माल्कम डेन्झील मार्शल यांचा जन्म १८ एप्रिल १९५८ रोजी ब्रिजटाउन, बार्बाराडोस येथे झाला. त्यांचे वडील डिन्जिल डीकोस्टर एडिगिल हे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. ते क्लाउडिन आणि गुरिडवुड इनफिल यांचा मुलगा सेंट फिलिपमध्ये किंग्सपर्क क्रिकेट क्लब खेळले होते. ते पोलिस होते, परंतु मार्शल एक वर्षाचे असताना एका अपघाताने त्यांचे निधन झाले . माल्कम मार्शल यांचे वय एक वर्षाचे होते. माल्कम मार्शल यांच्या आईचे नाव एलेनोर असे होते.
माल्कम मार्शल यांना त्यांच्या आजोबानी प्राथमिक क्रिकेटचे धडे दिले. १९७६ पासून ते बॅंक्स ब्रेवेरी संघाबरोबर खेळत होते. माल्कम मार्शल यांनी ४० षटकांचा पहिला १९७६ मध्ये सामना खेळला. त्यानंतर त्यांनी १९७८ मध्ये बार्बाराडोस येथे खेळला परंतु त्या सामन्यामध्ये ते शून्यावर बाद झाले आणि त्यांना एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिला सामना जमेकामध्ये खेळाला आणि याही सामन्यांमध्ये ते शून्यावर बाद झाले परंतु त्यांनी ७७ धावांमध्ये ७ विकेट्स मात्र घेतल्या. हा त्यांचा खेळ बघून त्यांची निवड १९७८-७९ च्या वेस्ट इंडिजच्या संघामध्ये झाली जो संघ भारतामध्ये खेळण्यासाठी येणार होता.
माल्कम मार्शल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना बंगलोर येथे १५ डिसेंबर १९७८ रोजी खेळला . ह्या भारताच्या दौऱ्यामध्ये माल्कम मार्शल तीन कसोटी सामने खेळले . दिलीप वेंगसरकर आणि माल्कम मार्शल यांच्यामधील खास ‘ दोस्ती ‘ सर्वाना माहीत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की दिलीप वेंगसरकर यांना ९४ धावांवर बाद केल्यानंतर मला इतका आनंद झाला तितका आनंद कधीच झाला नाही. तर दुसऱ्या इनिंगमध्ये वेंगसरकर यांना शून्यावर बाद केले तेव्हा तर मी सिद्ध करून दाखवले की मीच ‘ बॉस ‘ आहे. अर्थात या ‘ टसर ‘ ला वेगवेगळी कारणे आधी घडलेली आहेत.
मी माल्कम मार्शलला गोलंदाजी करताना मुंबईला पाहिले आहे त्याचा रनअप बघून समोरच्याला धडकीच भरेल आणि त्यामध्ये ऑफ ला विकेटकीपर सकट लागलेली फिल्डिंग पाहून तुफान येणार चेंडू एक तर यष्टी वाकडी करणार किंवा ऑफ ला झेल द्यायला मजबूर करणार. आजही १९८७ मध्ये झालेल्या न्यूझीलंड च्या सामन्यांमध्ये त्याने ज्या विकेट्स घेतल्या त्या बघताना आजही धडकी भरते. त्यावेळी मायकेल होल्डिंग आणि मार्शलने न्यूझीलंडची दाणादाण उडवली होती.
जवळजवळ २३ ते २४ पावलाचा स्टार्ट घेणारा माल्कम मार्शल पाहून भल्याभल्याना धडकी भरते आणि त्याने माईक गॅटींगचे जे नाक फोडले तो चेंडू किती भयानक असेल याची कल्पना करवत नाही. काही वर्षांपूर्वी माईक गॅटींगला पाहिले असता त्याची स्वाक्षरी घेत असताना त्याच्या नाकाकडे माझे लक्ष गेले आणि माल्कम मार्शलचा तो चेंडू आठवला. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या अँडी लॉईडला माल्कम मार्शलचा लागलेला चेंडू बघीतला त्यावेळी तेव्हा त्याच्या भयानक स्पीडची कल्पना आली. १९८४ साली अँडी लॉईड हा खेळत असताना त्याने ३३ मिनिटामध्ये १० धावा केल्यानंतर त्याला माल्कम मार्शलचा चेंडू डोक्याला लागला. तरी बरे डोक्यावर हेल्मेट होते . तरीपण तो फटका इतका भयानक होता की अँडी लॉईडला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले आणि त्यानंतर तो पुढे क्रिकेट खेळू शकला नाही.
माल्कम मार्शल बाउंसर तर टाकत असे परंतु तो दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत असे. त्याचप्रमाणे तो इनस्विंग यॉर्कर आणि अत्यंत प्रभावीपणे लेग कटरही करत असे. १९८८ मध्ये ओल्ड ट्रॅफर्डला २२ धावांमध्ये ७ विकेट्स घेतल्या. ही सिरीज ५ सामन्यांची होती त्यामध्ये माल्कम मार्शल याने १२.६५ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या. हळूहळू माल्कम मार्शलचा खेळ उतरणीला लागला त्यांनी त्यांचा शेवटचा इंटरनॅशनल सामना ८ ऑगस्ट १९९१ मध्ये ओव्हलवर खेळला . त्याने त्याची शेवटची ३७६ विकेट ग्रॅहम गुच याची घेतली . माल्कम मार्शल यांनी पहिला एकदिवसीय सामना २८ मे १९८० रोजी इंग्लंड विरुद्ध खेळला तर शेवटचा एक दिवसीय सामना न्यूझीलंड विरुद्ध ८ मार्च १९९२ रोजी खेळला . १९९२ मध्ये बेन्सन आणि हेजेस कप साठी खेळाला . त्यानंतर १९९३ मध्येही खेळला त्यावेळी त्याने २८ विकेट्स घेतल्या. शेवटचा सामना त्याने १९९५-९६ मध्ये खेळला .
माल्कम मार्शलने ८१ कसोटी सामन्यांमध्ये १८१० धावा केल्या तर २०.९४ या सरासरीने ३७६ विकेट्स घेतल्या . त्याने २२ वेळा एका डावामध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या तर ४ वेळा एका सामन्यांमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. त्याने कसोटी सामन्यामध्ये २२ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. कसोटी सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९२ . तर १३६ एकदिवसीय सामन्यामध्ये माल्कम मार्शलने १५७ विकेट्स घेतल्या त्यामध्ये एक डावामध्ये १८ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. तर ४०८ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये माल्कम मार्शने ११,००४ धावा केल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १२० तसेच त्याने ७ शतके आणि ५४ अर्धशतके केली. त्याने १९.१० च्या सरासरीने १६५१ विकेट्स घेतल्या तर ८५ वेळा एका डावामध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. तर १३ वेळा एक सामन्यामध्ये १० विकेट्स घेतल्या असून त्याने ७१ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या .
१९९९ मध्ये वर्ल्ड कपच्या दरम्यान माल्कम मार्शलला कॅन्सर झाला . तो त्याचे क्रिकेट सोडून हॉस्पिटलमध्ये भरती झाला. हॉस्पिटमध्ये भरती झाल्यावर त्याने एका खाजगी चॅनलला जी मुलखात दिली ती पाहून वेगळाच मार्शल डोळ्यसमोर उभा रहातो. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या माल्कम मार्शलला कॅन्सरने पुरते पोखरले होते.
४ नोव्हेंबर १९९९ या दिवशी अवघ्या वयाच्या ४१ वर्षी माल्कम मार्शलचे निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply