मासिक पाळीच्या रक्तस्रावाला विविध प्रकारच्या पारंपारिक, व सांस्कृतिक कारणाने मादियागोंड समाजात या काळात स्त्रीने सर्व दिवस राहते घर सोडून घराच्या बाहेर गावाच्या वेशीवरील एका मोडकळीला आलेल्या झोपडीत निवासाला जायचे त्याला कुरमाघर म्हणतात, {या झोपडीला कोर,खोपडी,वा गावकोर ) या नावाने पण संबोधीले जाते.
वास्तविक निसर्गपूजक माडियागोंड जातीच्या आदिवासीत मातृसत्ताक पद्धत असून घर चालविण्यात स्त्रीचा मोठा वाट आहे .ती दिवसभर घर व शेतीकामात गढलेली असते,अशा स्त्रीला मासिक पाळीच्या वेळी मात्र कुरमाघरात राहते घर सोडून राहण्यास जावेच लागते. ही परंपरा आदिवासी समाजात अनेक वर्षे चालू आहे, पण ही परंपरा अघोरी पद्धतीने आदिवासी समाजात पाळली जात आहे. ती कुरमाघर गावाच्या वेशीवर बांधली गेली आहेत.या झोपडीवजा घरात प्रत्येक कुमारी व स्त्रीला ४ दिवस राहण्याची सक्ती केली जाते, ते न पाळल्यास पंचायत सांगेल ती शिक्षा भोगावी लागते.हे घर कसले, छप्पर अर्धवट असलेले झोपडे,पावसात पाण्याचा वरून मारा, झोपण्यासाठी फाटक्या चटया व घोंगड्या,रात्रीला एखादा मिणमिणता दिवा, विजेचा तर पत्ताच नाही, भोवताली चिखलाचे साम्राज्य, कुत्रे डूकरांचा मुक्त संचार,अशा नरकवासात दर महिन्याला ४ दिवस काढायचे, पूर्वी म्हाताऱ्या स्त्रिया त्यांना सोबतीला राहत,पण आता त्याही राहत नाहीत.घरून जेवणाचा डबा कोणत्या वेळी येईल याचा नेमच नसतो, भुकेने जीव जातो पण घरी जाण्याची सोय नाही, पाणी पिण्यासाठी फुटका माठ. अतिशय गलीच्छ न्हाणीघर. आसपास सरपटणारे प्राणी,असे विदारक स्वरूप आहे. त्यातून काही आजार असला तर वीचारुच नका, आतापर्यंत १३ स्त्रिया मृत्यूमुखी पडल्या आहेत.
स्पर्श ही संस्था विविध पातळीवर या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे.७ वर्षे झाली यावरील अहवाल सरकारी दफ्तरात धूळ खात पडलेला आहे.ही प्रथा कायदा करून बंद पडण्याची गरज आहे,आणी त्यात विरोधाभास असा की अनेक कुमारिका व स्त्रिया त्यात नेमाने जातात,कारण आपल्यावर काही अन्याय होतो आहे याची त्यांना जाणीवच नाही,कारण प्रथा, परंपरा, आणी श्रद्धा यांचा समाजावर जबरदस्त पगडा आहे, स्वमत असे काही नाहीच, त्यात आशेचा किरण असा आहे की गावातील काही मुली शाळा कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांना विज्ञान कळते, त्यानी खंबीर राहून नकार दिला तर चित्र पालटेल.
अशा रुढ़ीच्या दृष्टचक्रात आपल्या सामाजिक संवेदना पार गोठून गेल्या आहेत.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply