‘काचेची घरं’ हे या लेखाचं शीर्षक असलं तरी ‘घर’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चटकन चित्रातलं वा प्रत्याक्षातलं घर येतं, त्याबद्दल मला काही लिहायचं नाही. मला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अलिकडे ज्या काचेच्या तावदानांच्या भल्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या आहेत व अजूनही उभ्या राहात आहेत, त्यावर मला काय वाटतं ते तुम्हाला सांगायचंय. मोठ्याल्या, आकाशाला स्पर्शायला निघालेल्या या इमारती आता केवळ मुंबई-पुणे-नाशिक या मोठ्या शहरांची मिरासदारी राहीलेली नाही, तर मध्यम व लहान शहरातही त्या आता बऱ्यापैकी डोकं वर काढून राहीलीत. ह्या इमारतींना मी ‘घरं’ म्हणत असलो तरी ह्या इमारती बऱ्याचदा व्यापारी उपयोगाच्या असतात.
मला बांधकामशास्त्राबद्दल काही म्हणजे काही कळत नसताना, तुम्ही म्हणाल, की मला यावर लिहायचा अधिकारच काय म्हणून..! तुमचं म्हणंणं चुकीचं आहे असही नाही, तरी मी जेंव्हा या इमारतींकडे पाहातो, तेंव्हा मात्र माझ्या मनात जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते आपल्यासमोर मांडावेत असं तीव्रतेने वाटलं आणि या लेखाचा जन्म झाला..माझं म्हणणं चूक की बरोबर की कालबाह्य की वेडेपणा हे आपण ठरवायचंय..
काचेची तावदानं लावलेल्या इमारती दिसतात देखण्या यात वाद नाही. प्रत्येक मजल्याच्या भिंती बांधणं, त्या भिंतींना आतून बाहेरून प्लास्टर करणं, रंगकाम करणं यात वेळ आणि पैसाही जास्त खर्च होत असावा. त्या मानाने इमारतींना भिंतींच्या जागी काचेची तावदानं लावणं पैसा आणि वेळ, दोन्हीची बचत करणाऱ्या असु शकतात आणि म्हणून अशा इमारती बांधण्याचं प्रमाण वाढलं असावं अशी माझी समजूत आहे, खरं-खोटं माहित नाही.
अशा इमारती बांधण्याचं वेड कदाचित पाश्चिमात्य देशांकडून आपण उचललेलं असावं अशीही माझी समजूत आहे. कोणताही विचार न करता पाश्चिमात्यांची भ्रष्ट नक्कल करायची यात आपण वाकबगार आहोतच. अश्या इमारती बांधणं ही अशीच एक भ्रष्ट नक्कल आहे अस माझ ठाम मत आहे. मला अस का वाटत, त्याची कारणं खाली देत आहे.
कोणत्याही देशातील लोकांच्या ‘रोटी, कपडा और मकान’ या तिन सर्वाधिक महत्वाच्या गरजा..! ह्या गरजा, त्या त्या देशातील परंपरांशी आणि त्या परंपरा त्या त्या देशातील हवामानाशी घट्ट निगडीत असतात. हवामानाचा विचार करूनच अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची त्या त्या देशाची म्हणून एक खासियत बनते. त्याची तशीच नक्कल त्या देशाच्या विरूद्ध हवामानाच्या देशात होवू शकत नाही आणि करण्याचा प्रयत्न केल्यास पदरी त्रासच पडतो हे लॉजिकली सर्वांना मान्य असायला हरकत नाही. या लेखात ‘रोटी, कपडा और मकान’पैकी फक्त ‘मकान’चा विचार केला आहे.
थंड व लहरी हवामानाच्या देशात काचेच्या तावदानांच्या इमारती कदाचित गरज म्हणून उभारल्या गेल्या असाव्यात हे थोडासा विचार केला तरी कळतं. दिवसेंदिवस सूर्यदर्शन नाही, ढगाळ वातावरण, कधीही पडणारा-भुरभुरणारा पाऊस, कधीतरी मधूनच होणारी हिमवृष्टी आणि मुख्य म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव ह्यामुळे आतल्या बाजूला पुरेसा प्रकाश व उब देण्याचं काम काचेची तावदानं करत असावीत. अशी काचेची घरं त्या देशांतही आतून हिटरने गरम केलेली असतात. हिटर असो वा थंड एसी, तो बाहेर गरम हवाच उत्सर्जित करत असतो. थंड हवामानाच्या देशात हिटरने बाहेर टाकलेली गरम हवा, बाहेरच्यांना उपकारकच वाटत असावी यात शंका नाही. पुन्हा थंड हवामान व रोज किमान एकदा तरी पडणाऱ्या पावसामुळे धुळीचं प्रमाण जवळपास नाहीच व त्यामुळे काचेची तावदानं घासून पुसून लख्ख करण्याचं काम पाऊसच बजावत असल्यामुळे, ते करण्यासाठी जास्तीची मेहेनत व खर्च नाही. काचेवरील पावसाचं पाणी, भिंतींच्या तुलनेत चटकन वाळत असल्यामुळे, अशा थंड हवामानाच्या, सदा पावसाच्या देशात इमारतींना सिमेंट-कॉंन्क्रिटच्या भिंतींऐवजी काचेच्या भिंती जास्त सोयीच्या असाव्यात व म्हणून तिथे नविन, आधुनिक इमारती तशा बांधल्या गेल्या असाव्यात.
ह्या पार्श्वभुमीवर आपल्याकडे काय चित्र दिसतं? आपला देश उष्ण कटीबंधात असल्यामुळे आपल्या देशाच्या बहुतांश भागात वर्षापैकी आठ-नऊ महिने उष्णता असते. पाऊस मोजून तिन-चार सलग महिने पडतो. उन्हाळा, पावलाळा व हिवाळा असे तीन स्पष्ट ऋतू दिसतात. हिवाळ्याचे तिन-चार महिने वगळले, तर देशात सुर्योदय ते सुर्यास्त असा किमान १२ तास प्रकाश व उष्णता असतेच. आपल्या देशात काचेच्या तावदानाच्या इमारती बांधल्यामुळे बाहेरचा प्रखर सूर्यप्रकाश उष्णतेसह आतवर पोहोचतो व म्हणून आतील प्रकाश विजेने कृत्रिमरित्या नियंत्रीत करावा लागतो. दुसरं म्हणजे, काचेची तावदानं असल्यामुळे, मोठ्या खिडक्यांच्या अभावाने वायुविजन होणं शक्यच नसतं व बाहेरची हवा आत पोहोचू शकत नाही व त्यामुळे आत थंडाव्यासाठी एसी लावणंही अत्यावश्यक होतं. आत थंडावा राखणारा एसी बाहेरच्या वातावरणाची उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरतोय हे सर्वांना कळतय परंतू, ‘मुझे थंडा लग रहा है ना, तो बस, बाहर गरमी बढती है तो मुझे क्या करना है’ ही वृत्ती असल्यानं बोलायचं कुणालाच नाही..!
काचेच्या तावदानांच्या इमारतींचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे या इमारतींवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचे होणारे परावर्तन. काचेच्या इमारतींवरून परावर्तीत( Reflection) होणाऱ्या प्रकाशामुळे आजुबाजूच्या रहीवाश्यांना जो त्रास होतो त्याची जाणिव कुणाला आहे असं वाटत नाही. किंवा असूनही दुर्लक्ष करत असतील. थेट प्रकाशापेक्षा परावर्तीत प्रकाश जास्त त्रासदायक असतो याचा अनुभव आपणही कधी न कधी घेतला असेल. अशा इमारतिंना परवानगी देणारी महानगरपालिका किंवा जी कोणी असेल त्या, स्थानिक स्वराज्य संस्थेत तरी याचा विचार केला जातो का हा प्रश्नच आहे. बाकी आग, अपघात किंवा पर्यावरणाची हानी वैगेरे बाबींचा या लेखात विचार केलेला नाही.
आणखी एक म्हणजे, आपण भारतीय लोक कुठल्याही गोष्टीची निर्मिती जगातील इतर कुणाही देशापेक्षा जास्त चांगली वा किमान त्यांच्या तोडीस तोड करू शकतो यात शंका नाही. परंतू इतर देशांत त्या उत्तम गोष्टीचा मेन्टेनन्सही तेवढाच दर्जेदार असतो आणि आपल्याकडे मात्र मेन्टेनन्सच्या आघाडीवर आनंदी आमंदी असतो. एकदा एखादी गोष्ट बांधली, की ती शेवटची मान टाकेपर्यंत तिच्याकडे पाहायचं नाही ही आपली खासियत आहे. पुन्हा पाश्चात्य देशांत सर्वसामान्य लोकांमधेही ती गोष्ट, सरकारी असो वा खाजगी, कशी वापरावी वा वापरू नये याची एक किमान शिस्त असते. आपल्याकडे ती जपून वापरा असं आज एकविसाव्या शतकातही लाऊड स्पिकरवरून वा बोर्ड लिहून सांगावं लागतं. त्यातून आपल्या उष्ण हवामानाचा देशात धुळीचं प्रमाण जास्त असल्यानं, इमारतीच्या त्या काचेच्या तावदानांवर धुळीची पुटच्या पुटं चढलेली कुठल्याही तशा इमारतीचं सहज म्हणून निरिक्षण केलं तरी दिसेल. या तावदानांची साफसफाई करणं ही मोठी स्पेशलाईज्ड व खर्चीक बाब असते व म्हणून सहाजिकच नेहेमी केली जात नाही. परिणामी ह्या सुंदर इमारती पार रया गेलेल्या व ओंगळवाण्या दिसतात.
उष्ण हवामानाच्या आपल्या देशात मोठ्याल्या एकमेकांच्या विरुद्ध दिशांना असलेल्या खिडक्यांच्या जाडसर भिंती असलेल्या इमारती हव्यात. जाड भिंतींच्या इमारती उष्णता व थंडी रोधक असतात. समोर समोरच्या खिडक्या हवा खेळती ठेवतात हे खरं तर इयत्ता चवथी-पाचवीतल ज्ञान. छताची उंची १० फुट वा त्यापेक्षा थोडी जास्त असल्यास जास्त हवा खेळती राहते हे त्याच दरम्यानच्या विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेलं आठवत.
ब्रिटिशानी त्यांच्या काळात बांधलेल्या इमारती आपल्या देशाच्या हवामानाचा बारकाईने अभ्यास करून बांधलेल्या होत्या. मुंबईच उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, विज्ञान भवन, मुंबईच दिवाणी आणि सत्र न्यायालय या इमारती असाच हवामानाचा अभ्यास करून बांधलेल्या असल्याने ह्या इमारतींमध्ये आजही भर उन्हाळ्यात फारशी उष्णता जाणवत नाही. उच्च न्यायालयातील न्यायदानाचे कक्ष हल्ली एअर कंडीशन्ड केलेत ते बाहेरच्या राहादारच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून, गरम होतं म्हणून नाही.
मुंबई विद्यापिठाच्या ‘कावसजी जहाॅंगिर सेनेट हाॅल’च्या बांधकामाची हकिकत यासाठी वाचण्यासारखी आहे, फोर्टच्या मुंबई विद्यापीठ संकुलातला सेनेट हाॅल सर गिल्बर्ट स्कॉट या विख्यात ब्रिटीश वास्तुविशारदाने डिझाईन केला आहे. या हाॅलच्या बांधकामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला कारण सर गिल्बर्ट स्कॉट ह्यांनी हाॅलचं आरेखन करण्यापूर्वी जिथे हाॅल बांधायचाय, त्या जागेचा नकाशा, तेथील वाऱ्याची दिशा, प्रत्येक ऋतूत बदलणारं तापमान, पाउस-पाणी ह्याची इतकी बारीक सारीक माहिती मागवली होती, की ती पूरवता पूरवता सरकारच्या नाकी नऊ आले होते. वेळ इतका जाऊ लागला, की या सेनेट हाॅलच्या बांधकामाला पैसे पुरवणारे कावसजी जहाॅंगिर यांनी पुढे पैसे देण्यास नकार देऊन तो पर्यंत झालेला खर्च सरकारकडे पाच टक्के व्याजासहीत परत मागीतले होते. पण विलंबाचं कारण पटल्यावर मात्र कावसजी जहाॅंगिर यांनी पुढे आणखी रक्कम दिली. गम्मत म्हणजे ह्या गिल्बर्ट महाशयांनी हयातीत कधीही मुंबई पहिली नव्हती. परंतु बारकाईने घेतलेल्या माहितीवरून आरेखित केलेले इमारतीचे सर्व नकाशे इंग्लंड वरून इथे पाठवून दिले होते व त्याबरहुकूम बांधकाम करण्याच्या सख्त सूचना दिल्या होत्या. बांधकामाला वेळ लागला. परंतु हा वेळ किती सार्थकी लागला हे ‘कावसजी जहाॅंगिर सेनेट हाॅल’ व शेजारच्या राजाबाई टॉवरमध्ये जाऊन आजही कोणीही अनुभवू शकतं. मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरमध्ये असलेल्या वाचनालयात मी अनेकदा जातो, तिथे एसी नसूनही अजिबात उकडत म्हणून नाही.
आपल्या हवामानाचा विचार न करता, पाश्चात्यांची भ्रष्ट नक्कल करून उष्णता कृत्रीमरित्या आपणच वाढवायची आणि ‘ग्लोबल वाॅर्मिंग’ होतंय म्हणून वातावरणाला दोष द्यायचा, याला चोराच्या उलट्या बोंबा असं नाही तर आणखी काय म्हणायचं? सर गिल्बर्ट स्काॅटसापखा विचार हल्लीचे वास्तुशिल्पी का करत नाहीत? सुंदरतेबरोबरच उपयुक्ततेला महत्व का देत नाहीत?
— नितीन साळुंखे
9321811091
मुंबई विद्यापिठ संदर्भ -डाॅ. अरूण टिकेकर-पुस्तक ‘स्थल-काल’
Leave a Reply