नवीन लेखन...

इंटेल कंपनीचा एक संस्थापक गॉर्डन मूर

गॉर्डन मूर यांचा जन्म ३ जानेवारी १९२९ रोजी झाला.

‘इंटेल’चे उत्पादन कोट्यवधी लोक दररोज वापरत असतात; पण ते नेमके कसे दिसते, ते मात्र कुणालाच माहीत नाही; हे अजबच नाही का? इंटेल नक्की काय बनवते? कॉम्प्युटर नेमका चालतो कसा? एकविसाव्या शतकात जगताना कॉम्प्युटर, मोबाईल फोन यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. याआधी असलेली रेडिओ किंवा टीव्हीसारखी उपकरणे आणि कॉम्प्युटर यामध्ये असा काय फरक आहे, ज्यामुळे कॉम्प्युटर सगळ्यांचा “दादा’ झाला?

जॅक किल्बीशिवाय इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) च्या शोधात महत्त्वाचं काम बजावणारा माणूस म्हणजे रॉबर्ट नॉइस (१९२७-१९९०). रॉबर्ट नॉइस फेयरचाईल्ड कंपनीत बऱ्यापैकी रुळला होता. तो कंपनी सोडेल हे कोणाच्याही डोक्यात आले नसते पण १९६८ ला त्याने गॉर्डन मूर सोबत एक अनपेक्षित खेळी खेळली. १९४७च्या साली बेल लॅब्स मध्ये ट्रान्झिस्टर नावाच्या इलेक्ट्रॉनिक स्विचचा शोध लागला होता. या शोधाने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणली होती. यामुळे संगणकाच्या आकारात आणि किंमतीत प्रचंड मोठा फरक पडणार होता. हे ‘भवितव्य’ ओळ्खल्याने हे ट्रान्झिस्टर्स वापरावेत म्हणून मूर आणि नॉइस यांनी ओरडून ओरडून फेयरचाईल्ड कंपनीला सांगितले होते पण कंपनीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्या दोघांनी वैतागून ती कंपनीच सोडून दिली. स्वतःच्या खिशातून अडीच लाख डॉलर्स गुंतवून ऑर्थर रॉक नावाच्या प्रसिद्ध वित्तसहाय्यकाकडून ३ लाख डॉलर्स घेतले आणि नवी कंपनी सुरु केली. गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नॉइस यांच्या नावावरून सुरुवातीला ‘मूर नॉइस’ ठेवण्याचा विचार होता.पण त्याचा उच्चार ‘मोअर नॉईज’ असा वाटेल अशी त्यांना भीती वाटली! मग त्यांनी वर्षभर ‘एनएम इलेक्ट्रॉनिक्स’ या नावानं त्यांची कंपनी चालवली. त्यानंतर त्यांनी तिचं नामकरण ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ असं करायचं ठरवलं. पण दुसऱ्या एका हॉटेलची साखळी चालवणाऱ्या कंपनीनं ते नाव आधीच घेतलं असल्यानं त्यांनी ते त्यांच्याकडून ‘विकत’ घेतलं आणि या लांब नावाचं छोटं स्वरूप (म्हणजे ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ ऐवजी ‘इंटेल’) घेऊन ते आपल्या कंपनीला द्यायचं ठरवलं. हीच आजची ‘इंटेल’ होय. ‘इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स’ चे लघुरूप म्हणजे इंटेल. आपल्या आधीच्या फेअरचाइल्ड कंपनीशी स्पर्धा करून आयसी बनवण्याऐवजी त्यांनी संगणकात माहिती साठवण्यासाठी लागत असलेल्या मेमरी चिप्स बनवायचा घाट घातला. लवकरच त्यांनी यात छान यश संपादन केलं. अँडी ग्रोव्हही या दोघांना येऊन सामील झाला. खरं तर ज्या कंपनीत आधी हे दोघे काम करत होते त्या फेयर चाईल्ड कंपनीने ‘इंटिग्रेटेड सर्किट’वर बऱ्यापैकी संशोधन केले होते. त्यामुळे याची माहिती नव्याने कंपनी स्थापणाऱ्या मूर आणि नॉइस या दोघांनाही माहित होते. त्यामुळे त्या दोघांनी फेयरचाईल्ड कंपनीचे संशोधन चक्क ढापले आणि आयसीज वापरून कॉम्पुटरची मेमरी बनवण्यास सुरुवात केली. यावर फेयर चाईल्डचा चांगलाच जळफळाट झाला पण काहीच करू शकली नाही. त्याकाळी इंटेलने काढलेल्या ११०३ मॉडेलच्या मेमरी चिपमध्ये १०२४ बिट्स (म्हणजे १ केबी) इतकी माहिती साठवू शकता येई. इतकी माहितीही त्याकाळी ‘प्रचंड’ मानली जाई. इंटेलच्या इंजिनियर्सच्या मते त्या चिपची किंमत १० डॉलर्स इतकी योग्य होती,म्हणजे थोडक्यात १ बिटला एक सेंट अशी किंमत होती. पुढे मुरने आपला एक महत्वाचा सिद्धांत १९६५ सालच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मासिकात मांडला. कॉम्प्युटरच्या वेगाच्या संर्दभात गॉर्डन मूरचा एक नियम सांगने आवश्यक आहे. ‘दर अठरा महिन्यांनी आयसीजची आणि परिणामी कॉम्पुटर्सची क्षमता दुप्पट होत जाईल’ हे त्याचे भाकीत होते. एका स्क्वेअर इंचातील ट्रांझिस्टर्सची संख्या दर अठरा महिन्यांने दुप्पट होते. मूरने १९६५ साली केलेले हे निरिक्षण मूर लॉ (Moore law) या नावाने प्रसिध्द आहे याचा दुसरा अर्थ असाकी, साधारणपणे दिड वर्षाने प्रोसेसरचा वेग दुप्पट होईल. आश्र्चर्य म्हणजे मूऱचे सुमारे चाळीस वर्षापुर्वी केलेले भाकीत खरे ठरले आहे. आज आपण २.४ गिगाहर्जचे मायक्रोप्रोसेसर वापरतो. काही वर्षा पूर्वी आपण एक गिगाहर्ज या वेगाचा मायक्रोप्रोसेसर वापरत होतो. तर त्याही आधी आपण पाचशे मेगाहर्जचे प्रोसेसर वापरत होतो. आज हेच भाकीत प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

सुरवातीला ही कंपनी कॅल्क्युलेटर्सना लागणाऱ्या मेमरी चिप्स बनवत असे. १९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. ठराविक कामे करण्यापेक्षा नवनवीन “प्रोग्रॅम लिहून’ या चीपकडून वेगवेगळी कामे करून घेता येतील अशी सोय यात होती. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं. तरीही पुढची अनेक वर्षे इंटेलचा प्रमुख व्यवसाय मेमरीच्या चिप्स बनवणं हाच होता. पण १९८० च्या दशकात जपानी कंपन्यांनी अतिशय स्वस्त दरात मेमरीच्या चिप्स विकायला सुरुवात केल्यावर इंटेलला काहीतरी वेगळं करणं भाग होतं. त्याच सुमाराला आयबीएमचा ‘पर्सनल कॉम्प्युटर (पीसी)’ जोर धरायला लागला होता. ऐंशीच्या दशकांत “पर्सनल कॉम्प्युटर” तयार झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा वापर वाढतच गेला. त्यामुळे आता मेमरीच्या चिप्सऐवजी मायक्रोप्रोसेसर वापरून संगणकाचा ‘सेंट्रल प्रॉसेसिंग युनिट (सीपीयू)’ नावाचा भाग बनवण्याकडे इंटेलनं मोहरा वळवला. यालाच आपण संगणकाचा मेंदू असंही म्हणतो. इंटेलची ही चाल कमालीची यशस्वी ठरली, आणि पुढची अनेक र्वष इंटेलनं अक्षरश: दणाणून सोडली. इंटेलने त्यांचं सर्वात पहिलं मॉडेल काढलं ‘४००४’. अंतराळात सोडलेल्या ‘पायोनियर-१०’ मध्ये हीच चिप वापरली होती. त्यानंतर इंटेलने ‘८००८’ ही चिप बनवली. मायक्रोसॉफ्टचा सर्वेसर्वा बिल गेट्सने हीच चिप वापरून ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिले होते. या चिप्स लोकप्रिय होतात न होतात तोच त्यांचा प्रतिस्पर्धी मोटोरोलाने ‘६८००’ नावाची नवी चिप बाजारात आणली.त्यावर इंटेलने ८०८६ आणि ८०८८ या चिप्स मार्केटमध्ये आणल्या. आयबीएमने बनवलेला पीसी याच चिप्सवर आधारित होता. मात्र त्यानंतर मोटोरोलाने ‘६८०००’ नावाची शक्तिशाली चिप काढून इंटेलला जबरदस्त दणका दिला होता. त्याकाळी इंटेलची एक ओळख होती,’इंटेल स्पर्धकांना फक्त हरवत नाही तर नेस्तनाबूत करते.’ याच ब्रीदवाक्यातून इंटेलने पुढे ‘८०२८६’ ही जबरदस्त ताकदवान, स्वस्त आणि वापरायला सोपी अशी मायक्रोप्रोसेसर चिप बनवली.

नव्वदच्या दशकांत ऍन्ड्य्रू ग्रोव्ह हा धडाडीचा “सीईओ’ कंपनीत जॉईन झाला. तेव्हापासून इंटेलची कॉम्प्युटरविश्वात जवळजवळ मक्तेदारीच तयार झाली. २८६, ३८६, ४८६ या चीप फारशा कुणाला माहीत नाहीत, कारण चिप्सच्या नंबरांमुळे होणाऱ्या कायद्याच्या कटकटी नकोत म्हणून इंटेलने त्यांचं नाव “पेन्टियम” ठेवलं. हाच तो जगप्रसिद्ध पेंटींयम मायक्रोप्रोसेसर. यामागची गंमतशीर कहाणी अशी की चिप्सना आकड्यांची (४००४, ८०८०, ८०२८६ वगैरे) नावं दिल्याने इंटेलला त्यावर पेटंट्स मिळेनात. कारण आकड्यांवर पेटंट्स मिळत नसतात. म्हणून ‘पेंटियम’ हे नाव निघालं. या चिप्सची ताकद बघा! १९९७ साली बाजारात आलेल्या ‘पेंटियम २’ मध्ये ७५००० ट्रान्झिस्टर्स एका चिपवर होते, आणि ही चिप दर सेकंदाला ४० कोटी आकडेमोडी करू शकत असे! हीच क्षमता आताच्या चिप्समध्ये कैकपटीनं वाढली आहे! “इंटेल इनसाइड’ या जाहिरात मोहिमेमुळे “पेंटियम’ हे नाव कोट्यवधी लोकांना माहीत झाले. त्यानंतर “पेंटियम ४’ श्रेणीवर आधारलेले कॉम्प्युटर्सही खूपच लोकप्रिय झाले. कॉम्प्युटरवर आधारित कामे जसजशी वाढत गेली. तसतशी त्याचा वेग वाढण्याची गरजही वाढतच गेलेली दिसते; पण एका कॉम्प्युटरमध्ये एकापेक्षा जास्त मायक्रोप्रोसेसर लावणे किचकट आहे. आज आपण कम्प्युटर विकत घेतो तेव्हा ‘पी-फोर’वाला कम्प्युटर विकत घ्यायचा की पी-फाइव्ह की पी-सिक्स या प्रश्नांनी गांगरून जातो. ही सारी नावं या पेन्टियम सीपीयूचीच असतात. पी-४ यातील पी म्हणजे पेन्टियम. पण यातल्या ‘पी सिक्स’ सीपीयूची मूळ युक्ती ‘डिजिटल इक्विपमेंट कापोर्रेशन (डेक)’ नावाच्या कंपनीकडून इंटेलनं चोरली असल्याच्या आरोपांनी मोठं वादळचं उभं राहिलं. त्या भानगडीत ‘डिजिटल’नं इंटेलला न्यायालयात खेचून ६०,००,००,००० डॉलर्सची वसुलीही केली ! पण पुढे एक आणखी गडबड झाली. व्हर्जिनियातील एका प्राध्यापकाने इंटेलला त्यांचा प्रोसेसर एक ठराविक आकडेमोड करताना चुकतोय हे दाखवून दिले. पण ही चूक २७००० वर्षांतून एकदाच होते असं इंटेलचे इंजिनियर पटवून देत होते तरी या प्रसंगाला वेगळेच वळण लागले. पेंटींयमवर अनेक जोक्स येऊ लागले, लोक थट्टा करू लागले. त्यामुळे आयबीएमने पेन्टियमवर आधारित पीसी बनवणे बंद केले. तेव्हा मात्र इंटेलने सपशेल शरणागती पत्करली. चिपमधील दोष काढून त्याजागी नव्या चिप्स बसवण्यात आल्या यात इंटेलला ४७.५ कोटी डॉलरचा फटका बसला.

वाढत्या वेगाची गरज भागविण्यासाठी आता इंटेलने नवे “कोअर’ तंत्रज्ञान बाजारात आणले आहे. कोअर तंत्रज्ञानामध्ये एक चीपच्या आतच माहितीवर प्रक्रिया करणारे दोन किंवा चार भाग असतात. यामुळे कॉम्प्युटरवर एकाच वेळी अनेक कामे वेगाने करणे शक्यं होते. ऍपलच्या संगणकात इंटेलचे प्रोसेसर आधी वापरले जात नव्हते. हा इंटेलसाठी एक धब्बाच होता पण २००५ साली स्टीव्ह जॉब्जने इंटेलच्या चिप्स बसवणे मान्य केल्याने आधीच दबदबा असलेल्या इंटेलचा मार्केटमधील धाक अजूनच वाढला. कॉम्प्युटर डेलचा असो, वा ऍपलचा…. इंटेलच्या चिपशिवाय त्याचे पान हलत नाही.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ – अच्युत गोडबोले, अतुल कहाते यांचे लेखन

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..