नवीन लेखन...

मी अनुभवलेला गोवा..

यावेळी बऱ्याच वर्षांनी गोव्याला कुटुंबासहीत पर्यटनासाठी जाणं झालं. बऱ्याच म्हणजे जवळपास २२ वर्षांनी. तसं दरम्यानच्या काळात मी एकटा गोव्याला बऱ्याचदा गेलोय, पण ते हवाईअड्ड्यावर आगमन-प्रस्थान येवढ्याच कारणांस्तव. सुशेगाद असा आता प्रथमच गेलो.

माझा काॅलेजचा मित्र श्री. दत्ता पाटील गेलं पाव शतक गोव्यात स्थायिक आहे. दत्ता एका बड्या आंतरराष्ट्रीय चेन रिसाॅर्टचा बराच बडा अधिकारी आहे. त्याच्याकडे मागे एकदा सहज गोव्यासंबंधी चवकशी केली होती, तर त्याने तिकडचं थेट सर्व बुकींग करुन मगच मला कळवलं.

माझा यावेळचा मुक्काम दक्षिण गोव्यातल्या बेनाॅलिम या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावातल्या ‘राॅयल पाम’ या दत्ताच्याच रिसाॅर्टमधे होता. अतिशय उच्च दर्जाचं वन बिएचकेचं, देखणं, सुसज्ज अपार्टमेंट दत्ताने आम्हा चौघांना राहायला दिलं होतं.

गोव्यातला दक्षिण गोवा हा भाग तसा उत्तर गोव्यापेक्षा शांत, कमी वर्दळीचा आणि त्यामुळे काहीसा डिसेंट्ही. त्यात मी राहात असलेलं बेनाॅलिम हे गांव तर आणखीच शांत. मी युरोपात अद्याप गेलेलो नाही, पण बेनाॅलिमचे हे चार दिवस मी युरोपात असल्याचा अनुभव, युरोपात प्रत्यक्षात न जाता घेत होतो, कारण इथे आलेले (की असलेले?) जवळपास ८० टक्के लोक युरोपियन्स होते.. त्यात रशीयनांची संख्या जास्त. रस्त्याने फिरताना दिसलेली किंवा आमच्या रिसाॅर्टमध्ये किंवा बेनाॅलिमच्या शांत व अतिशय गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहाण्यात आलेली दहा पैकी आठ माणसं परदेशी होती. हे इतके सहज वावरत होते, की जणू काही तेच इथले मुळचे रहिवासी असावेत आणि आम्ही फाॅरिनर्स.

मला ह्या परदेशी लोकांचं एक आवडतं, समोर आल्यावर दिवसाचा जो प्रहर असेल त्याप्रमाणे मनमोकळं अभिनादन करतात. त्यांना ओळखीची गरज भासत नाही. स्त्री-पुरुष असा भेदही त्यांच्या मनात नसतो. माझा मुंबईतला आपल्या देशी लोकांचा अनुभव याच्या एकदम विपरीत आहे. रसत्यातून येता-जाता समोरून कुणी ओळखीचं येताना दिसलं की नमस्कार-चमत्कार होतात, पण त्या ओळखीच्याच्या सोबत आणखी कुणी एखादी अनोळखी व्यक्ती असली, की त्या ओळखीच्याशी बोलताना, त्याच्यासोबत असलेल्या परंतू आपल्याला अनोळखी असलेल्या त्या व्यक्तीकडे मात्र आपली माणसं साफ दुर्लक्ष करतात. इतकं, की जणू काही ती व्यक्ती तिथे नाहीच. अशावेळी आपलं बोलणं चालू असताना त्या अनोळखी व्यक्तीची अवस्था फार विचित्र होते आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. मग ती व्यक्तीही इकडे-तिकडे पाहात, तिचंही आपल्याकडे वा आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही असं दाखवत बसते. माझ्यावर जेंव्हा अशी पाळी येते, तेंव्हा मी मात्र मी माझ्यासोबत जी व्यक्ती असेल, तीची रस्त्यात कुणी ओळखीचं कुणी भेटलं, की प्रथम तिची समोरच्याशी थोडक्यात ओळख करून देतो. असं करण्याने ती व्यक्तीही आमच्यातलीच आहे याची जाणीव तिच्यात निर्माण होते व ती आपल्या अधिक जवळ येते..परदेशी लोकांचं आपल्याशी सहज मनमोकळं हसणं, संभाषण करणं या पार्श्वभुमीवर अधिक भावते..

मी माझ्या ‘दत्ताकृपेने’ ‘दत्त’ म्हणून लाभलेल्या या चार दिवसांच्या गोवा मुक्कामात अनेक परदेशी लोकांशी मनमोकळा, म्हणजे व्याकरणाशी संबंघ नसलेल्या इंग्रजी भाषेत, संवाद साधला. गोव्यात आलेल्या या परदेशी लोकांत बहुतेक सर्वजण वयाच्या साठीच्या आजुबाजूचे होते. तरुण लेकुरवाळी जोडपीही होती, पण कमी. लोण्याच्या गोळ्यांप्रमाणे दिसणारी त्यांची लालबुंद, सुवर्णकेशा पिलं तर बघत राहावी अशी देखणी होती. आपल्यासारखी ‘नजर लागेल’ अशी संकल्पना त्यांच्यात नसल्याने, ती ही त्यांच्या मुलांना आपल्याला बिनधास्त बघू देत होती, हात लावू देत होती. आम्हाला भेटलेलं मार्टीन आणि आगा हे पोलंडचं जोडपं आणि त्यांची दोन गोंडस बाळं अशीच होती. बाकी बाई जगाच्या पाठीवरची कुठलीही असु दे, तिच्या बाळांचं कौतुक केलं, की तिच्या चेहेऱ्यावर ‘आई’पणाचे भाव सारखेच उमटतात. ‘जगात फक्त मीच आई झालेआहे’ आणि ‘आहेच माझं बाळ एकमेंवाद्वीतीय’ असा काहीसा अभिमानाचा-गर्वाचा-कौतुकाचे भाव तिच्या चेहेऱ्यावर उमटतात. आगाच्याही चेहेऱ्यावर उमटले होते. आम्ही तिच्या पोरांचं कोतुक केल्यावर, तर ती कुठल्याही ‘आई’ सारखीच खुलली..

या युरोपियन्समधील बहुतेक सर्वजण ऑक्टोबर महिन्यात इथे येतात, ते फेब्रुवारी अखेर परत आपल्या ‘बापदेशी’ परत जातात. आपल्यासारखी ‘मायदेश’ ही संकल्पना तिकडे नाही, त्यांची असते ती ‘फादरलॅन्ड’, बापदेश..! या काळात तिकडे प्रचंड थंडी पडत असल्याने, ते हे चार-पांच महिने गोव्यात, त्यातही दक्षिण गोव्यात’ मुक्कामाला येतात. एखाद्या घरात भाड्याने राहातात, बाजारहाट करतात, सायकल-स्कुटर घेऊन निवांत आजुबाजूला फिरतात. आपल्यासारखाच बाजारहाट करताना भाव करुन भाजी खरेदीही करतात. समुद्रस्नानाचा आस्वाद घेतात, तो ही अगदी सहजतेने. कुणी बघतंय का वैगेरे जाणीवच नाही. आपल्या लोकांसारखा ‘झगामगा झगामगा आणि आमच्याकडे बघा’ असा दिखावूपणाचा आवेश त्यांच्यात नसतो.

दक्षिण गोव्यातलं बेनाॅलिम गांवही देखणं, निवांत. उत्तरेतल्या कलंगुट, बागासारखी गर्दी इकडे अजिबात नाही. गावातल्या दक्षिणोत्तर जाणाऱ्या इटुकल्या रस्त्याला लागून असलेली दुकानं, हाॅटेल्सही युरोपीयन्स धर्तीवरची. बहुतेक दुकानांवरच्या पाट्या रशियन भाषेतही लिहिलेल्या. इटुकल्या रस्त्यालगतच्या पिटुकल्या हाॅटेलांच्या व्हरांड्यात टेबल-खुर्च्या लावून बसायची सोय केलेली, त्यानंतर मुख्य हाॅटेलही बरचसं वाॅललेस. मागे शेवटाला बार व त्या मागील भिंतींवर कलात्मकतेने लावलेल्या विविध ब्रान्डच्या दारूच्या बाटल्या..बारच्यामागे आपला एखादा आडवा-तिडवा पसरलेला देशी ‘सायबा’ सेवेला हजर. निवांत रस्त्याशेजारच्या तेवढ्याच निवात हाॅटेलच्या व्हरांड्यातील एखाद-दुसऱ्या टेबलवर एखादं-दुसरं छान पिकलेलं उंचं-लालगोरं, चंदेरी केसांचं जोडपं मस्त बियर किंवा काॅफी पित शांत बसलेलं. येणाऱ्या जाणाऱ्याशी नजरानजर झाली, की हात उंचावून छानसं हसणं. ओळखीची गरजच नाही. यांचं वागणं खरंच ‘विश्वबंधुत्वा’चं असावं असं वाटण्यासारखं, आपल्यासारखं फक्त प्रतिज्ञेत म्हणण्यासाठीचं नसतं..

मला गोव्यातलं काय आवडत असेल, तर ती देखणी, ऐसपैस घरं. शांत, झाडांच्या आड दिसेल न दिसेल अशी लपलेली, सुंदर मोठ्या आर्क्सची, तेवढ्याच लांब-रुंद आणि भरपूर खिडक्यांची, वप्रशस्त व्हरांड्यांची, व्हरांड्यातून खाली उतरत जाणाऱ्या आठ-दहा पायऱ्यांची आणि त्या पायऱ्यांना लागून असलेल्या, प्रशस्त पायऱ्यांसोबत उतरत खाली येऊन दोन बाजुंना दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कठड्यांची..हे कठडे येणाऱ्याच्या स्वागताला बाहू पसरून नेहेमीच तयार असावेत, असा त्यांचा अविर्भाव. गोवन घरांवरची पोर्तुगीज/युरोपियन आर्किटेक्चरची झांक मला खुप मोहवते हे खरंच. गोव्यातील गावांत गेलो, की कुठेही न जाता एखादा सुशेगाद पहुडलेला रस्ता पकडून चालत राहायचं आणि रस्त्याशेजारची ती हिरव्यागार झाडांच्या महिरपीत वसलेली, देखण्या रंगसंगतीने नटलेली ती देखणी घरं डोळ्यांत साठवत फिरायचं, हे अजुनही माझं स्वप्न आहे..आजवर जी अशी घरं पाहिलीत, ती गाडीतून येता जाताच फक्त..पोर्तुगीज पद्धतीच्या मोठ्या कमानी, व्हरांडे, दरवाजातील पायऱ्यांशेजारी दोन बाजुला दोन असलेल्या खुर्चीसारख्या सिमेंटच्या बैठका घराला एक वेगळंच सौंदर्य प्रदान करतात. घर हिन्दूचं असो की ख्रिस्त्यांचं, बांधणीवरची पोर्तुगीज छाप चटकन जाणवते. दारात घरायेवढंच देखणं तुळशी वृंदाववन किंवा ख्रुस हिच काय ती धर्माचं वायलेपण दाखवणारी खुण. बाकी माणसं, भाषा, वेश आणि जेवणाच्या पद्धतीत फारसा बदल नाही..दारातलं तुळशी वृंदावनाने खुरुसाचा झगा घातला असला, तरी त्या झग्याआडून अदृष्य दिसणारं तुळशीचं पावित्र्य मात्र पोर्तुगिजांना किंचितही नाहीसं करण्यात यश आलेले नाही, असं माझं निरिक्षण आहे..!

ओल्ड गोव्यातलं पोर्तुगीज काळात प्रथितयश वकिल असलेल्या अराॅजो अल्वारीस यांचं घर पाहिलं. जवळपास दहाहजार चौ. फुटांचा पसारा असेल हा सारा. त्या काळातल्या ऐश्वर्याच्या सर्व खुणा त्यांच्या वंशजांनी अजून जपून ठेवल्यात, त्या पाहायला मिळतात. मला या घरातल्या ऐश्वर्याच्या त्या खुणांपेक्षाही सर्वात जास्त काय आवडलं असेल, तर पोटमाळ्यावर काहीसा नजरेआड असलेला देव्हारा. अल्वारीस कुटुंब गोव्यातील इतर कुटुंबाप्रमाणेच बाटलेलं कुटूंबं असावं. पुढे पोर्तुगीज राजसत्तेशी जुळवून घेत त्यांनी अमाप प्रगतीही केली असावी असं तेथे उपलब्ध साधनांवरून दिसतं. प्रवेशद्वाराशीच एक चॅपेल व येशू-मारीचा देखणा पुतळा याची साक्ष देत उभा आहे. घरातल्या देवांना मात्र घराच्या मागच्या बाजुच्या एका उजव्या कोपऱ्यात प्रशस्त पोटमाळ्यावर सन्मानाने ठेवलेलं आहे व त्यांची पुजा करण्यासाठी त्या काळात एक स्वतंत्र पुजारी होता, अशी माहिती तिथे मिळते. ख्रिस्ती झग्याआडचं तुळशीचं न मिटलेलं किंवा पोर्तुगीज न मिटवू शकलेलं पावित्र्य असं मी जे वर म्हणालो, ते हेच.

गोव्यात मला आणखी काय मोहात पाडत असेल तर, ती सुंदर देखणी मंदीरं आणि गर्द हिरवाईच्या पार्श्वभुमीवर उठून दिसणारी, पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेली, पोर्तुगीज बांधणीची भव्य चर्चेस. मला गोव्यातली ही मंदीरे आणि चर्च्स पाहिली, की आमचे कविमित्र श्री. विष्नू सुर्या वाघ याच्या गाण्यातल्या, ‘भव्य भव्य ती चर्च पाहा रे, मंदीरे देखणी..’या ओळी हमखास आठवतात..एकाच धाटणीच्या भव्य पांढऱ्याशुभ्र चर्च्सची गोव्याच्या भुमीतली काळी पार्श्वभुमी मला माहित असुनही मला ती चर्चेस पाहायला खुप आवडतात. शांत, सुंदर वातावरणात त्या चर्चेस ना वेढून घेणारे भव्य, देखण्या मंदिरातल्या आरत्या आणि मंत्रोच्चरांचे सूर ऐकुनच विष्णूला ‘गांवा गांवामधून घुमते तुक्याची अभंगवाणी..’ या पुढच्या ओळी सुचल्या असाव्यात..

असं हे सुशेगाद गोवा आता काहीसं बदलत चाललंय, अशी तिकडच्या स्थानिकांची खंत होती. परप्रांतियांचं आक्रमण गोव्यावर होत चाललंय असं दत्ता आणि माझा तिकडेच स्थायिक झालेल्या दिलीप आंबेकर या मित्रांचंही म्हणणं होतं. मी या चार दिवसांत ज्या ज्या लहान मोठ्या दुकांनांना भेट दिली, त्यांचे मालकक स्थानिक हिन्दू-ख्रिश्चन असले, तरी ती दुकान चालवणारे बहुतेक सर्व देशाच्या उत्तरेतून आलेले होते. काश्मिरी मुसलमानांचीही संख्या वाढत चालली असून, बाहेरून गोव्यात आलेल्या सर्वांचा कल इकडे स्थायीक व्हायचा असतो, असंही तिकडच्या लोकांशी बोललो असता जाणवलं. मंदीरं आणि चर्च्सच्या सोबतीने मशिदींचे मिनारही आताशा दिसू लागलेत. अनेक वर्षांपूर्वी एका धर्माने गोव्यात घातलेल्या तांडवाच्या आठवणी गोवेकरांच्या स्मरणात इतक्या वर्षांनंतरही अद्याप ताज्या असल्याने, पुन्हा आणखी एका जुन्या धर्माचं नव्याने गोव्यात येणं त्यांना अस्वस्थ करतंय. मराठी आणि कोंकणी या जुळ्या बहिणी एकाच घरात सुखाने नांदत असताना, हिन्दी नामक आणखी एक बहिण गोव्यात नांदायला आलीय. नुसती आली नाहिय, तर ती कानामागून येऊन तिखट होऊ पाहातेय, यामुळेही गोव्यातील लोक घाबरून गेले आहेत. हल्ली गोवेकरही एकमेंकांशी मराठी किंवा कोकणी न बोलता हिन्दी बोलू लागलेत, हे ही त्यांना खुपतेय. एकजात सर्वजण परप्रांतीयांच्या या आक्रमणासाठी ‘कोकण रेल्वे’ला जबाबदार धरत होते. रेल्वे नसती, तर हे ही आले नसते असं ते म्हणत होते. बाहेरून आलेले लोक वाटेल त्या कमी पैशांत वाटेल ते काम करतात व त्यामुळे स्थानिकांच्या पोटापाण्यावर पाय येतो, अशी इतर शहरवासीयांसारखी गोव्यातल्या स्थानिकांचीही तक्रार होती. अंमली पदार्थांची समस्या तर आहेत. आणखी दहा वर्षांनी तर गोवा साध्या डोळ्यांनाही जाणवेल इतपत बदलेलं असेल असंही त्यांचं म्हणणं होतं. देव करो नि असं काही होवू नये असं म्हणत मी गोव्याचा निरोप घेतला..

– ©️नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..