आमच्या घराशेजारी देशमुख आडनावाचे नवीनच कुटुंब राहायला आले. देशमुख पती-पत्नी, त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा आर्यन आणि आर्यनची आजी… राधाआजी.
घरात इनमीन चारच माणसं. आर्यनच्या आजीने घरात लागणारे किराणा सामान इथे जवळ कुठे मिळते याची आमच्याकडे चौकशी करताच आईने त्यांना आमचा दूधवाला, पेपरवाला, किराणावाला, इस्त्रीवाला, केबलवाला यांचे संपर्क नंबर आणि पत्ते दिले. त्यामुळे त्यांचं काम खूपच सोपं झालं. त्यांना ह्या गोष्टींसाठी विनाकारण धावाधाव करावी लागली नाही. पोळ्या लाटण्याच्या कामासाठी आजी जेव्हा बाई शोधत होत्या तेव्हासुद्धा आईनेच आमच्याकडच्या घरकाम करणाऱ्या रखमाबाईंना त्यांच्याकडे काम करण्यासाठी राजी केले. आईमुळे रखमाबाई आढेवेढे न घेता लगेच त्या घरी कामासाठी तयार झाल्या. आजीला किती हायसं वाटले. सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या झाल्या. आईला तर त्या कितीतरी वेळ धन्यवाद देत होत्या. आर्यनच्या नवीन शाळेच्या प्रवेशासाठीसुद्धा बाबांनीच मदत केली. बाळूच्याच शाळेत प्रवेश मिळवून दिला.
‘इथं स्थिरस्थावर व्हायला तुमची फार मदत झाली,’ असं तोंडभरून आजी बोलल्या. आर्यन हळूहळू इथं रूळू लागला. आमच्या घरी येऊ लागला. आमच्यासोबत कॅरम खेळायला बसू लागला. आईच्या हातचा कुठलाही नवीन पदार्थ खाताना, ‘काकू, मस्त टेस्टी झालाय बरं,’ असं म्हणून आवडीने खाऊ लागला. लवकरच देशमुख कुटुंब आणि आमच्या घराची छान मैत्री झाली. वस्तूंची, पदार्थांची देवघेव सुरू झाली. अडचणीच्या वेळी एकमेकांना हाक मारली जाऊ लागली. माझी आणि आर्यनशी तर मस्तच गट्टी जमली. त्यालाही माझ्यासारखीच चित्रकलेची आवड आणि तोही आमच्यासारखाच गप्पिष्ट. एवढ्या कॉमन गोष्टी आमच्या मैत्रीसाठी पुरेशा होत्या. खरंतर, हे सगळं जुळून आलं
आर्यनच्या आजीमुळे. आजी आम्हाला अनेकदा घरी बोलवायच्या. स्वभावामुळे त्यांच्या बोलक्या अभ्यासालाही लवकरच त्या घराशी आमचे सूर जुळले. आर्यनचे आईबाबाही छान होते, पण ते दिवसभर कामासाठी बाहेरच असायचे. घरात दिवसभर आजी आणि आर्यन आजी मला आणि बाळूला त्यांच्याच घरी बोलवत. आमचा अभ्यास त्यांच्यासोबत छान होई.
आमची कुठलीही अडचण त्या चुटकीसरशी सोडवत. फावल्या वेळी गोष्टी सांगत, कोडी घालत. आमच्यासोबत गाण्याच्या भेंड्यासुद्धा खेळत. लवकरच त्यांच्याशी आमची छान मैत्री झाली. खूपदा त्या मोठी मोठी पुस्तकं वाचताना दिसायच्या. एकदा मी न राहावून त्यांना विचारलंच, ‘आजी, तुम्ही एवढी तासन्तास पुस्तकं वाचत बसता, कंटाळा नाही येत? आणि असं काय असतं एवढं या पुस्तकात? ‘ आजी हसून म्हणाली ‘शमू, अगं ही पुस्तकं आपले जिवाभावाचे मित्र असतात. या मित्रासोबत वेळ घालवायला मनापासून आवडतं मला. ही पुस्तकं आपले जिवाभावाचे मित्र असतात. या मित्रासोबत वेळ घालवायला मनापासून आवडतं मला. ही पुस्तकं सोबतीला असतात तेव्हा नव्या गोष्टी सांगतात. त्यांच्या सहवासात दिवस आनंदित होऊन जातात. समजते, उमजते, विज्ञानाची किमया. शमू, पुस्तक जणू एक अजबच दुनिया.
पुस्तकातली गोष्ट,
खाऊइतकीच गोड,
जीवनाला देते ती, आनंदाची जोड.
निळेभोर आकाश, सूर्य, चंद्र, तारे, पुस्तकातून भेटतात,
अगं, जवळून सारे.
आजी पुस्तकांबद्दल भरभरून बोलत होती. किती छान उलगडून दाखवलं तिने आम्हाला पुस्तकांचं नवं जग. तिनं सांगितलेलं मनात साठून राहिलं सारं. पुढे पुस्तकं वाचण्याची आवड आजीमुळेच लागली मला. आजीच्या सहवासात आमचं आनंदाचं इंद्रधनुष्य सहज फुलून यायचं.
एकदा काय झालं, आर्यनच्या घरी मी, बाळू आणि आर्यन अभ्यासाला बसलो होतो. अर्थात नेहमीप्रमाणे आजीच आमचा अभ्यास घेत होती. मला अडलेली भागाकाराची गणितं आजीने आधी मला सोडवून दाखवली. समजावून दिली. भाज्यबरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा उत्तर तपासण्याचा ताळाही छान सांगितला. आर्यनने मराठी व्याकरणातल्या शब्दांच्या जातीबद्दल विचारताच, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या आठ जातींची छान तोंडओळख करून दिली. बाळूला ऊर्ध्वपातनाचा प्रयोग हवा होता. आजीने या प्रयोगाचे स्पष्टीकरण इतके छान करून दिले की, गढूळ पाणी शुद्ध कसे करावे हे आम्हांला चटकन समजले. हा ऊर्ध्वपातनाचा प्रयोग आमच्या डोळ्यांसमोर उभाच राहिला.
एकमेकांच्या अभ्यासाची अडचण आम्हांला न होता त्याचा आम्हाला फायदाच होऊ लागला. आमच्या तिघांचाही अभ्यास झाल्यावर बाळू आजीला म्हणाला, ‘आजी आज आम्हांला एक गोष्ट सांग ना. तू किती पुस्तकं वाचतेस, त्यातलीच एखादी सांग.’ मग मी आणि आर्यननेही गोष्टीसाठी आजीकडे हट्ट धरला. आजी हसून म्हणाली, ‘सांगते, सांगते…
पण आधी मला काही प्रश्नांची तुम्ही उत्तरे द्यायची, चालेल?’ ‘हो हो चालेल…’ आम्ही तिघेही एका सुरात म्हणालो. मग आजी म्हणाली, ‘सिंहाचे सामर्थ्य सांगा बरं कशात? ‘ ‘त्याच्या बाळू पटकन म्हणाला, धारदार दातात. ‘छान!… हत्तीचे बळ सांगा बरं कशात?’ मी चाचरतच म्हणाले, ‘त्याच्या लांब सोंडेत.’ आजी म्हणाली, ‘शाब्बास!… बैलाची शक्ती सांगा बरं कशात? ‘ आर्यन लगेच म्हणाला, ‘त्याच्या मोठ्या शिंगात.’ आजी म्हणाली, ‘बरोबर!… आता सांगा, माणसाची ताकद सांगा बरं कशात? ‘ इथे मात्र आम्ही तिघेही जण एकदम गप्प झालो. आमचे विचारी का बिचारी झालेले चेहरे पाहून आजी म्हणाल्या, ‘अरे, माणसाची ताकद त्याच्या हुश्शार डोक्यात.’ बाळू पटकन म्हणाला, ‘अगदी, खरंय आज्जी. डेव्हिड आणि गोलिआथ या गोष्टीत एका छोट्या मुलाने आपल्या अक्कलहुशारीनेच त्रास देणाऱ्या राक्षसाला चांगलीच अद्दल वली, चलीय मी ही गोष्ट.’ आजीने आता पुढचा प्रश्न टाकला, ‘पण हुश्शार डोक्याचं रहस्य काय?’ इथेही आम्ही तिघं पुन्हा मूग गिळून बसल्यासारखे गप्प. मग आजीच म्हणाली, ‘अरे, हुश्शार डोक्याचं रहस्य… पुस्तकाशिवाय दुसरं आहेच काय…! पुस्तकं करतात डोक्याला सुपीक, हुशारीचं येतं, मग खूप पीक.’ इथंसुद्धा आजीने पुस्तकांचं महत्त्व बोलता बोलता, आम्हाला सहज समजेल असं सांगितलं. मग आजीने एका कोकीळ पक्ष्याची गोष्ट सांगितली. खूप सुंदर. काव्यात्मक. जणू ती एक तालकथाच. आजी म्हणाली…
‘उन्हातला वाटसरू आला,
झाडाच्या सावलीत
थंडगार वाऱ्याला तो, बसला बोलावीत
वाटलं त्याला झाडाखाली,
करावा थोडा आराम
जास्त नको थोडाच, कारण आराम आहे हराम!
ऊन कमी झालं की,
निघावं पुढच्या कामाला
कष्टावाचून काही नाही,
जाणीव याची त्याला वळकटी अंथरून तिथेच,
तो झाडाखाली झोपला
ऊन येताच डोळ्यावर,
झोप लागेना त्याला
झाडावरील कोकीळ पक्षी,
हे सारं होता पाहत वाटसरूचा व्याकुळपणा,
त्यालाही होता जाणवत त्याने आपले पंख पसरून,
किरणांना लपविले
वाटसरूच्या तोंडावर,
सावलीला त्याने धरले वाटसरू
आता झाडाखाली, शांत झोपी गेला
हे पाहून कोकीळला, आनंद फार झाला
कोकीळचा हा परोपकार, मनोमनी पेरत जाऊ
त्या दिवसापासूनच कोकीळ, लागला कुहूकुहू गाऊ’
आजीची गोष्ट संपली. आम्ही भान हरपून आनंदाने टाळ्या वाजवल्या. आजी म्हणाली, ‘मुलांनो, तो कोकीळ त्या दिवसापासून कुहूकुहू गाऊ लागला, कारण ईश्वराने जणू त्याच्या परोपकाराचे त्याला सुंदर गळा देऊन एक प्रकारे बक्षीसच दिले.’ आजीने गोष्टीचा अशा प्रकारे केलेला शेवट आम्हाला खूपच भारी वाटला. गोड गळ्याचे बक्षीस.
मी आणि बाळू घरी आल्यावर आजीची गोष्ट आईला सांगितली. बाळू म्हणाला, ‘आई आर्यनच्या आजी खूप बुद्धिमान आहेत गं. त्यांना सगळंच ठाऊक असतं. गोष्ट तर किती छान सांगतात. अभ्यासातल्या आमच्या अडचणी सोडवतात. आमच्यासाठी जणू त्या चालतंबोलतं पुस्तकच. मी हसून म्हणाले, ‘मी तर त्यांना गुगल आजीच म्हणते. काहीही विचारा… उत्तर लगेच तयार.’
बाळू म्हणाला, ‘थांब, उद्या आजीलाच सांगतो, त्यांचं तू केलेलं नवीन नामकरण.’ आई हसून म्हणाली, ‘गुगल आजी… छान आहे नाव. शमे, कसं गं सुचतं बाई तुला हे.’ मी म्हणाले, ‘अगं, आता आजीचा सहवास लाभलाय ना.’ तिच्या या वाक्यावर घरात हास्याची छान लकेर घुमली.
– एकनाथ आव्हाड
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply