रविवारी आठवड्याचं भविष्य वाचलं होतं, “पाहुणे येण्याची शक्यता.”
हे वाक्य साधारणपणे सहा-सात आठवड्यांनी माझ्या राशीला असते.
पण मी निर्धास्त असतो.
गोमुशिवाय माझ्याकडे कुणीही येत नाही आणि त्याला मी पाहुणा म्हणू शकत नाही.
पण सोमवारी संध्याकाळी गोमुच एका म्हाताऱ्या बाईला बरोबर घेऊन माझ्याकडे आला.
तशी ती फार म्हातारी नसावी.
पासष्टच्या आसपास वय असावं तिचं.
पण नऊवारी साडीमुळे प्रथम दर्शनी म्हातारी वाटली.
बाकी दुधी जसा तुकतुकीत असतो तशी ती तुकतुकीत होती.
कांठ पदराची पण साधी नऊवारी साडी होती.
डोक्यावरून पदर घेतला होता.
चेहरा गोल होता.
त्याच्यावर अजिबात सुरकुत्या नव्हत्या.
ती सांवळी होती.
जाडी नव्हती पण खाऊन पिऊन सुखी असावी.
पायांत झिजलेली चप्पल होती.
हातांत एक गाठोडं होतं.
परगांवाहून प्रवास करून आलेली दिसत होती.
बहुदा कुठल्या तरी गांवाहून एस.टी.ने आलेली असावी.
मला कळेना की गोमु हिला माझ्याकडे कां घेऊन आला ?
रविवारी वाचलेलं भविष्य मी विसरलो होतो.
▪
गोमु माझ्या खोलींत आला.
खरं तर घुसलाच आणि तिलाही बोलावलं, “मावशी, या इकडे. बसा.”
“अरे बाळा, मावशीला अहो, जाहो काय करतोस ?”
असं म्हणत तीही आंत घुसली.
आंत येऊन फतकल मारून माझ्या एकुलत्या एक कॉटवर बसली.
पेपरांत सारख्या सारख्या घुसखोरीच्या बातम्या वाचून घुसखोरीच वाटणार ना मला ?
काश्मीरमधील घुसखोरी, ब्रम्हदेशीय आणि बांगलादेशीय यांची घुसखोरी, मुंबईतील परप्रांतींयांची घुसखोरी आणि पदपथावरील घुसखोरी, ह्या सगळ्या घुसखोरीबद्दल ऐकून मी माझ्या खोलींत होणाऱ्या घुसखोरीविषयी टेन्शन घेणारच ना !
“मावशी, तुम्ही बसा इथेच थोडा वेळ. आम्ही थोडं खायला घेऊन येतो.”
गोमुने मावशीला सांगितले आणि मला हाताला धरून बाहेर नेऊ लागला.
ही काय भानगड आहे, म्हातारीला इथे कां घेऊन आलास, हे मलाही त्याला खडसावून विचारायचे होतेच.
म्हातारीच्या समोर असं विचारणं कांही ठीक दिसलं नसतं म्हणून मी त्याच्याबरोबर बाहेर निघालो.
▪
जरा दूर आल्यावर गोमु म्हणाला, “अरे यार पक्या ! ही मावशी…”
मी मध्येच म्हणालो, “मावशी ? तुला मावशी आहे हेही मला ठाऊक नव्हतं !
कुठून टपकली ही म्हातारी ?”
गोमु कपाळावर आंठ्या आणत म्हणाला, “अर्ध्या तासापूर्वीपर्यंत मलाही माहित नव्हतं की मला मावशी आहे. पण माझा पत्ता शोधत शोधत ती आली.
कोंकणातून एस.टी. ने आतांच आली आहे.
आठ दिवस माझ्याकडे राहून मुंबई पहायचीय म्हणत्येय.”
“सांग ना तिला की तुझी जागाच नाही म्हणून !”
मी व्यावहारिक सल्ला दिला.
पण गोमुला तो पसंत पडला नाही.
तो म्हणाला, “अरे, मला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवल्याचं, मला काऊ-चिऊचे घांस भरवल्याचं सांगत्येय रे ती !
तिला हांकलून देऊ कां ?”
“म्हणजे तुला ती आठवतही नाही ? लहानपणी म्हणजे कधी ? किती वर्षांचा होतास?”
“अरे, जन्मापासून म्हणत्येय ती. माझ्या जन्माच्या वेळी सुईणीचं काम पण तिनेच केलं म्हणे ! आतां सांग, तिला कशी कुठे पाठवू ? हॉटेलात ठेवणं परवडणार नाही आणि आपल्या गांवांत धर्मशाळाही नाही.”
हे सगळं कोणत्या दिशेने चाललं होतं, हे मला कळत होतं.
तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून मी म्हटलं, “वृध्दाश्रम आहे ना आपल्या गांवात.”
गोमुचे उत्तर तयार होतं.
“ते तर डीपॉझीट आणि तीन महिन्यांच भाडं घेतल्याशिवाय आत पाऊल ठेवू देणार नाहीत.
सात आठ दिवसांचा तर प्रश्न आहे.
पक्या आपण शाळेपासूनचे दोस्त.
माझी मावशी ती तुझी पण मावशी नाही कां ?”
▪
अशा प्रकारे मावशी माझ्या घरांत स्थिरावली.
आम्ही खायला घेऊन परत खोलीवर आलो तर ती माझ्या गादीवर पसरून गाढ झोपलेली.
पण बहुतेक आम्ही आणलेल्या भज्यांच्या वासाने ती खडबडून उठली.
भजी पुढे ठेवतांच तिने ती सापाच्या चपळाईने गिळून फस्त केली.
मग तिला बोलायला जोर आला.
गोमुला आशिर्वाद देत म्हणाली, “तुला उदंड आयुष्य देईल बघ देव. तुझी आई आजारी. माहेर गरीब. दुसरं कोण बघणार. दोन वर्ष तुला सांभाळत होते. लहानपणी मी तुझं केलं, त्याचे पांग फेडलेस बघ.
आता जरा तेवढी मुंबई बघूची आसा. तेवढी दाखव म्हणजे झालं.”
गोमुच्या लेखी त्याचं बाळपण शाळेंत मास्तरांचे बोल आणि क्वचित फटके खाल्ले तेव्हांपासून सुरू झालेलं.
हे शैशव काहीं त्याला आठवत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं नव्हतं.
गोमु म्हणाला, “मावशी, मुंबई इथून लांब आहे. मला सुट्टी पण नाही.”
मावशी गांवाहून आली तरी अडाणी दिसत नव्हती.
ती म्हणाली, “अरे टॕक्शा आहेत ना मुंबईत ? ते काय ते ओला की फोला आहे, कुबेर कां काही, ते पण आहे ना ? तुमची गरीबी असूनही मावशीने लहानपणी तुला चांदीच्या चमच्याने भरवलं आणि तू मावशीला फक्त चार दिवस मुंबई दाखवायचं, एवढं काम पण करणार नाहीस तिच्यासाठी ?”
मावशीने परत लहानपणच्या आठवणी, ज्या गोमुला आठवत नव्हत्या, सांगून गोमुला ब्लॕकमेल करायला सुरूवात केली.
▪
अर्थातच ह्या सर्व संभाषणानंतर मावशीच्या रहाण्याची सोय माझ्याच खोलींत होणार, हे ठरलेलेच होते. मावशी त्या खोलीत राहू लागली.
माझ्या रूमचे मालकही गांवी गेलेले असल्यामुळे तीही अडचण नव्हती.
मी बाहेर उघड्या छोट्या बालकनीमध्ये झोपू लागलो.
मावशीला मुंबई पहायचीच होती.
त्याचसाठी तर ती मु्ंबईला आली होती.
पण गोमुला तेव्हां नुकतीच देशमुखांनी नोकरी दिली होती.
त्यामुळे त्याला रजा मिळणं शक्य नव्हतं.
त्यामुळे त्याला तिच्याबरोबर जाता येणं शक्यच नव्हतं.
मी खूप आढेवेढे घेतले.
पण मैत्रीची शपथ घालून, गोमुने माझा विरोध मोडून काढला.
शेवटी मी माझ्या ऑफीसला आठवडाभर रजेचा अर्ज पाठवून दिला.
अर्थातच मला मीच आजारी असल्याचे कारण रजेसाठी द्यावे लागले.
मावशीला मुंबई दाखवायला बराच खर्च येणार होता.
तोही ओघाओघाने माझ्याकडेच आला.
मी खूप वैतागलो होतो.
पण मावशी उत्साहांत होती.
गोमु पण मदत करणार होता.
तो तिला मुंबई बघायचं प्लॕनिंग करायला मदत करणार होता.
“रोज काय काय पहायचं, महत्त्वाच्या साईटसं कोणत्या ?” हे सर्व तो तिला सांगणार होता.
हे म्हणजे जनतेच्या पैशाने इंजिनीअर्सनी पूल बांधायचा आणि नेतेमंडळींनी थाटामाटाने त्याचेच “लोकार्पण” करायचे, तसं झालं.
जुने लोक ह्याला आयजीच्या जीवावर बायजी उदार असंही म्हणत.
▪
पहिल्या दिवशीच मावशी ओलासाठी हट्ट धरून बसली.
पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत.
इथून बसने दादरला जाऊया. तिथे टॕक्सी करूया, अशी मी तिची समजूत घातली.
मी ह्यापेक्षा जास्त खर्च करू शकणारच नाही, अशी खात्री झाल्यावर ती निमूटपणे बसमध्ये बसली.
म्हणजे बसमध्ये निमूटपणे चढली.
बसमध्ये खिडकीशी बसून बस दादरला पोहोचेपर्यंत तिच्या अनेक प्रश्नांना मला उत्तरे द्यावी लागली.
कंडक्टरने बसस्टॉपचं नांव घेतलं की ती त्याबद्दल चौकशी करायची.
“स्टेडीयम म्हणजे तो क्रिकेट खेळतात तोच कां ?”
“टोल नाके बंद कां नाही झाले ?”
खाडी पुलावर “ह्या पुलाची लांबी किती ?” इत्यादी प्रश्न मोठ्या आवाजांत विचारून मावशी बससमधल्या सर्व प्रवाशांसमोर माझा इंटरव्हयू घेत होती.
आर. के. स्टुडिओ म्हटल्यावर इथेच उतरूया म्हणायला लागली.
कसेबसे दादरला उतरलो.
दादरला मग मीच टॅक्सी केली.
तिथून तिला गेट वे ऑफ इंडीयाला घेऊन गेलो.
गेट वे बघून मावशी खूष होईल असं मी समजत होतो.
तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार केला.
नंतर तिची नजर तिथे समुद्रांत प्रवाशांना फिरवणाऱ्या बोटींवर गेली.
तिने तो विषय काढतांच मी हसून म्हणालो, “कोकणांत बसली असशील ना नावेत. मग तो कोंकणचा समुद्र आणि हा समुद्र एकच.”
पण मावशी खमकी.
ती म्हणाली, “अरे पक्या, इथे येऊन जर मी मुंबईच्या समुद्रांत फिरले नाही, तर गांवात सगळे हंसतील मला. चल बघू रांग कमी आहे. पटकन् जाऊन येऊयां.”
▪
बोटींत फिरून आल्यावर मावशीची नजर ताजमहाल हॉटेलवर पडली.
“हे काय आहे रे समोर ?”
मला येऊ घातलेल्या संकटाची आधीच चाहूल लागली.
मी पुटपुटलो, “हे ताज महाल हॉटेल आहे.”
मावशी उत्साहाने म्हणाली, “बरं झालं हाटेल समोरच आहे ते. मला चहाची तल्लफ आलीच होती.”
मी म्हटलं, “मावशी, ह्या हॉटेलमधला चहा आपल्याला परवडणार नाही.”
मावशी भडकली, “कां नाही परवडणार ? माझं गांवाकडे स्वतःच घर आहे. दहा माड आहेत माझ्या नांवावर. सांग त्या हॉटेलवाल्याला. आतां तू दे पैसे. गांवाला परत गेले की मनी आर्डर करून तुझे सर्व पैसे परत करून टाकीन.”
मावशीने असे ठणकावून सांगितल्यावर माझी नाही म्हणण्याची काय बिशाद होती.
तरी ताजमध्ये शिरतांना मला आशा होती की दरवाजावरचे रखवालदार सरदारजी आमचा अवतार बघून आम्हांला आंतच सोडणार नाहीत.
पण लोकशाहीचा जमाना असल्यामुळे त्याने दरवाजा उघडून दिला.
कदाचित आम्हांला साफसफाई करणाऱ्याची माणसे समजून त्याने आंत सोडले असावे.
आंत बसलो असतांना नेमके आमचे साहेब कुणा फॉरीनरबरोबर तिथेच आले.
त्यांनी माझ्याकडे “खाऊ की गिळू” नजरेने पाहिलं.
तेव्हां माझा सिक लिव्हचा अर्ज त्यांना पोंहोचला, हे समजलं.
मावशीच्या यादीतले मुंबईतले एकच ठिकाण पाहून झाले पण मावशीच्या त्या एका दिवसांत माझी अर्ध्याहून अधिक शिल्लक संपली आणि साहेबाची नाराजी पदरांत पडली.
▪
मुंबईत वर्षानुवर्षे रहाणाऱ्यांना मुंबईत पहाण्यासारख्या कांही प्रेक्षणीय साईटस आहेत याचा पत्ताच नसतो.
त्याचं बरेचसे आयुष्य लोकल प्रवासातच जातं.
तो लोकलची स्टेशन पाठ म्हणून दाखवू शकतो पण प्रेक्षणीय स्थळाची कल्पना चौपाटीच्या पुढे जात नाही.
मी दुसऱ्याच दिवशी मावशीला म्हटले, “हुतात्मा चौक आणि गेट वे बघितलास. आता आज महालक्ष्मी, बाबुलनाथ ही मंदिरे आणि चौपाटी दाखवतो तुला. म्हणजे झाली मुंबई बघून.”
मला वाटले होते मावशी खूष होईल. एवढ्या जागा दाखवल्या की खूप झालं. पण मावशी म्हणाली, “चौपाटीजवळच माशांचा मुझीयम आहे ना रे ! तो ही दाखव.”त्या दिवशी जाण्या-येण्याचा खर्च, दोन्ही देवळांत वेगवेगळ्या देवांना चढवलेले पैसे, ॲक्वेरीयमच्या तिकीटांचा खर्च आणि जेवणखाणं हे सर्व हजार रूपयांच्या वर गेलं.
पण पहिल्या दिवसापेक्षा कमी खर्च आला ह्यावर मी समाधान मानलं.
तिसऱ्या दिवशी मावशीने सकाळी माझ्या हातांत काय काय पहायचे आहे त्याची यादीच ठेवली.
त्यांत काय नव्हतं ?
म्युझियम, जे.जे. आर्ट गॕलरी पासून, प्लॕनेटोरीयम आणि शिवाजी पार्कपासून संजय गांधी उद्यान पर्यंतच्या पंचवीस ठिकाणांची यादी होती.
पुढचे पांच दिवस मावशीने माझा खिसा आणि बँक खाते रिकामे केलेच, वर मला एका मित्राकडून उधारी घ्यायला लावली.
▪
मावशी उद्या जाणार म्हणून मी रविवारी आनंदात होतो.
तर गोमु तिला रहायचा आग्रह करत होता. मला वाटले आता भाच्याच्या विनवणीला मावशी मान देणार.
मावशी म्हणाली, “मुंबई बघण्याची माझी इच्छा पुरी झाली. मला आता घराकडे परत गेलेच पाहिजे. गोमु, तू मावशीचे खरंच पांग फेडलेस हो. किती माया करतंस. तू खर्च पण बराच केलास. तुला रजा मिळणं शक्य नव्हतं म्हणून. नाय तर माझी उत्तम बडदास्त ठेवली असतीस.”
गोमु म्हणाला, “मावशी, तुला जमेल तेव्हा परत ये. मी आणखी कांही इथली प्रेक्षणीय स्थळं दाखवीन.”
हे सर्व बोलणं माझ्याच खोलीत माझ्या समक्ष चाललं होतं.
मी खर्च केला होता आणि मावशी भाच्याला श्रेय देत होती.
मावशी-भाच्याचा प्रेमळ संवाद ऐकतांना माझा पारा वर चढत होता पण त्याकडे दोघांचही अजिबात लक्ष नव्हतं.
मावशी म्हणाली, “गोमु, तुझ्याशिवाय मला कोण आहे ? तेव्हां आता गांवी गेले की माझे घर, माड, आंबे, जे सगळं आहे, ते तुझ्या नांवावर करून टाकते.”
मावशी गेल्यावर जेव्हां माझी चडफड गोमुने ऐकली, तेव्हां तो मला म्हणाला, “पक्या, माझा शब्द आहे तुला. म्हातारी जे कांही माझ्या नांवावर करेल ना, त्याचा अर्धा भाग तुझा !”
गोमुने मनापासून आश्वासन देऊन माझा राग शांत करायचा प्रयत्न केला. तरी मी त्यानंतर दोन चार दिवस धुमसत होतोच.
▪
आठ दिवसांनी गोमुच्या नांवावर आणि माझ्या पत्त्यावर एक कार्ड आलं. मावशीचचं कार्ड होतं.
मावशीने लिहिलं होतं. “गोमाजी आणि प्रकाश, तुम्ही ह्या म्हातारीक मुंबई दाखवलीत, तिची सेवा केलीत.त्यासाठी थांकु. पण वाईच समजुतीचो घोटाळो झालो. माझा खरा भाचा, गोमाजी कोरेगावकर, तो पण नवी मुंबईतच रव्हतां. पण पत्ता दाखवणाऱ्याच्या चुकीमुळे मी ह्या गोमाजी गोरेगावकराकडे पोहोंचले आणि त्याकांच भाचा मानून बसले.खऱ्या भाच्याचे इकडे पत्र आले असा. तो कुटुंबासह खंय तरी प्रवासाक गेलाता. तेव्हां मी आता येऊ नये तर महिन्यानंतर यावं असं सांगल्यान आहे. माका वाईट वाटला की मी गोमुक भाचो समजून तुम्हां दोघांक बराच तरास दिलो. माका क्षमा करा. आणि गोमु आता माझो खरो भाचो भेटलाच हा तर माझा घर, माड आणि सर्व त्येका देऊचा असा. आतां तुला कशी नी काय देवू ? तेव्हां ह्या मावशीची अडचण समजून घे.”
गोमुने माचिसने पत्र असं जाळलं की जणू कांही मावशीचं अप्रिय मृत्यूपत्रच तो जाळत होता.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply