१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री प्रकाश गीध यांनी लिहिलेला लेख
साहित्य संमेलन हे एक महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रंथकारांनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करावी, कांनी ग्रंथ विकत घेण्याची हमी द्यावी, मराठी भाषा वीना अवगत होण्याचे प्रयत्न करावेत यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी ११ मे १८७८ रोजी प्रथम ‘ग्रंथकार संमेलन’ पुण्यात भरविले होते. हे ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजेच आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आणि कालप्रवाहात निर्माण झालेल्या प्रांतिक, उपनगरीय, दलित, ग्रामीण, बालकुमार, नवोदित, होतकरू व अलिकडेच साक्री येथे झालेले दलित, आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन या सर्वोची गंगोत्री आहे. काल-प्रवाहानुरूप संमेलनाचे मूळ प्रयोजन, उद्दिष्ट आणि स्वरूप बदलत गेले असले तरी संमेलनाच्या या उत्सवात ग्रंथांकडे लोक आकर्षित व्हावेत, यासाठी निरनिराळ्या प्रकाशकांचे स्टॉल्स असणे हा बऱ्याच वर्षापासून सुरू झालेला संमे-बनातील एक महत्त्वाचा भाग मूळ ‘ग्रंथकार संमेलनाच्या’ उद्दिष्टांशी सुसंगत आहे असे दिसते.
गेल्या १०९ वर्षीत ठाण्याला भरणारे हे दुसरे आणि ६१ वे असे साहित्य संमेलन. ते भरत असताना एक विचार मनात डोकावतो की, १८७८ मधील पहिल्या संमेलनापासून आजमितीस लोकांमध्ये ग्रंथ प्रेम खरोखरच वाढले आहे का? कारण पूर्वीच्या मानाने आपल्या समाजात साक्षरता वाढली आहे. सुशिक्षितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा साक्षर-सुशिक्षित समाजात ग्रंथ विकत घेणे, वाचणे, त्यांचा उत्तम संग्रह करणे व्हावयास हवे. परंतु ते अभावानेच दिसते. हे असे का व्हावे याचा शोध घेणे अगत्याचे आहे.
अलीकडे विद्यापीठीय पातळीवर ‘मराठी साहित्य’ हा विषय दुर्लक्षित होत आहे. हुषार विद्यार्थी लवकर नोकरी मिळण्यास साह्य होईल असे विषय निवडतात. शासकीय पातळीवरील मराठीचा वापर हा नित्य वादविषय झाला आहे. सर्वसामान्यपणे नित्य नवीन आणि चांगले वाचनाचा कंटाळा हा ‘गुण’ सर्वत्र जोपासला जात आहे. त्यामुळे पुस्तकाच्या दुकानातील विक्री रोडावत चालली आहे. ही बाब अधिक चिंतेची आणि चिंतनाची झाली आहे.
अनेक पुस्तके संग्रही असावीत. आपल्याला सवड मिळेल तेव्हा हवे ते पुस्तक काढावे आणि वाचनतंद्रीचा मनःपूत आनंद लुटावा. छापील अक्षराआड लपलेला लेखकाचा जीवनानुभव आपलासा करावा. पुस्तकातील ज्ञानाने आपल्या जीवनविषयक जाणीव अधिक प्रगल्भ व्हाव्यात असे आजकाल फारसे कुणाला वाटत नाही. ही गंभीर बाब आहे. वाचनाच्या एकूण उपेक्षेचे अंक कारण दूरदर्शनची लहान थोरात वाढती लोकप्रियता हे आहे. ग्रंथ परिशीलनाने व्यक्ति विकासाला आकार येतो म्हणून लहानपणापासूनच वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी. पण हल्ली नव्यापिढीचा व्यक्तिविकास दूरदर्शनच्या मार्गाने कसा होतो आहे हे आपण पाहतोच. ‘आपले वाचन वर्तमानपत्रातील चार ठळक मथळ्यांपलीकडे नाही’ असे अभिमानाने सांगणारे महाभाग आहेत. ‘पोटासाठी धडपड करण्यात सर्व दिवस जातो. वाचायला वेळ आहे कुठे? ‘ हा त्यांचा प्रतिसवाल यंत्रवत होत असलेल्या जीवनाचा पुरावा आहे.
आज समाजातील जो मोठा वर्ग पुस्तके वाचीत आहे असे आपल्याला वाटते तो शालेय पुस्तकांशिवाय अन्य पुस्तके मुळी विकत घेत नाही. आपण, मराठी माणूस – मराठी साहित्य – संस्कृती – भाषा यांचा मोठ्या अभिमानाने अनेकवार उल्लेख केलेला ऐकतो. जणुकाही या मराठीपणाची, भाषा, साहित्य, संस्कृती यांची जपणूक घराघरातून मराठी माणूस नक्कीच करीत असणार असे वाटते. पण अनुभव मात्र उलटा येतो. एका उच्च शिक्षित, बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर असलेल्या व्यक्तीने अगदी शपथ घेऊन ‘पु. ल. देशपांडे कोण ते खरोखरच आपल्याला माहित नसल्याचे’ एकदा सांगितले. यावर वेगळे भाष्य करायला नको. आपण पुस्तके वाचत नाही याचे समर्थन अनेकप्रकारे केले जाते. पुस्तकांच्या किंमती फार वाढल्यात त्यामुळे पुस्तके विकत घेणे परवडत नाही. ग्रंथालयात जाऊन पुस्तक आणण्या इतका वेळ नसतो. किंवा हवे ते म्हणजे ‘नेमके कोणते’ ते सांगता येत नाही.) पुस्तक मिळत नाही. पुस्तक आणले तर ते कळत नाही. अशी अनेक समर्थने केली जातात. आपण साक्षरता वाढल्याचे ऐकतो पण त्यामानाने चांगली पुस्तके वाचण्याची भूक वाढल्याचे मात्र दिसत नाही. हे झाले सर्वसामान्य शिक्षितांचे. उच्चशिक्षित बहुश्रुत असायला हवा. पण त्याला त्याच्याच विषयाचे समग्र ज्ञान नसते. कारण आपले शैक्षणिक धोरणच मुळी ग्रंथपरिशीलनास पोषक नाही. मग ‘वाचन म्हणजे मनाची, आत्म्याची आणि बुद्धीची नियमित भूक किंवा प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ हे दूरच राहिले.
पुस्तकांच्या किंमतीबद्दल प्रकाशकांचे म्हणणे असे की, ‘पेपरच्या किंमती वाढल्या आहेत. छपाईचे दर वाढलेत तसेच वितरकांच्या टक्केवारीत खूप वाढ झाली आहे. चांगला कागद, अत्कृष्ट डौलदार छपाई, मुखपृष्ठ छपाई, लेखकाचे मानधन आणि मग वितरकाचे साठ-सत्तर टक्के कमिशन यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढतात. ही बाजूपण विचारात घेण्यासारखी आहे.
ग्रंथालये ही पुस्तक खरेदी फारशी करू शकत नाहीत. शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानातून पुरेशी आणि चांगली पुस्तके ग्रंथालये विकत घेऊ शकत नाहीत. नवीन शैक्षणिक धोरणात ग्रंथालयांना महत्त्वाचे स्थान असल्याचे बोलले जाते. परंतु सध्याच ‘अपुरऱ्या अनुदाना-अभावी’ काही ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. असे वर्तमानपत्रातून आले आहे. म्हणजे ज्या ग्रंथालयांनी पुस्तके विकत घ्यावीत आणि वाचकांना ती उपलब्ध करावीत त्यांच्यावरच अनुदानाअभावी बंद पडण्याची पाळी आली तर ग्रंथालये लोकांमध्ये वाचनाची आवड कशी निर्माण करणार?
लोकांनी पुस्तके विकत घ्यावीत, ती वाचावीत आणि स्वतःचा असा एक पुस्तकसंग्रह अगदी अभिमानपूर्वक आपल्या घरात बाळगावा यासाठी अनेक प्रकाशकांनी ग्रंथ प्रदर्शने, ग्रंथजत्रा, ग्रंथ मोहोळ, ग्रंथ दिंडी आणि बाल झुंबड असे एकसे एक वरचढ आणि धाडसी कार्यक्रम हेतुपूर्वक गेल्या वीस बावीस वर्षात पार पाडल्याचे आपल्याला दिसते. ग्रंथ प्रसार केंद्राचे अरुण गाडगीळ यांनी १९६५ ते १९६७ या दोनवर्षीत शंभर ग्रंथप्रदर्शने आयोजित केली होती. त्यावेळी ते म्हणत की, ‘ग्रंथप्रदर्शन हा मोठा मजेदार अनुभव आहे. मी पुस्तकातून जे मिळवलं नसतं ते पुस्तकांबरोबर हिंडून मिळवलं. गावं पाहिली, लोक पाहिले. या पेशावर आपण आहोत. मी घरोघर, दारोदार पुस्तके न्यायला तयार आहे’. पुस्तक खरेदीकडे लोकांचा कल त्यावेळी किती होता ते गाडगीळांच्या ‘खूष’ होण्यावरून कळते. आज जर दोनचार प्रकाशकांनी मिळून विदर्भाचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा किंवा मराठवाड्याचा दौरा करावयाचे ठरविले तर खर्च प्रत्येकी दीड दोन हजार रु. येतो आणि पुस्तकांची विक्री जेमतेम होते चार ते पाच हजार. लोकांना पुस्तकां कडे आणि पर्यायाने वाचना कडे आकर्षित करण्यासाठी प्रकाशनपूर्व सवलती देणे, बुक क्लब किंवा वाचकवृन्द’ चालविणे अशा अनेक क्लुप्त्या योजल्या गेल्या आणि जात आहेत. ग्रंथालीने तर मोठ्या प्रमाणावर वाचक चळवळ गेली अकरा वर्षे चालवून अनेक दर्जेदार प्रकाशने सभा सदांना परवडतील अशा अल्प किंमतीत उपलब्ध केली आहेत. ग्रंथ दिंडीपासून ते अलीकडच्या बाल झुंबड पर्यंत मोठ्या महत्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. मॅजेस्टिक प्रकाशनाने महाराष्ट्रातील प्रमुख शहरात ‘मॅजेस्टिक गप्पा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आणि ग्रंथप्रदर्शने सातत्याने भरविली आहेत. या पार्श्वभूमीवर जरी आपण पाहिले तरी एकूण ग्रंथखरेदीचे प्रमाण फारसे आशादायक आहे असे म्हणता येणार नाही.
काही ग्रंथ भांडारांतून मुद्दाम चौकशी केली. ‘आध्यात्मावरची पुस्तके बरी विकली जातात’ असे विक्रेते म्हणाले. ‘दर गुरुवारी ‘लक्ष्मी- महात्म्य’ च्या पन्नास प्रती तरी खपतात’, असे डोंबिवलीच्या एका विक्रेत्याने सांगितले, कारण ‘सुवासिनींना त्या पुस्तकाची प्रत वाटणे’ हा त्या व्रताचा एक भाग आहे म्हणे. सहज मनात आले की, ‘अंटार्क्टिका एक रुपेरी स्वप्न’ किंवा मराठी विश्वकोषाचे खंड विकत घेतल्यास आपल्याला धंद्यात, प्रेमात, नोकरीत, लॉटरीत, एव्हढेच काय राजकारणात उच्चपद मिळविण्यात यश येईल असा अमुक तमुक महाराजांचा संदेश आहे. तो आपण पत्राने आणखी सात जणांना कळवावा आणि वरील दोन ग्रंथ शनिवारी सूर्यास्तापूर्वी आपल्या घरात आणून भाविकतेने वाचावेत म्हणजे उपर्युक्त फलप्राप्ती होईल’ अशी पत्रे नडलेल्या भाविकाकडे गेली तर या ग्रंथांची पहिली आवृत्ती नक्कींच लवकर संपेल. प्रकाशकांची पुस्तके लोकांनी विकत घ्यावीत म्हणून करावी लागणारी खटपट लटपट थांबेल. किंवा ठाण्याच्या भारत सहकारी बँकेसारखी ज्ञानकोशादिकांचे खंड लोकांनी विकत घ्यावे यासाठी खास कर्ज देण्याची अभिनव योजना राबवावी लागणार नाही.
ठाण्यात सारस्वतकार वि. ल. भावे यांचा खूप मोठा ग्रंथसंग्रह होता असे सांगितले जाते. अनेक ग्रंथांचा जाणीवपूर्वक संग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. ज्ञानकोशकार केतकर यांचाही खूप मोठा ग्रंथ संग्रह होता. हल्ली आवड असूनही आणि इतर खर्चाला मुरड घालून ग्रंथ खरेदी करण्याची तयारी असूनही जागेअभावी ग्रंथसंग्रह करता येत नसल्याची आढळणारी तुरळक उदाहरणे ग्रंथप्रेम कुठेनाकुठे जतन करीत आहेत. अर्थातच असा मोठा संग्रह ठेवण्याची ऐपत नसली तरी संमेलनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तेथील ग्रंथ प्रदर्शनातून किमान अंक तरी पुस्तक विकत घेतले पाहिजे असा दंडकच केला तर पुस्तक विक्रीस तो हातभार लावेल. वाचनाची अनास्था काही प्रमाणात तरी कमी होईल. एकूण ग्रंथव्यवहारास जरा बरे दिवस येतील. कारण किमान पाच-सहा हजारा-पासून ते दहा ते पंधरा हजारापर्यंत प्रतिनिधी संमेलनास येतात. तेवढी ग्रंथ विक्रीची निश्चिती होईल. प्रकाशकांनाही नवीन दर्जेदार उत्कृष्ट पुस्तके प्रकाशित करणे सोपे जाईल, आणि न्या. रानडे यांनी ज्या उद्देशाने आद्य मराठी ‘ग्रंथकार संमेलन’ सुरू केले तेही साधता येईल.
— प्रकाश गीध
तत्कालिन पत्ता : ई एन ई क्वार्टर्स, वॉटर टँक कंपाऊँड, बाराबंगला, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व).
१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री प्रकाश गीध यांनी लिहिलेला लेख
Leave a Reply