मांडव्याला शेतावर आंब्याची जास्त झाडे नाहीयेत, पंचवीस एक वर्ष जुने हापूस आंब्याचे एकच कलम केलेले झाड आहे. पण रायवळ किंवा गावठी आंब्याची खूप जुनी जवळपास शंभर वर्षांपूर्वीची खूपशी चार झाडे आहेत. अलिबाग परिसरात गावागावात आंब्याच्या झाडांना विशिष्ट अशी नावं ही पूर्वापार चालत आली आहेत. मांडव्याला आमच्या नानांच्या भाटात किंवा खळ्यात विहरीच्या जवळच असलेला लोणच्याचा आंबा. लोणच्याचा जरी असला तरी जेव्हा तो आंबा पिकल्यावर गोड लागतो. भाटातुन पुढे शेतावर गेलो की तीन मोठी मोठी झाडे आहेत. एका आंब्याला उग्र वास येतो त्याला भिकन्या आंबा बोलतात. भिकन्या आंब्याच्या झाडाजवळ गेलो तरी त्याचा उग्र वास लगेचच जाणवायला लागतो. शेतावर एक कच्ची विहीर आहे तिला तिकडे डोरा म्हणतात या विहिरी वर साखऱ्या आंबा आहे त्याची मुळे खाली विहरीच्या तळाशी गेलेली दिसतात. मे महिन्याच्या सुरवातीलाच सगळं पाणी आटलेले असते आणि तळाशी फक्त ओलावा असतो. डोऱ्याला विहीरी ऐवजी पावसाळा संपल्यावर दोन तीन महिने भाजीपाला करता येण्याएवढा पाणीसाठा राहील असा खड्डाच बोलले पाहिजे. कारण त्यामध्ये आम्ही कितीतरी वेळा उतरायचो आणि वर चढताना खाली घसरून पडत राहायचो, मग लांब काठी किंवा दोर पकडून चढता येत नसेल त्याला वर ओढून घायचो. साखऱ्या आंबा चवीला नावाप्रमाणेच साखरेसारखा. पण त्या झाडाला आंबे कमी येत किंवा एखाद वर्षी येतसुद्धा नसतं. साखऱ्या आंब्याच्या समोरच गोडंब्याचे झाड आहे. बहुतेक ते झाड सगळ्यात जुने असावे. इतर सर्व आंब्यांपेक्षा याचा पसारा खूपच मोठा आहे. गोडांब्या कडे बघूनच कोणालाही डेरेदार वृक्ष प्रत्यक्षात कसे असतात हे लगेच लक्षात येईल. भरगच्च पानांनी नेहमी बहरलेल्या गोडांब्याच्या खाली मे महिन्याच्या गर्मीत सुद्धा थंडगार वाटते. त्याच्या शितल छायेत एकदा बसल्यावर पुन्हा संध्याकाळ होईपर्यंत उठायची इच्छाच होत नाही.
एप्रिल अखेरीस आंबे पिकायला नुकतीच सुरवात झालेली असते. कच्च्या कैऱ्यांमध्ये बाठे झालेले असतात अशा ताज्या कैऱ्या तोडून नेल्या की नानी त्या कैऱ्या घालून मच्छीचे कालवण बनवायच्या, करदी, बोंबील, मांदेली, कोलबी, पापलेट जी काही मच्छी असेल त्यात कैऱ्या कापून त्यातील बाठे सुद्धा टाकले जात. एखाद दिवशी भिकन्या आंब्याच्या कैऱ्या टाकून सुद्धा कालवण केले जात असे, भिकन्या आंब्यामुळे कालवणाला जी चव यायची ती चव आणि फ्लेवर आजवर दुसरीकडे कुठेही अनुभवता आली नाही. दुपारी आंबट कालवण खाऊन सगळ्यांचा दौरा शेतावर निघायचा उन्हात खेळायला नको म्हणून सगळे दुपारी शेतावर आंब्यांच्या खाली. सतरंजी नाहीतर चटईवर किंवा सरळ मातीवर ज्याचा तो ताणून द्यायचा. भर दुपारी पंख्याची गरज नसायची की कशाची गरज नसायची. येतानाच सोबत मीठ आणि मसाला घेऊन आल्याने ज्याला झोप लागायची नाही तो आंब्यावर चढून फांदीवर बसून मीठ मसाला लावून कच्च्या कैऱ्या खात बसायचा. संध्याकाळी मग साडेचार पाच वाजता सगळेजण घरासमोरच्या शेतात क्रिकेट खेळायला निघायचे. शेतावर असलेले बांबू तोडून त्याचे स्टम्प आणि फळी पासून बनवलेल्या बॅट वापरून सगळे मजेत खेळायचे.
मे महिन्याच्या मध्यावर गोडांबा पिकायला सुरवात होते. गोडंब्याच्या कच्च्या कैऱ्या सुद्धा गोडच लागतात. आकाराने लहान पण गोल गरगरीत आणि भरलेला असा आंबा पिकायला लागल्यावर वेगेवेगळ्या रंग छटा दाखवायला लागतो. लाल तांबूस रंग घेतं खाली पिवळसर होणारा आंबा झाडावरच तोडून खाण्यात वेगळीच मजा असते. हा आंबा एवढा गोड आणि चवीला श्रेष्ठ आहे की आमच्यापेक्षा जास्त पक्षीच त्याला खात असतात. गोडांब्याला पक्षी पूर्णपणे पिकून सुद्धा देत नाहीत, पोपट आणि खारुताई यांच्या तावडीतून सुटलेले आंबे खूपच कमी शिल्लक राहतात. आमच्या सगळ्यांचे आई बाबा आले की गोडांब्याच्या झाडाखाली जेवण बनवून तिथेच खाली शेतामध्ये पंगत मांडण्याचा कार्यक्रम ठरलेला. कॉलेजला जाईपर्यंत वर्षातून दोन तीन वेळा तरी गोडांब्याच्या खाली आम्हा सगळ्यांची पंगत बसायची पण जसं जसे सगळे कॉलेजला जायला लागले तेव्हापासून कितीतरी वर्षांत जेवायला एकसुद्धा पंगत पुन्हा एकत्र बसली नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
B.E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply