नवीन लेखन...

“ग्राहक चेतना”

<

<<<

<<"नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलेले “ग्राहक चेतना” हे पुस्तक सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे. नागरिक याचा अर्थ स्त्री व पुरुष अशा दोघांसाठीही या पुस्तकाचे महत्त्व एवढ्यासाठी आहे की, या पुस्तकाचा विषय संपूर्णपणे सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. लहान-मोठा, स्त्री व पुरुष हे सारे माणूस आहेत आणि म्हणूनच अविच्छीन्नपणे ग्राहकही आहेत. काहीही खरेदी करीत नाही अशी व्यक्ती सापडणे विरळा. शाळेसाठी वही खरेदी करणारे विद्यार्थी असोत की भाजी खरेदी करणारी गृहिणी असो, दाढीसाठी साबण खरेदी असो की घरातल्यांसाठी एखादी वस्तू… कोणत्या ना कोणत्या वेळी माणूस ग्राहकाच्या भूमिकेत असतोच असतो. याची जाणीव मात्र मोठ्या प्रमाणात असतेच, असे मात्र नाही. सामान्य माणसाच्या मनात त्याच्या “ग्राहक” या भूमिकेविषयी जाणीव उत्पन्न करण्याचे काम “ग्राहक चेतना” या पुस्तकाद्वारे निश्र्चितपणे होऊ शकते.संपूर्ण जगाच्या आर्थिक व्यवहारात ग्राहक ही मध्यवर्ती संकल्पना आहे. ग्राहक हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे; परंतु या घटकाचा स्वतंत्रपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार व विकास म्हणावा तसा झालेला नाही. त्याची पहिली पायरी म्हणजे या कल्पनेच्या जाणीवेचा प्रचार-प्रसार, त्याच्या विविध अंगांविषयी समाजाला, सर्वसामान्य माणसाला माहिती होणे. याच भूमिकेतून नागपूरचे श्री. सुरेश बहिराट १९८५ सालापासून नियमितपणे दैनिक लोकमतमध्ये साप्ताहिक स्तंभ चालवित आहेत. एखादा स्तंभ एवढा प्रदीर्घ काळ चालू राहणे व संपादक, प्रकाशक, वाचक या साऱ्यांनीच तो उचलून धरणे यातच या स्तंभाचे महत्व व गरज सामावली आहे. “ग्राहक चेतना” नावाच्या या स्तंभातीलच काही निवडक लेखांचे संकलन म्हणजे नचिकेत प्रकाशनाचे हे नवीन पुस्तक होय.सुमारे सव्वादोनशे पानांच्या या पुस्तकात चार भागांमध्ये साठ लेख आहेत. पहिल्या पार्श्र्वभूमी या भागात ग्राहक दिन, ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक संरक्षणाची विविध दालनं याबद्दल माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या ग्राहक हित संरक्षण या भागात व तिसऱ्या ग्राहक राजा जागा राहा या भागात अनेक छोट्या-मोठ्या मुद्यांची चर्चा करण्यात आली आहे. खरेदी करताना घ्यावयाची काळजी, पेट्रोल पंपांवर होणारी फसवणूक, अपघातग्रस्तांना मदतीची योजना, टी.व्ही.च्या जाहिरातींचा परिणाम, शैक्षणिक संस्थांची अरेरावी, ग्राहकाची सुरक्षितता, किमतीचा ताळमेळ, वैद्यकीय व्यवसायाच्या संदर्भात ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून अपेक्षा, ग्राहकांचे हक्क, कास्तकारांसाठी ग्राहक संरक्षण, व्ही.पी. पार्सलमधून होणारी फसवणूक अशा अनेक व्यवहारांचे माहितीपूर्ण विवेचन या लेखांमध्ये करण्यात आले आहे. उत्पादक, व्यापारी, कायदे, सरकार, ग्राहक मंच, न्यायालये या साऱ्या या विषयांच्या काही बाजूंचं प्रतिनिधीत्व करीत असल्या तरीही ग्राहक या अतिविस्तृत व अनेक बाजू असलेल्या या विषयाचा एक महत्त्वपूर्ण पैलू स्वत: ग्राहक हा आहे. या ग्राहकाच्या सवयी, त्याची शैली, त्याच्या गरजा, त्याचा जीवनाकडे, खरेदीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याची मानसिकता हा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. त्यावरही या लेखांमधून प्रकाश टाकण्यात आला आहे. काजूपेक्षा लिपस्टिक महाग, गिफ्ट व डिस्काऊंटपासून सावधान, दिवाळीची खरेदी जरा सांभाळून, आई मला ड्रेस हवा, टॉनिकला रजा द्या, तुम्ही काय खात आहात? इत्यादी लेखांमधून ग्राहक मानसिकतेची चिकित्सा करण्यात आली आहे. ग्राहक मंचाच्या झरोक्यातून या शेव टच्या भागात १६ निवाडे देण्यात आले आहेत.या पुस्तकातील काही माहिती, प्रसंग हे तात्कालिक असले तरी त्यानिमित्ताने ग्राहक, त्याचे हितसंरक्षण, कायदे, मानसिकता आदी विषयांची केलेली चर्चा उपयुक्त ठरेल अशीच आहे. भविष्यासाठी त्यातून मार्गदर्शन मिळू शकते. ग्राहक, ग्राहक चळवळ यासंबंधी जागृती व जाणीव निर्माण करण्यासाठी हे पुस्तक निश्र्चितच उपयुक्त ठरेल, या पुस्तकाचे अर्थव्यवहारातील व समाजव्यवहारातील मूल्य निश्र्चितच आहे. पुस्तकाची मांडणी, छपाई, मुखपृष्ठ उठावदार आहे.पुस्तकाचे नाव – ग्राहक चेतना : लेखक – सुरेश बहिराट : किंमत – २०० रुपये नचिकेत प्रकाशन, २४-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-४४००१५ ०७१२-२२८५४७३, भ्र. ९२२५२१०१३०

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..