नवीन लेखन...

कोबोल या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

कंप्यूटरच्या भाषांपैकी एक “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी “इंटरनेट’चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या पहिल्या “नेव्हल ऑफिसर’ ठरल्या.

संगणकशास्त्र आणि नौदलातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नावाजलेली ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ म्हणजे रिअर ऍडमिरल ग्रेस मरे हॉपर. संगणक प्रोग्रॅमिंगच्या भाषेची पहिली संकलक अशी ग्रेसची ओळख आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि अमेरिकन नौदलातील असामान्य कामगिरीमुळे त्यांचा उल्लेख “अमेझिंग ग्रेस’ असाही केला जातो. इतकेच नव्हे तर यू. एस. नेव्ही डिस्ट्रॉयरला “यू. एस.एस. हॉपर” हे नाव त्यांच्याच नावावरून दिले गेले आहे, हा केवढा मोठा गौरव आहे.

ग्रेस मरे हॉपर यांचे शालेय शिक्षणही न्यूयॉर्क येथे झाले. त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्रातील पहिली पदवीही तेथेच मिळवली. १९४१ मध्ये जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर अचानक हल्ला केला, तेव्हा ग्रेसला नाविक दलात प्रवेश हवा होता. तो तिला मिळाला नाही. तिचे चौतीस हे वय त्यांना जास्त वाटले होते. शिवाय तिच्या पाच फूट सहा इंच उंचीच्या मानाने तिचे वजन नौदलाच्या प्रमाणाप्रमाणे सोळा पौंड कमी भरले. शासनाने तिचे गणितातील पदव्युत्तर शिक्षण पाहून गणितात अध्यापन करण्याचा निर्णय घेतलं आणि तिला सैनिकाऐवजी नागरिक राहण्याचा आदेश दिला. तरीही निराश न होता, तिने खटपट करून अमेरिकन नौदलाच्या राखीव सेनेत नेमणूक मिळवली. लेफ्टनंट हा हुद्दा तिला देण्यात आला आणि दुस-या युद्धाच्या धामधुमीत नौदलाच्या “Ordnance Computation Project” या विशेष प्रकल्पावर तिला धाडण्यात आले. वयाच्या साठाव्या वर्षी ती नौदलातून निवृत्त झाली. पण एका वर्षातच तिला पुनः बोलावण्यात आले. नौदलाच्या सर्व संगणकीय कामाचे प्रमाणीकरण करण्याच्या कामात समन्वय आणण्यासाठी तिची नेमणूक झाली. यापूर्वी तिला आदेशा बरहुकूम काम करण्याचा अनुभव होता. आता सबंध नौदलातील नोकरशाहीशी तिचा सामना होता आणि तो तिने यशस्वीपणे हाताळला.

युद्धकालीन कामगिरीवर असतांना तिला मार्क-१ हा जगातील पहिला डीजीटल संगणकीय सोफ्टवेअर प्रोग्राम शिकायला मिळाला.या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन या हुशार बाईनं एका आयुष्यात काय काय करावं? डब्यात जाणारा ‘मार्क-१’ संगणक तिनं तिच्या हुशारीनं वाचवला. तसंच ‘कंपायलर’ नावाच्या संकल्पनेला तिनं जन्म दिला. जसा एखादा दुभाष्या एका भाषेतलं बोलणं समजून घेऊन दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ लावून सांगतो, तसं ‘कंपायलर’ नावाचा एक प्रोग्रॅम आपण संगणकाला चालवायला सांगू शकतो. हा ‘कंपायलर’ प्रोग्रॅम मग आपल्याला सोप्या वाटतील अशा संगणकाच्या भाषेत (उदाहरणार्थ सी, जावा, कोबॉल) लिहिलेले प्रोग्रॅम्स संगणकाला समजतील अशा ०-१ च्या भाषेत (मशीन लँग्वेज) आपल्याला बदलून देतो. आणि हा ० आणि १ च्या भाषेतला ‘मशीन लँग्वेज’ मधला प्रोग्रॅमच संगणकाला कळू शकतो. त्यामुळे मग आपल्याला संगणकाची ०-१ ची क्लिष्ट भाषा शिकत बसावी लागत नाही. तसंच एकदा ग्रेस हॉपर तिचा एक प्रोग्रॅम चालवून बघत असताना अचानक ‘मार्क २’ संगणक नीट कामच करेना! त्या इमारतीत वातानुकूल यंत्रणा नव्हती. त्यामुळे सगळ्या खिडक्या वारं येण्यासाठी उघडलेल्या होत्या.

काय झालं म्हणून तिनं एका सहकाऱ्याच्या मदतीनं जरा खुडबूड करुन बघितली तेव्हा तिच्या लक्षात आलं की संगणकाचा कुठला तरी भाग उघडा राहिला होता, आणि त्यात एक किडा (बग) जाऊन बसला होता! त्याला बाहेर काढून तिनं तिचा प्रोग्रॅम परत चालवून बघितला तर तो व्यवस्थित चालला की! आजही त्या ऐतिहासिक किडय़ाचा अवशेष अमेरिकेत जपून ठेवलेला बघायला मिळतो! तेव्हापासून कोणताही प्रोग्रॅम नीट चालत नसेल तर त्या प्रोग्रॅममध्ये ‘बग’ आहे असं सॉफ्टवेअरमधली मंडळी आजही म्हणतात आणि ती ‘बग’ शोधून प्रोग्रॅम दुरुस्त करायला ‘डिबगिंग’ असं म्हणतात! असो. १९५३-५४ च्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे प्रोग्रॅमर मंडळींना इंग्रजीसारख्या भाषेत संगणकाकडून काम करुन घेण्यासाठी सूचना लिहायची सोय करणं. प्रोग्रॅमिंगचं काम शक्य तितकं सोपं व्हावं यासाठी ग्रेस हॉपर प्रयत्नशील असे. त्यातूनच जेव्हा इंग्रजीशी बऱ्यापैकी साधर्म्य असणारी ‘कोबॉल’ नावाची भाषा तयार झाली तेव्हा त्या प्रयत्नात तिचा वाटा मोठा होता. यासाठी १९५९ साली हॉपरसकट ६ माणसांनी एका परिषदेत यासंबंधी चर्चा करुन या भाषेचा तपशील ठरवला.

अनेक दशकं ‘कोबॉल’ ही भाषा संगणकाचे प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी वापरात असलेली सगळ्यात लोकप्रिय भाषा होती. १९६६ साली तिचं वय खूप जास्त असल्याच्या सबबीवर तिला नौदलानं सक्तीनं निवृत्ती घ्यायला लावली. तिच्या आयुष्यातला हा सर्वात वाईट दिवस होता. पण १९६७ साली नौदलात काम करणाऱ्यांची पगारपत्रकं बनवायच्या कामात असंख्य चुका होत असल्यानं त्या दुरुस्त करण्यासाठी प्रोग्रॅम्स लिहिण्यासाठी तिला ‘थोडय़ा काळासाठी’ परत कामावर रुजू व्हायची विनंती केली गेली. हा ‘थोडा काळ’ चार वर्षांचा असणार होता! १९७१ साली ती परत एकदा निवृत्त झाली. पण तिला कोणी निवृत्त थोडीच होऊ देणार होतं! १९७२ साली तिला पुन्हा एकदा कामावर येण्याची विनंती केली गेली. १९७३ साली तिला ‘कॅप्टन’ म्हणून पदोन्नती मिळाली. शेवटी १९८६ साली वयाच्या ८०व्या वर्षीही ही बाई नाखुशीनं तिच्या इच्छेविरुद्धच निवृत्त झाली. ही तिची शेवटची (!) निवृत्ती होती! संगणकक्षेत्रातली बहुतेक झाडून सारे पुरस्कार तिला मिळाले होते. तिची संगणक आणि नौदल यांच्याविषयीची भाषणं अतिशय लोकप्रिय असायची.

“मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन’मध्ये काम करणाऱ्या महिलांनी “हॉपर्स’ नावाचे मंडळच स्थापन केले आहे आणि त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. सप्टेंबर १९९१ मध्ये तिला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय पदक मिळाले. तिने केलेल्या संगणकाच्या विकास कार्याची देशाने घेतलेली ती दखल होती. यापेक्षा आणखी एक सर्वोच्च पातळीवरील सन्मान तिला लाभला. तो म्हणजे अमेरिकन नौदलातील एका विनाशिकेला तिचे नाव देण्यात आले. यु.एस.एस. हॉपर या ४६६ फूट लांब व ८३०० टन वजनाच्या विनाशिकेवर अत्याधुनिक संगणकीय यंत्रणा बसवलेली आहे. नौदलाच्या परंपरेनुसार या विनाशिकेवरील मानचिन्हातही शब्द आहेत, ते माजी रिअर अॅयडमिरल हॉपर मार्गदर्शन करताना नेहमी वापरत असे – DARE & DO

अशा या हरहुन्नरी बाईची काही विधानंही अजरामर आहेत:
‘कुठलीही गोष्ट करायची परवानगी मागण्यापेक्षा ती सरळ करुन मोकळं होणं जास्त बरं असतं.’ किंवा
‘बंदरात असलेलं जहाज हे समुद्रातल्या जहाजापेक्षा जास्त सुरक्षित असतं. पण बंदरात ठेवण्यासाठी जहाज तयार केलेलं नसतं.’ ग्रेस हॉपर यांचे १ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ विनोद गोरे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..