नवीन लेखन...

गोमु पैज घेतो (गोमुच्या गोष्टी – भाग ११)

विजापूरच्या बादशहाने शिवाजी राजांना धरण्याचा/मारण्याचा पैजेचा विडा दरबारांत ठेवला होता.
तो अफजलखानाने उचलला.
त्याचे पुढे काय झाले ते आपल्याला माहित आहेच.
तेव्हां कुठलीही पैज घेणं ही गोष्ट सोपी नाही.
मला वाटते पैज घेणे किंवा कठीण गोष्ट करायचे आव्हान देणे हे पुराणकालापासून चालत आलेलं असावं.
महाभारतात असे बरेच प्रसंग आहेत.
प्रतिज्ञा आणि पैज यांत अर्थातच फरक आहे.
प्रतिज्ञा करणाऱ्याला कुणी आव्हानही देत नसत आणि नंतर बक्षिसही देत नाही.
पैज घेतांना एक आव्हान देणारा असतो आणि दुसरा ते स्वीकारणारा असतो.
पैज जिंकला तर जिंकणाराला काय मिळणार आणि तो हरला तर काय द्यावं लागणारं हे पैज घेतानाच ठरतं.
त्यादृष्टीने महाभारतांतला द्यूत खेळण्याचा प्रसंग पैज ह्या सदरांत मोडतो.

तुम्ही म्हणाल, “पक्या, हे दळण कशासाठी ?” तर सहजच.
कांही लोकांना संवय असते की जरा कांही कठीण गोष्ट वाटली की ते ताबडतोब म्हणतात, “चल, लागली पैज ?”
दुसरा जर तयारीचा असला तर तो लगेच म्हणतो, “चल, लागली. केवढ्याची ?”
त्याला जर खात्री असली की हे आपण सहज करू शकतो तर तो पुढे म्हणतो, “हजार, हजार रूपयांची लावतोस ?”
मग पहिल्याने जर विचार न करतां पैजेच आव्हान दिलं असलं तर तो म्हणतो, “एवढी मोठी नाही. दहा रूपयांची ठीक आहे. सहज मजा म्हणून”.
केव्हां केव्हां तो पैज मागेही घेतो.
गोमुच्या समोर कुणी कसलीही पैज लावण्याचं, आव्हान देण्याचा अवकाश, गोमु ती पैज ताबडतोब स्वीकारत असे.
एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीला शब्द मागेही घेऊ देत नसे.
“पैज म्हणजे पैज. लावायची नव्हती तर बोललास कशाला ?” असा त्याचा खडा सवाल असे.

अनुभवाने आम्हां मित्रांपैकी कुणी कसली पैज लावण्याबद्दल गोमुसमोर बोलत नसे.
बरेच जण गोमुशी पैज लावून पस्तावले होते.
खाण्याबद्दलची पैज म्हणजे गोमुला क्रिकेटच्या भाषेंत “वॉक ओव्हर” होता.
लग्नांत पन्नास जिलब्या खाण्याची पैज, एकावेळी वीस अंडी खाण्याची पैज, एका वेळी पंधरा आईस्क्रीम खाण्याची पैज, दहा पुरणपोळ्या फस्त करण्याची पैज, अशा कितीतरी खाण्याच्या पैजा जिंकून त्याने अनेकदा मित्रांचे खिसे हलके केले होते.
त्यामुळे खाण्याच्या कुठल्याही पैजेची गोष्ट त्याच्यासमोर काढली जात नसे.
लोकल रेल्वेने फुकटांत प्रवास करण्याची पैज लावणंच मुळांत हास्यास्पद होतं पण कुणीतरी लावलेली ती पैजही गोमुने जिंकली होती.
आमंत्रण नसलेल्या लग्नांत जेऊन येण्याची पैज हीसुध्दा तो सहज जिंकला होता.
इतरही अनेक त्याला झेपणार नाहीत असं वाटलेल्या चालण्याच्या अथवा धांवण्याच्या पैजाही त्याने जिंकल्या होत्या.
कदाचित पैजेपायी मिळणारे पैसे त्याला बळ देत असावेत.
परंतु त्यामुळे आमचा कुणीही मित्र गोमुसमोर “चल लागली पैज ?” हे शब्द उच्चारत नसे.
तो अलिखित नियमच झाला होता.
परंतु एका मित्राचा मावसभाऊ मितेश आमच्याबरोबर असतांना त्याने पैजेचा विषय गोमुसमोर काढलाच.

मितेश म्हणाला, “हल्ली टी. व्ही. वरच्या बऱ्याच विनोदी कार्यक्रमांत विनोद म्हणून पुरूष बाईचा वेष घेतात पण ते सहज ओळखतां येतात.
हुबेहुब बाईसारखं सोंग कोणी घेऊ शकेल असं मला वाटत नाही.”
गोमु म्हणाला, “कां नाही असं सोंग घेता येणार ?
बालगंधर्व स्त्रीवेष घेऊन हळदी कुंकुवाला पण जाऊन आले होते म्हणतात.”
त्यावर मितेश उत्तरला, “ती बहुधा दंतकथा असेल.”
गोमु म्हणाला, “मला नाही खोटं वाटतं ते.
माहित नसलं तर बाईच्या वेषांतल्या पुरूषाला नाही ओळखू शकणार कोणी ?
फार फार तर पुरूषी दिसणारी बाई समजतील त्याला.. हा..हा..”
मितेश आता इरेला पेटून म्हणाला, “मी यावर पैज घ्यायला तयार आहे. आहे कुणी तयार ?”
गोमु म्हणाला, “कितीची पैज लावणार ते बोल.”
बाळूची पहिली बोली हजाराची होती.
त्यावर गोमुने त्याच्या लक्षांत आणून दिलं की बाईचा वेष भाड्याने घ्यायला सुध्दा हजार रूपये पुरणार नव्हते.
कमीत कमी दहा हजाराची पैज लावली तर तो ही पैज घ्यायला तयार होता.
मितेश म्हणाला, “तू पैज घेणार असशील तर मी तुला एका महिला मंडळाच्या एखाद्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रण तुला मिळवून देईन. म्हणजे मंडळ तुला ५००० रूपये मानधन देईल.”
गोमु म्हणाला, “मग आणखी पांच हजार तू दे. तूझाही साॅलिड स्टेक पाहिजे ह्यांत.”
मितेश आता थोडी काचकुच करू पहात होता.
पण आम्ही सर्वांनीच त्याला माघार घेऊ दिली नाही.
एवढेच नव्हे तर पांच हजार रूपये दोघांनीही आगाऊ आमच्याकडे दिले पाहिजेत हेही ठरले.

मग पैजेच्या बाकीच्या अटी ठरल्या.
मितेश गोमुला जवळच्याच म्हणजे नेरूळच्या महिला मंडळाचे ज्योतीष या विषयावर भाषण करण्याचे आमंत्रण आणून देणार होता.
गोमुने ‘गोमती गोरे’ हे नांव घेतलं होतं.
मंडळाला कुमारी गोमती गोरे ह्या एक प्रसिध्द ज्योतीषी असल्याचे सांगायचे ठरले.
आम्हां सर्वांना हे ऐकताना गोमुचा खूप हेवा वाटला.
कारण तो आतां भविष्य बघायच्या निमित्ताने सर्व बायांचे हात हातात घेणार, हे आमच्या लक्षांत आले.
अर्थात त्याआधीच त्याचे सोंग उघडकीला आले तर त्याच हातांनी त्याला मार खावा लागणार होता.
गोमुने मंडळांत जायचं, पाहुणचार स्वीकारायचा, बायकांशी बोलायचं, भाषण द्यायचं, हा सगळा दोन तासांचा कार्यक्रम होता.
मंडळ पाहुण्या बाईंना ५००० रूपये पाकीटांत घालून देणार होते.
मग त्यांनी टॅक्सीत बसवलं की झालं.
तोपर्यंत गोमुला कोणीही जर पुरूष म्हणून ओळखले नाही तर तो पैज जिंकणार होता आणि मितेशला त्याला आणखी पांच हजार द्यावे लागले असते.
जर त्याला बायकांनी आधीच ओळखले आणि पोलिसांत तक्रार केली तर काय होईल त्याची जबाबदारी गोमुची.
जर बायकांनी पुरूष आहे हे ओळखले आणि पैसे दिले नाहीत तर गोमुने पैज हरल्याचे पांच हजार मितेशला द्यायचे.
पुरूष म्हणून ओळखूनही जर पैसे दिले तर ते पांच हजारसुध्दा मितेशचे.
आम्ही सर्व साक्षीदार.

मंडळाच्या कार्यक्रमाला दोन आठवड्यांचा अवकाश होता.
गोमुने पहिली प्रॅक्टीस सुरू केली ती बाईच्या आवाजांत बोलायची.
तो बाईचा आवाज सहज काढत असे.
पण दोन चार वाक्य बाईच्या आवाजात बोलणं आणि दोन तास ते सोंग सांभाळणं यांत फार फरक होता हे गोमु ओळखून होता.
एकदा तो माझ्याबरोबर माझ्या खोलींत बोलत असतांना माझ्या खोलीचे मालक अचानक आले आणि बाईला शोधू लागले.
ते म्हणत होते, ‘मी आता बाईचा आवाज ऐकला.’
मी कशीबशी त्यांची समजूत घालून त्यांना बाहेर काढले.
गोमुला बोलण्याखेरीज साडी नेसायला, साडीमध्ये सहज वावर करायला, बायकांचे हावभाव करायला आणि विशिष्ट बायकी शब्द म्हणजे, ‘अय्या’ ‘इश्श’ बोलायला वगैरे शिकायचे होते.
ह्या सर्वाची प्रॅक्टीस तो माझ्याच खोलींत करणार होता.
पण मालकांच्या भीतीमुळे मी त्याला नकार दिला.
मालक ओरडतील ही भीती तर होतीच पण मोरूची मावशीमध्ये झालं तसे तिच्या प्रेमांत पडले तर आणखी नवंच झिंगाट.
मग तो मला घेऊन एका निर्मनुष्य मैदानावर जाऊन तिथे ह्या गोष्टींचा टिच्चून सराव (म्हणजेच प्रॅक्टीस बरं कां) करू लागला.
आठ दिवसांत तो बेमालुमपणे बाईच्या आवाजात हवा तितका वेळ बोलू लागला.
हावभाव करू लागला.
जय्यत तयारी केली त्याने.

कार्यक्रमाच्या दिवशी मी कु. गोमती गोरेंना टॅक्सींत बसवले आणि टॅक्सी नेरूळच्या दिशेने निघून गेली.
गुबगुबीत गोमु गोमती गोरे, ज्योतीष विशारद शोभत होता.
गळ्यांत एक रस्त्यावर दहा रूपयांना विकत घेतलेली मण्यांची माळ घातली होती.
हातांत बांगड्यांबरोबर एक लाल जाड धागाही बांधला होता.
पुढे काय झाले ते जाणण्याची उत्सुकता तुम्हाला वाटत असेल ना !
मी तर त्या रात्री त्याच्या येण्याची वाटच पहात होतो.
पठ्ठ्या यशस्वी होतो कां मार खाऊन येतो, ह्याची मलाही उत्सुकता होती.
गोमु आला आणि अंगावर कुठे पट्ट्या नव्हत्या म्हणजे मार खाऊन नव्हता आला.
पण त्याचबरोबर पैज जिंकल्याचा खूप आनंदही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता.
तो थोडा घुश्शातच वाटला.
मी विचारलं, “गोमु, पैज जिंकलास ना !”
ह्या पुढचा भाग त्याने मला जे सांगितले त्यावरून मी लिहिला आहे.
गोमु टॅक्सींतून महिला मंडळाच्या दारांत उतरला.
‘पाहुण्यांनी वेळेवर पोंचायचं नसतं’ हा साधा प्राथमिक नियम त्याने पाळला नव्हता.
कार्यक्रमाला वेळेवर किंवा आधी पोहोंचणाऱ्या पाहुण्याची साधारणपणे आपल्याकडे जी हालत होते, तीच त्याची झाली.
कोणीही त्याचं स्वागत करायला दाराशी हजर नव्हतं.
तो तसाच आंत गेला.
छातीत थोडं धडधडत होतं.
पण दहा हजार रूपयेसुध्दा त्याला खुणावत होते.
दहा हजार रूपये जिंकायची आशा जबर होती.
आंतही हॉल जवळजवळ रिकामाच होता.
प्रेक्षकांसाठी मांडलेल्या खुर्च्यांवर चार-पांच जणी गप्पा मारत बसल्या होत्या.
त्यांच काही गोमुकडे लक्ष नव्हतं.
त्या आपल्या गप्पांत गुंग होत्या.
गोमुला कोणी ओळखणारंही नव्हतं.
गोमु जाऊन प्रेक्षकांतल्याच एका खुर्चीवर बसला.
अर्थात ज्योतिष विशारद कुमार गोमती गोरे म्हणून तो तिथे बसला होता.
पण अजून ती ओळख कुणाला झाली नव्हती.

कु. गोमती गोरेंना त्या चार-पांच बायकांच बोलणं सहज कानावर येत होतं.
एक म्हणाली, “काय ग बाई ! ज्योतिषी बाईला कशाला बोलावलयं ह्या आपल्या मूर्ख सेक्रेटरीने ?”
“नाही तर काय ! निदान एखाद्या ज्योतीषीबुवाला तरी बोलवायचा नाही कां ?
म्हणजे हात हातांत द्यायला तरी बरं वाटलं असतं हिला, होय की नाही ?” दुसरी म्हणाली.
तशा सर्व हंसल्या.
पण गोमुच्या छातीत धस्स झालं.
पहिली म्हणाली, “चावटपणा पुरे.
माझं म्हणणं एखाद्या पाककलेच पुस्तक लिहिलेल्या बाईला बोलवायचं होतं.
काही तरी नविन शिकतां आलं असतं.”
“पाककलेची पुस्तकं लिहिणाऱ्या बायकांना स्वयंपाक बहुदा नाहीच करतां येत.
ती आपल्याला काय शिकवणार ?” तिसरी म्हणाली.
“हो त्यापेक्षा ही ज्योतीषी बरी आहे.
प्रश्न विचारून भंबेरी उडवूया तिची.”
दुसरी म्हणाली.
परत मोठा हंशा झाला.
गोमुचा धीर खचला.
तो तिथून पळून जायचा विचार करू लागला.
एव्हांना कांही बायका प्रेक्षकांच्या जागा भरू लागल्या होत्या तर एक दोन जणींची हाॅलमधल्या एकमेव टेबलजवळ धावपळ सुरू झाली होती.
टेबलावर पांढराशुभ्र टेबल क्लॉथ, त्यावर एक फूलदाणी, त्यांत फुलांची रचना, पाण्याचा तांब्या अशी सर्व तयारी त्या करत होत्या.
हॉल छोटाच असल्यामुळे माईक नव्हता.
“ही कोण जी ‘गोमटी’ येणार आहे ना तिचंच भविष्य आज बदलणार आहे मी. कसला भंपकपणा.
एकविसाव्या शतकांत ह्या अंधश्रध्दा. बघतेच मी तिला.”
आतापर्यंत गप्प असलेली भक्कम देहाची, पु.लं. च्या भाषेतली, एक विशाल महिला आवेशांत बोलली.
तिचे बोलणं ऐकताच गोमुचं उरलं सुरलं धैर्य संपलं.
दहा हजार रूपयांवर पाणी सोडायला लागेल हा विचारही आला नाही.
तो चक्क पळून जाण्यासाठी दरवाजाकडे गेला.

तो दारांत असतानाच एक पस्तीशीच्या सुंदर आणि स्मार्ट मॅडम आंत आल्या.
गोमुला पहातांच त्या मॅडमनी गोमुचा हात हातात घेतला व म्हणाल्या, “ज्योतीष विशारद, कु. गोमती गोरे आपणच ना ?”
गोमुच्या हातांतून वीज सळसळून गेली.
कांही बोलणे सुचेना.
त्या मॅडमच पुढे म्हणाल्या, ‘अहो मी अनघा वर्दे. ह्या मंडळांची सेक्रेटरी. सगळ्या सभासदांना ओळखते. तुम्ही नवीन दिसताय, त्याअर्थी तुम्हीच आजच्या पाहुण्या असणार ! बरोबर ना ? या, या.”
गोमुचा नव्हे कु. गोमतीचा हात धरून वर्दे मॅडम त्यांना टेबलापाशी घेऊन आल्या.
गोमु निमूटपणे त्यांनी दाखवलेल्या खुर्चीवर बसला.
पाणी पिण्याची खूप इच्छा होत होती पण मग त्याचा परिणामही लक्षांत आला म्हणून त्याने विचार बदलला.
वर्दे मॅडमनी प्रेक्षकांना साद घातल्यावर बायकांना बोलणं आवरते घ्यायला पांच मिनिटे द्यावी लागली.
मग वर्दे मॅडमनी आणि सर्वांनी प्रार्थना म्हटली.
कु. गोमती गोरे सुध्दा प्रार्थनेला उभ्या राहिल्या.
फक्त त्यांना प्रार्थना येत नव्हती म्हणून त्या नुसत्या उभ्याच राहिल्या.
नंतर वर्दे मॅडमनी पाहुण्यांची महान ज्योतिषी म्हणून ओळख करून दिली.
कुठलं तरी पुस्तकं त्यांनी लिहिल्याचंही ठोकून दिलं आणि कु. गोमती गोरेंच्या छातीत जोरांत धडधडू लागलं.
त्यांनी स्वत:च कु. गोमतीबाईंना पुष्पगुच्छ दिला आणि आपले अभ्यासपूर्ण भाषण करायची विनंती केली.
कु. गोमती गोरे पाठ केलेले भाषण द्यायला उभ्या राहिल्या.
कांही सेकंद हॉलच्या भिंती फिरत असल्याचा त्यांना भास झाला.
पण मग त्यांना पाठ केलेले भाषण आठवले.
गोमतीबाईंनी पाठ केलेले भाषण धडाधड म्हणून टाकले.
गोमती गोरेंना काळजी होती प्रश्नोत्तराची आणि भीती होती त्या मागे बसलेल्या सभासदांची.
पण सुदैवाने वर्दे मॅडमनी वेळेच्या अभावास्तव प्रश्नोत्तरे रद्दच केली आणि कु. गोमतींनी सुस्कारा सोडला.

नंतर चहापानाचा कार्यक्रम झाला.
तेव्हां दोघी तिघी आपला हात दाखवायला पुढे झाल्या.
त्यांना वर्दे मॅडम म्हणाल्या, “अहो त्यांच भाषण ऐकून कळलं नाही का तुम्हाला की ते फक्त जन्मपत्रिकेवरून भविष्य सांगतात.
हात कसले दाखवताय ?
मग बघतां बघतां हाॅल मोकळा झाला.
वर्दे मॕडम कु. गोमती गोरेंना बरोबर घेऊन बाहेर पडल्या.
गोमुला कळेना आपल्याला पाकीट कधी मिळणार ते !
विचारायची हिंमतही होईना.
वर्देबाईंनी एक टॅक्सी थांबवली.
गोमुला आंत बसायला सांगून म्हणाल्या, “गोमती, मीही येतेय बरोबर. मलाही तिकडेच जायचंय.”
आंत बसल्यावर गोमु गप्पच होता.
वर्देबाईंनी विचारलं, “मानधन नको कां, गोमाजीशेठ ?”
गोमु दचकून सीटवरच चार इंच वर उडाला.
डोकं टपाला आपटलं.
आपल्याला ह्या बाईंनी ओळखलंय, हे त्याच्या लक्षांत आलं.
वर्दे मॕडम हंसल्या आणि म्हणाल्या, “मला सुरूवातीपासूनच माहीती होतं तुम्ही कोण आहात ते.
पण मी तुमचं बिंग फोडलं नाही बरं कां ?
खरं सांगू, तो पैज लावणारा मितेश माझा लांबचा भाचा.
तो अनस्पोर्टींग वागला.
त्याने तुमच्याशी पैज लावली आणि मला ही माहिती देऊन तुमची फजिती करायला सांगितली.
म्हणजे बदमाशीच ना !
पण मी तुमचं सोंग तुम्ही व्यवस्थित निभावलेलं पाहिलं आणि मितेशवरच डाव उलटवायचं ठरवलं.
आणि हे घ्या तुमचे मानधन.”
गोमु पाकीट घेऊन टॅक्सीतून उतरला.
तो पैज जिंकला होता.
पैजेचे पांच हजार मितेशकडून घेणारच होता.
पण मितेशच्या दगाबाजीबद्दल त्याला कसा धडा शिकवायचा ह्याचाच तो विचार करत होता.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..