लहानपणापासून माझ्या मनात बरीच कुतुहले आहेत. मोठा झाल्यावर त्यातली बरीच कमी झाली‚ काही आणखी नवी आली. बालपण खेडयात गेले असल्याने सुरवातीची बरीच वर्षे दुरच्या डोंगराच्या पायथ्याची वाहने बघून ती आपोआप कशी धावतात याचे कुतूहल वाटायचे. वाहन चालवायला ड्रायव्हर असतो हे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. सगळयाच वाहनांना ड्रायव्हर असतो हे समजल्यावर तर मला धक्काच बसला होता.
पोपट हा माझा आवडता पक्षी आहे. पिंजर्यातला नव्हे‚ रानातला. पाळीव पोपटाच्या डोळयांत मला कारुण्याचा भाव दिसतो. त्याच्या चोचीला लालभडक रंग कोण देत असावे असा मला लहानपणी प्रश्न पडायचा. पोपट तंबाखू‚ चूना आणि कात टाकून पान खातो त्यामुळे त्याचे तोंड लाल होत असावे अशी माझी बरीच वर्षे समजूत होती. शिवाय त्याच्या गळयालाही मफलरसारखा पट्टा कुणी बांधलाय ते मला कळायचे नाही. अशासारखी ही लहानपणाची कुतूहले गेली आणि आता लोक फ्रंेच कट का ठेवतात यासारख्या शंका डोक्यात घुसल्या.
एक तर हा फ्रंेच कट दाढीचा आहे की मिशीचा आहे ते मला माहीत नाही. बहूतेक तो दाढीचा असावा कारण त्या कटातल्या जास्त केसांचा वाटा दाढीचा असतो. एकदा घरी दाढी करत असताना या फ्रंेच कटाचा विचार माझ्या डोक्यात आला. हल्ली दाढी मात्र मी घरीच करतो. त्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे मला रविंद्रनाथ टागोरांसारखी भारदस्त दाढी नाही आणि दुसरे म्हणजे प्रत्येक आठवडयाला फक्त दाढी करायला त्या कारागीराकडे जायचे हा विचार मनात आल्याआल्या करायला आलेल्या दाढीचे केस हनुवटीवरच उभे रहातात.
मागे एकदा दाढी करायला ह्याच्या खुर्चीत बसलो होतो. तो झुपकेदार ब्रश चोळून चोळून त्याने माझ्या तोंडाला फेस आणला. फक्त तोंडालाच काय‚ तो फेस त्याने माझ्या नाकातही कोंबला. श्वास घेता येईना! हा सगळा कार्यक्रम झाल्यावर “लगेच येतो साहेब!” म्हणून तो जो सटकला ते अर्ध्या तासानेच परत आला. आपल्याशिवाय जग चालणार नाही हा अविर्भाव सतत तोंडावर बाळगणारे हे तमाम कारागीर माझ्याच वाट्याला का येतात काही कळत नाही. बरं‚ खुर्चीवर बसायच्या आधी काही सांगणार नाहीत. गळयाभोवती कोणे एके काळी पांढरा असेल अशी शंका येणारा कापडाचा तुकडा गंुडाळून तोंडाला फेस आणला की‚ “साहेब जरा चहा पिऊन येतो!” मग काय, साहेब बसतातच वाट बघत!
तो बाहेर गेल्यावर त्याच्या त्या मानेभोवती टाकलेल्या वस्त्राने मी नाकातला फेस पुसून टाकला आणि चातकाप्रमाणे त्याची वाट बघत बसलो. तोंडावरचा तो स्थायुरुप की द्रवरुप असणारा फेस केव्हाच सुकून गेला होता. त्याची वाट बघून पेंग यायला लागला आणि हा आला.
हे सगळे कारागीर त्यांच्या दुकानात आरसे कशाला लावतात कोण जाणे! गिर्हाईकाने खुर्चीवर बसल्यावर समोरच्या आरशात जरा स्वत:ला न्याहळले की यांचे पित्त खवळते. गिर्हाईकाची मुंडी ही जिवंत माणसाची आहे हे विसरून अंगात असणारे सगळे बळ हे लोक मुठीत एकवटतात आणि तो मुंडीनामक अवयव मागे नाहीतर पुढे आदळतो. “हं…असंच बसा. जरादेखील हलू नका.” त्यातूनही हलण्याचा प्रयत्न करून त्याचा नियमभंग केला‚ तर हा हातात असणारा वस्तरा चारपाचवेळा इकडे तिकडे करण्याऐवजी आरशातून गिर्हाईकाकडे बघत आणि एखादया खलनायकासारखे हसत आठ दहावेळा इकडे तिकडे करतो. मग गिर्हाईक कशाला झक मारायला हलेल? म्हणून त्याच्याकडे गेले की स्वत:ची मुंडी त्याच्या स्वाधीन करून बसण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. मग पुरेसा फ्रंेच कटही होणार नाही एवढीशी दाढी करायला त्याच्याकडे कशाला जा? ज्यादिवशी दाढी करताना काहीही कारण नसताना त्याने माझा कापडाने गळा आवळला त्याच दिवशी मी दाढीचे सामान खरेदी केले. फक्त केस कापून आल्यावरच मानगुटीवर जे बलशाली प्रयोग झालेले असतात त्यानेच दोन दिवस मान धरल्यासारखी वाटते (दुसर्या कुणीतरी नव्हे. आपोआप)
तर अचानक फ्रेंच कटाचा विचार मनात आला त्यावेळी दाढीचे उत्तरायण चालू होते. म्हणजे दाढी केल्यावर केस कुठे कुठे बाकी आहेत हे बघण्याचे काम चालले होते. असे न बघितल्यामुळे केस शिल्लक रहातात हा माझा अनुभव आहे. हनुवटी बरीच गुळगुळीत झाली असल्यामुळे फ्रेंचकट ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. खरंतर मी हा कट कधीच ठेवणार नाही. कारण हा कट ठेवलेला माणूस सकाळी न अंघोळ केल्यासारखाा वाटतो. तरीही म्हटले‚ पहिल्यांदा तशी दाढी कोरू आणि मग सगळीच दाढी करू. पण हा विचार डोक्यात यायलाही खूप उशिर झाला होता. ‘चला मिशी तर कोरता येते का ते बघूया’ म्हणून हातातली कात्री डाव्या मिशीच्या टोकाला लावायला आणि किचनमध्ये कुठलेतरी भांडे पडायला एकच गाठ पडली. परिणामी आमची एक तृतीयांश डावी मिशी शहीद होऊन पुढयात पडली. (अरेरे! काय पाप घडले हे आपल्या हातून, काय दोष होता त्या बिचारीचा?) मला तिरुपतीला जाऊन टक्कल केल्यावरही होणार नाही तेवढे दु:ख माझ्या तुटलेल्या मिशीपेक्षा राहिलेल्या मिशीकडे बघून झाले. झालेल्या गोष्टीवर निरर्थक विचार करण्यात काही अर्थ नसतो हा कुण्या महापुरुषाचा विचार चटकन माझ्या मनात आला आणि विदयुत चपळाईने मी माझी एक तृतीयांश उजवी मिशी उडवली. माझ्या दोन्ही मिशांची ही अवस्था झाल्यावर समोरच्या आरशात जो माणूस होता, तो मला चार्ली चॅप्लिन आणि हिटलरच्या वंशातला दिसू लागला.
एकूण काय‚ फ्रेंच कटाचा विचार असा अंगाशी आल्यामुळे मी सगळीच्या सगळी मिशी कापून टाकली. एवढ्यात ही बाहेर आली. मी लाजेने तोंडावर हात धरला होता तो बराच वेळ न काढल्यामुळे हिला काहीतरी शंका आली.
“तुम्हांला हजारदा सांगितलं असेल सलूनमध्ये जाऊन दाढी करा म्हणून! पण ऐकायला नको. बसतात आरसा समोर घेऊन वेडंवाकडं तोंड करत आणि आडवी तिडवी ब्लेडं फिरवत!”
सावध असताना आडव्या तिडव्या ब्लेडने एकवेळा चेहरा कापला तरी चालेल पण बेसावध असताना ‘फास्स-’ करून अचानक पाण्याचा फवारा तोंडावर मारलेला मला आवडत नाही. मी अजूनही तोंडावरून हात काढला नव्हता.
“जास्त नाही ना लागलं? डेटॉल आणायला बरं. ते एक केव्हाचंच संपलंय!” असे म्हणत हिने बंडयाला हाक मारली. डेटॉल आणल्यावर आपली काही धडगत नाही हे ओळखून मी पिक्चरातल्या मधुचंद्राच्या रात्री नवरा नववधूचा पुढे आलेला घुंगट जसा हळूवार उचलतो तो भाव तोंडावर आणून नाकाखालच्या आत्ताच गुळगुळीत केलेल्या भागावरून हात काढला. ही “ई–” करून एवढया मोठ्याने किंचाळली की माझ्या समोरचे पाण्याचे भांडे माझ्याच हातून आडवे झाले.
“हे काय एक नवीनच थेर?”
“कुठं काय? मिशी…मिशी कापली!” असे म्हणत मी माझ्या कापलेल्या मिशांचा सुरवंटासारखा एक झुपका तिला दोन बोटांच्या चिमटीत घेऊन दाखवला.
ती दोन्ही कानावर हात ठेऊन पुन्हा किंचाळली “शी–”
“काय शी?”
“मामंजी अजून आहेत म्हटलं!”
“हॅ- तुझं आपलं काहीतरीच असतं!” एखादया सराईत न्हाव्यासारखा ब्लेड ‚कात्री‚ ब्रश इत्यादी सामानाची आवराआवरी करत मी म्हणालो.
“ज्यांचे बाप नसतात ना‚ ते मिशा काढतात!”
“म्हणजे मिशांवरून बाप आहे की नाही ते समजायचं?”
“मग?”
“अगं सावंतला किती मोठी मिशी आहे‚ त्याचा बाप जाऊन झाली की नाही चारपाच वर्षे? आणि वजिफदारला मिशी आहे का? पण त्याचा बाप अजूनही ठणठणीत आहे. माहित आहे ना?”
“ते मला काही सांगू नका. तुम्ही मिशी का काढली ते मला आधी सांगा.”
“आँ? आता चुकून निघाली त्याला मी काय करणार? मी काय मुद्दाम काढली आहे काय?” आम्ही मिशा कोरत होतो हे तिला कशाला सांगा?
“पण या वयात शोभत नाही हे नसते उद्योग करणं!”
या वयात कसले उद्योग करणं मला शोभेल हे मी तिला विचारणार आहे पण धाडस होत नाही.
“पण तुलाच अडचण व्हायची ना तिची?” ही लाजली.
“चला तुमचं आपलं काहीतरीच!” आमच्या घरातले वातावरण क्षणात असे हे पालटते. एवढ्यात बंडया उड्या मारत घरात आला. माझ्याकडे बघताना हा कोण नवीनच माणूस आपल्या घरात घुसला आहे हा भाव त्याच्या चेहर्यावर होता.
“मम्मी हे कोण गं?”
“हे तुझे पप्पा आहेत‚ पप्पा!”
आईचे हे उद्गार ऐकल्यावर त्याला मजा वाटली असावी.
“मने, मने‚ अगं पळ. आपले पप्पा बघ कसे दिसताहेत ते. आपल्या गावी एक बिनशिंगाचा बैल होता ना‚ अगदी तस्से!”
एवढ्यात मनुबाईंची उडी घरात पडली.
“अय्या खरंच की! पण त्याला शेपटी होती ना रे?”
मनीच्या या प्रश्नाने घरातले तणावाचे वातावरण एकदमच निवळले.
…
©विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog/
Leave a Reply