एक दिवस मी आणि गोमु गाडींतून स्टेशनवर उतरलो.
घाई नसल्याने सावकाश बाहेर पडत असतांना गोमुला वजन करण्याचं मशीन दिसलं आणि ताबडतोब त्याचा हात खिशाकडे गेला.
आवश्यक किंमतीचचं काय पण कुठलंच नाणं खिशांत नसल्यामुळे त्याने तोच हात माझ्यापुढे केला आणि म्हणाला, “पक्या, मित्रा जरा दोन रूपयांच नाणं दे. वजन केलं पाहिजे. काळजी तर घ्यायलाच हवी ना !”
मी माझ्या खिशातून दोन रूपयांच नाणं काढून त्याच्या हातावर ठेवलं.
मला माहित होतं की गोमुला वजनापेक्षा तिकीटावर येणाऱ्या भविष्यांत जास्त रस आहे.
वजनाचं नुसतं निमित्त.
तरीही मी त्याला निमुटपणे पैसे दिले.
नाही म्हटलं असतं तर आम्ही शाळेंत असतांना एकदां त्याने मला दोन रूपयांच आईसस्फृट घेऊन दिलं होतं त्याची गोष्ट सांगायला सुरूवात केली असती.
खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे.
नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.
▪
गोमु मशीनवर उभा राहिला, नाणं टाकलं, चक्र फिरलं आणि तिकीट आलं.
गोमुने प्रथम भविष्य वाचलं.
ते होतं, “या आठवड्यांत आपले ध्येय साध्य होणे अशक्य.”
ते वाचून गोमुला वजन करायला टाकलेले पैसे फुकट गेल्यासारखं वाटलं.
ते पैसे माझे होते ही आठवण मी त्याला करून देताच “अरे, पक्या तुझे काय माझे काय पण पैसे फुकट गेले ना ! हे असलं बेकार भविष्य.”
पुन्हां त्याला मीच आठवण करून दिली की हे मशीन वजन करण्यासाठी आहे.
भविष्य नंतर.
आलेलं भविष्य गोमुच्या बाबतीत ह्याच आठवड्यात काय पण अनेक आठवडे घडणारं होतं.
असं निगेटीव्ह भविष्य वजनाच्या मशीनवर छापणाऱ्याचा मला राग आला.
‘हा आठवडा तुमचे भाग्य उजळून टाकेल” किंवा “ लौकरच तुम्हांला लाॅटरी लागेल.”
असं काहीतरी लिहिलं असतं तर काय बिघडलं असतं ?
गोमुने तिकीट माझ्या हातात दिलं.
तिकीट गोमुच वजन ९५ किलो दाखवत होतं.
मी म्हटलं, “गोमु, तुला खानावळीच जेवण चांगलंच मानवलेल दिसतय. पंचाण्णव किलो वजन म्हणजे जरा जास्तच.”
“काय? पंचाण्णव किलो ? नॉनसेन्स !.” गोमु.
▪
पण त्या तिकीटाने आणि विशेषतः ९५ किलो ह्या आंकड्याने गोमुवर काय जादू केली कुणास ठाऊक !
एवढी वर्षे स्वतःच्या जाडेपणाबद्दल आणि वजनाबद्दल बेपर्वा असणाऱ्या गोमुने वजन कमी करायचं ठरवलं.
९५ किलो खूपच मनाला लावून घेतले त्याने.
त्याच्या उंचीला ७० किलो वजन ठीक होते.
त्याचे नेहमी ७८-८० च्या आसपास असायचे.
तेवढं जास्त वजन त्याने नेहमीच सांभाळले होतं.
पण ९५ किलो सांभाळणे त्याला कठीण वाटू लागलं.
प्रथम त्याने माॅलमध्ये जाऊन खास धावण्याच्या वेळी घालायचा ड्रेस विकत घेतला.
“जाॅगिंग” करायचंय असं सांगितल्यावर दुकानाच्या मालकाने ‘जॉगिंग कीट’ कशाकरतां हवं म्हणून विचारलं.
तर गोमु म्हणाला, “धावण्यासाठी”.
अनुभवी मालक गोमुच्या शरीराकडे पहात म्हणाला, “तुम्हाला वजन कमी करायचय काय ? तुम्ही जागच्या जागी ट्रीड मीलवर धावू शकता, स्टँडींग सायकल चालवू शकता.” मालक गोमुचं बजेट चाचपून पाहात होता. सर्वांच्या किंमती कळल्यावर गोमुने ‘कीट’ म्हणजे फक्त कपडे विकत घेतले.
मग तो ब्रँडेड बूट घ्यायला निघाला.
मी बरोबर होतोच.
मी म्हटले, “गोमु, ह्या सगळ्याची काय गरज आहे. हाफ पँट आणि टी शर्ट आणि साधे कॅन्व्हासचे बूट नाही कां चालणार ?”
गोमु म्हणाला, ‘अरे, ही सायकाॅलाॅजी आहे. फील आला पाहिजे. वाटलं पाहिजे आपण खास प्रयत्न करतोय. तरच वजन कमी होईल.”
पण ब्रँडेड बूटांच्या दहा हजारांच्या आसपासच्या किंमती ऐकून तोही गडबडला.
शेवटी एके ठिकाणी सेलमध्ये त्याला ब्रँडेड पण सेकंड क्वालिटी बूट साडेतीन हजाराला मिळाले.
▪
जामानिमा झाला आता सकाळची धावायची वेळ ठरवायची होती.
गोमुने वेगवेगळ्या हेल्थ एक्सपर्टसची मतं वाचली.
कोणी सकाळी तीनची वेळ उत्तम म्हटले होते तर कोणी सकाळी सातची वेळ ही चांगली म्हटली होती.
कांही जणांनी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा धावायची गरज व्यक्त केली होती.
पुन्हा संध्याकाळी धांवायचा विचार गोमुला मानवण्यासारखा नव्हता.
तेव्हां पहाटे तीनपासून सकाळी सातापर्यंत केव्हांतरी धावायला निघायला हवे होते.
गोमु मला विचारू लागला, “मित्रा, तुला कुठली वेळ सोयीची वाटते ? तुला केव्हां यायला जमेल ?”
मी म्हणालो, “गोमु, मी तुझ्याबरोबर धावायला येणार नाही. लौकर तर मुळीच उठणार नाही.“
गोमुने आपण “शाळेपासूनचे दोस्त” वगैरे सुरूवात केली पण ह्या बाबतीत मी अजिबात बधलो नाही कारण मला माझी झोंप फार प्रिय होती.
साडे सात आठच्या आधी उठायचा विचारही मला अस्वस्थ करी.
गोमु म्हणाला, “ठीक आहे. मी उद्यापासून पहाटे साडे तीनला उठतो आणि धावायला जातो.
पण तू बरोबर असतास तर मजा आली असती.
मला गजराचं घड्याळ लागेल.
तुझंच घेऊन जातो.
नाहीतरी तू वापरत नाहीसच.”
त्याने माझं टेबलावरचं गजर असलेलं घड्याळ उचललं आणि तो निघून गेला.
▪
त्यानंतर आमची भेट दुसऱ्या दिवशी साडेआठला तो आला, तेव्हां झाली.
सकाळी एक तास तो धांवल्याचं कोणतंही चिन्हं त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं.
पायांतही चप्पलच होती.
मी विचारले, “कसे झाले तुझे पहिल्या दिवशीचे धांवणे ?“
“धांवणे काय खाक होणार ? तुझा हा डबा वाजलाच नाही.”
माझं घड्याळ टेबलावर आपटत गोमु रागारागांत बोलला.
मी म्हणालो, “असं कसं होईल ?”
घड्याळ पाहिलं, अलार्म करून पाहिला.
सर्व ठीक होतं.
मी गोमुला विचारलं “नक्की अलार्म लावला होतास ना ? आणि कितीचा अलार्म लावला होतास ?“
“बरोबर साडेतीनचा अलार्म लावला होता.
बाजूलाच झोपणाऱ्या बाळूला पण दाखवला होता.
तो म्हणाला देखील, ‘च्या xxx, म्हणजे तुझा हा गजर आम्हाला पण साडेतीनला उठीवणार म्हणायचा.’
माझ्या लक्षांत आलं.
अलार्म झाला नव्हता कारण गोमु झोपल्यावर बाळूने अलार्म गुपचूप बंद केला असणार.
मी ते लक्षांत आणून दिलं तसा गोमु निश्चयाने उठला.
“बघतो त्या बाळ्याला. परत हात तर लावू दे घड्याळाला.”
असं म्हणत पुन्हां ते घड्याळ घेऊन गोमु गेला.
▪
दुसऱ्या दिवशी पहाटे तीनला अलार्म झाला, गोमु जागाही झाला.
झोपेत त्याच्या लक्षांत नाही राहिलं की आपण एवढ्या लौकर उठायचं कां ठरवलं होतं ? त्याने स्वतःच घड्याळ्यावर हात मारून अलार्म बंद केला आणि तो परत शांत झोपला.
जागा झाला तेव्हां साडे सात वाजले होते.
असे दोन/तीन दिवस गेल्यावर गोमुने साडेतीन हे फार लौकर होतात म्हणून पहाटे पाचची वेळ ठरवली.
पहिल्या दिवशी पाचला अलार्म झाला.
गोमु उठला.
नवा डार्क निळा जाॅगिंग सूट त्याने अंगावर चढवला, बूट घातले आणि धावायला बाहेर पडला.
रस्ता रिकामा होता म्हणून गल्लीपासूनच त्याने धावायला सुरूवात केली.
जरा पुढे गेला आणि एका श्वानराजाला त्याची पळणारी मूर्ती दिसली.
त्या कर्तव्यदक्ष श्वानाने भुंकून इतर श्वानांना सावधानतेचा इशारा दिला.
बघतां बघतां दहा बारा कुत्र्यांचा घोळका भुंकत भुंकत जमा झाला आणि थोड्याच वेळात गोमुच्या मागे लागला, “हाड, हुड” करून गोमुने त्यांना हांकलायचा प्रयत्न केला.
पण त्याचा काळसर निळा वेष बघून आणि त्याला पळतांना पाहून तो चोर असावा हा ठराव त्यांच्या जनरल बाॅडीत एकमताने पास झाला होता.
त्यामुळे त्यांनी पाठलाग चालूच ठेवला.
एकाने तर हिंमत करून गोमुच्या पोटरीचा चावा घ्यायचा प्रयत्न केला.
पण त्याच्या तोंडात फक्त पँटच्या कापडाचा छोटा तुकडा आला.
तोपर्यंत त्यांची हद्द संपली होती.
त्यामुळे एकेक करून सर्वांनी माघार घेतली होती.
गोमु त्या दिवशी जेमतेम दीड किलोमीटर धावला आणि थकून बसला.
नवी पँट रफू करायसाठी पन्नास रूपये गेले आणि नव्याच पँटला लावलेला पॅच ही फॅशन म्हणून सांगायची वेळ आली.
▪
अनेक थोर लोक प्रयत्नांची महती सांगून गेलेत.
गोमु त्यांच्या पंगतीत शोभला असता.
त्याचे धांवण्याचे प्रयत्न चालूच राहिले पण आठ दिवस झाले तरी जास्त प्रगती होईना.
मग त्याने आॅप्शन म्हणून एक “जिम जॉईन” केला.
म्हणजे तो व्यायामशाळेत जायला लागला.
आमचा एक मित्र अनेक वर्षे तिथला सभासद होता.
गोमु ‘जिमला’ येणार ह्याचा त्या मित्राला इतका आनंद झाला की त्यानेच गोमुची एक महिन्याची ‘जिम’ची फी भरली.
गोमु रोज बरोबर येणार म्हणून तो खूष होता.
तिथे पहिल्या दिवशी गोमुची उंची, दंडांचा घेर, पोटाचा घेर, कमरेचा घेर, नितंबाचा घेर ह्या सर्वाची नोंद करण्यांत आली.
वजन अर्थातच गोमुने प्रथमच ९५ सांगितले, तेंच नोंद केले गेले.
त्या नोंदीत गोमुने विशेष रस घेतला नाही.
तिथल्या कोचने गोमुला भाषणच दिलं.
“ह्या वयांत हे असं फुटबॉलसारखं होत चाललेल शरीर बरं दिसतं कां ?” पासून त्यांनी सुरूवात केली आणि आळशी जीवनशैलीमुळे संभाव्य आजारांची मोठी यादीच भाषणांत दिली.
त्यांनी गोमुला कोणकोणते व्यायाम कोणत्या साधनावर किती वेळ केले पाहिजेत ह्यांचीही लिखीत यादी दिली.
▪
जिममधल्या कोचने फक्त व्यायामावरच भागवलं नाही तर गोमु दिवसांतून किती वेळा आणि काय खातो ते विचारलं ?
गोमुने खाताना कधीही हात आंखडता घेतला नव्हता.
विशेषतः दुसऱ्याच्या पैशाने खाताना मुळीच नाही.
परंतु काय खाल्लं याची मोजदाद ठेवली नव्हती.
खरं तर वजन कमी करण्यासाठी खाण्यावर बंधन येईल हा विचार त्याच्या मनांतच आला नव्हता.
पण कोचने त्याला डाएटींग केल्याशिवाय वजन कमी होणार नाही असं सांगून रोजचे खाणे नियंत्रणांत आणायला सांगितलं.
न्याहारीला दोन डबल आम्लेट आणि अर्धा पाव (ब्रेड) सहज फस्त करणाऱ्या गोमुला कोचने सांगितलेल्या भाज्या, त्यासुध्दा उकडून खाणं केवळ अशक्य होतं.
पण पहिले दोन दिवस त्यांने संत्र्याचा रस पिऊन, न्याहारी आणि पालेभाज्या खाऊन, जेवण केलं.
पण हे डाएटींग कांही त्याला झेपेना.
▪
गोमुला कोणी पाठ केलेल्या ऋजुता दिवेकर हयांच्या डाएटींग टीप्स दिल्या तर कोणी डाॕक्टर दिक्षित यांचा डाएटींगचा सोपा कोर्स सांगितला.
व्हाट्स ॲप वापरून सर्वजण सर्वच विषयांतले तज्ञ झाले होते.
त्यांतही कर्करोगापासून ते नखांवर येणाऱ्या डागांवर काय उपाय करावे हे सांगणारे व्हाटस ॲप डाॅक्टर तर बरेच होते.
त्यात गोमुचे मित्र होतेच.
ते पुढे सरसावले पण गोमुने त्यांना त्यांच्या थेरपीचा आपल्यावर प्रयोग करायची संधी दिली नाही.
गोमुला एक वेळ मित्रांपासून लांब रहाणं शक्य होतं
पण चमचमीत खाण्यापासून लांब रहाणं केवळ अशक्य होतं.
त्यामुळे डाएटमुळे थकलेल्या गोमुचे पाय त्याच्याही नकळत बटाटेवड्याच्या नाही तर समोशाच्या गाडीकडे वळायचे.
कोणाच्या घरी गेला तर बिन साखरेचा चहा घ्यायला सांगितलेला सल्ला पाळण्याची त्याची इच्छा असे.
पण साखरेसारख्या गोड स्वभावाच्या माणसांनी दिलेला साखरेचा चहा नाकारून त्यांचा अपमान करण्याएवढा तो मॕनरलेस नव्हता.
“यजमान देवो भव” हा त्याचा बाणा होता.
परिणामी धांवणे, व्यायाम करणे हे उपाय जसे वजन कमी करायला त्याला उपयोगी पडले नाहीत, तसेच डाएटींगचे प्लॕनही त्याच्या कामी आले नाहीत.
▪
पंधरा दिवस झाल्यावर गोमु पुन्हां वजनाच्या मशीनवर चढला.
तिकीट आलं ते ९७ किलोच.
गोमु बेचैन झाला.
त्या तिकीटावरचं भविष्य वाचायलाही तो विसरला.
मी बरोबर होतोच.
मी त्याच्याकडून तिकीट घेतलं आणि भविष्य वाचलं. “चिंता करणे सोडा.”
मला ते वाचून आश्चर्य वाटलं.
कारण गोमु दुसऱ्यांना चिंता करायला लावी.
स्वतः कसलीच चिंता करत नसे.
ते तिकीट दाखवत मी त्याला विचारलं, “गोमु, तुला कसली चिंता आहे ?”
गोमु म्हणाला, “फक्त वजनाची.”
मी त्याला म्हणालो, “तुझं गेल्या वेळचं भविष्य काय होतं आठवतय ?”
त्याला अर्थातच आठवत नव्हते.
मी म्हणालो, “You will fail to achieve your target in this fortnight”.
आणि तसंच झालं ना !
तुझं वजन कमी करतां आलं नाही तुला.
आता भविष्य आहे की चिंता करणे सोडा.
मी ऐकलं आहे की चिंता करणारे नकळत जास्त खातात आणि त्यांच वजन वाढतं.
तू वजनाची चिंता सोड.”
गोमुने त्या दिवसापासून वजनाची चिंता करणे खरंच सोडले.
व्यायामाची धडपड सोडली.
डाएटींगचे प्लॕन फेंकून दिले.
गोमु नॉर्मल झाला. दुसऱ्याच्या पैशाने मिळेल ते सर्व खाऊ लागला.
स्वतःच्या खिशांत पैसे असल्यास चमचमीत खाऊ लागला.
चार पाच दिवसांनी आम्ही एका मित्राकडे गेलो होतो.
त्याने वजन करण्याचं छोटं मशीन घेतलेलं दाखवलं.
तो मित्र म्हणाला, “यार, स्टेशनवरची, रस्त्यावरची वजनाची मशीन्स बोगस असतात, म्हणून मी हे आणलं.”
गोमुने तात्काळ वजन करून पाहिलं तर ते निघालं ८० किलो.
गोमु म्हणाला, “म्हणजे माझं वजन वाढलंच नव्हतं आणि मी आपला उगाचच——“.
आतां त्याचे ब्रँडेड बूट दीड-दोन हजाराला कोणी विकत घेईल काय, ह्याची पहाणी तो करतोय.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply