नवीन लेखन...

गोमु आणि परी (गोमुच्या गोष्टी – क्रमांक १९)

गोमुच्या आणि माझ्या भेटी कमी झाल्या होत्या.
फोनवर जुजबी बोलणं होई.
व्हाटस ॲपवर गुड मॉर्निंग, सुप्रभात होत असे.
पण गोमुची खरी खबर कळत नसे.
गोमुच्या पार्टीनंतर जवळजवळ तीन महिने आमची भेट झाली नाही.
हे अगदीच विचित्र होतं पण आम्ही दोघेही आपल्या कामांत व्यस्त होतो.
पाहुणा म्हणून वृत्तपत्रांत लेखन करायला सुरूवात केली त्याची परिणती पांच वर्षांनी मी एका छोट्या वृत्तपत्राचा उपसंपादक होण्यांत झाली होती तर गोमु त्याचे हॉटेल उत्तम चालवण्याच्या कामांत व्यस्त होता.
फोनवर कामासंबंधी बोलणं होई पण उत्तर ‘ठीक चाललंय’ असंच असे.
पार्टीनंतर तीन महिने आणि वीस दिवस झाले असतां फोनवर गोमु मला म्हणाला, “पक्या, यार, कसाही वेळ काढ पण आज मला तुला भेटायचय. तेही तुझ्या खोलीवर.”
मी विचारले, “ कांही विशेष ?”
तो म्हणाला, “ते आल्यावर सांगतो तुला. तू साडेसातपर्यंत येशील ना घरी ?”
“हो. साडेसातला मी घरी असेन. तू आज माझ्या डब्यांत जेव. मी दोघांचं जेवण मागवतो.”


“परी आहे रे ती परी. नावाने आणि रुपाने.”
संध्याकाळी गोमु मला सांगत होता.
*“प्रत्येक स्त्री आपल्या परिने परीच असते,* बरं कां गोमाजीशेट.” माझं सुवचन.
चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आलंच असेल की गोमु पुन्हा प्रेमांत पडला होता.
पण हा संवाद होण्याआधी काय काय झालं ते प्रथम सांगतो.
मला त्याने सकाळी फोन केला तेव्हांच मला वाटले होते की तो असेच काही सांगणार तर नसेल?
पुन्हां कुणाच्या प्रेमात तर नाही पडला ?
गोमु खरंच पुन्हां प्रेमांत पडला होता.
मध्ये एक दोन वर्षे अशीच गेली होती, हेच आश्चर्य होतं.
आतां हॉटेलच्या कामांत इतका व्यस्त असतांना हा प्रेमांत पडला होता.
गोमुने आम्ही भेटल्यावर, फार वेळ न घालवतांच मला विचारलं, “‘आपले हॉटेलच्या बाजूला दुसरे हॉटेल येणार असे मी म्हटले होते ना तुला ? आठवतंय कां ?”
मी मानेने होकार दिला तसा तो पुढे म्हणाला, “त्या हॉटेलची मालकीण एक बाई आहे असं मी म्हटलं होतं, तेही नक्की आठवत असेल तुला !
काम चालू झाल्यावर एक दोनदां ती येऊन गेली होती पण मी तिला पाहिली नव्हती.
ते हॉटेल सुरू व्हायची वेळ जवळ येऊ लागली तशी ती पुन्हा पुन्हा यायला लागली.
मग मी तिला पाहू शकलो.”


“मी तिला प्रथम पाहिली तेव्हां संध्याकाळचे साडेपाच वाजले होते.
दिवस लहान असल्यामुळे उजेड कमी होता.
ती तिच्या कारमधून उतरली आणि मला एकदम उजेड वाढलेला वाटला.
काय रूबाब होता रे तिचा.”
गोमु तिच्या पहिल्या दर्शनाचं वर्णन तिसऱ्यांदा करत होता.
“ती तिथल्या दोन पायऱ्या चढून वर आली आणि नव्या हॉटेलचं इंटीरीअरचं काम करणारा धांवत आला.
तिच्या तयार होणाऱ्या हॉटेलात जायच्या आधी तिने एक नजर आमच्या हॉटेलकडे टाकली.
मी दरवाजाशीच उभा होतो.
तिची माझी क्षणभर नजरानजर झाली.
पक्या, मी त्या क्षणीच तिच्या प्रेमात पडलो.”
मी म्हणालो, “गोमु, हे तुझं नेहमीचचं आहे. सांभाळ स्वत:ला. मुख्य म्हणजे तुझं हॉटेल सांभाळ. दोन्ही घालवून बसशील.”
माझा सल्ला व्यवहारी होता.
“पक्या, धीस इज फायनल. ही नाही तर कुणीच नाही.”
मी परत त्याला म्हणालो, “अजून तिचं नांव माहिती नाही. तिच्याशी बोलला नाहीस आणि असं बोलायला लागलास. चल, पहिल्यांदा खाऊन घेऊ या.”


मी डबा उघडला आणि त्याच्यापुढे ठेवला.
पण एऱ्हवी खाण्यावर तुटून पडणाऱ्या गोमुचं आज खाण्याकडे लक्ष नव्हतं.
तो म्हणाला, “तिचं नांव मला कळलं. मी ते त्या इंटीरीअरवाल्याकडून माहित करून घेतलं.
परी, परी नांव आहे तिचं.
नांवाने आणि दिसायलाही परीसारखीच आहे.”
“तू कधी खरी परी पाहिली आहेस ?
*प्रत्येक स्त्री आपल्या परिने परीच असते.”* इति मी.
वर दिलेला संवाद असा झाला आमच्यांत.
त्या दिवशी मी परत परत त्याला सावध करत होतो की तुला तुझं काम महत्त्वाचं आहे.
“अन्वयने तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
हॉटेल चांगलं चालणं महत्त्वाचं आहे.
तू तिच्या प्रेमात पडलायस पण ती तर तुझी स्पर्धक आहे.
तुझं हॉटेल नाही चाललं तर तुझं कांही खरं नाही.”
गोमु म्हणाला, “हॉटेल आतां मस्त चाललंय रे. नांव झालंय.
कांही जण तर नियमित येतात.
मला ती काळजी नाही.
फक्त परीशी ओळख कशी काढायची हाच प्रश्न आहे.
असं करू कां ?
पुढल्या वेळी ती आली की तिला हेल्प ऑफर करू कां ?”
माझ्या लक्षांत आलं की हे प्रकरण आता हे प्रकरण कसेही वळण घेऊ शकते.
आपण ह्याला कितीही सांगितलं तरी हा आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.


त्यानंतर फोनवरच त्याने मला सांगितलं, “पक्या, परीच्या हॉटेलचं येत्या रविवारी उद्घाटन आहे.
सर्व व्यवस्था मीच बघतोय.”
मी विचारलं, “तुझी ओळख कधी झाली ?”
गोमु म्हणाला, “तुला भेटलो त्यानंतर चार दिवसांनी ती कामाचा प्रोग्रेस पहायला परत आली.
अँड आय ऑफर्ड हर हेल्प.
ती इतकी गोड हंसली म्हणून सांगू, अगदी मध उधळल्यासारखा वाटला.
मी खलास.
ती म्हणाली, ‘तुम्ही मला मदत करणार ? किती छान !
मी तर गोंधळून गेलेय.
मला मदत हवीच आहे.’
मग काय सगळ्या गोष्टींचा मी चार्ज घेतला.”
मी म्हणालो, “धन्य आहे तुझी.
पण ह्यांत तुझ्या हॉटेलकडे दुर्लक्ष होत नाही ना !”
गोमु म्हणाला, “बिलकुल नाही.
आमच्याकडे संध्याकाळी सातनंतर जागा मिळणे मुष्कील होते.
प्रॉफीट डबल झालाय.
मी अन्वयला सगळं रिपोर्ट करतो.
त्याचं मार्गदर्शनही घेतो.”
तरीही मी त्याला म्हणालोच, “गोमु, सांभाळून.
आपल्याच हातांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नकोस म्हणजे झालं.”
गोमुचा आत्मविश्वास नेहमीप्रमाणेच जबरदस्त होता.“
तशी कांही शक्यताच नाही.
पण रविवारी ये तू उद्घाटनाला.”


रविवारी सकाळी अकराला परीच्या हॉटेलचं उद्घाटन झालं.
स्थानिक नगरसेवक आले होते.
इतर पाहुणे होते.
मी परीला पाहिलं.
ह्यावेळी गोमुची निवड ठीक होती.
परी खरंच आकर्षक होती.
तिचे डोळे बोलके होते.
ओव्हलशेप चेहरा छान होता.
अंगाने मध्यम होती.
जाडी नाही की बारीक नाही.
हल्ली मुली एकतर खाण्यावर ताबा नसल्यामुळे जाड्या असतात किंवा डाएटींगच्या फॅडमुळे बारीक तरी असतात.
मुख्य म्हणजे तिचं वागणं नम्र होतं आणि हंसणं छान होतं.
मला ती गोमुला जोडीदार शोभेलशी वाटली.
गोमु थोड्या वेळाने कुठून तरी आला आणि माझ्या कानांत कुजबुजला, “आहे की नाही परीसारखी परी.
चल मी तुझी ओळख करून देतो.”
माझ्या हाताला धरून तो मला परीकडे घेऊन गेला.
“हा माझा खास मित्र.
प्रकाश कलबाडकर.
लेखक आहे हं !
सध्या वर्तमानपत्रांत लिहितो पण एक दिवस लेखक म्हणून नाव काढणार.”
परी हंसली आणि म्हणाली, “तुमच्याबद्दल खूप ऐकलयं मी.
नेहमी बोलण्यात तुमचं नांव असतं.
खूप दिलदार आहेत तुमचे मित्र.
स्वत:चं हॉटेल बाजूला असतांना ते मला हॉटेल काढायला मदत करताहेत.”


त्या दिवशीच माझी खात्री झाली की “आग दोनो बाजू बराबर लगी है.”
मी दुसऱ्या दिवशी गोमुला फोन केला आणि विचारलं, “गोमु, काय अभिनंदन करायचं कां ?
परीला प्रपोज केलंस ना !”
गोमु म्हणाला, “नाही रे ! सगळं मस्त चाललंय.
पण विचारायची हिम्मत होत नाही.
“नाही” म्हणाली तर काय करणार ?
जरा तिचं हॉटेलही सेटल होऊ दे.
एक दोन आठवड्यांत विचारतो.”
त्यानंतर महिन्याने असेल, मीच एका संध्याकाळी अचानक त्याच्या हॉटेलमधे गेलो.
गोमु हॉटेलमध्ये नव्हता.
गोमुचा सगळा स्टाफ मला आता ओळखत होता.
त्याचा सुपरवायजर येऊन मला काय हवं वगैरे विचारू लागला.
मी त्याला विचारले, “मॅनेजरसाहेब कुठे आहेत ?”
तो म्हणाला, “तुमच्याचं हॉटेलमध्ये.”
मी म्हटलं, “ काय ? माझ्या हॉटेलमध्ये ? म्हणजे ?”
त्यावर खुलासा करत तो म्हणाला, “साहेब, बाजूचं हॉटेल आहे ना त्याचं नाव आहे “तुमचंच हॉटेल”, म्हणून मी म्हटलं तसं!
साहेब, त्या हॉटेलात गेलेत.”
मी विचारलं, “केव्हां येतील ?”
“ते कांही सांगतां येत नाही. रोज बहुदा बाईसाहेब गेल्या की येतात.”


‘बाईसाहेब’ म्हणजे कोण हे मी अंदाजाने ओळखले.
म्हणजे गोमुचे बरे चालले होते.
मी बसलो होतो, ते हॉटेल हाऊस फुल होते.
मी गोमुला फोन केला.
गोमु उचलेल की नाही, ही मला शंकाच होती.
पण त्याने उचलला.
“पक्या, लौकर बोल, मी जरा बिझी आहे.”
मी म्हणालो, “मला माहित आहे कशांत बिझी आहेस ते.
आता जरा थोडा वेळ काढ आपल्या जुन्या मित्रासाठी.
मी इथे तुझ्या हॉटेलात बसलो आहे.”
गोमु म्हणाला, “ओके. ओके. आलोच मी दोन मिनिटांत.”
गोमु लागलीच आला.
मी पहिला प्रश्न डायरेक्ट विचारला ?
“प्रपोजल कुठवर आलं ?”
गोमु त्यावर गप्प झाला.
मला वाटलं की कांही बिनसलं की काय ?
एक खोल श्वास घेऊन बाहेर टाकत गोमु म्हणाला, “तेवढं अजून जमलं नाही.
बाकी मी तुला सांगतो, तिचं हॉटेल एवढं फर्स्ट क्लास चाललंय की दुसऱ्याच महिन्यांत आमच्या इतकाच बिझनेस होईल.
‘आपलंच हॉटेल”च्या आणि तिथल्या डीशेसच वेगळ्या ठेवल्यात.
तिथे चायनीज, पाश्चिमात्य, अश्या भारताबाहेरच्या डीशेस ठेवल्यात आणि आपल्याकडे सगळं इंडीयन.
अपवाद फक्त पंजाबी डीशेस आणि स्टार्टर्स.
त्या दोन्हीकडे मिळतात.”
मी म्हणालो, “हे बरं झालं. नाही तर बाजूलाच हॉटेल आलं म्हणून काळजी वाटत होती.”
गोमु म्हणाला, “ह्या एक ते दीड कीलोमीटर अंतरात पस्तीस ते चाळीस रेस्टॉरंटस आहेत. एक अगदी बाजूला आलं तर त्यांत काय ?”


त्यानंतर फोनवर बोलणं होत होतं.
व्हॉटस ॲपवर मेसेजेस येत होते.
पण हवी ती बातमी गोमुकडून मिळत नव्हती.
म्हणजे अजूनही तो प्रपोज करायला धजावत नव्हता.
ती काही सतत तिच्या हॉटेलमधे नसे.
कधी दिवसांत एकदा तर कधी दोनदा ती हॉटेलात येत असे.
ती आल्याचे कळताच गोमु हातातले काम सोडुन तिच्या हॉटेलात जात असे.
त्याच्या सांगण्याप्रमाणे ती नेहमीच त्याचं स्वागत करत असे आणि मग दोघं गप्पा मारत बसत असत.
तिच्या आईला अजूनही बरं वाटलं नव्हतं.
त्याची तिला चिंता होती.
तिचं आईशिवाय जवळचं असं कुणीच नव्हतं.
वडिल लहानपणी गेले होते.
आईनेच वाढवलं होतं.
सख्खी भावंडही नव्हती.
मग एके दिवशी रात्री गोमुचा अपेक्षित फोन आला, “पक्या, दोस्ता, उद्या पार्टीला ये.
फक्त आपली तिघांची पार्टी.”
मी विचारलं, “म्हणजे तू हिंमत केलीस तर ! वाह रे, मेरे यार.
अभिनंदन पण हे कसं जमलं तुला ?”
तो म्हणाला, “अरे,काय झालं !
तिच्या आईची प्रकृती जरा आणखीच बरी नाही.
ते सांगतांना तिला रडू आलं.
ती रडायला लागल्यावर मी तिचा हात हातात घेतला.
दुसरा हात तिच्या पाठीवर फिरवून तिला शांत करू लागलो.
मी तिला म्हणालो, ‘काळजी करू नकोस.
मी आहे ना तुझ्या मदतीला.
मी तुझ्याबरोबर डॉक्टरांकडे येईन.
तुला हवी ती मदत करीन.
मी आहे ना !”
त्यावर ती म्हणाली, “असेच कायम रहाल माझ्या सोबतीला ?”


म्हणजे शेवटी गोमुलाच तिने प्रपोज केलं होत तर.
दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो, तेव्हां मी प्रथम तिच्या आईची चौकशी केली.
ती म्हणाली, “आई, आतां बरी आहे.
उद्या आम्ही दोघं तिला भेटायला माझ्या घरी जाणार आहोत.”
गोमु म्हणाला, “भेटायला आणि तिची संमती घ्यायला.”
परी म्हणाली, “हो, आईला मी अजून ह्यातलं कांही सांगितलं नाही.
ह्यांच्या डोळ्यात, बोलण्यात, वागण्यात, माझ्यासाठी जीव तोडून काम करण्यांत, यांच प्रेम मला दिसतं होतं.
पण ह्यांच्या तोंडून बाहेर येत नव्हतं ना ?
म्हणून मीच जरा आईच्या आजाराचं थोडं वाढवून सांगितले आणि रडण्याचे नाटक केलं.
तरी एवढचं म्हणाले, ‘मी आहे तुझ्या मदतीला.’
मग मलाच विचारावं लागलं.”
मी म्हणालो, “तुम्हां दोघांच अभिनंदन.”
ती म्हणाली, “एवढ्यांत अभिनंदन नाही स्विकारतां येणार.
मी आईच्या इच्छेविरूध्द कांही करणार नाही.”
इथे गोमुकडे एक तिरपा कटाक्ष टाकून ती म्हणाली, “आईला हा तुमचा मित्र जावई म्हणून पसंत पडायला हवा ना !”
गोमु म्हणाला, “परी, तू त्याची चिंता करू नकोस.
मी तुझ्या आईला अशी खूष करून टाकतो की ती लागलीच म्हणेल, “जांवई माझा भला.”
मी मात्र कल्पना करून पहात होतो की हा परीच्या आईला खूष करून येईल की कांही गडबड करून तिचा राग ओढवून घेईल !
प्रत्यक्षांत काय झालं ते पुढील भागांत सांगतो.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..