नवीन लेखन...

गोष्ट त्या दोघांची

गिरिजाआत्या अणि तिचे यजमान रत्नाकर. आम्ही त्यांना काकाच म्हणायचो. दोघांचा संसार तसा वाढलेल्या वयावरच सुरू झाला. रत्नाकर आपल्या लग्नाचं वय उलटुन गेलेल्या बहिणीसाठी थांबून राहिले होते आणि गिरीजाआत्याचं लग्न जुळत नव्हतं म्हणून ती बिनलग्नाची राहिली होती. गंमत म्हणजे काही वर्षांपूर्वी हे प्रपोजल दोघांच्याही समोर आलं होतं. परंतू प्रत्येक गोष्ट घडण्याची नियतीने एक वेळ निश्चित केलेली असते. आपल्या बहिणीसाठी रत्नाकरनी त्यावेळी या लग्नाला नकार दिला. अखेर बहिणही अविवाहित राहूनच स्वर्गवासी झाली. परंतू गिरीजाआत्या आणि रत्नाकरकरकाकांचं लग्न मात्र ती हयात असतानाच झालं. यालाच म्हणतात नियतीचा खेळ.

र.काकांचा स्वभाव माणसं जोडणारा, मनापासून मदतीचा हात देणारा, चांगल्या गोष्टींचं कौतुक करणारा, सरळमार्गी आणि छक्के पंजे न जाणणारा होता. त्यांना मुलांना शिकवण्याची, म्हणजे शैक्षणिक विषय शिकवण्याची मनापासून आवड होती. संस्कृत, गणित, शास्त्र आणि इंग्रजी हे त्यांचे आवडते विषय. याउलट गिरीजाआत्या एक यशस्वी शिक्षिका असूनही माणसांचा फारसा वासवारा नको असणारी, कुणाशीही जुळवून न घेणारी, प्रत्येकात काहीतरी खोट शोधणारी, संशयाने ग्रासलेली. आता तिच्यातल्या सकारात्मक गोष्टी सांगायच्या तर ती एक चांगली शिक्षिका होती, नाकासमोर चालणारी आणि सुसंस्कृत सभ्यता या गुणांनी पूर्णपणे युक्त होती. र.काका एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीत एक यशस्वी विक्री अधिकारी ( sales executive ) म्हणून कार्यरत होते. प्रथमदर्शनी तसं सगळं व्यवस्थित चाललं होतं. घरात पैशाची आवक चांगली होती, स्वतःची प्रशस्त जागा होती. राजाराणीचा संसार होता. परंतू गिरीजाआत्याचा स्वभाव किरकिरा आणि सतत प्रकृतीची तक्रार करत रहाणारा. तरी र.काकांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही किंवा कधी चिडचिडही केली नाही. ऑफिसमध्ये जाण्याआधी आणि अगदी आल्यावर सुद्धा अगदी आनंदाने ते स्वयंपाकघरात बायकोच्या मदतीला हजर व्हायचे. या सगळ्यात एकच कमतरता होती ती अपत्याची. तशी गिरीजाआत्याला लहान मुलांची फारशी आवड नव्हती. परंतू र.काका लहान मुलांत मनसोक्त रमायचे. रस्त्याने जाताना एखादं गोड मुलं दिसलं की ते न राहवून त्याला उचलून घ्यायचे. गिरीजाआत्या त्यांना खूप ओरडायची. त्यावर म्हणायचे ‘ अगं आपण त्याला पळवून नेतोय का?’ बघ ना किती गोड आहे ‘. परंतू अपत्य सुख नियतीने त्यांच्या पदरात काही टाकले नाहीं.

लग्नापूर्वी र.काका आपले भाऊ, वहिनी, पुतणे कंपनी साऱ्यांशी खूप अटॅच्ड होते. परंतू लग्नानंतर हे ममत्व कमी कमी होत दुरावा वाढत गेला. मनाने र.काका या साऱ्यांपासून दुरावले, आणि मनं दुरावली की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टीही कलुषीत होऊ लागते. त्यातच र.काकांची थोरली अविवाहित बहीण जी विचित्र स्वभावामुळे वृद्धाश्रमात राहत होती ती स्वर्गवासी झाली. ती हयात असताना मात्र त्यांनी तिचं सगळं मनापासून केलं.

असेच दिवस जात होते आणि अचानक र.काकांच्या वागणुकीत काही अनाकलनीय बदल होऊ लागले. सतत काहीतरी विचार करत बसायचे, बँकेचे सगळे व्यवहार मांडून तपासत बसायचे, त्यांचं बोलणंही जेव्हढयास तेव्हढं होऊ लागलं. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर आणि भुकेवर होऊ लागला. अत्यंत सज्जन, पापभिरू असलेले र.काका विचित्र गोष्टी डोक्यात घेऊन विचार करत राहू लागले. अर्थातच या साऱ्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला. अखेर एका मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यांच्या औषधांनी त्यांना थोडा आरामही मिळाला. परंतू अजूनही या सगळ्यातून ते पूर्णपणे बाहेर येत नव्हते. जवळच्या सगळ्यांनी त्यांना खूप समजावलं, कारण त्यांची हे अवस्था सगळ्यांनाच नवीन होती. आपण विचित्र वागतोय हे र.काकांना जाणवतं होतं परंतू तो मानसिक आजार त्यांना यातून बाहेर येऊ देत नव्हता. अखेर सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या आणि एक दिवस र.काका गिरीजाआत्याला मागे ठेवून हे जग सोडून गेले. सुख, संपत्ती, स्वास्थ्य असूनही मानसिक आजाराने एका सत्छील माणसाचा बळी घेतला. सारी क्रियाकर्म आटोपली. गिरीजाआत्याचं वय असलं तरी तिला शारीरिक व्याधी काही नव्हत्या, आणि एकटं रहाणं तसं तिला फारसं आवडत नव्हतं असही नाही. त्यामुळे सुरवतीचा काळ बरा गेला. र.काकांचा पुतण्या मधूनमधून येऊन काही हवं नको पहात होता. पण हळूहळू वयानुसार गिरीजाआत्याला नित्याचं काम करणंही कठीण जाऊ लागलं. मुळात तिला झोप कमीच होती. एकटेपणामुळे नाही म्हटलं तरी कंटाळा आणि असुरक्षितता वाढत जाऊन ती अजून कमी झाली. या सगळ्याच्या परिणामाने ती आजारी पडली आणि तिला इस्पितळात दाखल करावं लागलं. शारीरिक व्याधी काहीही नसल्याने आणि जगण्याची मानसिकता कणखर असल्यामुळे चार पाच दिवसातच तिला आराम वाटू लागला. परंतू आता तिला घरात एकटं ठेवणं शक्यच नव्हतं, आणि चोवीस तास तिच्याबरोबर रहाणं कुणालाच जमण्यासारखं नव्हतं. नर्सिंग ब्यूरो मधल्या दोन बायका बारा बारा तासांसाठी ठेवून पहिल्या परंतू हा प्रयोगही तितकासा यशस्वी ठरला नाही. तिचा पुतण्या नित्यनेमाने रात्री तिच्या सोबतीला यायचा पण दिवसभर ती एकटीच असायची. अखेर तिला वृद्धाश्रमात दाखल करण्याचं ठरलं, आणि तिनेही ते मान्य केलं. आज गिरीजाआत्या ठाण्यातील एका वृद्धाश्रमात आहे. या गोष्टीला चार वर्ष होऊन गेली. आर्थिक स्थिती चांगली, स्वतःची जागा, कसलीही जबाबदारी नाही या सगळ्या सकारात्मक गोष्टी असूनही आज ती वृद्धाश्रमात आहे. दोन वर्षांपूर्वीच तिने वयाची नव्वदी कधीच पार केली आहे. अजूनही ती स्वतचं सगळं स्वतः करते. या वयातही ती आपल्या प्रत्येक गोष्टीत चिकित्सक आहे. अगदी तिला आणलेल्या गाउनचा रंग, डिझाईन ती व्यवस्थित पारखून घेते.

आयुष्याला कंटाळली असली तरी जगण्याची जिद्द आजही भरपूर आहे. आजही बसल्या बसल्या ती अनेक गोष्टी जमा करत असते. वर्तमानपत्रात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, घरगुती औषधोपचार,कलाकृती यांची कात्रणं व्यवस्थित कापून एका वहीत जपून ठेवत असते. शक्य होईल तेव्हढ लिहून ठेवत असते. आपल्या कलासक्त मनाने नेहमीच्या वापरातील वस्तूंना सजवत असते. फक्त हे सारं पाहायला तिचं आपलं तिथे कुणीच नसतं.

— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..