निवडणूक जवळ आलीय.
निवडणूक, मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, एक वातावरण तयार करतेच.
प्रत्येक निवडणुकीची आपली अशी खास वैशिष्ट्य असतात.
लोकसभेच्या निवडणुकीचा पसारा खूप मोठा असतो.
विशेषतः उमेदवाराच्या दृष्टीकोनांतून हा पसारा मोठा असतो.
जेवढी मोठी निवडणूक तितका उमेदवाराचा खर्च जास्त.
सभा घ्या. त्याच्यासाठी स्टेज लावा.
लाउडस्पीकर लावा.
हा खर्च कमी वाटतो म्हणून की काय कोण जाणे पण सभेला श्रोते यावे यासाठीही पैसे द्यावे लागतात म्हणे.
शिवाय वर्तमानपत्रांत, टीव्हीवर, रेडीओवर नांव आणि चेहरा झळकण्यासाठी खर्च करावा लागतोच.
हँडबिलं, पोस्टर्स, फलक छापून/रंगवून घेणे आणि सर्वत्र वाटणे/चिकटवणे ह्यासाठीही वेगळा खर्च होतो.
मतांसाठी भांडी वाटली जातात.
भेटी दिल्या जातात.
ही सर्व काम करायला माणसंही लागतातच.
तात्पुरतं काम म्हटलं की गोमु हमखास ते करणारच.
गोमु ह्या निवडणुकीसाठी काय करतोय ते सध्या गुपित आहे.
पण मला आठवण झाली ती त्याने मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकींत केलेल्या कामाची.
▪
म्युनिसिपल निवडणुकीला गोमुच्या वॉर्डातून वीस तरी उमेदवार निवडणुकीला उभे होते.
सर्वच उमेदवार भरपूर खर्च करायला समर्थ होते.
आचारसंहीता होतीच पण जिंकणे महत्त्वाचे असं मानणारे उमेदवार होते.
उमेदवाराच्या बरोबर फिरणारे, त्याला सतत चिकटून असणारे अनुयायी फक्त फोटोपुरते असतात.
काम करायला वेगळी माणसं लागतात.
त्यांना पैसे द्यावे लागतात.
अगदी मोठ-मोठ्या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षांचीही हीच हालत असते.
मग लहानसहान पक्षांच तिकिट मिळवलेले आणि स्वतंत्र उमेदवार, यांना तर माणसे लागणारच.
गोमुने अशाच एका स्वतंत्र उमेदवाराचं काम करायला घेतलं होतं.
त्यांचं नांव होतं सूर्यकांत घाडगे.
हुशार वाचकांना माहितच आहे की अशा गोष्टी सांगताना नांव बदललेली असतात.
सूर्यकांत यांनी बिल्डर म्हणून नांव कमावलं होतं.
भरपूर माया गोळा केली होती.
आतां सूर्यकांतना नगरसेवक होऊन जनतेची सेवा करायची होती.
गोमुने त्यांचा प्रचार करायचं मान्य केलं होतं आणि ते निवडणुकीचा फॉर्म भरायला गेले, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तो त्यांच्या अॉफीसांत जाऊ लागला.
▪
कांही संकेत अलिखित असतात की काय कुणास ठाऊक ?
पण एखाद्याचं नांव सूर्यकांत असलं तर ९०% केसेसमध्ये त्याला चंद्रकांत नांवाचा धाकटा किंवा मोठा भाऊ असतोच.
आपले जुने मराठी हिरो नव्हते कां ?
चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे.
अगदी तसाच सूर्यकांत घाडगेंना चंद्रकांत नावाचाच पण धाकटा भाऊ होता.
दोघांनीही बिल्डरचा धंदा बरोबरच सुरू केला होता.
पण पुढे दोघांच्यांत प्रथम कांही क्षुल्लक बेबनाव झाला.
पुढे तो वाढत गेला आणि पहाता पहाता दोघे सख्खे भाऊ हाडवैरी झाले.
एकमेकांना पाण्यांत पाहू लागले.
घरांतल्यांना दोघांनीही तंबी दिली की कांहीही संबंध ठेवायचे नाहीत.
चंद्रकांतला जेव्हां कुणकुण लागली की सूर्यकांत निवडणुकीला उभा रहातोय, तेव्हां त्यानेही ताबडतोब निवडणुक लढवायचं ठरवलं.
ते ही त्याच वॉर्डातून.
त्याने पण आपली थैली उघडली आणि मतदारराजावर उधळण करायला तो सज्ज झाला.
त्याचा एक मदतनीस गोमुला ओळखत होता.
त्याने गोमुला मदतीला घ्यायचे ठरवले.
गोमु सूर्यकांत ह्यांच काम करतोय, हे त्याला ठाऊक नव्हते.
गोमुला वाटले दोघांचेही काम स्वीकारायला काय हरकत आहे.
मोठी मोठी वर्तमानपत्रे पैसे घेऊन नाही कां सर्वांच्या जाहिराती छापत ?
त्याने चंद्रकांत यांच्या प्रचाराचं कामही स्वीकारलं.
▪
सूर्यकांत घाडगे आणि चंद्रकांत घाडगे दोघांचही शिक्षण कमी झालं होतं आणि वक्तृत्वाच्या नांवानेही बोंब होती.
अजून शिकाऊच होते.
त्यांचा भर घरोघरी फिरण्यावर रहाणार होता.
तरीही कांही ठिकाणी छोट्या मोठ्या सभा घ्याव्या लागत.
त्या दोघांचीही भाषणे लिहायची कामगिरी हस्ते परहस्ते गोमुवर येत असे.
गोमुने अर्थातच माझ्याकडून चारपाच वेगवेगळी भाषणं लिहून घेतली होती.
व त्यांतच इकडेतिकडे बदल करून तो ती त्या दोघांना देत असे.
दोघांचीही भाषणं ऐकणाऱ्याला जाणवे की असंच भाषण आपण कुठे तरी ऐकलेलं आहे.
पण त्यांना त्यांत बिलकुल नवल वाटत नसे.
कारण निवडणुकीतली बरीच भाषणे सारखीच असतात.
आश्वासनांची खैरात करणारी.
सर्वच भावी नगरसेवक सांगत की त्यांना तुम्ही रात्री-अपरात्री सुध्दा कामाला हांक मारू शकता.
सर्वच तुमच्या सेवेसाठीच निवडणुकीला उभे असतात.
▪
पुढे पुढे तर उमेदवाराच्या वतीने भाषण करण्याचं कामही गोमु करू लागला.
एका गल्लींत तो एक दिवस सूर्यकांत घाडगेंसाठी भाषण देई.
तर दुसऱ्या गल्लींत दुसऱ्या दिवशी तो चंद्रकांत घाडगेंसाठी भाषण करत असे.
सुरूवातीला हे कुणाच्याच लक्षांत आले नाही.
पण सूर्यकांत-चंद्रकांतच्या एका दूरच्या नातेवाईकाच्या ते लक्षांत आले.
सूर्यकांत आणि चंद्रकांत यांच्या भांडणाच्या आगींत नेहमी काड्या टाकण्याचे म्हणा किंवा तेल ओतण्याचे काम नेहमी निष्ठेने तो करत होता.
स्मार्टफोनमुळे कुणीही व्हीडीओ बनवू शकतो.
त्याने गोमु चंद्रकांतच्या वतीने भाषण करतांनाचा एक व्हीडीओच केला.
तो त्याने सूर्यकांतकडे व्हॉटसॲपवर पाठवला.
गोमुच्या सुदैवाने तो सूर्यकांतने पाहिलाच नाही.
गोमु बहुदा सकाळी सातपासून दोनपर्यंत चंद्रकांतच्या निवडणुकीसाठीच्या अॉफीसमध्ये किंवा बाहेर काम करीत असे तर संध्याकाळी चारपासून अकरा बारा वाजेपर्यंत सूर्यकांतसाठी काम करीत असे.
पण तो दोघांच काम करतोय, हे फारसं कुणाच्या लक्षांत आलं नव्हतं.
दोघांकडच्या कामाच्या वेळेंत नाश्ता, सकाळ-संध्याकाळचं जेवण ह्या सर्वाची छान सोय झाली होती.
▪
निवडणूक आठ दहा दिवसांवर आली तेव्हां गोमुने सूर्यकांतच्या प्रचार प्रमुखाला सुचवलं की मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनी फोटो आणि आपलं निवडणूक चिन्हं असलेल्या पोस्टर्स सर्वत्र लावल्या आहेत.
सूर्यकांतनीसुध्दा निदान पांच सहाशे पोस्टर्स लावणं आवश्यक होतं.
त्या प्रचारप्रमुखाने सूर्यकांतची संमती घेऊन पांचशे पोस्टर्स छापून आणून त्या सर्वत्र चिकटविण्याचं काम गोमुवरच सोपवलं.
त्याच दिवशी संध्याकाळी गोमुने तीच सूचना चंद्रकांत यांनाही केली.
चंद्रकांतचा फोटो आणि चिन्ह असलेल्या पोस्टर्स तांतडीने छापून ताबडतोब सर्वत्र लावण्याची कामगिरी गोमुवरच आली.
गोमुचे काम सोपे झाले.
पनवेलला कांही तेव्हां निवडणुका नव्हत्या.
पनवेलच्या एका प्रिंटीग प्रेसचा मालक गोमुच्या ओळखीचा होता.
दोघा उमेदवारांकडून त्यांचे खास पोजमधले हात जोडलेले फोटो आणि “तुमच्या सेवेसाठी मी सज्ज आहे. मलाच निवडून द्या.” असे शब्द लिहिलेल्या प्रत्येकी पाचशे पोस्टर्सची अर्जंट अॉर्डर गोमुने त्या पनवेलच्या प्रेसला दिली.
▪
स्वतंत्र उमेदवारांना द्यावयाची चिन्हे ही वेगळी असतात.
निवडणूक मुख्याधिकारी ती प्रत्येक ऊमेदवाराला कळवतो.
सूर्यकांत ह्याला खुर्ची ही निशाणी मिळाली होती तर चंद्रकांत ह्याला बाक ही निशाणी मिळाली होती.
दोघांनी छापलेल्या हँडबिलांत योग्य तीच निशाणी छापली होती.
पनवेलच्या प्रेसमध्ये छपाईला मजकूर आणि फोटो दिल्यावर प्रेसवाल्याने गोमुला त्यांची निशाणी विचारली.
गोमुला ठाऊक होते की एकाचे चिन्ह बाक आहे आणि एकाचे खुर्ची पण बाक मोठ्या भावाचे की धाकट्याचे हे त्याला पटकन आठवले नाही.
त्याच्याकडे त्यावेळी हँडबीलही नव्हते.
फोन करून प्रचारप्रमुखांना विचारता आले असते.
पण गोमुला ते बरोबर वाटेना.
कारण आपण भाषण करतो. आपण आता स्टार प्रचारक आहोत आणि आपल्याला आपल्या उमेदवाराचे चिन्ह माहित नाही, हे समजल्यावर तो प्रचार प्रमुख रागावला असता.
त्याने थोडासा मेमरीला ताण दिला आणि सूर्यकांत यांच्या पोस्टर्सवर बाक आणि चंद्रकांत यांच्या पोस्टरवर खुर्ची छापायला सांगितली.
▪
पोस्टर्स छापून आल्या आणि रातोरात एका दोघा पोरांच्या मदतीने गोमुने त्या वार्डमध्ये सर्वत्र लावल्या.
सकाळ झाली तशी त्या पोस्टर्स सर्वांच्या नजरेस पडू लागल्या.
बऱ्याच जणांना कांहीच जाणवलं नाही.
परंतु कांही लोकांनी हँड बिलावरच्या सूर्यकांत आणि चंद्रकांत यांची चिन्हं पाहिली होती.
त्यांच्या लक्षांत आलं की सूर्यकांत यांचं चिन्ह खुर्ची आहे पण पोस्टरमध्ये बाक दाखवलं आहे तर चंद्रकांत यांच्या बाकाऐवजी खुर्ची छापली आहे.
लोकांच्यात कुजबुज सुरू झाली आणि पहातां पहातां तो कुचेष्टेचा विषय झाला.
सर्व एकमेकांना विचारू लागले.
कुणी तरी भीत भीत ही गोष्ट सूर्यकांत ह्यांना आधी सांगितली आणि मग दाखवली.
सूर्यकांत गरजले, “कुठे आहे तो xxx गोमु ? xxचं डोकं दगडाने ठेचतो. सिमेंटच्या भिंतीत गाडून टाकतो.”
चंद्रकांतना जेव्हां हे त्याच्या चमच्यांनी दाखवलं तेव्हां त्यांचीही प्रतिक्रिया अगदी तशीच होती.
फक्त “xxचं डोकं दगडाने ठेचतो” ऐवजी “xxचं थोबाड वीटेने फोडतो” असं ते म्हणाले.
दोघांचे सहाय्यक गोमुला शोधु लागले.
पण गोमुलाही एव्हांना आपली घोडचुक कळून चुकली होती.
तिचा दोघांवर काय परिणाम होईल ह्याचीही त्याला कल्पना आली.
तो कुठे गायब झाला ते कुणालाच कळलं नाही.
▪
दोघा उमेदवारांनी सगळ्या पोस्टर्स काढून टाकायचं ठरवलं.
परंतु कोणीतरी म्हणालं, “अहो चिन्ह बघून मत देण्याइतके अडाणी आहेत कां आपले मतदार ? लोक आतां नांव वाचतात आणि मत देतात.
चुकून जर चिन्ह पाहून देत असतील तर ‘त्या’च्या पोस्टरवरचं आपलं चिन्ह पाहून आपल्याला त्याची कांही मत मिळतीलच.”
दोघांनाही हा सल्ला पटला.
त्यांनी पोस्टर्स तशाच ठेवल्या.
प्रचार चालूच राहिला.
वेळेवर निवडणुका पार पडल्या.
मतदानाच्या दिवशी एक दोन ठिकाणी सूर्यकांत आणि चंद्रकांत यांची गांठ पडली.
मतदारांनी दोघांनाही मत देण्याचे आश्वासन दिलं होतं पण जशी मतमोजणी सुरू झाली तसा दोघांनाही अंदाज आला की आपण ह्या शर्यतीत कुठेच नाही.
शेवटी निकाल लागलाच किंवा निकालच लागला.
दोघांचही डीपॉझीट जप्त झालं होतं.
एका मोठ्या पक्षाचा उमेदवार खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आला होता.
चंद्रकांत आपल्या जागेवरून उठले आणि मोठ्या भावाकडे गेले.
“दादा, माफ कर. मी तुझ्याविरूध्द उभं रहायला नको होतं.” चंद्रकांत म्हणाले.
सूर्यकांत धाकट्या भावाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, “अरे, त्याने फार फरक नसता पडला. हे आपलं काम नाही. आपण आपला बिल्डरचा धंदा वाढवूया. पण त्या गोम्याला सोडायचा नाही. शोधून काढूया आणि धुवून काढूया त्याला.”
चंद्रकांतनी ह्या प्रस्तावाला लागलीच मान डोलावली.
दोघे भाऊ ह्या प्रकारामुळे आपलं वैर विसरून गोमुला कसं पकडतां येईल त्याचं प्लॕनिंग करू लागले.
▪
जिंकलेल्या उमेदवाराची मतमोजणी केंद्रावरूनच मिरवणूक निघाली.
सूर्यकांत आणि चंद्रकांत एकत्र असतानाच त्यांच्या एका त्यांच्या एका सपोर्टरने येऊन सांगितलं की गोमु जिंकलेल्या उमेदवाराच्या मिरवणुकीत नाचतोय.
अगदी पहिल्या रांगेत नाचतोय.
हे ऐकून चंद्रकांत म्हणाले, “चल दादा. आपण त्याचा आताच समाचार घेऊया.”
ते दोघे आणि त्यांच्याबरोबरचे कांही टगे ताबडतोब त्या मिरवणुकीच्या दिशेने गेले.
जवळ गेल्यावर एकजण आत घुसला आणि गोमुची कॉलर पकडून त्याला बाहेर आणू लागला.
गोमुही कांही लेचापेचा नव्हता.
त्याने झटक्यासरशी आपली कॉलर सोडवून घेतली आणि त्याच्या तोंडावर एक पंच मारला.
आता तिथे जुंपणार असं वाटत असतानाच विजयी उमेदवार वळले आणि विचारू लागले, “काय झालं ?”
तोपर्यंत तिथे आलेले सूर्यकांत आणि चंद्रकांत सांगू लागले, “ह्याने आमचा विश्वासघात केलाय. आमच्या दोघांकडूनही पैसे घेऊन आमच्या पोस्टर्स चुकीच्या छापल्या. आता तुमच्या मिरवणुकीत नाचतोय. ह्याला आमच्या दोघांच्या ताब्यांत द्या.”
विजयी उमेदवार म्हणाले, “अहो, झाली चूक त्याची पण ती चूक झाली नसती तरी तुम्ही काही निवडून येण्याची शक्यता नव्हती.
उलट आभार माना त्याचे.
तुम्ही सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झाला होतां.
त्याच्या चूकीने जी गडबड झाली त्यामुळे त्याला धडा शिकवायला म्हणून कां होईना पण वैर विसरून एकत्र आलांत.
खरं आहे की नाही.
बिचारा गोमु गेले सात दिवस माझ्या ऑफीसात लपला होता तुम्हाला घाबरून.
आता तुम्ही एक झालांत ना, तसेच आनंदाने रहा.”
सूर्यकांत आणि चंद्रकांत, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि कडकडून मिठी मारली.
मग विजयी उमेदवाराचा जिंदाबाद तर त्यांनी केलाच पण गोमुच्याही नांवाने एकदां मोठ्याने जिंदाबाद केला.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply