नवीन लेखन...

गोमु गुप्तधनाच्या शोधांत (गोमुच्या गोष्टी – भाग १२)

एकदा गोमु माझ्या खोलीवर आला तेव्हां त्याच्या हातांत एक जुनाट गुंडाळी केलेला कागद होता.
मी त्याला हे काय आहे म्हणून विचारणार होतो पण त्या आधीच तो म्हणाला, “इंग्रजीत चान्स ‘आॕफ लाईफ टाईम’ म्हणतात ना, तो आलाय माझ्या आयुष्यांत.”
मी त्याच्या तोंडाकडे पहातच राहिलो.
तो ती गुंडाळी उघडून कागद पसरत म्हणाला, “हा बघ, हा आहे नकाशा.”
मी म्हणालो, “ते तर दिसतंच आहे. की हा नकाशा आहे. पण कसला आहे ? कुठला आहे ?
आणि तो हातांत आल्याने तुला “लाईफटाईम चान्स” कसला मिळाला ?”
“हा साधासुधा कुठल्या तरी फडतुस जागेचा नकाशा नाही.
हा एका गुप्त खजिन्याचा नकाशा आहे.”
गोमुने गुपित उघड केलं.
“तो तुझ्याकडे कसा आला ?
कशावरून हा गुप्तधनाचा नकाशा आहे ?
कुठल्या गांवात आहे हा गुप्त खजिना ?”
मी गोमुवर प्रश्नांची सरबत्ती केली.
माझा अर्थातच त्यावर विश्वास नव्हता.
गुप्त खजिने फक्त जुन्या सिनेमांत आणि कथा-कादंबऱ्यात असायचे.
आता गुप्त कांही राहिलं नव्हत.
गुप्तधनासाठी जवळजवळ संपूर्ण पृथ्वी खोदून झाली होती.
समुद्रांचे तळही धुंडाळले गेले होते.
गोमुने एव्हांना कागद समोर पसरला होता.
तो म्हणाला, “पक्या, हा नकाशा एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी तयार करून घेतलेला आहे.
एका जुन्या बखरीत त्यांना सांपडलेल्या माहितीवरून त्यांनी हा नकाशा बनवून घेतला.
नकाशा बनवणाऱ्यालाही त्यांनी कांही सांगितलं नाही.
फक्त खाणाखुणांच वर्णन करून तो बनवून घेतला.”
“कोणाची बखर ? कुठे आहे ती ?” मी म्हटलं.
“ती बखर प्राध्यापकांना एका जुन्या वाड्यांत मिळाली होती. त्या वाड्यांतील कागदपत्रांच संशोधन करतांना त्यांना ती सांपडली होती.
त्या बखरीसकट सर्व कागदपत्र एका सरकारी म्युझियमच्या स्वाधीन करण्यात आले होते.
पुढे एका आगीत ते कागदपत्र आणि बखर नष्ट झाली.
प्राध्यापकांनी मात्र अभ्यास करतांना हा भाग मुखोद्गत केला होता.
कोणालाही न सांगता त्यांनी हा नकाशा बनवून घेतला.”
गोमु पुढे सांगत होता.

मला खात्री होती की त्याला कोणीतरी फसवलं असावं.
म्हणून त्याला अडवत मी विचारले, “किती पैसे दिलेस हा कागद मिळवायला ?”
“एक पैसा सुध्दा दिलेला नाही.”
गोमु म्हणाला.
“खरंच !” मी आश्चर्याने विचारले.
“प्राध्यापकांनी स्वतः मला तो दिलाय.”
गोमुने सांगितले.
पुढे गोमुने सांगितले त्यांतून मला निश्चितपणे कळले ते एवढेच की ते प्राध्यापक आता हे जग सोडून गेले होते.
त्यांच्या अंतःकाळी केवळ योगायोगाने गोमु त्यांना भेटला. तो हॉस्पिटलमध्ये कुणाला तरी भेटायला गेला होता.
त्या व्यक्तीचा रूम नंबर लक्षांत न राहिल्यामुळे चुकीने तो प्राध्यापकांच्या रूममध्ये गेला होता.
पण प्राध्यापकांनी त्याला बसवून घेतले होते.
मग लपवून ठेवलेला हा नकाशा त्याच्या स्वाधीन केला होता.
विजयनगरच्या साम्राज्याच्या कालखंडात उत्तरेकडून अल्लाउद्दीन खिलजी जेव्हां दक्षिणेत आला, तेव्हां शेवटचा राजा कृष्णदेवराय याच्याकडील एका मातब्बर मंत्र्याने आपल्याजवळील सर्व जडजवाहीर एका गुप्त ठिकाणी हलवलं असा स्पष्ट उल्लेख त्या बखरीत होता व पुढे ते गुप्त ठिकाण ओळखण्याच्या सांकेतिक खुणा सांगितल्या होत्या.
त्या सांकेतिक खुणा मात्र खुबीने सर्व बखरभर पसरल्या होत्या.
त्या सर्व खुणा प्राध्यापकांनी ओळखून मुखोद्गत करून ठेवल्या होत्या.
त्यानंतर तो खजिना शोधण्यासाठी त्यांनी आपल्या एका तरूण विद्यार्थ्याची मदत घेतली होती.
दुर्दैवाने शोधमोहिमेदरम्यान तो तरूण मलेरीयाला बळी पडला.
प्राध्यापकांचा शोध अर्धवट राहिला.
गोमुने शोध लावून त्यांतले अर्धे धन एका संस्थेला द्यायचे वचन प्राध्यापकांनी त्याच्याकडून घेतले होते.
त्यानंतर हॉस्पिटलची नर्स तिथे आली.
गोमु तिथून निघाला.
दुसऱ्या दिवशी त्याला कळले की त्याच रात्री ते प्राध्यापक निधन पावले होते.

गोमुची गोष्ट ऐकून मलाही ती खरी असावी असं वाटू लागलं.
हा नकाशा नीट पाहिला तर तो नाशिक जिल्ह्यांतील कांही ठिकाणे दाखवत होता.
त्यामध्ये नाशिकजवळील सिन्नर ह्या गांवाच्या बाहेर एका तलावाजवळ विशिष्ट खूण होती आणि तेच गुप्त खजिन्याचं ठिकाणं असावं असा प्राध्यापकांचा निष्कर्ष होता.
इ.स. १२४९ पर्यंत नाशिक विजयनगरच्या साम्राज्यांतील एका भागांत येत होते.
पण ते मुख्य राजधानीपासून लांब होते.
तेव्हां त्या मातब्बर मंत्र्याने इथे आपले जडजवाहीर लपवले असण्याची खूपच शक्यता होती.
सिन्नर कांही मुंबईपासून फार लांब नव्हते.
चार-पाच तासाचाच प्रवास होता.
पण खजिना शोधायचा काहीच अनुभव आमच्याकडे नव्हता.
म्हणजे लहानपणी ट्रेझर हंट हा खेळ आम्ही खेळले होतो.
परंतु त्यांत जागोजाग मार्गदर्शन करणाऱ्या चिठ्ठ्या असायच्या.
इथे तर आमच्याकडे ह्या नकाशा शिवाय दुसरं कांहीच नव्हतं.
आम्ही कधी सिन्नर किंवा नाशिकला गेलोही नव्हतो.
त्यामुळे सुरूवात कशी आणि कुठून करायची हे मला कळत नव्हतं.
अर्थातच प्लॅन करण्याचा मान गोमुचाच होता आणि मी तो हिरावून घेऊ इच्छित नव्हतो.
गोमु म्हणाला, “पक्या, आपण हा खजिना शोधायचा प्रयत्न करायचा. एवढी अचानक चालून आलेली संधी सोडायची नाही. तेव्हां आता तयारीला लागूया.”

असे म्हणत त्याने तो कागद गुंडाळी करून परत खिशांत ठेवला.
मग एखादा सेनापती जसा व्यूह रचतो किंवा चढाईची योजना आंखतो त्याप्रमाणे तो प्लॅन करू लागला.
त्याची पहिली पायरी म्हणून दोन्ही हात पाठीमागे धरून तो खोलींतल्या खोलींत फेऱ्या मारू लागला.
नेपोलीयन अशा फेऱ्या मारत असे, असं कुठेतरी वाचलं होतं.
बऱ्याच फेऱ्या मारून झाल्यावर तो म्हणाला, “प्रथम आपल्याला बरोबर कोणत्या वस्तु न्याव्या लागतील हे ठरवले पाहिजे.
गुप्त खजिना म्हणजे तो जमिनीत गाढलेलाच असणार.
तर खोदकामाचे साहित्य आपल्याला बरोबर न्यावे लागेल.”
मी म्हणालो, “बाप रे ! म्हणजे कुदळ, फावडं, पहार, घमेलं वगैरे न्यावं लागणार की काय ?“
“हो, ह्यापैकी कांही गोष्टी घ्याव्याचं लागतील. त्या तिथे गेल्यावरही घेऊन चालणार नाही कारण त्यांना आपल्या हेतुविषयी संशय येईल.
आपल्याला तर गुप्तता पाळणे आवश्यक आहे. काय ?” गोमुने प्रश्न केला.
“खरं आहे. पण एवढं अवजड सामान घेऊन आपण जाणार तरी कसे ?” मी विचारले.
माझ्या मनांत आतां यांतून बाहेर कसे पडतां येईल, हे विचार सुरू झाले होते.
पण मी पुरतां चक्रव्यूहांत अडकलो होतो.
गोमु म्हणाला, “आपण प्रथम तिथे जाऊ. कुठलीही लढाई करण्याआधी तळ कुठे ठोकायचाय, हे ठरवावं लागतं.
आपण पहाणी करून खजिन्याची जागाही नक्की करूया आणि त्यासाठी आपल्याला कुठल्या हाॅटेलांत अथवा भाड्याच्या घरांत रहाता येईल ते पाहूया.”

मग आम्ही वेळ न घालवतां सिन्नरला जायचे ठरवले.
त्यासाठी सायबर कॅफेच्या इंटरनेटवर जाऊन बसलो आणि नकाशामध्ये सिन्नर आणि आसपासच्या भागाचा थोडा अधिक अभ्यास केला.
तेव्हां आमच्या लक्षांत आले की ते ठिकाण एका मध्यम आकाराच्या तलावाजवळ होते.
त्या तलावाजवळच एक मारूतीचे मंदीर होते व त्याच्या मागच्या बाजूस तो तलाव आणि मंदीर ह्याच्यापासून समान अंतरावर होते.
आता आमचा हुरूप वाढला.
आम्ही त्या भागाच्या नकाशाचा अभ्यास केला.
त्यांत आम्हाला दिसलं की त्या तळ्याजवळच्या भागाला सरडवाडी म्हणतात.
ते एक छोटं स्वतंत्र गांवच होत म्हणा ना !
सिन्नरला रहायला बरीच ठिकाणं होती पण सरडवाडीला एकच ‘आनंद’ नांवाचा लाॅज होता.
तो त्या देवळापासून जवळ होता.
मग आम्ही तिथे जाऊन मुक्काम करायचे ठरवले.
गोमु म्हणाला, “आपल्याला जर खजिन्याचे ठिकाण शोधण्यात यश आले तर आपण जवळच्या गावांत जाऊन आवश्यक ती साधने विकत घेऊ.
पक्या, मला खात्री आहे की आपणच तो खजिना शोधून काढू. चलो सरडवाडी.”
आता गुप्त खजिना शोधाच्या मोहीमेने त्याचा पूर्ण ताबा घेतला होता.

ह्या जगांत माणसांनी ठरवलेले सगळे प्लॅन्स यशस्वी व्हायला काय हरकत आहे ?
पण आजवर असं झाल्याचं दिसून येत नाही.
भारतात निघालेला कोलंबस अमेरीकेत जाऊन पोहोचला.
मारी क्युरी शोध करत होत्या वेगळाच आणि त्यांना रेडियम सांपडलं.
अशा कितीतरी घटना असं दाखवतात की माणूस योजतो एक आणि होते दुसरेच.
ते दुसरेही जर चांगलेच असेल तर हरकत नाही.
पण नुसताच प्लॅन फसला तर सगळंच मुसळ केरात.
मुख्य म्हणजे त्यात घातलेले पैसे वाया जाणार होते.
त्यामुळे मला खूप धागधूग वाटत होती कारण नेहेमीप्रमाणे ह्या मोहीमेची आर्थिक बाजू मीच सांभाळायची होती.
खजिन्यांत मला अर्धा भाग मिळणार होता हे नक्की होतं.
मी गुपचूप बसच्या तिकीटासाठी, लाॅजमध्ये आठ दिवस रहाण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या खर्चासाठी पैसे जमवले.
माझे सगळे पैसे घेऊनही मला एका मित्राकडून हजार रूपये उधार घ्यावे लागलेच.
“पक्या कांही दिवसांचाच तर प्रश्न आहे. एकदा का खजिना आपल्या हातात आला की आपल्याला असा हात पसरावा लागणार नाही.”
हात पसरावा लागला होता मला.
गोमुला नाही. गोमु जेव्हां कोणाकडून उसने पैसे घेत असे तेव्हांही कधी त्याने पैशांसाठी हात पसरला आहे असं न दाखवतां, त्याला पैसे उसने देण्याची संधी देऊन त्याच्यावर मेहरबानी करतोय असंच भासवत असे.

एका दिवशी आम्ही सीबीडीला नाशिकची बस पकडली.
इथून थेट सिन्नरला जाणारी बस नव्हती.
नाशिकला पोहोचायला आम्हाला वाटेतल्या जागोजागीच्या ट्रॅफीक मुळे सात तास लागले.
वाटेत सटरफटर खाल्ल होतं पण नाशिकला पोहोचलो तेव्हा दोन वाजल्यामुळे सडकून भूक लागली होती.
मग नाशिकला जेवण घेतले.
तिथून पुढे सिन्नरला पोहोचलो.
सिन्नर हे आता गांव न वाटतां शहरच वाटत होते.
आम्ही सरडवाडीची चौकशी केली तर सर्वांनी ते ‘लई लांब’ असल्याचं सांगितलं आणि रिक्षाने जाण्याचा सल्ला दिला.
तिथे रिक्षा अर्थातच मीटरवर नव्हती.
रिक्षावाला आपल्या धंद्याला जागून तोंडी येईल ती किंमत सांगत होता.
शेवटी अडीचशे रूपये मान्य करावे लागले.
रिक्षांत बसलो आणि भरधाव निघालेली रिक्षा पंधरा मिनिटातच सरडवाडीला आनंद लाॅजवर पोहोचली.
मुंबईच्या हिशोबाने रिक्शाच्या एवढ्या अंतराचे फार तर पन्नास रूपये झाले असते.
माझे बजेट उलटसुलट होत होते.
पण मुक्कामी पोहोचल्याचा आनंद होताच.
गोमु तर आता आपण खजिन्याच्या समोरच उभे आहोत ह्या आविर्भावांत होता.
रिक्षाचे भाडे ठरवणे वगैरे मामुली बाबी सैनिकांनी पहायच्या.
सेनापतींचे लक्ष्य आपल्या ध्येयावर होते.

इथे फारशी गर्दी वाटली नाही.
सुदैवाने आनंद लाॅजमध्ये आम्हाला नेहमीच्याच दरांत पेशल खोली देण्यांत आली.
म्हणजे त्या खोलीला बाथरूम, टाॅयलेट आंत होती.
आनंद लाॅजचे जेवण साधे होते पण ठीक होते.
मांसाहारी जेवण हवे असल्यास एक दिवस आधी नोटीस आवश्यक होती.
आनंद लाॅजला पोंहोचेपर्यंत सात वाजले होते.
अंधार झाला होता.
थंडीचे दिवस होते.
तरीही गोमु म्हणाला, “आपण जेवायच्या आधी देवळाकडे फेरफटका मारून येऊयां. आराम करायला रात्र आहेच.”
एरव्ही कोणत्याही वेळी माझ्या खोलीवर आला तर माझ्या पलंगावर दिवसाही तंगड्या ताणून पडणारा गोमु आज मला हे सांगत होता.
मीही ती जागा पहायला उत्सुक होतोच.
आम्ही फेरफटका मारायला म्हणून निघालो.
मारूतीचे मंदीर आम्हाला दिसलं.
जुन्या काळचं मंदिर होतं ते.
विजेचे दिवे नव्हतेच पण कोणीतरी दोन पणत्या पेटवून गेलेलं होतं.
आम्ही मारूतीरायाला नमस्कार केला आणि मनांतल्या मनांत तुम्हांला जसं सीतामाईंना शोधण्यांत यश आलं तसं आम्हांला खजिना शोधण्यांत येवो अशी प्रार्थना केली.
मग देवळाच्या मागच्या भागाची पहाणी करायला निघालो.
देवळापासून तळे साधारण दोन किलोमीटर अंतरावर होते.
पण ह्या भागांतला रस्ताही कच्चा होता आणि आजूबाजूला थोडी झाडीही होती.
गोमुकडे टाॅर्च होता आणि तो खास नकाशा पहाण्यासाठी होता.
त्याने टाॅर्चचा प्रकाश नकाशावर आणि आजूबाजूच्या भागावर आळीपाळीने पाडला.
परंतु त्याला कांही अंदाज बांधता येईना.
प्रोफेसरांनी केलेली खूण साधारण तलावांचा कांठ आणि देऊळ यांच्या मध्यावर होता.
पण तेवढ्यावरून कांही अंदाज बांधणे कठीण होते.
मग आम्ही लाॅजवर परत आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळीच चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो.
नकाशावरून पुन्हां ती जागा शोधू लागलो.
देवळापासून तलावापर्यंतचे अंतर गोमुने आपल्या पावलांनी मोजले.
मग त्याचा मध्य काढला.
पण तिथे कांही खास खूण दिसेना.
जसजसा दिवस वर यायला लागला तसे थोडे लोक आजूबाजूला दिसू लागले.
त्यांच्या पुढ्यात नकाशा बाहेरही काढता येईना.
शेवटी आम्हीच तिथून काढतां पाय घेतला.
पुन्हां दुपारी दोन तीन वाजता शोध सुरू केला.
तिथे असलेल्या पिंपळाजवळ एक खड्डा पडलेला होता तिथे पूर्वीच कुणीतरी खणले होते असे वाटले.
गोमुने खड्ड्यातली माती हातात घेतली.
ती चोळून परत आत टाकत तो शेरलाॅक होम्सच्या स्टाईलमध्ये म्हणाला, “पक्या, ही माती किंचित ओलसर वाटतेंय. कोणीतरी अलिकडेच इथे खणलं असावं. म्हणजे आणिही कोणी तरी खजिन्याच्या मागावर असावे.”
मी म्हणालो, “मग त्यांनी खजिना नेलाही असेल.”
“मला नाही असे वाटत. कारण त्यांनी फार खोलवर खणलेलं वाटत नाही.”
गोमुची तर्कशक्ती मला थक्क करत होती.
परंतु त्याला आपण कुठे खणावयास पाहिजे याचा अंदाज येईना.
आम्ही जसाजसा आसपासचा भाग पहात होतो, तसातसा आमच्या मनांत संभ्रम निर्माण होत होता.
तिथे बऱ्याच ठिकाणी पूर्वी कुणीतरी खणलेलं असावं असं वाटत होतं.
त्या दिवशीही आम्ही हात हलवत परत गेलो.
आणखी एक दिवस त्या जागेची पहाणी करून गोमुने पिंपळाच्या झाडापासून सहा फुटांवरील जागा पक्की केली.
“पक्या, हीच जागा असली पाहिजे. पिंपळाची भर दुपारची सांवली इथपर्यंत पोंचते. नकाशात पिंपळ आहे आणि ती खूण सावलीपाशीच असावी.”
खरं तर नकाशावर पिंपळ नव्हता पण प्रोफेसरांच्या खूणेजवळचं एक चिन्हं झाडाचं वाटत होतं खरं.

त्याच दिवशी रात्री आम्ही परत नकाशाचा अभ्यास करायला बसलो.
थोड्या वेळाने त्या हॉटेलचे मालक अचानक आमच्या खोलींत आले.
गोमुने नकाशा लपवायचा प्रयत्न केला पण त्यांनी तो पाहिलाच.
ते हंसत हंसत म्हणाले, “काय ? खजिन्याचा नकाशा दिसतोय. खजिन्याच्या शोधांत आलांत वाटते.”
आम्हाला आश्चर्य वाटले की ह्यांना खजिन्याबद्दल कळले कसे ?
तोवर ते पुढे म्हणाले, “तुम्हालाही त्या प्रोफेसरांने पाठवले असेल ना ! वेडा हो वेडा. अगदी ठार वेडा.
खरं तर आमच्या नाशकांतला हुशार माणूस पण ह्या खजिन्याच्या वेडापायी फुकट गेला.
त्याच्या सांगण्यावरून सरकारी पहाणीसुध्दा करून झालीय.
‘असा खजिना असणे शक्यच नाही’ असा रिपोर्ट पण दिलाय.
तरीही तो अनेकांना नकाशाच्या काप्या वाटतो.
तुम्ही आलांत तेव्हा पहिल्याच दिवशी मला वाटले की तुम्ही पण खजिना शोधायला आलेत.”
मला त्यांचा राग आला.
गोमु मात्र कसल्यातरी विचारातच होता.
मी म्हणालो, “मग पहिल्याच दिवशी कां नाही सांगितलंत आम्हाला ?“
त्यावर हंसत हंसता ते म्हणाले, “मी वेडा नाही हो; आपणहून चालत आलेले गिऱ्हाईक घालवायला.
आता लोकांना मी थोडंच सांगतो इथे खजिना आहे म्हणून ?
पण प्रोफेसरवर विश्वास ठेवतात आणि येतात इथेच.”
मला त्यांचा आसुरी आनंद पहावेना.
मी म्हणालो, “पण आतां ते प्रोफेसर गेले वरती आणि त्यांना सांपडलेली बखरही जळली.
आतां नाही येणार कोणी खजिन्याच्या शोधांत.”
त्यांचा चेहरा पडला.
तरी वरवर हंसत ते म्हणाले, “अहो, असे वेडे प्रोफेसर काय कमी आहेत आणि जुन्या वाड्यांत बखरी हव्या तेवढ्या. दुसरा कुणी तरी प्रोफेसर हाच शोध लावेल. चालू द्या तुमचं.”
ते निघून गेले तसं मी गोमुला म्हणालो, “गोमु आता निघायला उशीर झालाय. पण उद्या सकाळी आपण मुंबईला जायचं. जाळून टाक तो नकाशा.”
गोमु तरीही आपल्याच विचारांत होता.
तो मला म्हणाला, “पक्या, ही मोहीम फसली असावी पण माझे मन मला सांगतयं की खजिन्याची गोष्ट खरी असणार.
प्राध्यापक आणि त्यांनी पाठवलेले आपल्यासारखे संशोधक, आपण ह्या मारूतीच्या देवळामागे खजिना शोधत राहिलो.
मला वाटते की खजिना तलावात असावा.
कारण तलावाच्या मध्यभागीही एक मारूतीचे देऊळ आहे.”
गोमुचा आशावाद चांगला असेल पण तरी तो माझ्या खिशाला परवडणारा नव्हता.
मी त्याला निक्षून सांगितले, “मी उद्या सकाळी मुंबईला जाणार. तुला तळ्यांत पोहायची हौस असेल तर आता जा आणि पहाटेपर्यंत परत ये.”

— अरविंद खानोलकर.

फोटो-सरडवाडी, सिन्नर, अशोक फडके यांचे सौजन्याने.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..