नवीन लेखन...

गॉडफादरच्या शोधात…

सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तिव्रतेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.लातूर हे गाव काय आहे हे अनेकांना माहीत नाही

पण लातूरच्या मातीत खेळलेले आणि खेळता खेळता जमिनीला पाठ लागलेले नेते हे गाव कधी फितूर होईल हे सांगता येत नाही याची ग्वाही देतील. अशा या गावात नारायण राणे, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या तिघा नेत्यांनी एकत्रित येऊन सोने लुटण्याचा कार्यक्रम गाजवला. खरे तर सोने देणे आणि घेणे हा काही मोठा कार्यक्रम नसतो पण असे तीन राजकीय नेते, तेही सतत जाहीर सभांची मैदाने गाजवणारे, कोणत्याही निमित्ताने एकत्र आले तरी भाषणे केल्याविना कशी राहतील? त्यांनी याही निमित्ताने भाषणे केली आणि ती गाजवली. या गाजण्याला चांगली पार्श्वभूमीही होती. एक नेते काँग्रेसचे, एक नेते नुकतेच काँग्रेसमध्ये येऊन भबावलेले तर तिसरे नेते एक पाय कमळात एक हात हातात अशा मनस्थितीतले. मग एकमेकांना टोमणे मारण्याचा आणि कोपरखळ्या मारण्याचा कार्यक्रम रंगल्यास नवल ते काय ? मुळात नारायण राणे मराठवाड्यातल्या या इतक्या लांबच्या गावात आलेच कसे, असा पहिला सवाल निर्माण झाला. या सवालाचा जबाब पाहिजे असल्यास राणे यांच्या सध्याच्या मोहिमेकडे लक्ष द्यावे लागते. राणे सध्या गॉडफादरच्या शोधात आहेत. त्यांनी आठ दिवसांपूर्वीच सोलापुरमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली आणि भाषण करताना आपण गॉडफादरच्या शोधात सोलापुरात आलो आहोत असे सांगितले. साहजिक आहे. ते बाळासाहेबांवर रुसून आणि उद्धववर वैतागून शिवसेनेतून बाहेर पडले. तिथून बाहेर पडण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता. पण, नंतरचा प्रवास म्हणावा तेवढा मुत्सद्दीपणाने आखलेला नव्हता. त्यामुळे त्यांची गाडी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत काही जाऊन पोचलेली नाही. ती तशी पोचू शकत नाही हे त्यांना आता उमगायला लागले आहे. याला कारण म्हणजे दिल्लीत योग्य गॉडफादर नसणे. त्यांनी प्रभा राव यांनाच गॉडफादर मानले होते. तशी त्या आधी शरद पवारांना गळ घातली होती पण पवारांनी राणे यांना राष्ट्रवादीत येण्यापेक्षा काँग्रेसमध्ये जाण्यात किती फायदे आहेत हे व्यवस्थित पटवून दिले. (स्वत: पवारांनाच हे अजून का पटेना हे काही कळत नाही) त्यामुळे प्रभा राव आणि गोविंदराव आदिक यांनाच गॉडफादर मानून ते काँग्रेसवासी झाले आहेत आणि आता पस्तावायला लागले आहेत.आता त्यांना गॉडफादर शोधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सोलापुरात त्यांनी तसे म्हणताच सुशीलकुमार शिंदे यांनी, आपण काही राणे यांचा गॉडफादर होणार नाही असे सांगून हात झटकले. तिथे अपयश आल्याने राणे खाली लातूरला गेले आणि तिथे त्यांनी चाचपणी केली. शिंदे नाही तर नाही विलासराव सही असे म्हणून राणे विलासरावांना गॉडफादर होण्याची गळ घालतात की काय असे लोकांना वाटले. पण, ते विलासरावांना तशी गळ घालायला आले नव्हते तर चांगला गॉडफादर कसा शोधावा याचा सल्ला विचारायला आले होते. या बाबतीत विलासराव भारी निघाले. मुख्यमंत्रिपद गिळायला अनेक राहू आणि केतू भोवती फिरत असताना त्यांनी आपले पद एक वर्षाचा अपवाद वगळता 10 वर्षे टिकवले. दिल्लीत कोणी तरी भारी गॉडफादर आहे म्हणूनच त्यांना हे शक्य झाले होते. शिवराज पाटील तर सतत 25 वर्षे निवडूनही आले आणि आता राज्यपालही झाले. तेव्हा गॉडफादर शोधण्याचा काही तरी लातूर पॅटर्न नक्कीच असला पाहिजे. तो सोन्याच्या निमित्ताने लुटता येतो का याची चाचपणी करायला राणे आले होते.विलासराव कसेही असोत, चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी विरोधी पक्षात असूनही गोपीनाथरावांशी मैत्री छान जपलेली आहे. आता तर त्यनी आपल्याला सतत तीन वर्षे सतावणार्‍या राणे यांनाच मित्र करायला सुरूवात केली आहे. इतकी चांगली मैत्री करणारा नेता महाराष्ट्रात कोणी नसेल. आता या मैत्रीचे रूपांतर राजकारणात करण्याची विद्याही त्यांना चांगली अवगत झाली आहे. त्यांनी गोपीनाथरावांची भाजपातली चलबिचल ओळखून खडा टाकून पाहिला आणि ते काँग्रेसमध्ये येतात का याची चाचपणी केली. गोपीनाथरावही मैत्रीला पक्के मानले जातातच पण मैत्रीचे रूपांतर राजकारणात न करण्याबाबतही तितकेच दक्ष असतात. पण त्यांनीही राणे यांच्या साक्षीने विलासरावांच्या खड्याला खड्यासारखे पटकन वेचून न टाकता त्या खड्याचे तरंग पाण्यावर उमटू दिले आहेत. गोपीनाथराव काँग्रेसमध्ये जाऊन मैत्री राखतील असे अनेकांना वाटत आहे. पण, याबाबत विलासराव मुंडे आणि गोपीनाथराव देशमुख हे डीयर फ्रेंड एक वेगळाच मैत्रीचा खेळ खेळायला लागले आहेत. मुंडे यांनाही राणे यांच्याप्रमाणेच दिल्लीत गॉडफादर उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे वजन घटले आहे. दिल्लीत आपले वजन वाढवण्याचा हा एक वेगळा डाव आहे. याबाबतीत विलासरावच त्यांचे गॉडफादर होत आहेत. खरे तर गोपीनाथरावांना राणे यांच्या साक्षीने काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात काही एक इशारा आहे. उघडपणे तसे आमंत्रण देत असले तरी काँग्रेसमध्ये आल्यास राणे यांच्यासारखी अवस्था होईल हे विलासराव आपल्या मित्राला सूचित करत आहेत. पण त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण देण्यामागे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना घाबरवण्याचा हेतू आहे. म्हणजे गोपीनाथराव अशा रितीने आपल्या मित्राच्या तोडून आपल्या नेत्यांना घाबरवत आहेत तर विलासराव नारायण राणे यांना लातुरात बोलावून आपल्या शेजार्‍याला म्हणजे नांदेडच्या नेत्यांना घाबरवत आहेत !

— अरविंद जोशी
अद्वैत फिचर्स

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..