नवीन लेखन...

गोष्ट छोट्याश्या ‘गुलाबी’ आभाळाची !

” आनंद ” मध्ये जीवनाला हसत सामोरा जाणारा आणि मृत्यूचे प्रगल्भ स्वागत करणारा खन्ना डोळे पाणावून गेला. त्याच्याबाबतीत करुणेचा थकवा (compassion fatigue) अनुभवणारा आणि त्यातून बाहेर पडलेला /सावरलेला (ही स्फूर्ती जाणाऱ्या आनंदनेच बहाल केली असते भास्कर बॅनर्जी ला) अमिताभ म्हणतो- ” आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं I ” या जोडीने बहार आणली आपल्या इवल्या चित्रानंदात !

मग आला ” मिली”- दुःखाचे स्त्री रूप घेऊन ! इथेही अमिताभ होताच, पण समोर जया भादुरी ! इथे या असाध्य रोगाच्या सहन करण्याला एक आशेची किनार लावली होती – चित्रपटाच्या शेवटी पुढल्या टप्प्याच्या उपचारांसाठी अमिताभ मिलीला प्रगत देशात नेतो आणि एक आशा जागवतो- कदाचित मिली वाचली असेल/ पुढे जगली असेल.

अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे.

SCID (Severe Combined Immunodeficiency) ने जन्मजात ग्रस्त अशी आयेशा आणि तिची आई – प्रियांका चोप्रा यांच्या झुंजीची ही कथा ! खरंतर या बाळाची चाहूल लागल्यावर गर्भपाताचा पर्याय हे जोडपं नाकारतं आणि पुढील तेरा-चौदा वर्षे ज्यात पराभव ठरलेला आहे अशा लढाईला फरहान-प्रियांका कंबर कसतात. त्या मुलीच्या प्रकृतीमधील चढउतार आणि मधूनच चिंतीत करणारी परिस्थिती प्रियांका आसवांच्या आडून सोसते. त्यामानाने प्रगल्भ बाप दुरूनच हे भोगत असतो. नियतीबरोबरच्या या झुंजीत वैद्यक शास्त्र पणाला लागते, प्रियांका आंतरजालावरून (इंटरनेट) मिळेल ती लक्षणे/उपचार यांची माहिती मिळवत अर्धी डॉक्टर बनते. या तीव्र आणि मनस्वी झोकून देण्यामुळे एक दिवस ती स्वतः मनोरुग्ण बनते आणि काही दिवसांसाठी परिवारापासून दूर जाते-उपचारांकरिता.

त्यांचा पुत्र दुरून आणि कधीकधी सहभागी होऊन बहिणीला कुमक पुरवीत असतो. “ दोन देशात दोघे आपण “ हा लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप चा पर्याय निवडला जातो- फक्त मुलीच्या उपचारांसाठी.

सोसण्याचा बांध फोडून एक दिवस पती-पत्नी कचाकचा भांडतात , मुलीसाठी कोणी अधिक उध्वस्त झालं? तिथेही प्रियांकाचे पारडे उजवे !
या बालिकेमध्ये अतिशय दुर्मिळ अशी वैद्यकीय गुंतागुंत (तिच्या रोगप्रतिकार शक्तीला आव्हान करणारी आणि छोट्यामोठ्या संसर्गांना सहजी बळी पडू शकणारी ही अवस्था) आणि त्यांवर झालाच तर किंचित परिणाम ( थोड्या वर्षांनी आयुष्य वाढण्याची शक्यता) म्हणून बोन मॅरो ट्रांसप्लांट चा पर्याय खंबीरपणे आईच नाकारते- बापाच्या इच्छेला डावलून !

स्वतःचं वेगळं असं जगणंच विसरलेली प्रियांका इथे “मेरी कोम ” नंतर भावली. फरहान नक्कीच समृद्ध आहे आणि वेगवेगळ्या छटांच्या भूमिका सहजी साकारतोय.

शेवटी आयेशा जाते आणि तिने जाण्यापूर्वी केलेला व्हिडीओ सगळ्यांना दाखविला जातो. संपूर्ण चित्रपटच दिवंगत आयेशाच्या कथनातून तिच्या कुटुंबियांच्या नियतीशी चाललेल्या लढतीची ” आँखो देखा हाल ” टाईप कहाणी आपल्याला सांगतो.

व्हिडिओत ती आईचे आभार मानते- ” इवलेसे १३-१४ वर्षांचे का होईना आयुष्य दिल्याबद्दल आणि गर्भातच तिचे जीवन न संपवल्याबद्दल ! ”

आजोबा, विधवा आई आणि कॅन्सरग्रस्त नातू यांच्या त्रिकोणाचा असाच ” अनुराग ” होता पण त्याची धग इतक्या तीव्रतेने जाणवली नव्हती. दुर्धर रोगांनी गांजलेल्या बालकांचे हाल तसेही प्रेक्षक म्हणून आपल्याला एका मर्यादेपलीकडे बघवत नाही.

पण हे इवलेसे गुलाबी आकाश बघता बघता अथांग होत जाते आणि आपल्याला वरच्या इयत्तेत घालते- असे प्रयोग काळजाला हात घालणारे असतात आणि ते फारसे सहन होत नसतील तरी बघायचे असतात कारण छोट्याशा खिडकीतूनच आभाळाचा कितीतरी मोठा इंद्रधनुषी तुकडा दिसतो-

आता जरा “पिंक “रंगाकडे माझे अधिक लक्ष असेल.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..