नवीन लेखन...

गिरनार यात्रा (भाग – १)

अद्वयच्या बारशाचा दिवस होता. मी 12-12.15 ला धावत-पळत उमा नीलकंठ मध्ये पोहोचले. दारातच अरूताई, जिजाजी आणि नरेन बोलत असतानाचे शब्द कानावर आले.’ मग ठरलं तर! तू उद्याच ट्रेन बुकिंग करून टाक.’ आणि मी ,’कुठे चाललाय त? मी पण येणार!’ असं बोलून गेले.

2 सेकंद एकदम सन्नाटा पसरला. नरेन म्हणाला, आम्ही गिरनार ला जातोय. 10,000 पायऱ्या आहेत तिथे चढायला! तुला जमेल का? माझ्या एकंदरीत सुदृढ शरीर यष्टीचा अंदाज घेत, मी लगेच माघार घेतली. ‘राहू दे जा तुम्ही, मी नाही येत..!!’ अरु ताई लगेच म्हणाली, तुझ्या तोंडून गुरुदेवांनी वदवून घेतलं आहे म्हणजे तुझी ट्रीप सफल होईल. तू सर्व गुरुदेव दत्तांवर सोपवून निर्धास्त ये!

आता अरुताईने असं सांगितल्यावर मी पण श्रध्दा ठेवून जायचं निश्चित केलं. हा प्लॅन ठरला डिसेंबर मध्ये. आणि आम्हाला जायचं होतं 1 फेब्रुवारीला… माझ्याकडे 1 महिना आणि काही दिवस होते हातात. एकदम जोरदार प्लॅनिंग केलं – वजन कमी करण्याचं, वॉकिंगच आणि प्राणायाम सुरू करण्याचं.. 1-2 kms. पण जेमतेम चालणारी मी, पहिल्याच दिवशी 6 किलो मीटर चालले आणि मी एकदम खुश झाले. वा! जमेल की आपल्याला..मग दिवसातून 2-4 वेळा आमचे 10 मजले चढ – उतार करून झाले. 10 मजले कुठे आणि 10,000 पायऱ्या कुठे? असो! हे ही नसे थोडके…

पण नव्याचे नऊ दिवस!! हा माझा उत्साह जेमतेम आठवडाभर  टिकला. नंतर 10,000 बहाणे मिळायला लागले, आज काय खूप हेक्टीक शेड्युल आहे, आत्ता मीटिंग आहे, आज उशिरा उठले, काल झोपायला उशीर झाला. मी आणि माझे कष्टाचे प्रयोग आठवडाभर चालले आणि बंद पडले.

जसं जशी जाण्याची तारीख जवळ येत चालली तस तशी धाक धुक वाढायला लागली. जमेल का आपल्याला? पण अरु ताई म्हणाली तसे, देवावर हवाला ठेवून, बूट खरेदी, इतर छोट्या मोठ्या गोष्टी यांची खरेदी झाली. जायचा दिवस उद्यावर येवून ठेपला.

आज 31 जानेवारी 2018, ऑफिस मधून मी निघाले. 1 तारखेची रात्रीची गाडी होती. 1 फेब्रुवारीला बाबांचा वाढदिवस होता, आणि जाण्याची तयारी म्हणून मी work from home करणार होते. घरी येवून ॲक्टिवा स्टँडला लावेपर्यंत फोन वाजला. घाई घाईत पर्स काढायला गेले आणि काय झालं माहीत नाही, गाडीच्या स्टँड खाली माझ्या पायाचा अंगठा आला आणि गाडीच पूर्ण वजन अंगठ्यावर! इतकी जीवघेणी कळ आली, आणि त्या नादात गाडी स्टँड वरून खाली घेणं पण जमेना. मी माझ्या पायाकडे पाहिलं … खाली रक्त दिसलं. ते बघून गाडी स्टँड वरून खाली काढण्याचं माझं उरलं सुराल अवसान पण संपलं. तेवढ्यात तिकडून सोसायटी मधलेच एक काका जात होते. त्यांच्या मदतीने गाडी पुढे ढकलली आणि पाय काढला. पायाला तसा ही ठणका लागला होता. मग काकांनीच गाडी स्टँडवर लावली. मी सॅक आणि पर्स सांभाळत लंगडत घरी पोहचले.

झालं! आता कसा गिरनार चढायचा? लगेच नरेनला फोन लावला. तो ही लगेच आला, पायाच ड्रेसिंग केलं. नखं थोड निघालं होतं आणि आंगठा सुजून टपोऱ्या बोरसरखा झाला होता. या गडबडीत ज्या फोन मुळे गडबड झाली तो पहिला तर तो US हून बिग बॉस चा फोन होता. त्यांना आधी फोन लावला, तर त्यांनी एक बॉम्ब टाकला की उद्या रात्री 10 वाजता क्लाएंटच्या सीनिअर मॅनेजमेंट बरोबर मीटिंग आहे. He also mentioned that, I know you are travelling, but still a request to join the call. In case any thing reqd., you can help else just listen to it. लगेच ठाण्याच्या ऑफिस मधून माझ्या immediate reporting manager चा फोन. ऊद्या थोडा वेळ तरी येवून जा, आपण presentation बनवू. मग जा तू परत!

आता ह्या दुखऱ्या पायाने मी गिरनारला जावू शकते का नाही इथपासून शंका! पण नरेनने लगेच टी. टी.च इंजेक्शन दिलं आणि पेन किलर आणि अँटी बायोटिक्स् चालू केल्या. सगळ्यांच्या म्हणण्यात आल, हिम्मत हारू नकोस. तिथे पर्यंत जा, पुढे दत्तगुरूच शक्ती देतील. मला इकडे चप्पल घालता येत नव्हती. मग शैलेशने जाऊन स्लिपर्स आणल्या. दुखऱ्या पायानेच मी त्या दिवशी झोपले. दुसऱ्या दिवशी पॅकिंग पूर्ण करून स्लीपर्स घालून ऑफिस मध्ये… तिथे आम्ही प्रेझेंटेशन बनवलं. दुपारी 3 पर्यंत घरी आले. थोडा वेळ रेस्ट केली आणि अखेर अनिश्चिततेच्या सावटाखाली मुंबई सेंट्रल कडे प्रयाण केले.

मी आणि नरेन इकडून सौराष्ट्र एक्स्प्रेसने जुनागढला जायचं आणि अरुताई , जीजाजी आणि त्यांचा ग्रूप पुण्याहून येणार होते. आमच्या गाड्या थोड्या फार फरकाने जुनागढला दुपारी पोहचणार होतो. प्रवास मी अंगठ्याला बंडेज आणि पायात स्लिपर्स घालून सुरू केला.

सगळ्यात मेन immediate hurdle होतं, रात्रीची 10 ची मीटिंग.! Connectivity मिळेल का नाही… ट्रेन च्या आवाजात मला ऐकू येईल का नाही.. शंभर शंका!

10 वाजता ट्रेनच्या आवाजात मीटिंग ऐकायचा मी आटोकाट प्रयत्न केला. एसी कोच होता तरीही खूप disturbance होता. कानात जीव आणून ऐकणे ह्या म्हणीचा अर्थ पुरेपूर जाणवला. 1-2 माझ्याकडे आलेले प्रश्न झेलून त्यांना समाधानकारक उत्तरे दिली. मिटिंग छान पार पडली. मिटिंग संपताना शेवटी आमच्या बिग बॉसने क्लाएंटला (Harman International) मी ट्रेन मध्ये आहे हे सांगितले. मी एक holy place 10000 पायऱ्या चढून जात आहे हे ऐकून त्यांना प्रचंड धक्का बसला आणि आम्हाला फोटोज् पाठव असे म्हणत आणि पुढच्या प्रवासा साठी शुभेच्छा देत मीटिंग संपली. देव कृपेने कनेक्टिव्हिटीचा कुठेही प्रॉब्लेम झाला नाही. मीटिंग नंतर मला बिग बॉस कडून स्पेशल ऍप्रिसिएशन मिळाले. चला! सुरुवात तर चांगली झाली!

आता मी आणि नरेन आरामात पत्ते काढून खेळायला लागलो. पायाला ठणका लागल्यावर लक्ष्यात आलं की मी बराच वेळ पाय खाली सोडून बसले आहे.  नाईलाजाने पाय पसरून बसले. आता उद्या कसं रे चढणार नरेन? मी शंका बोलून दाखवली. नरेनने धीर दिला. मग आम्ही घरातून आणलेले मेथी पराठे आणि चटणी दही भात खावून झोपलो.

मी आणि नरेन जेंव्हा केंव्हा दीदीकडे गुजरात/ हैदराबादला जायचो तेंव्हा जाणीवपूर्वक साईड लोअर आणि अप्पर बर्थ घ्यायचो. का? तर ते जोडून त्यावर मस्त पत्ते खेळता येतात. आताही तसेच बर्थ होते. ते एका दृष्टीने खूपच बरं झालं होतं. मला पाय पसरूनच बसावं लागेल असं वाटलं नव्हतं.

सकाळी 10-10.15 ला राजकोट आले. तिथे आमचे 2 डबे वेगळे केले आणि वेरावळ एक्स्प्रेसला जोडले. उरलेली ट्रेन पोरबंदरला रवाना झाली. आमची ट्रेन पुढे जाऊन परत मागे येऊन दुसऱ्या प्लॅटफॉर्मला लागली. म्हणजे आम्ही एकच स्टेशनवर परत आलो. मला ह्या arrangement ची खूप मजा वाटली.

भरूचचे खारे दाणे, सुरती गाठीया, मठरी, भेळ, खाकरा अशा चटक मटक गुजराथी पदार्थांची चव चाखत चाखत दुपारी 1-1.30 च्या सुमारास आमची गाडी जुनागढ ला पोहचली.  पुणेकरांची गाडी 1-1.30 तास आधी येणार होती पण अरुताईचा फोन आला त्यांची गाडी 3 तास उशिराने येतीय.

आणि तुम्ही जुनागढहून रिक्षा घेऊन गिरनार पायथ्याशी जा आणि आपण बुकिंग केलेल्या हॉटेल मध्ये थांबा. मी त्यांना फोन करून कळवल आहे. मुंबई सोडल्यावर बाहेरच्या जगात खूप कष्टाळू, प्रामाणिक, अगत्याशिल, साधी सरळ लोकं भेटतात. त्याची प्रचिती आम्हला बाहेर आल्यापासून यायला लागली. एका तासात ह्या सगळ्यांचा आम्हाला प्रत्यय आला आणि पुढे पण येतच राहिला.

बाहेर आल्याबरोबर एक रिक्षावाला आम्हाला सामोरी आला. तिथून गिरनार पायथा 7-8 kms. होता. त्याने अगदी माफक पैसे सांगितले. त्या रिक्षा 6 सीटर होत्या. मागे ही जागा होती.त्याने स्वतः आमचं सामान मागे चढवलं. स्टेशनहून निघाल्यापासून त्याच्या गप्पा चालू झाल्या. मुंबईहून आलात का? पहिल्यांदाच आलात का? आम्ही पण अंदाज घेत उत्तरं देत होतो. अचानक एका हॉटेल समोर त्याने रिक्षा थांबवली. तो म्हणाला, तुम्ही इथे जेवण करून घ्या. खूप चांगली गुजराथी थाळी मिळते इथे. मी बाहेर थांबतो.तुम्ही सावकाश जेवा. आमचे शेजारच्यावरही आंधळा विश्वास न ठेवण्याचे मुंबईकर संस्कारित मन सजग झाले. आपण जेवतो आहे हे बघून हा बॅगसकट पसार झाला तर? वेटींग चार्जेस लावले तर? आम्ही थोड्या साशंकतेने नकार दर्शविला. ते प्रामाणिक असल्यामुळे म्हणा किंवा इतर प्रवाशांच्या पूर्वानुभव म्हणून म्हणा, त्याने आमचे मन वाचले. ‘आप बिलकुल चिंता मत करना, मै जादा पैसा नाही लूंगा, आप हमारे मेहमान है और मेहमान भगवान होते हैं. हम उन्हे फसाते नही हैं. आपका सामान भी हमारे पास सुरक्षित रहेगा! मला तर एक क्षण वाटलं,जुनागढ च्या लोकांना मन वाचण्याची जादू येते की काय?

आम्ही ‘गुरुदेव दत्त’  म्हणून सामान त्या रिक्षावालाच्या हवाली केले आणि रिक्षा नजरेआड होणार नाही अशा बेताने आत बसलो. दारातच आमचं खूप जोरदार स्वागत झालं आणि जेवण तर अगदी आग्रह कर -करून वाढलं. स्वादिष्ट गुजराथी जेवणाचा अगदी चांगला तास – दीड तास आम्ही आस्वाद घेत होतो. मधेच एकदा उठून मी बाहेर, तो रिक्षावाला आहे का बघायला आले. तो तर होताच तिथे पण दरवाजा वरच्या माणसाच्या वक्तव्याने मला एक सणसणीत चपराक मारल्यासारखे वाटले. ज्याने आमचं स्वागत केलं तो म्हणाला,’ ये मुंबई नही हैं बहेनजी, जुनागढ हैं. यहा आपका सामान सुरक्षित हैं.कोई फसएगा नहीं आपको!’

मी मनातल्या मनात खजील झाले. काय इमेज आहे मुंबईची अर्थात ती बऱ्याच प्रमाणात खरी सुध्धा होती. असो.

आमचं जेवण संपतच आलं होतं की नरेनचा फोन वाजला. अरुताईचा कॉल होता. आम्ही 10 मिनिटात जुनागढला उतरत आहोत आणि आमच्याकडे सामान खूप आहे. त्यातून सगळेच सीनिअर सिटीझन आहेत तर तुम्ही इथे येऊ शकता का?  सामान उचलायला मदत होईल.

नशिबाने आम्ही स्टेशन पासून फार लांबवर नव्हतो. आम्ही लगेच रिक्षावाल्याला आमचा प्रॉब्लेम सांगितला. तो ही लगेच मदत करायला तयार झाला. परत रिक्षा उलटी फिरवून आम्ही स्टेशनला आलो. त्या रिक्षावाल्यांनी अजून एकाला पकडलं आणि नरेन, आणि ते दोघं रिक्षावाले पलिकडच्या प्लॅटफॉर्मवर गेले. इकडे पायमुळे मला तसही फार इकडे तिकडे जात येत नव्हत आणि आमचं सामान पण रिक्षताच होतं. म्हणून मी गाडीतच बसले. जुनागढच भर दुपारच उन्ह ते! अंगाची लाही लाही होत होती. आपण कसं चढणार गिरनार? दुखरा पाय, तापत उन्ह, ओव्हर ऑलच ट्रेकची नसणारी सवय, वजन.. एकंदरीतच सगळे negative पॉइंट्स एका पारड्यात होते आणि ते आधीच नकाराकडे झुकलं होता. एक अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर पुण्याचा 6 जणांचा ग्रुप आम्हाला येऊन मिळाला. त्यांनी गाडीतच खाल्ल होतं त्यामुळे त्यांना जेवायची इच्छा नव्हती.

मग त्या दोन रिक्षानी आम्ही गिरनार पायथ्याकडे कूच केलं.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..