नवीन लेखन...

गोमुचा डीसकाउंटेड स्मार्टफोन (गोमुच्या गोष्टी – भाग ३)

थोड्याच वर्षांपूर्वी स्मार्ट फोन बाजारांत आले. तंत्रज्ञानाने कमाल केली.

पंचाहत्तर वर्षांपूर्वी फक्त ग्रामोफोन होता. मग रेडीओ आला. सुरूवातीला तो चाळीत एखाद्याकडेच असायचा असं म्हणतात. फोन तर दुर्मिळच होते म्हणे. नंतर ट्रान्झिस्टर आले. प्रगती होतच होती.

मग पेजर, नुसते मेसेज पाठवायचे मेसेंजर, फोन करायचे मोबाईल, ब्लॅकबेरी ते स्मार्टफोन ही प्रगती खूप भराभर झाली.

म्हणजे माझा जन्म झाला तेव्हां पेजर होते. मी दहा वर्षाचा झालो तेव्हां साधे मोबाईल आले पण फार थोड्यांकडे. पंधरा वर्षांचा झालो तेव्हां कुणी तरी हातात की बोर्डवाले फोन घेऊन फिरतांना दिसू लागले. पण खरा बदल हा स्मार्ट फोनचाच. गोमुच्या शब्दात माणसाच्या हातांत ‘जिनी'(Genie-जादूचा मदत करणारा राक्षस) आला होता. त्यामुळे प्रत्येकाला वाटू लागलं की आपल्याकडे स्मार्टफोन असायलाच हवा. अगदी मला आणि गोमुलाही स्मार्टफोन हवा होता.

माझी आता पंचवीशीही उलटली होती. पण स्मार्ट फोनच्या किंमती आमच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. स्मार्ट फोनचे स्वस्त प्रकार अजून बाजारांत यायचे होते. त्यावेळची ही गोष्ट आहे. माझ्या फोनवर एक एसएमएस आला. ‘स्मार्टफोन – किंमत ४५,०००/- . आमच्या स्कीमखाली घेतल्यास १५,०००/- अट : आणखी किमान दोन किंवा अधिक फोनची दुसऱ्यांची ऑर्डर मिळवणे. दुसऱ्या ऑर्डरपासून प्रत्येक ऑर्डरमागे पांच हजार रूपये क्रेडीट होतील. म्हणजे चार ऑर्डर्स दिल्या तर आपला फोन फुकट. XXXXXXXXXX नंबरवर फोन करा.’

मला स्वत:ला एकही फोन विकतां येणार नाही याची पक्की खात्री होती. त्यामुळे मी त्या एसएमएसकडे दुर्लक्ष केले होते. पण दोनच दिवसांनी तसाच मेसेज गोमुला आला. गोमुमधला धडाडीचा विक्रेता ह्या स्कीमने प्रभावित झाला. त्याने चार जणांकडून स्वत:चे पंधरा हजार उभे करून भरलेही होते. आणखी दोन ऑर्डर मिळवून दिल्या की फोन त्याच्या घरी येणार होता. एक ऑर्डर त्याने मिळवली होती. ती मक्या ह्या आमच्या मित्राकडून. दुसरी मिळविण्यासाठी तो माझ्याकडे आला होता.

मी प्रथम माझ्या सगळ्या शंका त्याला सांगितल्या. पण माझ्या सर्व शंका त्याने लिलया निवारण केल्या. वर म्हणाला, “अरे ही संधी वाया नको घालवू. तू ऑर्डर दे मी तुलाही अधिक ऑर्डर्स मिळवून देईन. मग तुझेही पैसे परत येतील.”

मी शेवटी कबूल झालो. खोटं कशाला सांगू मलाही त्या ‘जिनी’चा अथवा स्मार्टफोनचा मोह होताच.

गोमुने माझ्याप्रमाणेच मक्यालाही ऑर्डर्स मिळवून देण्याची जबाबदारी घेतली होती. कांसवाच्या अवतारांत विष्णुने पृथ्वी पाठीवर घेतली होती म्हणे. पृथ्वी नाही पण आजूबाजूच्या लोकांच्या असल्या चिंता गोमु लिलया पाठीवर वहात होता.

गोमुला त्याचा फोन दहा दिवसांनी घरपोच मिळाला. तोपर्यंत त्याने चेन ऑर्डर्स मिळवत एकूण पंधरा सोळा ऑर्डर्स दिल्या होत्या. सर्वांचे अधिकचे दोन फोन विकण्याची जबाबदारी अर्थातच गोमुनेच घेतली होती. मला बरं वाटलं. आम्हाला फोन मिळतील आणि गोमुला बऱ्यापैकी पैसे मिळतील.

गोमुचा फोन आल्यानंतर दोनच दिवसांनी माझा फोन आला. फार सुंदर पॕकेजिंग होतं. बरोबर अभिनंदन करणार पत्रही होतं. त्याखालची सही मात्र वाचतां येण्यासारखी नव्हती. बहुदा चीनी लिपीत असावी. बरोबर चार्जर होता. रेडीओ कानाला लावण्याचे इअर प्लग होते. फोनही छान दिसत होता. पण असं म्हणतात ना की दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. तसंच झालं.

पहिला दिवस तो फोन चार्ज करण्यांत गेला. नंतर मी फोन चालू केला. फोनवर कांही ठराविक चित्रं दिसत होती. फोनही करता येत होता. पण फोनमध्ये कांहीतरी गडबड होती. कुठल्याही चित्रावर क्लीक करून पुढे कांहींच होत नव्हतं. मला वाटले, मला स्मार्ट फोन कसा वापरायचा ते कळत नाही. दुसऱ्यांना विचारायची लाज वाटत होती. दिव्याचा जिनी हातांत आला तेव्हां तो वापरायचा कसा हे अल्लादीनला माहित होते.

मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती. गाडी पुढे जातच नव्हती. माझी खात्री झाली की मला तो वापरतां येत नव्हता. स्वतःची लाज वाटली. लहान मुलंही स्मार्ट फोन सहज वापरतात असं ऐकून होतो. गोमु आला की त्याच्याकडून शिकून घ्यायचं मी ठरवलं.

दुसऱ्या दिवशी गोमु आला. त्याचा चेहरा पडलेला होता.

मी त्याला विचारले, “गोमु, मला कांही हा फोन वापरतां नाही आला. तुझ्याकडून शिकून घ्यावं लागेल मला.”

गोमु शांतपणे म्हणाला, “बघू तुझा फोन”.

दोन मिनिटे त्याने पाहिला.

मग म्हणाला, “पक्या हा फोन स्मार्ट फोन नाही रे ! हा आपल्या साध्या मोबाईल सारखाच आहे. त्या xxxने आपल्याला गंडवलं.”

माझाही चेहरा पडला.

“म्हणजे आपण पंधरा हजारांत असला फोन घेतला ?” मी ओरडलो.

गोमु म्हणाला, “होय. आपल्याला ह्या लोकांनी बहुदा फसवलंय.”

मी म्हणालो, “तू कोणाला दाखवलास कां ?”

त्याने मानेनेच नकार दिला.

मी म्हणालो, “मग चल. नेहमी “सेकंड ओपिनियन” घ्यावं असं शहाणे म्हणतात.”

“हे शहाणे कोण ? त्यांचा काय संबंध ?” गोमु.

“अरे शहाणे म्हणजे समजदार. म्हणजे मीच. तो सलीम फोन दुरूस्त करतो, तो मला चांगला ओळखतो. त्याला दाखवूया हे फोन.”

आम्ही सलीमभाईकडे गेलो. त्याला फोन दाखवले. त्याने दोन्ही फोन उघडून पाहिले.

नीट तपासून तो म्हणाला, “हा स्मार्ट फोन नाही. ह्याला ती चीप बसवलेलीच नाही. हे फोन तुम्ही कुठे घेतले ?”

मग गोमुने त्याला सर्व हकीकत सांगितली.

सलीम म्हणाला, “तुम्ही ज्या नंबरवर फोनची आॕर्डर दिली, तिथे परत फोन करून पाहिला काय ?”

गोमु म्हणाला, “मी बरेचदा तो नंबर लावला पण नेहमी एकच उत्तर येत, “धीस फोन इज स्वीचड ऑफ”.

सलीम गंभीर झाला.

तो म्हणाला, “अरे, हा फोनही फार दिवस चालणार नाही. तुम्ही स्टँडर्ड कंपनीचे फोन सोडून हा कशाला घ्यायला गेलात?”

मी म्हणालो, “ते फार महाग आहेत रे.”

सलीम म्हणाला, “पण आता हा केवढ्याला पडला ? थोडे दिवस थांबायचं ना ! फोनच्या किंमती हळूहळू खाली येतातच.”

म्हणजे जिनीच्या ऐवजी साधाच राक्षस आमच्या हातात आला होता.

तोपर्यंत ऑर्डरप्रमाणे सर्वांचे फोन येतच होते. मोबाईलचा फोनही चालत नाही म्हटल्यावर कांही जण तो परत करत होते आणि गोमुकडे पैसे परत मागत होते. काहीजण फोन परत घेऊन जा म्हणत होते. गोमु हैराण होऊन गेला होता. कुठे तरी दूर पळून जावं असं त्याला वाटत होतं.

तो मला म्हणाला, “पक्या, पळून जाऊ काय रे ? थोडे दिवस गायब होतो आणि कलकलाट शांत झाल्यावर परत येतो.”

मग शेवटी आम्हीच पोलिसांकडे तक्रार करायचं ठरवलं. कारण दुसऱ्या कोणी आधी तक्रार केली असती तर पोलिसांनी कदाचित गोमुलाच पकडला असता. पोलिसी खाक्याबद्दल आम्ही ऐकून होतो. तक्रार करायला जायलाही भीती वाटत होती. सलीमभाईनेच आमची एका पोलीस सब-इन्स्पेक्टरची ओळख करून दिली. सब-इन्स्पेक्टर आम्हांला सायबर क्राईम ब्रँचला घेऊन गेला. तरीही त्या असिस्टंट पोलीस कमिशनरच्या समोर आमची भीतीने गाळण उडाली. भक्कम देह. पिळदार मिशा. वाटलं आतां आमची यात्राच निघणार. वाघासमोर शेळ्या कशा उभ्या रहात असतील ?

पण त्यानी आम्हाला बसायला खुर्च्या दिल्या.

मग शांतपणे साध्या आवाजांत ते म्हणाले, “बोला काय काम आहे ?”

आमच्या कल्पनेतील पोलीस अधिकाऱ्याच्या विरूध्द हे साहेब निघाले.

त्यांनी आमची सर्व कहाणी शांतपणे ऐकून घेतली.

मग ते म्हणाले, “अशी तक्रार घेऊन येणारे तुम्ही पहिलेच नाहीत.”

असा मूर्खपणा करणारे फक्त आम्हीच नव्हतो, हे समजल्याने थोडा आनंद वाटला.

“अजूनही कांही अशा तक्रारी आल्या आहेत. शिवाय तो नंबरही बदलता आहे. कांही काळ तो नंबर वापरून गळाला मासे लागले की ते तो फोन बंद करून टाकतात. ही आंतरराष्ट्रीय टोळी असावी. तुम्ही पैसे ज्या अकाउंटला ट्रान्स्फर केले, ते बँक अकाऊंटही बंद केलं असणार. सीम कार्डही काढून फेंकून देत असावेत. लोकांना फोन घेतांना त्यांचा माहिती विचारली, पत्ता विचारला, प्रूफ मागितलं तरी राग येतो. पण लोकांची कोणी अशी फसवणूक करू नये म्हणूनच आम्ही ही काळजी घ्यायला सांगतो. आता आम्ही तुमच्या तक्रारीची नोंद करून घेतली आहे. आमचा शोध चालू आहेच.”

आम्हाला फारशी आशा वाटली नाही.

मग गोमुला ते म्हणाले “हां, पण तुम्ही एकट्याने एवढ्या आर्डर्स त्या एका फोनवर दिल्यात, तेव्हां तुमचं कांही संभाषण झालं कां ?”

गोमु म्हणाला, “फारसं कांही नाही. एक बाई हिंदीत बोलत असत आणि फोन पाठविण्यासाठी फक्त पत्ता लिहून घेत.”

साहेब म्हणाले, “आठवून पहा. इतर काही आवाज, काही शब्द कानी आले कां ?”

गोमुने आपल्या मेंदुला चालना दिली आणि त्याला कांहीतरी आठवलं.

“फक्त एकदा, दोनदा त्या बाईंनी मध्येच ‘बहादूर’ अशी कोणाला तरी हाक मारलेली मी ऐकली होती आणि रूम एअरकंडीशनरचा फार आवाज येत होता.”

आम्ही चिंतेत असतांनाच सगळ्यांचेच फोन बिघडले. थोड्याच दिवसांत सोळाच्या सोळा स्मार्टफोन गोमुकडे परत आले. सर्वच आपले पैसे परत मागत होते. आम्हाला कांही सुचेना. दोन लाखांवर नुकसान झालं होतं. ते फोन गोमुने माझ्या खोलींतच आणून टाकले होते. मला तर ते डोळ्यासमोरही नकोसे वाटत होते. जिनी राहिला बाजूला आणि राक्षस मानगुटीवर बसल्यासारखे वाटत होते. त्याच वेळी पोलिसांनी ते फोन आम्हांला त्यांच्याकडे जमा करायला सांगितले. आम्ही दोघे जाऊन त्यांच्याकडे सर्व फोन नेऊन दिले. फोन दृष्टीआड झाल्याने मला खूप बरं वाटलं.

त्याच सुमारास डीसकाउंटेड फोनचे एसएमएस कांहीजणांना परत आले आणि त्यांत चक्क गोमुच्या सीमचाच नंबर दिला होता. गोमु ते सीम जुन्या फोनवर वापरत असल्यामुळे त्याला कांही फोनही आले होते. आम्ही तात्काळ ही माहिती एसीपी साहेबांना दिली.

एका आठवड्याने एसीपीनी आम्हाला परत बोलावले. आम्ही भीत भीतच गेलो. एसीपीनी हंसून स्वागत केलं आणि चक्क गोमुच अभिनंदन केलं.

ते म्हणाले, “तुम्ही सांगितलेल्या ‘बहादूर’ ह्या हांकेमुळे आणि बिघडलेल्या, म्हणजे आवाज करणाऱ्या एअरकंडीशनरच्या माहितीमुळे आमचे पोलिस नेपाळमधल्या या टोळीला पकडू शकले. विशेषतः तुम्हाला आलेले फोन नंबर तपासले त्यांत ह्याच लोकांनी केलेले दोन फोनही मिळाले. आम्ही त्यांचे लोकेशन मिळवले. चोर कितीही हुशार असला तरी अतिविश्वासाने एखादी तरी चूक करतोच. मग आम्ही तर्क केला की ही टोळी नेपाळ-युपी किंवा नेपाळ-बिहार ह्या सीमेवर काम करत असणार. ते बरोबर निघालं. ते बिहारला येऊन गुन्हा करत आणि मग नेपाळला पळून जात. त्यांच्याकडे ह्याच मेकच्या फोनचा मोठा साठाही मिळाला. पैसेही जप्त करण्यांत आले आहेत. पण तुम्हांला त्यांतले कधी आणि किती मिळतील मी सांगू शकत नाही.”

हे म्हणजे तुमचं नव घर तयार आहे पण ताबा देता येणार नाही असंच झालं होत. गोमुच्या मानगुटीवरून राक्षस हलायला तयार नव्हता.

इतक्यांत एसीपी पुढे म्हणाले, “ह्याच टोळीने आणखीही बरेच तऱ्हेचे सायबर गुन्हे केले आहेत. त्यामुळे ह्या टोळीला पकडण्याला उपयुक्त माहिती दिल्याबद्द्ल सरकारतर्फे ठेवण्यांत आलेलं दोन लाख रूपयांच बक्षिस तुम्हांला देण्यांत आलं आहे.”

आठवड्याच्या आंतच गोमुच्या हातांत बक्षिसाचे दोन लाख रूपये आले. त्याने त्या रक्कमेतून त्याच्यामुळे जे जे फसले होते त्या सर्वांचे पैसे परत केले. आम्हा दोघांच्या हातात कांही राहिलं नाही व आमचे पैसे वायां गेलेच. परंतु गोमुची बदनामी टळली.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..