महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला.
द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभान होऊन त्यानी जींकण्याच्या अपेक्षेने पत्नी द्रौपदी हीलाही पणाला लावले. कौरवानी द्रौपदीची विटंबना सुरु केली. हारलेले पांडव मुकपणे सारा भयावह प्रकार बघत बसले.
द्रौपदी असाहय्य झालेली होती. तीला कुणीही मदत करण्यास सरसावत नव्हते. शेवटी तीने मानलेला भाऊ श्रीकृष्णाचा धावा केला. तो धाऊन आला. त्याने तीला त्या वस्रहरण प्रसंगातून सोडवले. सारे वातावरण शांत होऊ लागले होते.
द्रौपदी मात्र मानसिक निराशेने ग्रस्त झाली होती. ती कृष्णावर देखील रागावली. तीला एक आधीकार व प्रेम प्राप्त झाले होते.
” कृष्णा हे सारे विक्षीप्त घडत असताना, मी तुझा धावा केला. तू आलास, परंतु तू येण्यास उशीर कां केलास ? ” प्रेमाने परंतु निराशेच्या स्वरांत द्रौपदीने कृष्णाजवळ तक्रार करीत विचारणा केली. श्री कृष्णानी हासून उत्तर दिले.
” तू माझा धावा केलास. मदतीची अपेक्षा केली. ”
तू त्या क्षणी काय म्हणालीस ते आठव. तू म्हणाली होतीस ” हे द्वारकेच्या कृष्णा मी संकटात आहे. तू त्वरीत येऊन माझी सोडवणूक कर. ”
तू जेव्हां मला हांक दिली की ” हे द्वारकेच्या कृष्णा, तेंव्हा त्याक्षणी मी तर तुझ्याच ह्रदयांत बसलो होतो. ”
जर तू मला ” माझ्या ह्रदयातील कृष्णा संबोधून हाक दिली असतीस, तर मी तुझ्याजवळच होतो. त्याचक्षणी मला येता आल असत. परंतु तु मला द्वारकेच्या कृष्णा संबोधल्यामुळे मला प्रथम द्वारकेस जावे लागले व तेथून तुजसाठी आलो. त्यामुळे वेळ लागला. ”
आपण देखील जीवनांत ह्याच रीतीने आपली वाटचाल करतो. अशी समज आहे की तो ईश्वर हा तुमच्या आमच्यामध्येच असतो. अहं ब्रह्मास्मि अर्थात मीच ब्रह्म वा परमेश्वर आहे म्हणतात. मात्र आपण त्याला जाणत नसतो. समजत नसतो. “मी ” ला ओळखत नसतो. त्याला आम्ही बाह्य जगांत शोधण्याचा सतत प्रयत्न करतो. देवस्थळे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, मशिदी, इत्यादी मध्ये त्याच्या अस्तित्वाचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण आयुष्य खर्च करतो. आम्ही ईश्वराला आमच्यातच म्हणजे “मी ” चा शोध घेण्यात कमी पडतो. त्यात वेळ खर्ची होते. ह्रदयातील त्या ईश्वराला श्री कृष्णाला जर द्वारकेत न्याल तर आयुष्याची वेळ वाया जाईल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply