साधारण चारेक वर्षांपूर्वी मी फेसबुकवरच्या ‘आम्ही साहित्यिक’ या समूहावर लिहायला लागलो. अगदी थोडयाच अवधीत अनेक जणांशी ऋणानुबंध … कौटुंबिक जिव्हाळा सुरु झाला. सौ. मंजुषा बुगदाणे या मी लिहिलेलं सातत्याने आवर्जून वाचत होत्या.
त्या देखील मध्ये मध्ये अनेक विषयांवर लिहायच्या. लिहिणं अगदी साधं … अकृत्रिम. मुख्य म्हणजे भाषेला थोडासा ग्रामीण बाज. साहजिकच लिहिणं थोडंसं वेगळं. मी वाचायला लागलो. काही दिवसांनी त्यांनी ‘गोष्टी माहेरच्या – माजलगावच्या’ या शीर्षकाखाली त्यांच्या लहानपणीच्या .. गावातल्या गोष्टी लिहायला सुरवात केली. त्या गोष्टी अतिशय सुंदर लिहिलेल्या होत्या. गोष्टी त्यावेळच्या ग्रामीण जीवनाच्या… रसरशीत. त्यातही मराठवाडयातल्या ब्राम्हण समाजाच्या अनेक सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक गोष्टी सांगणाऱ्या. सणावारांच्या, उबदार नात्यांच्या, स्त्री मनाच्या, शेतीवाडीच्या. त्या अंबेजोगाई-परळी जवळच्या माजलगावच्या. ‘मुळे’ कुटुंबातील. मला त्यांच्या माजलगावाच्या या गोष्टी आवडल्या. या निमित्ताने त्यांच्याशी अधेमधे थोडंसं बोलणं होत गेलं.
एकदा मी कविवर्य ना. घ. देशपांडे यांच्याविषयी थोडंसं लिहिलं. त्यांच्या कंचनीचा महाल या कवितेविषयी देखील लिहिलं. मला तो महाल बघायला त्यांच्या गावी म्हणजे मेहेकरला कधीतरी जायचंय असं पण लिहिलं. हे सौ. मंजुषा यांनी वाचल्यावर मला मेसेज केला की त्यांचं सासर मेहेकरचं. कविवर्य देशपांडे यांचा वाडा त्याच्या अगदी घराजवळ आहे. तुम्हाला कधी जायचं असेल तर मला सांगा. मी नक्की तुम्हाला मदत करेन. त्यांनी असंही सांगितलं की मेहेकरपासून लोणार सरोवर अगदी जवळ आहे. त्या सरोवराचे सुप्रसिद्ध अभ्यासक प्राचार्य सुधाकर बुगदाणे माझे चुलत सासरे आहेत. त्यांचीही तुमच्याशी गाठ घालून देईन. आम्ही त्याच दरम्यान म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ मध्ये जायचं ठरवलं देखील पण काहीतरी काम आलं. जाणं झालं नाही. नंतर कोरोनाचं पर्व सुरु झालं. मात्र यामुळे त्यांच्याशी ऋणानुबंध अजून दृढ झाला.
त्यांचं अजून एक वैशिष्ठय म्हणजे त्या रोज फेसबुकवर दाखवत असलेली त्यांच्या बागेतली फुलं. ती फुलं इतक्या वेगवेगळ्या प्रकारची की आश्चर्य वाटायचं. मी विचारल्यावर म्हणाल्या की घराच्या आवारात आणि टेरेसवर त्यांनी अनेक फुलझाडं जोपासलेली आहेत. शेकडो झाडं. त्यांचा तो छंद त्या जीवापाड जपतात. त्यांची जीव ओतून निगराणी ठेवतात. यात अगदी तजेलदार … फुललेली कमळं देखील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे एवढी फुलं फुलतात पण यातलं एकही फुल त्या तोडत नाहीत. तोडू देत नाहीत. या फुलझाडांशी त्याचं खूप प्रेमाचं नातं आहे. त्यांची मनं त्यांना कळतात. त्याप्रमाणे त्यांना ऊन, सावली, पाणी हे सगळं समजून उमजून देतात.
हे सगळं कळल्यावर आम्हाला त्याची बाग बघायची होती. त्याप्रमाणे मी त्यांना विचारलं देखील. त्यावेळी आम्ही दोघं हैदराबादला होतो. मुंबईला परत आल्यावर काही दिवसातच कोरोना सुरु झाला आणि नाशिकला त्यांच्या घरी जाणं जमलं नाही. गेल्या आठवडयात आम्ही सापुतारा परिसरात जाणार होतो. त्यांचं घर आमच्या मार्गालगत होतं. आम्ही सहकुटुंब गेलो. अगदी ८७ वर्षांच्या माझ्या सासूबाई देखील होत्या. आम्ही त्याची बाग बघितली. बाग … फुलझाडं त्यांनी दाखवली. बाग अतिशय साधी पण समृद्ध. कुठेही फार सजावट नाही की भपका नाही. मात्र प्रत्येक झाड रसरशीत. उत्तम निगराणी ठेवलेलं. त्या लहान असल्यापासूनच शेतकरी कुटुंबात वाढल्या असल्याने त्यांना उपजतच यातलं उत्तम ज्ञान आहे. त्यात त्या सतत याचा अभ्यास करत असतात. वेगवेगळे प्रयोग करत असतात. हे सगळं झाडांची मनं जपत करतात. मध्ये त्यांच्या गुलाबाला राष्ट्रीय पातळीवर दुसरं बक्षीस देखील मिळालं.
आम्ही थोडाच वेळ त्यांच्याकडे होतो. पण कायम लक्षात राहील अशी ती भेट होती. पूर्णतः अकृत्रिम आणि खऱ्या स्नेहाची. ऋणानुबंध कसे असतात बघा …आम्ही दोघं तर होतोच पण माझ्या ८७ वर्षांच्या सासूबाई देखील आल्या. त्याच्याकडे परत जायचंय. झाडांच्या काही गोष्टी अजून जाणून घ्यायला. अर्थात मराठवाडयाच्या ब्राह्मणी स्वैपाकाची चव घ्यायला. नाशिकला अजून काही घरी देखील जायचंय. ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या गाठी …. भेटीत तुष्टता मोठी हेच खरं.
-प्रकाश पिटकर
7506093064
9969036619
मार्च १०, २०२२
Leave a Reply