कसारा घाटातून मोखाड्याला जायला खोडाळा मार्गे रस्ता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उंचच उंच डोंगरांच्या सान्निध्यातून जाताना अप्रतिम निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते. कसारा घाटातून नाशिककडे जाताना डाव्या बाजूला वळण घेतले की लहान मोठ्या टेकडया आणि त्यावर लावलेले नाचणीचे पिक बघता बघता नागमोडी रस्त्यांवरून गाडी डौलाने जाते. रस्त्याच्या दुतर्फा आंबा, ऐन. पळस आणि सागाच्या झाडांची गर्दी. पावसाळ्यात नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या आणि लुसलुशीत गवतामुळे हिरवेगार झालेल्या टेकडया आणि त्यांच्या पाठीमागे तसेच मोठं मोठे हिरवेगार सह्याद्रीचे पर्वत.
सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते. आंबा आणि ऐनाच्या झाडांची खोडे भिजून चिंब झालेली आणि पाण्याने निथळत होती. विहिगावाच्या जवळच एक घाट लागतो. या घाटातील रस्ता अरुंद असून एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला डोंगर कडा.
शाहरुख आणि करीनाच्या अशोका पिक्चर नंतर एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलेला अशोका धबधबा याच विहिगावतील घाटामध्ये खाली एका दरीत आहे. घाटातून दिसणारे धबधब्याचे विहंगम दृष्य पाहताना सह्याद्रीच्या सृष्टीसौंदर्याचा गूढ खजिना हाती लागल्यासारखे वाटतं होते. उंचावरून फेसाळणारे तुषार आणि पाणी काळ्या कातळावरून ओसंडून वाहत वाहत खाली झेप घेत होते. पाण्याचा खळखळाट आणि पक्षी व पाखरांची किलबिल यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. घाटातून जाताना झरे, ओढे नाल्यांमधून नितळ आणि स्वच्छ पाणी जसजसे खाली दरीत जाऊन मुख्य प्रवाहाला मिळत होते तसे गढूळ व्हायला लागले होते. विहिगाव मागे गेल्यावर वैतरणा नदीवर उंचच उंच खांबांवर उभा असलेला पूल लागतो. हा पूल इतका उंच आहे की त्याखाली शेकडो फूट खालून वैतरणा नदीचे विशाल पात्र आहे ज्यामध्ये एखाद्या विशाल धरणा एवढा पाणीसाठा होतो. पुरेसा पाऊस झाला नसल्याने सदर पात्रात 10 टक्के सुद्धा पाणी साठा झालेला नव्हता.
पावसाळ्यात नदीचे पात्र पूर्ण भरल्यानंतर अशोका धबधब्यानंतर हा पूल सुद्धा एक पर्यटन केंद्र बनून जातो. पुढे खोडाळा, देवबंद अशा गावातून नागमोडी रस्त्यांवरून जात जात मोखाडा मार्गे जव्हार आणि जव्हारहून वाडा आणि भिवंडी मार्गे घरी जायचे होते. जव्हार मोखाडा मार्गा पासून दोन किलोमीटर अंतरावर एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या शिवा कोरड्याचे मेट या गावातून माझ्याकडे कामाला असणाऱ्या कल्पेशला आणायच्या निमित्ताने कसारा ते मोखाडा मार्गावरील सृष्टी सौंदर्य अनुभवण्याचा मोह आवरता आला नाही. कल्पेशला घेतल्यानंतर जव्हार शहर सोडल्यानंतर सकाळचे साडेनऊ वाजले होते. जव्हार शहराच्या पुढे असलेल्या पठारावर त्यावेळी सुद्धा धुके दिसत होते. अमेरिकेतील ग्रँड कॅनीयन सारखीच एक भल्यामोठ्या खिंडी सारखी दरी आहे. या दरीमध्ये घनदाट हिरवीगार झाडी आणि भलेमोठे वृक्ष आहेत. मधून मधून डोकावणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि थंडगार वारा अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण. उंचावर असल्याने हिल स्टेशन म्हणून जव्हार प्रसिद्ध आहेच परंतु दाभोसा आणि अशोका धबधबा यामुळे असंख्य पर्यटक जव्हार परिसरात पावसाळी पर्यटनासाठी आतुर असतात. मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech. ), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply