मार्च महिन्याच्या सुरवातीस थंडीचा कडाका ओसरू लागतो. हवेत सुरेख गारवा येऊ लागतो. स्वेटर रजया बासनात गुंडाळून ठेवल्या जातात.पंख्याचा वेग वाढला जातो. एप्रिलच्या सुरवातीस कूलर खिडक्यावर विराजमान होतात. सकाळी दहानंतर घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसतं. प्राणी,पाखरे सावलीचा आधार शोधतात. सगळीकडे रखरख वाढू लागते. सूर्य आग ओकू लागतो.वारासुद्धा तापू लागतो.अंगाची काहिली होऊ लागते. सारीकडे वैराण भासू लागते. उन मी म्हणते . झाडे वैराग्यासारखी दिसू लागतात.जिथे नजर टाकावी तिथे रखरखित भासू लागते. अश्यातच एक झाड फुलू लागत.ते म्हणजे गुलमोहर. झाडाला लटकणाऱ्या, खुळखुळ करणाऱ्या शेंगा वाळून गळून पडतात. लाल चुटूक कळ्या झाडावर उमलू लागतात आणि हा हा म्हणता कळ्यांच रुपांतर लाल फुलात होते. सारे झाड लालबुंद फुलांनी बहरू लागते. आजूबाजूच्या तापलेल्या वातावरणात आपले अस्तित्व दाखवू लागते.साऱ्यांना आपल्याकडे बघणे भाग पाडते. वर्षभर वैराग्यासारखे वावरणारे झाड आता मानाचा लाल केशरी पटका ल्यालासारखे दिमाखात उभे असते. जणू सांगत असते वातावरणाची दाहकता शमवणारा मीच आहे.
वास्तविक वर्षभर गुमान गप असणारा गुलमोहर उन्हाळ्यात राजासारखा तेजपुंज दिसू लागतो. गुलमोहराची विशेष अपेक्षाही नसते. त्याची वेगळी निगा राखावी लागत नाही.तो कुठेही तग धरतो.मग तो शेताचा बांध असो, नाहीतर शाळेचे पटांगण असो ,रस्त्याच्या बाजूला असो, किंवा एखाद्या बंगल्याचे आवर असो.उन्हाळ्याच्या रखरखीत पणात काही मोजकी झाडे ज्या दिमाखात वावरतात त्यात एक गुलमोहर. त्याचा लाल पर्णसंभार दूरवरूनही दिसून येतो. तसे हे झाड माणसाळलेले. माणसापासून दूर राहू शकत नाही.पण फुलझाडासारखे माणसावर अवलंबून नसते . आधी केशरी तुरे मग त्या तुर्यांचे लालचुटूक गुच्छ झाड्याच्या माथ्यावर मिरवू लागतात. झाड म्हणता म्हणता पेटलेल्या ज्वालेच्या सारखे दिसू लागते.
पिवळी फुले असणारेही गुलमोहर असतात पण ते विरळे. तीसुद्धा लाल गुल्मोहारासारखे बहरतात पिवळाधमक रंग डोक्यावर लेऊन. पण दिसतात मात्र क्वचितच. एक हळदीचा रंग ल्यालेले तर दुसरे कुंकवाचा. दोन्हिही डोळ्यांना सुखावतात.लांबवर पसरलेला रस्ता असतो. नजर जाईपर्यंत रखरख असते.अधून मधून घाणेरी,निवडुंग,बाभळी,सारखी काटेरी झाडे चुकारपणे उभी असतात. उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करत असतात. तापता वारा त्यात भर घालत असतो. अश्यावेळी अचानक फुलांनी डवरलेल्या गुलमोहारांची रांग दिसू लागते. मायबाप सरकारने कधी नव्हे ते रस्त्याकडेला गुलमोहर लावण्याची कृपा केलेली असते. इतकावेळ डोळ्याला जाणवणारा उन्हाचा ताप अचानक नाहीसा होतो. गुलमोहोर आपल्याला कवेत घेतो. इतकावेळ आलेला शीण, मरगळ अचानक नाहीशी होते.आपण नकळत सुखावले जातो.ह्यापेक्षा वेगळ सुख काय असू शकते.
गुलमोहराला सोबत करणारे आणखी एक झाड म्हणजे बहावा. पिवळ्या धमक फुलांनी ह्याच सुमारास फुलणारं झाड.पण हे गुलमोहरासारखं कुठेही दिसत नाही.त्याची जाणीवपूर्वक लागवड करून त्याला निगुतीने वाढवाव लागतं नाहीतर तग धरणे मुश्किल. तेसुद्धा ह्याच वेळी डवरते .वास्तविक बहावाची लागवड केली जाते ती औषधी म्हणून,कारण त्याचं आयुर्वेदातील महत्व. ते सुद्धा निसर्गाशी प्रामाणिक राहते.त्याचा फुलोरा पूर्ण फुलल्यावर साधारण ४० ते ४५ दिवसात पाऊस सुरु होतो. तोवर हे दिमाखाने गुलमोहरासारखेच फुलत राहते.
हळूहळू मे सरतो. अर्धा जून सरल्यावर पावसाळा अक्राळविक्राळ काळे ढग घेऊन येतो. बघताबघता धारा कोसळू लागतात. धरती पाण्याने नाहून निघते.आणि निऊ लागते. चहूकडे हिरवळ फुटू लागते. रखरखीतपण लयाला जाते. वसुंधरा हिरवा शालू ल्यालाप्रमाणे दिसू लागते. फुलांना बहर येऊ लागतो. माळावर रानफुले डोलू लागतात. गुलमोहर आणि बहावा आपला बहर आवरता घेतात पुढल्या वर्षी फुलण्यासाठी.
© रवींद्र वाळिंबे
८१४९७५२८१५
raviwalimbe65@gmail.com
फारचं सुंदर वर्णन केले आहे सर ??????