जुन्या काळी चित्रपट ह्या माध्यमाला पूर्णत्वास नेण्यास चित्रकार हा एक महत्वाचा घटक होता. एम.एफ. हुसेन, रघुवीर मुळगांवकर सारखे स्वयंशिक्षित चित्रकार जसे कार्यरत होते, तसेच जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतलेले एस. एम. पंडीत चित्रपट सृष्टीसाठी कामे करीत असत. या कलाकारांचे बहुतेक काम छपाईसाठी केलेले असे. पण त्याच बरोबर चित्रपटगृहावर व अन्य ठिकाणी चित्रपटाबद्दल माहीती एकाच वेळी अनेकांना मिळू शकेल असे प्रभावी माध्यम होते ते चित्रपट बॅनर्स ! आणि हे करणारे अनेक कलावंत त्या काळात गाजत होते. ते म्हणजे बी. विश्वनाथ, अंकुश, डी. आर. भोसले, एन.आर. भोसले, दिवाकर, पामार्ट, एल्लोरा आर्ट अशी नावे.
अशा नावामध्ये एक नांव अग्रणी तळपत होते, आपल्या जादूभरी रंगभोर आविष्काराने सर्वानाच आकर्षीत करीत होते, ते म्हणजे गोपाळ बळवंत कांबळे अथवा ज्यांची सुपारीचीत सही आपणाला नितांत सुंदर अशा बॅनरवर दिसत असे, ते ‘ जी. कांबळे ‘ या रंगसम्राटाचे !
भित्ति चित्रण (पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी कांबळे यांचा जन्म २२ जुलै १९१८ रोजी झाला.
कोल्हापूर जिल्हा हा तसा कलावंतांची खाणच म्हणायला हरकत नाही. या कलापुरातील भूमीमध्ये कलामहर्षी बाबूराव पेंटर, आबालाल रहमान, गणपतराव वडणगेकर, बाळ गजबर जन्माला आले होते. याच कोल्हापूरात गोपाळरावांचा जन्म एका गरीब खाटीक कुटुंबात झाला. घरात एकूण सात भावंडे. त्यातील गोपाळराव चौथे. वडीलांना त्यांचा पारंपारीक व्यवसाय मान्य नव्हता. म्हणून ते कागल सोडून कुटुंबाला घेऊन कोल्हापूरला आले. गोपाळरावांची सर्व भावंडे चित्रपट सृष्टीशी संबंधित होती. त्यामुळे गोपाळरावांचेही तेथे जाणे येणे वाढले. चित्रकलेची आवड असलेल्या गोपाळला आर्ट स्कुलमध्ये जाऊन चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे ही गोष्टच दुरापास्त होती. ते रहात होते त्या मंगळवार पेठेत हंस नावाचे चित्रपट गृह होते. त्याठिकाणी इंग्रजी चित्रपटाची उत्तमोत्तम पोस्टर लागलेली असत. आपणही अशी पोस्टर रंगवावीत ही उर्मी त्यांच्या मनात उफाळून येत असे. पण एका गरीब घरातील मुलाकडे रंगपेटी कोठून असणार ? पण या मुलाची अभिलाषा तेथील कोल्हापूर सिनेटोन मधील लोकांनी हेरली व त्यांनी गोपाळरावांना शिल्लक राहीलेले रंग देण्यास सुरुवात केली. हंस सिनेमागृहासमोरच रस्त्यावर बसून गोपाळराव समोरील चित्रपटगृहावरील पोस्टर प्रमाणे चित्रे रंगवू लागले. त्यांच्या कलेचा श्रीगणेशा एकूण अश्या प्रकारे सुरु झाला. घरापासून जवळच असलेल्या बाबूराव पेंटर व आबालाल रहमान या दोन मातब्बर कलाकारांचा सहवासही त्या कोवळ्या वयातच त्यांना लाभला.
आणि ही चित्रकलेची असलेली जन्मजात ओढ, कलेची भूक, अन कलेचे वेड या दोन्ही गोष्टी गोपाळरावांच्या ठायी प्रकर्षाने जाणवीत होत्या. कोल्हापूरातील कलावंतांची चित्रे ते एकाग्रतेने अवलोकन करीत, एकलव्याप्रमाणे त्यातील कौशल्य स्वतःमध्ये सामावून घेत. लहान वयातच त्यांनी चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतला, आणि त्यांच्या चित्राला बक्षीस मिळाले. त्यावेळी व्ही. शांताराम यांच्या हस्ते गोपाळरावांना चांदीचे पदक देण्यांत आले. तेव्हां व्ही. शांताराम यांच्या मनातही आले नसेल, की पुढे हाच मुलगा आपल्या चित्रपटांची भव्यता वाढवीण्यास कारणीभूत ठरेल. गोपाळरावांचे मन शाळेत कधी रमलेच नाही. वर्गात गणित सोडविण्याऐवजी ते चित्रे रेखाटत असत. मन धावे ते चित्रे अन चित्रकारांकडे. शाळा सुटल्यावर ते थेट चित्रपट स्टूडीओ गाठत. तेथील पोस्टर – बॅनर्स पहात. या सिनेमा पोस्टर्सनी त्यांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ केली. कोल्हापुरात ज्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटांच्या पोस्टर – बॅनर्सच्या अभिनव कल्पनेला जन्म दिला, त्या कल्पनेची शिदोरी सोबत घेऊन गोपाळरावांनी शालेय शिक्षणाला रामराम ठोकला आणि सर्वस्वी चित्रकलेला जवळ केले.
गोपाळरावांना गुरु असा नव्हताच. ते स्वतःच स्वतःचे गुरु होते. न चुकता असंख्य स्केचिस करणे यामुळे त्यांच्या हाताला एक सराव झाला. केवळ ब्रशने ते बाह्यरेषा काढू लागले. यावेळी त्यांनी ब्रिटिश चित्रकार एफ.मटानिया यांच्या चित्रांचा अभ्यास केला. छत्रपती सिनेटोनमध्ये पडदे रंगविण्याची कामे त्यांनी अभ्यासली. व नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये भालजी पेंढारकर यांच्याकडे ते काम करू लागले. खडतर अश्या गरिबीतून उत्कर्षाकडे ती वाटचाल होती. पुढे कोल्हापुरात कांबळे यांच्या महत्वकांक्षेला वाव मिळेल अशी शास्वती त्यांच्या कलासक्त मनाला वाटेना. कारण तेथील मर्यादीत क्षेत्र. डोळ्यापुढे एकच ठिकाण दिसत होते, ते म्हणजे मुंबई. पण ते एवढे सहज नव्हते. गोपाळरावांनी निर्धार केला, अन खिशात एक पैसा नसताना अक्षरश: ते मुंबईला पळून गेले. मुंबईत गोपाळराव कांबळे या कलाकाराच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरु झाला. आरंभीचा काळ खूपच खडतर होता. सिनेमा पोस्टर करण्यासाठी त्यांच्या फिल्म कंपन्यांमध्ये फेऱ्या सुरु झाल्या. आरंभाला फाजलभाईंच्या फिल्म सिटीत, त्यानंतर चंदुलाल शहा यांच्या रणजीत स्टुडीओमधे त्यांना पोस्टर बनविण्याचे काम मिळाले. चंदुलाल शहा हे वर्षाला बारा-बारा चित्रपट काढीत असत. गोपाळरावांना पगार होता महीना पस्तीस रुपये. पण त्यांचे काम चंदुलाल याना एवढे आवडले की त्यांनी गोपाळरावांना पोस्टर विभागाचा प्रमुख बनवून टाकले. गोपाळरावांच्या खास अशा पद्धतीने केलेल्या रंगमयी पोस्टरचा बोलबाला लवकरच सिनेश्रुष्टीत झाला. आणि अनेक निर्मात्यांकडून त्यांना मागणी येऊ लागली. आणि चित्रपट सृष्टीने या भावी बॅनर – पोस्टर पेंटिंगच्या बादशहाचे दोन्ही हात पसरून स्वागत केले. गोपाळरावांनी चित्रपटसृश्टीत कलाकार या नात्याने पाऊल टाकले ते, ते क्षेत्र काबीज करण्यासाठीच ! त्यांनी आपल्या कामाचा व नावाचा एक ठसा उमटविला. त्यांच्या चित्ररेषेतील विलक्षण सामर्थ्य, व्यक्तीची ओळख, रंगावरची कमालीची हुकूमत, कुंचल्यावरची पकड, पोत अन लय सांभाळण्याचे समतोलत्व आणि कामाचा प्रचंड आवाका या सर्वच गोष्टी गोपाळरावांचे नांव सर्वतोमुखी करण्यास पुरेशा होत्या. आणि येथून पुढे या पोस्टर-बॅनरवर त्यांची वळणदार अशी ‘ जी. कांबळे ‘ ही सही दिसू लागली आणि ‘ जी. कांबळे ‘ व पोस्टर हे समीकरणच बनले.
रणजीत पाठोपाठ जी. कांबळे यांनी देविका राणी यांचे बॉंबे टॉकीज, मेहबूब खान यांच्या स्टुडीओची पोस्टरपेंटिंगची कामे केली. याच काळात मेहबूब खान यांचा ‘ रोटी ‘ हा चित्रपट सुरु झाला होता. रोटीची पोस्टर बनविण्यासाठी गोपाळरावांना मुंबईहून दिल्ली, अमृतसर, लाहोर, कराची या शहरांना भेटी देण्याचं योग आला. मद्रास येथील जेमिनी स्टुडीओत जेव्हां त्यांची बॅनरची कामे सूरु असत तेव्हां लोकांची प्रचंड गर्दी ते बॅनर पाहायला जमत असे. हे ब्यानर करण्याची पद्धत देखील मोठी कष्टप्राय तशीच कौशल्यपूर्ण असे. प्रथम दहा बाय बाराच्या आकाराचे चित्रपटाचे कृष्णधवल स्टील फोटो घेऊन त्यावर लहान लहान चौकोन काढायचे. नंतर ब्यानर ज्या पटीत मोठा हवा त्या पटीत हे चौकोन कॅनव्हास अगर प्लयवूड वर आखायचे. चारकोलने अथवा खडूने त्यावर फोटोप्रमाणे बाह्यरेषा आखायची. आणि त्यानंतर ते रंगवायचे. येथे कलाकार आपले सर्व कसब त्यामध्ये ओतीत असे. शिवाय अगदी जवळून रंगविण्याचे असल्याने घोड्यावर चढून ते रंगवावे लागत. समोर असलेला बॅनरवरील व्यक्तीचा एकेक डोळाच सुमारे तीनेक फुटाचा असतो. हे अत्यंत कठीण काम असायचे. पण हे कलाकार त्यात रंगांची आतिषबाजी करून त्यांना जिवंत करीत असत.
त्या वेळी कलायोगी जी. कांबळे पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत काम करीत होते, त्याच दरम्यान कंपनीचे एक भागीदार व्ही. शांताराम प्रभात मधून बाहेर पडले आणि मुंबईत परळ भागात त्यांनी आपली ‘ राजकमल कलामंदीर ‘ ही नवीन चित्रपट संस्था सुरु केली. शांताराम बापूना माणसे हेरण्याचा, त्यांच्यातील कलागुण पारखण्याचा एक उत्तम गुण अवगत होता. `मग ते चित्रकार असोत, छायाचित्रकार असोत, कथा लेखक, संगीतकार असोत, असे सर्वच सर्जनशील कालावन्त त्यांनी ‘ राजकमल ‘ च्या छत्राखाली आणले होते. अश्या या हरहुन्नरी कलाकाराचे लक्ष जी. कांबळेंकडे जाणे हे ओघानेच आले. शिवाय चित्रपट निर्मितीमध्ये चित्रकाराच्या अदाकारीने महत्व बाबूराव पेंटरांच्या हाताखाली प्रशिक्षित झालेल्या शांतारामबापूना अवगत होतेच ! व्ही. शांताराम यांनी सन्मानाने कलायोगींना राजकमल मध्ये बोलावून घेतले, आणि त्या दिवसापासून व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा आणि कलायोगी जी. कांबळे यांच्या पोस्टर – बॅनरचा सुवर्णकाळ सुरु झाला. राजकमल कलामंदीरचा भव्य बोलपट अन त्याचे चित्रपट गृहावरील इंद्रधनुष्याच्या रंगांची उधळण करणारे कांबळे यांचे बॅनर हे एकमेकाला पूरक ठरले.
राजकमलच्या ‘ शकुंतला ‘ चित्रपटाचे पोस्टर सहासष्ट बाय साडेबारा फुटांचे होते. मुंबईच्या स्वस्तिक चित्रपटगृहावर लागलेले हे पोस्टर कांबळे यांनी केवळ अडीच दिवसात पूर्ण केले होते. त्यासोबत तेथील सर्ववातावरण शकुन्तलमय केले होते. साधारण १९५० साल असावे. शांतारामबापुनी ‘ दहेज ‘ चित्रपट पूर्ण केला होता. जयश्री व पृथ्वीराज कपूर यांच्या भूमिका त्यात होत्या.
‘दहेज’ ची जाहीरात नेहमीपेक्षा काही वेगळी व्हावी असे शांतारामबापूना वाटत होते. अनेक चित्रकारांना त्यांनी कामाला लावले होते. पण शांतारामबापूंच्या चेहऱ्यावर पसंतीची पावती काही दिसेना. शेवटी हे प्रकरण कांबळे यांच्याकडे आले. कांबळेंनी बराच विचार केला, आपली चित्र कल्पना पक्की केली. आणि जवळ जवळ बारा फुटांचे एक कटाऊट करून त्यांनी दाखविले. त्यामध्ये एक बाई दाखविली होती. त्या बाईची साडी वाऱ्याने फुगायची. वारा कमी झाला की हा फुगवटा कमी व्हायचा. व बापूनी ते पाहील्यावर त्याना ही कल्पना खूपच आवडली. ‘ दहेज ‘ मध्ये जयश्रीने घुंगट घेतला होता. त्यात घुंगट हलत असल्याचे दृश्य त्यांनी बॅनरवर तयार केले. हे पाहण्यास लोक प्रचंड गर्दी करीत असत. दुसऱ्या एका चित्रात पृथ्वीराज ललिता पवारांच्या तोंडावर नोटा फेकत असताना दाखविले होते. त्या नोटा इतक्या खऱ्याखुऱ्या वाटत होत्या जवळ जाऊन पाहील्यावरही विश्वास बसत नव्हता. आणि गुणांची कदर असलेल्या शांताराम बापूनी ‘ दहेज’च्या कामावर खुश झाल्याने त्यांना ‘ हिलमन ‘ गाडी बक्षिसादाखल दिली. कलाकार अन कालापारखी या दोघांचाही सन्मान यात सामावलेला होता ! या नंतर राजकमल कलामंदीरच्या चित्रपटांसोबत जी. कांबळे यांच्या कला आविष्काराचा प्रवास अखन्डपणे सुरु झाला. नयनरम्य, वास्तववादी अश्या चित्रपट बॅनरनी लोकांना चित्रपटगृहाकडे वळविण्यास प्रवृत्त केले.’ सावता माळी, ‘ ‘ पर्बतपें अपना डेरा, ‘ डॉ. कोटणीस की अमर कहानी, ‘रामजोशी,’ तीन बत्ती चार रास्ता, ‘ तुफान और दीया, ‘ दो आँखे बारह हात, ‘ झनक झनक पायल बाजे,’ ‘ नवरंग,’ अश्या राजकमलच्या अनेक चित्रपटांना जी. कांबळे यांनी आपल्या कुंचल्याने सजविले. जी. कांबळे यांच्या कला कारकीर्दीतील एक महत्वाचे व त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे काम म्हणजे त्यांनी केलेले ‘ मुगल – ए -आझम ‘ या चित्रपटाची पोस्टर्स व बॅनर. के. असीफ या कलासक्त दिग्दर्शकाचा अतिभव्य चित्रपट. या चित्रपटाची भव्यता चोहोबाजूनी होती. दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर यासारखे कलावन्त, नौशादचे संगीत, बडे गुलाम अली सारख्या गायकांना त्याने तानसेनचे सूर आळवायला लावले होते. शीशमहल हे त्यातील मुख्य आकर्षण ठरले होते. अश्या या चित्रपटाची तितकीच भव्य प्रसिद्धी कोण करणार ? के. असिफने यांनी आपली अजरामर कलाकृती ‘ मुगल-ए -आझम साठी कांबळे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आणि कांबळे यांनी अक्षरश: त्याचे सोने केले. विलोभनीय रंगसंगती, एकापेक्षा एक अशी सौंदर्याने नटलेली सरस अशी चित्रे जी. कांबळे यांच्याकडून आविष्कृत होऊ लागली. आणि व्यक्ती रेखाटनातील तो एक परमोच्च बिंदू साधला गेला. यासाठी त्यांनी विन्सर न्यूटनचे रंग वापरले होते. सर्वच ठिकाणी चित्रपटगृहावर कांबळे यांच्या ब्यानरनी सजावट केली होती. याच कालावधीत राणी एलिझाबेथ या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांची भव्य मिरवणूक दिल्लीतील रस्त्यावरून चालली होती. तेथे मुगल -ए -आझम हा चित्रपट सुरु होता. एलिझाबेथ राणीने क्षणभर मिरवणूक थांबवून त्या कलात्मक आणि नेत्रदीपक सजावटीचा आनन्द घेतला. कलायोगी कांबळे यांना मिळालेली सर्वोच्च मानवंदना होती. पुढे कांबळे यांनी चित्रपटाच्या कामापासून थोडे बाजूला जाऊन पेंटिंगच्या विश्वात रमायचे ठरवीले. त्यात चित्रकार हळदणकर यांनी त्यांना त्यांच्यातील अद्भूत कलेची जाण देऊन पेंटींगकडे प्रोत्साहीत केले. आपले ब्यानर काम झाल्यावर नष्ट होताना त्यांनी पाहीले. यापुढे पोर्ट्रेट पेंटींग करून अभिजात कला निर्मिती करायची त्यांनी ठरविली.
त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सरवस्वी पेंटींगला वाहून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्यांनी करायला घेतले तेव्हां त्यांनी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास सुरु केला. शिवाजी महाराजांचे जे अस्सल चित्र हॉलंडच्या मुझियम मध्ये आहे त्या रेखाचित्रावरून छत्रपतींचे चित्र कांबळे यांनी केले. सदर चित्र त्यांनी महाराष्ट्र शासनास बहाल केले. त्याबद्दल त्यांनी एक पैसाही घेतलं नाही. आज महाराष्ट्र शासनाने त्यास अधीकृत चित्र म्हणून मान्यता दिली आहे. गोपाळरावांची कलासंपदा सुरूच होती. शेवटची चार पाच वर्षे ते डोळ्याला भिंग लावून काम करीत असत. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी ब्रश खाली ठेवला नाही. वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत अखंड कलासाधना सुरु होती. अगदी त्याच्या वाढदिवसादिवशीच ! एका मुलाखती त्यांनीच सांगीतले होते, ‘ आपल्या हातून चांगली चित्रे तयार व्हावीत. आपल्या माघारी रहाणार आहेत ती फक्त चित्रे. या भावनेने मी चित्रनिर्मिती करतो. यात मी रमून जातो.’ नव्या पिढीला त्यांचा संदेश होता, कोणतीही कला कष्टाशिवाय साध्य होत नाही. तुम्ही तुमची कला मुक्त करा. तीच तुम्हांला यश, कीर्ती मिळवूंन देईल ! जी. कांबळे यांचे २१ जुलै २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply