(चाल : पारंपारिक गरबा / डांडियाची )
नृत्य गोपगोपींचें , धुंद सुरूं रास
वृंदावन लोटलें शरद-उत्सवास ।।
केशकलापीं गोपी माळती फुलें
वेण्यांचा संच दाट लांबवर झुले
चंपक, जुइ, मोगरा, दरवळे सुवास ।।
वस्त्रांतुन एकएक रंग उधळती
इंद्रधनू आज जणूं लक्ष उजळती
मांडियली रूपयौवनाची आरास ।।
गोलगोल नरनारीचक्र हें फिरे
झुलत डुलत नृत्य लांबवक्र हें फिरे
तालबद्ध मृदु मृदंग दास करि पदांस ।।
टाळ्यांचा टिपर्यांचा नाद धुंद हा
विसरें निजभान पुरें सर्व वृंद हा
लुप्त या घटीस सर्व चिंता-भय-त्रास ।।
आज हर्षसागरात हृदय डुंबतें
मोदाच्या वारूवर गगन चुंबतें
मनिं भुवनीं उल्हासच करितसे निवास ।।
एकसाथ खालीवर श्वास होतसे
एकरूप सारे , आभास होतसे
वेगळेपणा न उरे आज शतमनांस ।।
रासनृत्य नाचे आनंदकंदही
राधाही धुंद, रंगला मुकुंदही
ओठांवर मंदमधुर स्मित करी विलास ।।
नृत्यसमाधीस दिव्य, शक्य न बाधा
राधामय कान्हा , कान्हामय राधा
स्वर्गातिल सौख्य मिळे दोन प्रियजनांस ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com /
www.snehalatanaik.com
Leave a Reply