वर्क परमिटवर आल्यावर आणि झोन 5 मध्ये रेसिडेंशियल एरियात राहून आम्ही एकदम रेसिडंटसारखे झालो. त्यातून थंडी! मग काय, बहुतेक सगळे विकेंडस् घरी किंवा इतर फ्रेन्डस् कडे जावू लागले. ऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या. बहुतेक वीकेंड ह्याच्याकडे पार्टी, उद्या त्याच्याकडे असे गेले. पूर्ण फॅमिली ऍटमॉसफियर झाले.
पहिल्या व्हिजिटमधे अचंबित करणारी प्रेक्षणीय स्थळे बघितली.ह्या व्हिजिटमधे तिथे रहाणाऱ्या भारतीय लोकांचे सुरवातीच्या संघर्षाचे किस्से अचंबित करणारे होते. कसे त्यांनी एका घरात १०-१२ लोक राहून, खाण्या-पिण्याच्या बाबतीत मन मारुन, पै-पै साठवून ह्या लेव्हलला पोहचले होते. कधी ब्रिटीश कलिग्स् ची साथ मिळत गेली, कधी त्यांना रंगावरून खूप त्रास दिला गेला. सगळीकडे नाण्याला दोन बाजू असतात.ह्या वेळेस दुसरी बाजू पण समोर येत होती. पण कदाचित आम्ही तिथे परमनंट नव्हतो, त्यामुळे आम्हाला कधी ह्याची झळ बसली नाही. त्यातून तिथे स्त्रियांना विशेष रिस्पेक्ट दिला जातो, त्यामुळेही मला कामाच्या ठिकाणी कसलाही त्रास जाणवला नाही.
आम्ही एकत्र नवरात्री साजरी केली. नवरात्रीमधे आम्ही रोज देवीची आरती केली. त्या विकेंडला आम्ही गुजराती कम्युनिटी हॉलमधे जाऊन गरबा केला. तिथे काही ब्रिटीश कलिग्स् सुद्दा चणिया चोली आणि ब्रिटिश जेन्ट्स् गुजराथी ट्रॅडिशनल ड्रेस घालून आले होते.आपले भारतीय लोकं तर इतके झगमगत होते, की मी गुजरातमधे आहे की लंडनमधे मलाच कळेना. मनसोक्त दांडिया/गरबा एन्जॉय करुन रात्री ऊशिरा घरी आलो. प्रत्येक विकेंडला आम्ही जमलो की गाण्याच्या भेंड्या हा प्रमुख खेळ होता. कधी विशिष्ट प्रसंगाचीच फक्त गाणी, कधी फक्त त्या हिरोची गाणी, कधी एखाद्या शब्दा वरून गाणी. असे भेंड्यांमधले वैविध्य मी पहिल्यांदा तिकडे शिकले. आत्तापर्यंत नुसत्या अक्षरावरुन भेंड्या खेळले होते मी. एकंदरीत आठवडाभर काम आणि विकेंडला धमाल असं रुटीन चालू होतं.
परेश नवरात्री दरम्यान भारतात परतला. ऊमेशपण ऑक्टोबर एंडला परतला. आता त्या घरात मी पूर्ण एक महिना एकटी रहाणार होते. मला बघता बघता दीड महिना झाला. मी इथल्या वातावरणाला, थंडीला रुळले होते. मी ऑफिसमधून परत येताना पूर्ण अंधार असायचा आणि सडबरी स्टेशन ते घर हा १५ मिनिटांचा रस्ता तर पूर्ण निर्मनुष्य!! नोव्हेंबरची सुरुवात होती. चिलिंग कोल्ड होतं. हातात हॅंडग्लोव्हज्, कानटोपी, जाड जॅकेट आणि गळ्याभोवती मफलर अशी माझी वरात एकदा घरी चालली होती.मधला एक पॅच गोल्फ क्लबच्या मधून जात होता. दोन्ही बाजूला ग्रीन टेकाड, मधे छोटी पायवाट आणि दोन बाजूला कुंपण. तो ५ मिनिटाचा रस्ता आज खूप भितीदायक वाटला. समोरच्या बाजूला दोन धिप्पाड ब्लॅक लोकं कंपाऊंडवर कोणाची तरी वाट बघत बसली होती. त्यांना बघूनच माझ्या हाता-पायांना घाम फुटला. मी आजू-बाजूला पाहिले, एक काळं कुत्र नाही रस्त्यावर. गरज पडली तर हाक तरी कोणाला मारणार? अर्थात ते दुष्टच आहेत, हे धरुनच मी चालले होते. एरवी कोणी नसतं इथे, मग हे आजच का आहेत? पाळतं तर ठेवली नाही ना ह्यांनी? ते माझ्याकडेच का बघतायतं? मनात खूप भलते – भलते विचार यायला लागले.माझे हात-पाय थरथरायला लागले.तेव्हढ्यात मला लक्षात आले की, माझ्याकडे मोबाईल आहे. घाई-घाईत मोबाईल काढला. पण हॅंडग्लोवज् मुळे तो नीट ऑपरेट करता येईना. पटकन हॅंडग्लोव्हज् काढला आणि शैलेशला डायरेक्ट फोन लावला. त्याला सांगितलं, मी घरी पोहचेपर्यंत फोन ठेऊ नकोस. बोलत रहा. घरी जाऊन सांगते बाकी. आणि तो ५ मिनिटांचा रस्ता आणि पुढे ३-४ मिनिटे मी मोठ-मोठ्याने बोलत घरी पोहचले. ते खरचं कोणाची वाट बघत थांबले असतील, पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी ना चिंती ..
आता मी घराजवळ पोहचले तर हात कुठला सरळ व्हायला. त्या ५-७ मिनिटाच्या एक्सपोजरमुळे माझा हातच ताठरला. पटकन डाव्या हाताने लॉक ऊघडले आणि आत जाऊन आधी हिटरवर हात ठेवले. तेंव्हा कुठे ते नॉर्मल झाले. मग शांतपणे सगळा किस्सा शैलेशला सांगितला. मग मी शांत झाल्यावर त्याने सांगितले, अशा वेळी तिथल्या तुझ्या फ्रेंडला फोन करायचा, वर्स्ट केसमधे तो येऊ शकतो. इतकी साधी गोष्ट मला सुचली नाही. असो. असे एखाद-दुसरे टेंशनवाले प्रसंग सोडता, माझा सडबरिमधला एकटीचा स्टे खूप चांगला झाला.
अशा प्रकारे थोडी नर्व्हस सुरुवात, काही टेंशन देणारे अनुभव, नाण्याची दूसरी बाजू अश्या निगेटिव्ह अनुभवाच्या गोळा बेरजेतही तिथे मिळालेले मित्रमंडळ, नवरात्रीचा दांडिया, सडबरीला एकटे राहून तिथले वातावरण अंगवळणी पडून आलेला कॉन्फिडन्स ह्या जमा-खर्चाच्या हिशोबात जमेचाच हातचा अधिक होता.
— यशश्री पाटील.
Leave a Reply