नवीन लेखन...

महान दिग्दर्शक सर आल्फ्रेड हिचकॉक

महान दिग्दर्शक सर आल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९९ रोजी लंडन येथे झाला.

हिचकॉकचे वडील विल्यम यांचा लंडनमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय होता. त्याची आई एमा जेन ही खूप करारी स्त्री होती. लहानपणापासूनच रोमन कॅथॉलिक धर्माच्या शिकवणुकीमुळे आपल्या हातून चूक घडली तर नंतर कन्फेशन मागावं लागेल, याची हिचकॉकला सतत काळजी असायची. त्यामुळे हातून चूक होऊच नये यासाठी त्याच्या मनात सतत एक दबलेली भीती असे. हिचकॉकच्या घरात आईची हुकमत होती. आक्रमक स्वभावाच्या आईबद्दलही त्याला कायम भीती वाटत असे. कदाचित यामुळेच हिचकॉकच्या ‘नटोरियस’, ‘द बर्डस’, ‘रिबेका’ आणि ‘सायको’ अशा चित्रपटांमध्ये आईचा प्रचंड दबाव असलेला नायक दिसतो. हिचकॉकला विल्यम हा भाऊ आणि एलन कॅथलीन ही दोन मोठी भावंडं होती. मात्र वयात बरंच अंतर असल्यामुळे हिचकॉक आणि त्याची भावंडं यांच्यात फारसं सख्य नव्हतं. आईची भीती आणि भावंडांशी फारसं न जमणं, यातून हिचकॉक एकाकी बनला. सोबतच्या विद्यार्थ्यांबरोबरही त्याचं नीट जमत नसलं तरी मानसिक पातळीवर हिचकॉकनं स्वत:चं एक भावविश्व निर्माण केलं होतं. हिचकॉकनं नकाशे जमवून एखादं ठिकाण त्या नकाशावरून गल्लीबोळांपर्यंत पाठ करण्याचा छंद जोपासला होता. एडगर अॅलन पो हा हिचकॉकचा आवडता लेखक होता. हेरगिरी, आंतरराष्ट्रीय संबंध, आत्मचरित्रं, राजकारणातली कारस्थानं असं सर्वच प्रकारांचं हिचकॉकचं वाचन जबरदस्त होतं. सिनेमाच्या तांत्रिक अंगांची माहिती देणारी पुस्तकंही हिचकॉक आवर्जून वाचत असे. नंतरच्या काळात त्याची सेक्रेटरी सुझन हिनं, ‘विमान जमिनीवरून झेप घेऊन आकाशात कसं उडतं, ते मला समजतच नाही’, असं म्हटल्यानंतर हिचकॉकनं चक्क तिला विमानं आणि एरोडायनॅमिक्स याबाबत सविस्तर समजावून सांगितलं होतं. असंच एकदा त्यानं एका माणसाला टेलिव्हिजन कसा चालतो, हेही समजावून सांगितलं होतं. शाळा संपल्यावर ‘स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड नॅव्हिगेशन’ या कॉलेजमध्ये हिचकॉकनं यंत्रं, इलेक्ट्रॉनिक्स आणि जहाजं यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. पण त्याचे वडील १९१४ साली मरण पावले. त्यामुळे त्यानं शिक्षण अर्धवट टाकून ‘हेन्ले टेलिग्राफ अँड केबल कंपनी’मध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तेव्हा हिचकॉक फावल्या वेळात चित्रकला शिकत असल्यामुळे हेन्ले कंपनीनं त्याला आपल्या जाहिरातींच्या डिपार्टमेंटमध्ये हलवलं. एकदा विजेच्या दिव्यांचा वापर आणि केबलिंग किती महत्त्वाचं आहे, या विषयाची जाहिरात करायची होती. तेव्हा हिचकॉकनं दोन मेणबत्त्यांचं चित्र काढलं. बाकी कागदावर सगळा काळोख होता. चित्राचं नाव होतं ‘चर्च लायटिंग’! विजेच्या दिव्याशिवाय चर्चमधलं दृश्य पुरेसं दिसणार नाही, असं हिचकॉकनं त्या जाहिरातीत चतुराईनं व्यक्त केलं होतं.

चित्रपट या प्रकाराचं हिचकॉकला आकर्षण वाटत होतंच. त्यातच ‘फेमस प्लेयर्स’ ही अमेरिकन कंपनी आपला इंग्लंडमधला फिल्म स्टुडिओ लंडनमध्ये थाटणार ही बातमी हिचकॉकला वाचायला मिळाली. या कंपनीत काम मिळवण्यासाठी तो त्यांच्या लंडनमधल्या स्टुडिओत जाऊन धडकला. १९२० साली फेमसनं हिचकॉकला पूर्णवेळ नोकरी दिली. यानंतर ३ वर्षांत हिचकॉकनं फेमस प्लेयर्सच्या ११ मूकपटांवर काम केलं. या काळात हिचकॉकनं चित्रपटाचं लेखन, पटकथा, संकलन अशा अनेक गोष्टी शिकून घेतल्या. स्टुडिओत सकाळी येणारा पहिला आणि स्टुडिओतून रात्री निघणारा शेवटचा माणूस, असं तेव्हा हिचकॉकचं वर्णन केलं जात असे.

‘फेमस प्लेयर्स’ मात्र या काळात डबघाईला येत चालली होती. चित्रपट बनवणं जमेना तसं फेमस प्लेअर्सनं आपला गाशा गुंडाळला आणि आपला स्टुडिओ इतर चित्रपट कंपन्यांना भाड्यानं द्यायला सुरुवात केली. फेमसचे सगळे पगारी नोकर बेकार झाले. त्यात हिचकॉक होताच. मात्र तेव्हाच मायकेल बाल्कन हा इंग्लिश निर्माता, व्हिक्टर सॅव्हिल आणि ग्रॅहॅम कट्स हे दोन दिग्दर्शक, उद्योजक जॉन फ्रिडमन यांनी एक चित्रपटकंपनी स्थापन केली. त्यात हिचकॉकला नोकरी मिळाली. या काळात आल्मा रेव्हिल या तरुणीचा हिचकॉक काम करत असलेल्या कंपनीत प्रवेश झाला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. आल्मा पटकथालेखन आणि एडिटिंग या क्षेत्रात तिथे मदत करत असे.

मात्र ही कंपनीदेखील बंद पडली. मायकेल बाल्कन यानं मग ‘गेन्सबरो पिक्चर्स’ ही नवीन कंपनी काढली. ‘गेन्सबरो कंपनी’नं फेमस प्लेअर्सचा स्टुडिओ विकत घेतला. हिचकॉकनं गेन्सबरोत प्रवेश करून चित्रपट बनवताना हरप्रकारे मदत केली. मात्र हिचकॉकच्या चित्रपट बनवण्यातल्या अनेक गुणांमुळे त्याची इतरांना असूया वाटायला लागली. त्याची परिणती गेन्सबरोमधून हिचकॉकला चक्क काढून टाकण्यात झाली. तेव्हा बाल्कननं त्याला एका स्वतंत्र चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर दिली.

प्रचंड मोठं पोट, चपटा चेहरा, कपाळामागे गेलेले केस, बारीकसे पण चाणाक्ष डोळे, चिमणीच्या चोचीसारखं नाक आणि डबल हनुवटी असं अनाकर्षक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या हिचकॉकनं प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करणारे ५३ रहस्यप्रधान चित्रपट काढले. ‘चित्रपटाचा मूळ हेतू मनोरंजन हा आहे आणि त्यासाठी आधी प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटात मुळात रस वाटायला हवा’, असं म्हणणाऱ्या हिचकॉकनं थ्रिलर प्रकारातल्या चित्रपटांमध्ये एकमेवाद्वितीय असं स्थान निर्माण केलं. चित्रपटात तंत्राचा उत्कृष्ट वापर करणारा हिचकॉक सेक्स, रहस्य आणि विनोद यांचं बेमालूम मिश्रण करून थ्रिलर चित्रपट बनवत असे. सुटसुटीत कथा, आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटना, प्रेक्षकांच्या मनाशी खेळ, सतत बदलणारी दृश्यं आणि कॅमेऱ्याचे बदलणारे अँगल्स, ताण वाढवण्यासाठी मागे चालू असणारं, काहीसं लाऊड संगीत, सावल्यांचा गूढ खेळ, आरसे, गोलाकार जिन्याच्या भयावह पायऱ्या, फ्लॅशबॅक्स, प्रेक्षकांना विचारात पाडणं, एडिटिंग आणि साऊंडवर उत्तम लक्ष असणं, लाईटचे खेळ वापरून सावल्यांमुळे रहस्य वाढवणं हे सगळे थ्रिलर चित्रपटांचे अविभाज्य भाग आहेत. थ्रिलर चित्रपटात कोणाचं तरी आयुष्य टांगणीला लागलेलं असतंच. थ्रिलर म्हटल्यावर पाठलाग, अपहरण, खून, सुरे, पिस्तुलं, विषप्रयोग, दरोडे, दहशतवादी, राजकीय हेरगिरी, प्रेमत्रिकोणातून घडणारे खून, बळी पडलेली माणसं, गुन्हेगार, दुर्दैवी लोक, निरपराध लोक, तुरुंगातले सहकारी, भूतकाळात भयंकर गोष्टी घडलेल्या व्यक्तिरेखा, स्त्रियांवर आलेलं एखादं भयावह संकट, कोर्टातले नाट्यमय प्रसंग, सुप्त लैंगिकता, मनोविश्लेषण, मानसिक रुग्ण, पोलिस, डिटेक्टिव्ह, एकसारखी दिसणारी दोन माणसं, विचित्र नातेसंबंधात गुंतलेली माणसं, सतत एकीकडून दुसरीकडे कुठेतरी प्रवासाला जाणारी माणसं – हे सगळं आलंच. थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला.

ज्या काळी चित्रपटाचा दिग्दर्शक नावाचा माणूस कसा दिसतो, ते लोकांना माहीतदेखील नसायचं अशा काळात प्रत्येक चित्रपटात स्वत: क्षणभर दर्शन देऊन हिचकॉक प्रेक्षकांपर्यंत सहज पोचला. पाच फूट आठ इंच उंचीचा हिचकॉक आयुष्यभर लठ्ठच होता. एकदा तर त्याचं वजन ३६५ पौंडांपर्यंत (१६५ किलो) पोचलं होतं! त्याचं रोजचं जेवण रोस्ट चिकन, हॅमचा तुकडा, उकडलेले बटाटे, दोन भाज्या, ब्रेड, एक बाटली वाईन, सॅलड, डेझर्ट आणि ब्रँडी इतकं साधं(!) असे. त्याला आईस्क्रीम भयंकर आवडायचं. मात्र आईस्क्रीम खाणं हा कार्यक्रम साधारण संध्याकाळनंतरचा असायचा. खाण्याची आवड असणाऱ्या हिचकॉकला अंड्यांचा मात्र फोबियाच होता! हिचकॉकला भीती हा विषय केंद्रस्थानी ठेवून चित्रपट का काढावेसे वाटले, याचं उत्तर त्याच्या बालपणातल्या दोन प्रसंगांमध्ये सापडतं. त्यातला पहिला प्रसंग खूपच विचित्र होता. हिचकॉक पाच वर्षांचा असताना एकदा त्याच्या आईवडिलांनी त्याला त्याच्या बेडरूममध्ये झोपवलं आणि ते दोघं फिरायला गेले. लहानगा हिचकॉक मधल्या काळात उठला. भोवतालचा अंगावर येणारा काळोख पाहून तो भीतीनं गारठला. मग तसाच रिकाम्या घरात चालत चालत तो स्वयंपाकघरात पोचला. तिथल्या फ्रिजमधला मांसाचा एक तुकडा त्यानं खायला सुरुवात केली. मात्र आपण एकटे आहोत आणि अचानक कोणीतरी काळोखातून आपल्या अंगावर येईल, अशी भीती त्याच्या मनात तेव्हा बसली ती कायमच! दुसऱ्या प्रसंगात म्हणजे त्याच्या लहानपणी हिचकॉकच्या वडिलांनी एक चिठ्ठी देऊन त्याला पोलिस स्टेशनात पाठवलं. तिथे ‘खोडकर मुलांचा आम्ही असाच समाचार घेतो’ असं एक पोलिस म्हणाला आणि त्यानं दहा मिनिटं हिचकॉकला एका बराकीत डांबलं. ती दहा मिनिटं, आता पुढं काय घडेल याच्या सस्पेन्समध्ये हिचकॉकनं अतिशय साशंक आणि भयग्रस्त अवस्थेत काढली. हे दोन अनुभव हिचकॉक आयुष्यात कधीच विसरू शकला नाही, असं तो स्वत:च सांगत असे.

‘सायको’ प्रदर्शित होण्याआधी आपल्या सहायकाला पाठवून हिचकॉकनं ‘सायको’ कादंबरीच्या सर्व प्रती विकत घेतल्या होत्या. तर चित्रीकरणापूर्वी सर्व स्टाफला गुप्तता बाळगण्याची उजवा हात उंचावून शपथ घ्यायला लावली होती. १९६० साली चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ‘चित्रपट सुरू झाल्यानंतर कोणालाही आत प्रवेश नाही’ असं पोस्टरही लागलं होतं. त्यात हिचकॉक हातातल्या मनगटी घड्याळाकडे बोट दाखवून ‘वेळेवर या’ असा इशारा देताना दिसतो. चित्रपट थिएटरमध्ये दाखवायच्या आधी संगीताची रेकॉर्ड लावून ‘आता दहा मिनिटं राहिली, आता पाच मिनिटं राहिली’ अशी अधूनमधून अनाऊन्समेंटही होत असे. सस्पेन्स चित्रपटाच्या /नाटकाच्या जाहिरातीत सुरवात चुकवू नका ,शेवट सांगू नका हे लिहिण्याची पद्धत प्रथम आल्फ्रेड हिचकॉक याने गाजलेल्या सायको या चित्रपटापासून सुरु केली .

सायको —सायको म्हणजे गुढ घर, त्यातला नॉर्मन बेट्स हा देखणा खुनी नायक ,शॉवर घेताना अंगावर काटा आणणारा नायिकेचा होणारा खुन.

अमेरिकेत विस्कॉन्सिन मधे एड जीन नावाचा माणसांना खाणारा एक भयानक खुनी होऊन गेला या घटनेवरूनच रोबर्ट ब्लोचयांनी सायको हि कादंबरी लिहिली होती. हिचकॉक यांनी त्या कादंबरीचे सगळे हक्क विकट घेतले ,त्या कादंबरीची विक्री बंद केली एवढेच नव्हे तर विकत गेलेल्या प्रतीही परत मिळविल्या. आणि १९५९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला.

‘सायको’च्या रहस्याबद्दल आणि प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याबाबत हिचकॉक कमालीचा दक्ष होता. ‘सायको’ या चित्रपटाच्या निर्मितीला ८ लाख डॉलर्स लागले असले तरी हिचकॉकनं त्यावर शेवटी २ कोटी डॉलर्स कमाई केली. ‘सायको’नंतर हिचकॉकनं डॅफ्नी द्यु मॉरिए या लेखिकेच्याच कथेवर ‘द बर्ड्स’ हा चित्रपट काढला. टिपी हेड्रन त्यात नायिका होती. टिपी हेड्रनच्या ६ वर्षाच्या मुलीला त्यानं ‘द बर्ड्स’मधल्या पोशाखातल्या आपल्या आईची तितक्याच उंचीची मोठी बाहुली दिली होती. मात्र ती बाहुली चक्क एका कॉफिनमध्ये ठेवलेली होती! यानंतर हिचकॉक प्रचंड खायला आणि दारू प्यायला लागला. १९८०च्या सुरुवातीला त्यानं ऑफिसही बंद केलं. हिचकॉकला वयाच्या पाचव्या वर्षी पोलिसचौकीत डांबून ठेवलं होतं, तेव्हा तो पोलिस ‘धिस इज व्हॉट वुई डू टू बॅड लिटिल बॉईज’ असं म्हणाला होता. हिचकॉकच्या थडग्यावर त्याला काय कोरलेलं आवडेल असं विचारल्यावर त्यानं ‘धिस इज व्हॉट वुई डू टू बॅड लिटिल बॉईज’ असं उत्तर दिलं होतं. मात्र आपलं प्रेत दफन न करता जाळावं, अशी हिचकॉकची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह दहन करून त्याची राख पॅसिफिक समुद्रात विखुरली गेली! आल्फ्रेड हिचकॉक या अजुनी कुतूहलाचा विषय असलेल्या महान दिग्दर्शकाला…..एक वर्ष आधी ‘जीवन गौरव’ सन्मान मिळाला होता आणि हा आपल्या मित्राला म्हणाला – ‘आता मी लवकरच मरणार ! व आल्फ्रेड हिचकॉक यांचे २९ एप्रिल १९८० रोजी निधन झाले.

— नीलांबरी जोशी.

आल्फ्रेड हिचकॉक यांचे चित्रपट

सिक्रेट एजंट
https://www.youtube.com/watch?v=vIhqVVfOa8Q

मर्डर
https://www.youtube.com/watch?v=BcK7xd_Y8W4

सायको
https://www.youtube.com/watch?v=hrwIrkwhzKA

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..