शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन जीवन सुरु होताना आपल्या मनात आपल्या भावी आयुष्याविषयी खूप वेगवेगळ्या कल्पना असतात. पैकी काही स्वप्नाळू असतील तर काही वास्तववादी! स्वप्नाळू वाटत असलेल्या कल्पना जर प्रत्यक्षात उतरवायच्या असतील तर त्यासाठी स्वत:च्या विचारांची आपल्या स्वत:ला खात्री असणं आणि आपल्या निर्णयाबद्दल आत्मविश्वास असणं फार महत्वाचं ठरतं. असाच एक स्वप्नाळू वाटणारा, सरधोपट वास्तवाशी फारकत घेणारा निर्णय एक युवती घेते… आणि त्यानंतर काय काय घडतं तिच्या आयुष्यात याचा पट मांडला आहे “गोष्ट एका खर्या इडीयट ची’ या पुस्तकात!
दिल्ली शहरात लहानाची मोठी झालेली संयुक्ता. दहावीच्या परीक्षेनंतर महाविद्यालयात प्रवेश न घेता तिने आपल्याला हवं ते शिकायचं ठरवलं आणि तिच्या आई-वडिलांनी देखील तिला खंबीर पाठींबा दिला.
सुरुवातीला संयुक्ता गोंधळली, नक्की काय शिकावंसं वाटतय आपल्याला याबाबत तिचा नक्की निर्णय होत नव्हता. आपण जे काही “वेगळं” शिकू त्यामुळे पुढील आयुष्यात आपल्याला उदरनिर्वाहासाठी काय संधी उपलब्ध होतील असेही तिला वाटे. तिच्या या वेगळ्या वाटेचं काही लोकांनी स्वागत केलं तर काहींनी प्रश्नचिह्न उपस्थित केलं. पण तरीही संयुक्ता आपल्या स्वत:ला “इडियट” होण्यापासून थांबवू शकली नाही!
अनौपचारिक महाविद्यालयीन वर्गांना बसणे, नावडते आणि नीरस वाटणारे विषय शिकणे यापेक्षा संयुक्ताला एक खुलं अवकाश मिळालं, तिने ते स्वत:हून निवडलं!
आपल्याला नक्की काय करायला आवडेल याच्या शोधात संयुक्ता कला शाखा,नृत्य, ओरिगामी, भारतीय संगीत आणि मागावर विणकाम अशा वेगवेगळ्या गोष्टी कुतुहलाने शिकली.
चेन्नई मधील के. एफ. आय या जे. कृष्णमूर्ती यांच्या शाळेत संयुक्ताने प्रवेश घेतला. संयुक्ता तिथे तत्वज्ञान विषयांच्या बैठकीत सहभागी झाली, भारतीय तत्वज्ञान तिने काही अंशी वाचलं. त्यातून तिचे स्वत:चे विचार स्पष्ट होत गेले. बालवाडीपासून बारावीपर्यंत असेलल्या या शाळेत अभ्यासेतर उपक्रमांवर भर होता, त्याचा फायदा संयुक्ताला झाला. भौतिकशास्त्र, इतिहास, चित्रकला, हातमाग असे विषय संयुक्ता इथे शिकली आणि त्याचवेळी तिमे इग्नूच्या बहिस्थ अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला.
नृत्य करणे, नृत्यनाट्य सादर करणे असा एक वेगळा अनुभव संयुक्ताने प्रथमच इथे घेतला.ओरिगामी सारख्या सोप्या वाटणा-या कागदी घड्यातून त्रिमितीय कलाकृती साकार करायलाही संयुक्ता इथे शिकली.
संयुक्ताच्या या शाळेत हातमागावर कापड विणायला शिकायची संधी उपलब्ध होती आणि संयुक्ता ते मनापासून शिकली. उश्यांचे अभ्रे, हात पुसायचे पंचे असं विणायला शिकताना संयुक्ताला या कलेचे पारंपरिक स्वरूप शिकून घेण्याची इच्छा झाली.
संयुक्ताला हातमागावर विणकाम आणि वस्त्रकला असा तुलनेने किचकट विषय का शिकावासा वाटला याबद्दल ती सांगते-
ती एक निर्मितीक्षम प्रक्रिया आहे ,जिच्यात हात आणि मन दोन्ही गुंतलेली असतात.
लोकांमध्ये काम करण्याची माझी इच्चा यात फलद्रूप होणार होती. लोक म्हणजे विणकर.
सर्जनशील कला आणि विक्री अशा कला – व्यवसायाशी संबंधित अनेक संधी यातून निर्माण होणार होत्या.
वस्त्र विणण्याची कला ही सोपी गोष्ट नाही हे माहिती असूनही संयुक्तानी पूर्ण विचारांती या केलेला वाहून घेण्याचं ठरवलं.
या कलेच्या प्रशिक्षणासाठी संयुक्ता खेड्यातील हातमाग विणकराच्या घरापासून ते बनारस पर्यंत फिरली. पारंपरिक हातमागावर कापड विणण्याची कला शिकताना तो माग खड्ड्यात कसा पुरावा लागतो येथपासूनचे शिक्षण तिने घेतले आणि एक शहरातील मुलगी ही लोप पावत असलेली कला शिकण्यासाठी येते हे पाहून गावातील विणकरही आत्मीयतेने तिला ही कला शिकवितात, त्यांचा आणि तिचा एक सुरेखसा भावबंध तयार होतो.
या प्रशिक्षणाच्या जोडीनेच नर्मदा खो-यातील तत्कालीन आंदोलनात संयुक्ता सहभागी झाली आणि त्यातून तिला समाजदर्शन घडले. तिचा दृष्टीकोन अधिक व्यापक झाला.
या सर्व व्यापातून संयुक्ताने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो ही “सुवर्ण पदकासह!”
आता संयुक्ताचा विवाह झाला आहे. आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी ती समाधानी आहे आणि आपल्या आवडत्या विषयात प्राविण्य मिळविल्याच समाधान तिला आहे. आता संयुक्ता आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे हातमाग विणकरलोकांसह काम करते. वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांसह तिचा संपर्क आहे आणि त्या जोडीने मानव जातीच्या हितासाठी ती तिच्या परीने ती काम करते!
मनापासून वाटतं तेच करा , यश हमखास आहे! असा मूलमंत्र युवा पिढीला देणारी संयुक्ताची ही कथा !
उच्च शिक्षणाचे अभियांत्रिकी, वैद्यक आणि संगणक हे तीन आयाम समाजातील युवक युवती आणि त्यांचे पालक यांच्या मनावर अधिराज्य गाजवत संयुक्ताचाहा प्रवास विशेष महत्वाचा वाटतो.
चला तर मग, संयुक्ताची मूळ वास्तववादी कथा वाचायला घेवूया !
गोष्ट एका खर्या इडियटची
अनुवाद – प्रभा पागे
राजहंस प्रकाशन
मे २०१०
Leave a Reply