नवीन लेखन...

गोष्टी सांगेन युक्तांच्या चार

(महाभारतातील कथा )

पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला. त्यानंतर एक वर्षभर त्यांना विराटाच्या मत्स्य देशात अज्ञातवासात राहून काढावे लागले. हाही खडतर काळ संपला व त्यांनी विराटाच्या नगरीस रामराम ठोकला. उपप्लव्य नावाच्या एका नगरामध्ये ते उघडपणे वास करू लागले. कृष्ण आणि बलराम द्वारकेहून तेथे आले. मित्रमंडळ व आप्तेष्ट आले. या सर्वांच्या उपस्थितीत अर्जुनपुत्र अभिमन्यूचे विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी मोठ्या थाटात लग्न पार पडले.

त्यानंतर सर्वांनी मिळून खल केला. यामध्ये असे ठरले की, दुर्योधनाशी बोलणी करण्याकरिता व त्याचे मन वळवावे यासाठी एका खास दूताची रवानगी करावी. हे काम पार पाडण्यासाठी राजकारण धुरंधर अशा मुत्सद्द्याचीच नेमणूक करावयास हवी. राजा द्रुपदच्या दरबारात सर्व प्रकारची धार्मिक कृत्ये करणारा एक विद्वान व व्यवहारी ब्राह्मण होता. त्यास योग्य त्या सूचना देऊन दुर्योधनाशी बोलणी करण्यासाठी पाठवायचे ठरले. पण शांततेच्या तहाच्या वाटाघाटी चालू असताना युद्धाची तयारीही चालू ठेवायची हे राजकारणाचे एक तंत्र आहे. त्यानुसार पांडव युद्धाची तयारी करू लागले. कारण त्यांना खात्री होती की, दुर्योधन कसल्याही विनंतीस भीक घालणार नाही. दुर्योधनही मोठा राजकारणी. त्यानेही आपल्या बाजूने जय्यत तयारी चालू ठेवली.

ठरल्याप्रमाणे द्रुपदचा कुशल ब्राह्मण हस्तिनापुरास गेला. पांडवांनी आपल्या बाजूच्या लोकांस तयारीत राहण्यास सांगितले. श्रीकृष्णाची भेट घेण्यासाठी म्हणून अर्जुन स्वत: द्वारकेला गेला. दुर्योधनास हे कळताच रथारूढ होऊन त्यानेही द्वारकेस प्रयाण केले. दोघेही एकाच वेळेस द्वारकेस पोहोचले. भगवान श्रीकृष्ण दोघांनाही आधार वाटत होता. त्याची मदत म्हणजे हमखास विजय असे त्यांना वाटत होते.

द्वारका नगरीमध्ये श्रीकृष्णाच्या महालात प्रवेश होणे त्यांना मुळीच अवघड नव्हते. कारण दोघेही श्रीकृष्णाचे आप्तच. त्यावेळी कृष्ण गाढ झोपलेला होता.

तो जागा होईपर्यंत दोघेही तेथेच वाट पहात बसले. श्रीकृष्णाच्या डोक्याच्या बाजूस असलेल्या सुंदर नक्षीकाम केलेल्या शोभिवंत आसनावर, दुर्योधन बसला तर अर्जुन पायाच्या बाजूस हात जोडून विनम्र भावाने उभा राहिला.

साहाजिकच श्रीकृष्ण उठला तेव्हा त्यास प्रथम दृष्टीस पडला तो अर्जुन.

त्याने प्रथम अर्जुनाचे स्वागत केले व त्याचे कुशल विचारले. मग दुर्योधनाकडे वळून त्याचेही स्वागत केले व कुशल विचारले. नंतर उभयतांस प्रश्न केला, “आज कसे काय येणे झाले?” प्रथम दुर्योधन बोलला, “ श्रीकृष्णा, कौरवपांडवात युद्ध होण्याचा संभव दिसतो. त्याप्रसंगी तुझी साथ मला हवी. मी व अर्जुन दोघेही तुला सारखेच.

दोघेही तुझे आप्तच. तुझ्या शयनमंदिरात येतेवेळेस मी आधी आलो. प्रथम आलेल्यास प्रथम संधी, ही जगाची रहाटी आहे. जनार्दना, तू महात्मा आहेस.

तूच आदर्श घालून द्यावयास हवा. म्हणून धर्माचे पालन कर. मी प्रथम आलो, हे लक्षात राहू दे.

यावर पुरुषोत्तमाने म्हटले, “ठीक आहे, दुर्योधना. पण मी उठल्यावर मला अगोदर दिसला तो अर्जुन. म्हणून याबात तुम्हा दोघांचा मजवर समान हक्क आहे. मी दोघांसही साहाय्य केले पाहिजे. जगाची रीत अशी आहे की, बक्षिसी लहानास पहिल्यांदा द्यायची व मोठ्यास त्याच्यानंतर. पण अर्जुना तू कशासाठी आलास ते समजू दे.” “तुझ्या कृपाप्रसादाचा लाभ व्हावा यासाठी. युद्धात पांडवांना तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. म्हणून येणे घडले.” अर्जुन नम्रपणे म्हणाला.

श्रीकृष्ण दोघांसही उद्देशून म्हणाला, ठीक आहे, माझ्याकडे प्रचंड व अजिंक्य असे सैन्य आहे. ते एकाने घ्यावे व दुसरीकडे मी जातीने राहीन. परंतु मी स्वत: शस्त्र हाती धरणार नाही, किंवा युद्धात प्रत्यक्ष भाग घेणार नाही, केवळ युक्तिच्या चार गोष्टी सांगेन. अर्जुन लहान असल्याने प्रथम त्याने मागणी करावी.

श्रीकृष्णाने असे सांगितल्यावर दोघेही विचारमग्न झाले. काय निवडावे हा खरोखरीच गहन प्रश्न होता.

कृष्णाने विचारले, “सांग पार्था, सांग. तुला मी हवा की माझे मोठे सैन्य हवे?” क्षणाचाही विलंब न लावता नतमस्तक होऊन अर्जुनाने उत्तर दिले, “श्रीकृष्णा, मला तू हवाच; मग तू निःशस्त्र का असेना.” हे ऐकताच दुर्योधनाच्या आनंदास पारावार उरला नाही. काय ही अर्जुनाची अक्कल असे त्यास वाटले.

त्याला हवे होते ते मिळाले. आपली पसंती सांगण्याची आवश्यकताच त्याला उरली नव्हती. सहाजिकच वासुदेवाचे प्रचंड सैन्य त्याच्या बाजूस आले. तो हर्षाने बलरामाकडे गेला, आपल्या अक्कलहुषारीची तारीफ करीत त्याला सर्व वृत्तांत कथन केला.

तेव्हा बलराम म्हणाला, “छान झाले दुर्योधना. तुझा विजय असो. पण माझा पेच कसा सोडवू? कृष्ण ज्या बाजूस आहे, त्याविरुद्ध मी उभा ठाकू कसा?

तसेच मी पार्थासही मदत करणार नाही; माझा नाइलाज आहे, दुर्योधना. क्षत्रिय धर्माचे पालन कर. या भूमीचे राजे तुझे गुणगान करतात. क्षत्रियाच्या ब्रिदास जागून युद्ध कर. खरे पाहता, कृष्ण व मी दोघेही कौरव-पांडवांचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही यात पडू नये, असे मी कृष्णास निक्षून सांगितले होते; पण त्यास हे पटले नाही.”

दुर्योधनाने बलरामाचा निरोप घेतला व आनंदाच्या बेहोशीत तो हस्तीनापुरास परतला. “किती मुर्ख हा अर्जुन! द्वारकाधीशाचे प्रचंड सैन्य माझ्या बाजूने लढणार, जोडीला बलरामच्या सदिच्छा आहेतच. आणि एकाकी वासुदेव सैन्याविना तिकडे राहणार! विजयाचे पारडे माझ्याकडे झुकणार!” पुढे श्रीकृष्ण व अर्जुन असे दोघेच बोलत बसले असतां, श्रीकृष्णाने प्रश्न केला, “धनंजय, शस्त्रहीन एकाकी अशा माझी पसंती तू का केलीस? पराक्रमी सैन्य का नाकारलेस?’ अर्जुन नम्रपणे म्हणाला, “ भगवंता, तू सर्वशक्तिमान प्रभू आहेस. तू एकटाच सर्व राजांना व त्यांच्या सैन्यांना जिंकण्यास समर्थ आहे. तू माझा साथी व सारथी हो. केवळ तुझ्या सान्निध्यामुळे माझ्या अंगी प्रचंड बळ येईल व मी युद्ध जिंकू शकेल. ही माझी फार दिवसांची इच्छा आज तुझ्या कृपेमुळे सफल झाली.

तुझ्यासारखी निष्कलंक कीर्ती मला हवी, केवळ उपभोग नको.”

अर्जुनाने लोटांगण घातले. सस्मित वदनाने श्रीकृष्ण उद्गारला, “पार्था, माझी बरोबरी करू इच्छितोस! कर प्रयत्न तुला यश येवो. तथास्तु” भारतीय युद्ध सुरू झाले तेव्हा हा जगाचा स्वामी भगवान नारायण अर्जुनाचा सारथी झाला. रणांगणावर रथ हाकू लागला. अर्जुनाच्या घोड्यांची निगा राखणे, त्यांचा खरारा करणे, हे कामसुद्धा त्याने मोठ्या आनंदाने केले.

दुर्योधन व अर्जुन यांच्याबरोबर आधी केलेल्या कराराचे त्यांनी पालन केले -“न धरी शस्त्र करी, मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” राजकारणधुरंधर, मुत्सद्दी, शक्तीपेक्षा युक्तीने कार्यभाग साधतात.

भारतीय युद्धात हे दिसून आले. पांडवांचा विजय झाला.

[साहित्यसुधा, इयत्ता ७ वी, १९७९, कर्नाटक सरकार, पृ. १६२-१६६]

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..