नवीन लेखन...

ग्लुमी पॅच (माझी लंडनवारी – 35)

दुसऱ्या दिवशी मी घरीच होते. खोकला, सर्दी, अशक्तपणा जाणवत होता.   मार्टिनने उमेशबरोबर गेट वेल सूनचा मेसेज पाठवला. अचानक हवामान बदलल्यामुळे असं होऊ शकतं असे सांगून मला टेक प्रॉपर रेस्ट असे सांगितले.

संध्याकाळी मी आणि उमेशने फोनवरून घरच्या गणपती विसर्जनाचा पूर्ण कार्यक्रम ऐकला. आधीच लवकर अंधार पडत असल्याने आणि थंडीमुळे मनाला मरगळ आली होती. त्यातून विसर्जन, त्यामुळे मन अजूनच उदास झाले.

थंडीमुळे सूर्य पण गारठला आहे असा गुळमुळीत तळपायचा. ते सुद्धा ढगोबांनी कृपा केली तर महाराजांचं सौम्य दर्शन होत होतं. सूर्य आणि त्याचं लख्ख तळपणं किती उत्साहवर्धक असतं ह्याची जाणीव झाली. इंग्रज बहुदा समर सिझनमध्ये  वर्षभराच चैतन्य अंगात साठवून घेत असावेत. समर मधली ऊत्साहवर्धक शांती आता विंटरमधे उदासिन वाटत होती.

गुरवारी मला बरेच फ्रेश वाटत होते. मग मी पण ऑफिसला गेले. आमचं नेहमीच रूटीन चालू झालं. आता आम्ही दोघच होतो सडबरी टाऊनला. प्रियाचा आणि कामाचा काही ताळ मेळ जमला नाही, त्यामुळे तिला लवकर परत पाठवल आणि ती परस्पर बंगलोरला गेली असं उमेशच्या बोलण्यातून मला कळलं. म्हणून मला ती मुंबई मध्ये भेटली नाही तर! आणि ना ही माझ्या मेल्सना तिने उत्तर दिले. ती परत येणार नव्हती. तिच्या कामाचा आणि माझा काही संबंध नव्हता. पण ती एक मैत्रीण किंवा सोबतीण म्हणून खूप चांगली होती. आनंदी असायची आणि आम्ही तिघं खूप मस्ती-मजाक करत होतो. आता आम्ही दोघंच होतो. एकंदरीतच दुसर्या मुक्कामाची सुरवात थोडी डिप्रेसिंग झाली होती. हे वातावरण गपगार करणारे होते

ही तर थंडीची सुरुवात होती. Temperature hits zero or less असं आम्ही ऐकलं होत. पण ते डिसेंबर मध्ये.तितके दिवस तर आम्ही इथे असू की नाही शंका होती.

बाहेर जास्त फिरायला पण नको वाटायचं थंडीमुळे. त्यामुळे आम्ही घरी येऊन काय करायचं असा मोठ्ठा प्रश्न पडायचा आम्हाला. संध्याकाळी आम्ही पत्ते, गाणी ऐकणं, गाण्याच्या भेंड्या असं खेळून वेळ ढकलत होतो. गप्पा, जुन्या आठवणी शेअर करणे, पुढच करीअर डिस्कस करणे. काय काय करणार?

पत्ते तर इतके खेळलो होतो की पत्त्याना जीव द्यावासा वाटत असेल. ते मनात म्हणत असतील, पिसून पिसून पिसं काढली आमची!

ते औदासिन्य काय कमी होतं, की त्यात एका निराशाजनक बातमीने भर घातली. दुसऱ्या ट्रीपच्या पहिल्या विकएंडला आम्ही परेशकडे गेलो प्रेस्टन रोडला. तिथेच मला expected पण unwanted news मिळाली.आमचे लाडके शिरीष काका आम्हाला शेवटी सोडून गेले होते. घरी, काका-काकू, लता मावशी सगळ्यांना फोन केले. रडू आवरत नव्हत. तो वीकेंड निराशेत गेला.

सोमवारपासून पुन्हा नेहमीचे ऑफिस रूटीन सुरू झाले. एकदा रम्मी खेळत असताना निक अचानक उगवला. मग ओळख-पाळख गप्पा झाल्या. तो जेवूनच आला होता. आमची जेवण झाली. मग आम्ही तिघे पत्ते खेळलो. आम्ही चक्क 5-3-2 खेळलो. थोडी चेष्टा मस्करी, गप्पा झाल्या. खूप मस्त वाटलं. त्याने विचारले, तुम्ही ऑफिस मधून घरी आल्यावर वेळ कसा घालवता? टीव्ही वगैरे आवडत नाही का?

आवडून उपयोग काय? आणू कुठून टीव्ही? तर तो म्हणाला, उद्या मी येतो संध्याकाळी, आपण आपल्या रेव्हच्या ऑफिस मध्ये जाऊ, तिथे एक एक्सट्रा टीव्ही आहे तो घेऊन येऊ. फ्री चॅनल्स बघता येतील तुम्हाला.

दोन दिवस निक आलाच नाही. शुक्रवारी आम्ही पत्ते खेळत होतो.मी माझे सगळे बाहेरचे कपडे मशीनमधे धुवायला लावले होते. घरातल्या जरा बऱ्या सलवार कमीज वरच होते. आणि निक उगवला धूमकेतू सारखा. चला, टीव्ही घेऊन येवू. ‘तुम्ही जा. मी थांबते घरी’ अस मी सुचवल. पण त्याने ऐकलं नाही.’घरी एकटी कंटाळशील. चल तू पण!’ असं म्हणताच मी त्याला माझ्या ड्रेसची अडचण सांगितली. तो म्हणाला गाडीतून जायचंय गाडीतून यायचं. काही फरक नाही पडत. मग आम्ही निघालो. मलाही यु.के. मधलं आमचं ऑफिस बघायचं होतं.

ऑफिस कुठलं? दोन रुम्स् होत्या एका बिल्डिंगमधे. तिथला टीव्ही उचलून गाडीच्या डिकीत ठेवला आणि आम्ही निघालो. वाटेत एका पब समोर त्याने गाडी थांबवली. आणि ‘चला, पब मध्ये जावूयात’ अस म्हणाला. आम्हाला दोघांनाही उत्सुकता होती पण माझ्या चेहऱ्यावर जरा टेंशन आलं. त्याने लगेच स्पष्टीकरण दिलं, ‘तुला वाटतं तसं इथे नसतं. It’s very sofsticated. इथे मुली पण येतात. टेंशन घेऊ नकोस.’

मी जरा रिलॅक्स झाले पण आता दुसरा प्रश्न. सलवार कमीज मध्ये पब? हाकलवतील मला बाहेर! अशी मी शंका उपस्थित केली. ‘तुझ्याकडे कशाला बघतील लोक? इतर अनेक गोष्टी आहेत बघायला’ अस म्हणत त्याने ऊमेशकडे बघून डोळा मारला. आणि आम्ही सगळेच हसायला लागलो. माझ्याही मनावरचे दडपण कमी झाले. चला बिनधास्त!

असं म्हणत आम्ही पबमध्ये शिरलो. तिथलं वातावरण वेगळच होत. सगळीकडे दिव्यांचा योग्य झगमगाट. टेबल खुर्च्यापण त्या चकमकीत धुंद वातावरणाला साजेशा. बार काउंटरवर वेगवेगळ्या साइजच्या आणि डिझाइनच्या ग्लासेसची आकर्षक मांडणी. काउंटरजवळ उंच उभ्या सिंगल खुर्च्या.

एकटा जीव सदाशिव तिथे शांतपणे आपल्याच तंद्रीत पीत बसलेला दिसला. आम्ही एक कॉर्नर पकडून बसलो. माझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस. बाकी सगळे प्रॉपर हार्ड ड्रिंक घेतलेले. म्हणजे चिकन टिक्का शेजारी अळूचं फदंफदं वाढलंय अस वाटत होत.पण सगळे आपापल्या विश्वात मग्न होते. त्यामुळे आमच्याकडे तसही कोणाचं लक्ष नव्हत. आणि कोणी ओळखतही नव्हतं आम्हाला. कदाचित निकला नंतर कोणी विचारला तरच.पण ती ही शक्यता नव्हतीच. आम्ही पण थोडे सैलवलो. गप्पा मारत निकला कंपनी दिली. जसं जसं वेळ वाढायला लागला, तसा तसा पार्टीचा रंग बदलायला लागला. पण खरोखर तिथल्या मुली सुंदर होत्या. त्यांचे फॅशनेबल कपडे त्यांनाच जास्त शोभून दिसत होते. आता आम्ही तिथून काढता पाय घेतला.

घरी येऊन टीव्ही सेट करून देऊन निक त्याच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे आम्ही मस्त उशिरापर्यंत मूव्ही बघितला.आणि टीव्ही आणण्याची मेहनत सत्कारणी लावली.

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..