानावर एकटे राहाणे, तपश्र्चर्या करणे हे येर्‍यागबाळयाचे काम नव्हे.

गोरक्ष टुंक नतंर यात्रेकरूंना थोडासा दिलासा मिळतो. कारण पुढच्या शिखरावर जाण्यासाठी हजार ते पंधराशे पायर्‍या उतरायला लागतात. श्री गिरनारी बापूंची गुंफा लगते .येथे भैरवनाथाचे मंदिर आहेत. जे भक्त इथे नतमस्तक होतात त्यांना श्री गिरनारी बापू प्रसाद म्हणून ज्याच्या-त्याच्या योग्यतेनुसार रूद्राक्ष देतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात. उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे 300 पायर्‍या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे. डाव्या बाजूच्या कमानीतून पुढे समोर हजार पायर्‍या चढल्यावर दत टुंक आहे.

चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. यांच स्थानवर बसून भगवान दत्तात्रयांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान पावले असा समज सर्व दत्त भक्तां मध्ये आहे.

दहा बाय बारा चौ फूट जागेमध्ये दत्तात्रेयांच्या पादुका, एक सुबक मूर्ती, एक पुजारी बसू शकेल एवढीच जागा आहे. येथे एक प्राचीन घंटा आहे. ती घंटा तीन वेळा आपल्या पुर्वजाची नावे एकेक करून घेत वाजवल्यावर सर्व पितरे मुक्त होतात. इथून पुढे जायचा कुठलाही रस्ता नसल्यामुळे परत आलो त्या वाटेवरून खाली कमंडलू स्थानापाशी जावे लागते. भगवान दत्तात्रेयाची सगुण उपासना करताना चरण पादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तसेच आकाशातील चांदण्याचे अवलोकन करणे हाही काही सांधकांचा दत्त उपासनेचा भाग असल्यामुळे या स्थानावरून पहाटेच्या अथवा रात्रीच्या वेळी जे अवकाशाचे विहंगम दृश्य दिसते ते येथे येऊनच अनुभवावे.

पावसाळ्यात तर येथील अनुभवाचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे. ढग सुध्दा या शिखरा पासून खाली असतात.

उतरताना परत त्या दोन कमानीशी आल्यावर कमंडलू स्थानकडे जायला 300 पाय-या उतरायला लागतात. इथे पाच हजार वर्षे पासून असलेली चेतन धुनी आहे. दर सोमवारी पहाटे सहा ते आठ या वेळातही “धुनी” प्रज्ज्वलित करण्यासाठी उघडतात.  त्यात भरपूर लाकडे घालतात. येथील “भस्म” प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते.

भगवान दत्तात्रेय ध्यानात अनेक वर्षे दत्त टुंकवर बसलेले असताना देवी अनुसूया मातेने त्यांना भानावर येण्यासाठी हाक मारली तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी ( जिथे धुनी आहे) प्रकटला तर दुसर्‍या स्थानावर जल निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे.

श्री गुरूदेव दत्त दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

2 Comments on गिरनार व नवनाथ गुरू शिष्य

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..