मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली ‘ग्रिप्स नाट्य चळवळ’ सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव रंगत आहे. या महोत्सवात पुण्यातूनही काही कलावंत सहभागी झाले आहेत. भारतात ही चळवळ रुजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे ग्रिप्सचे विशेष निमंत्रित आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ही चळवळ आणली डॉ. मोहन आगाशे यांनी. त्यांनी १९८६ च्या सुमारास पुण्याच्या मॅक्सम्युलर भवनाच्या मदतीने नाटके बसवायला आणि सादर करायला सुरुवात केली. ही चळवळ पुण्यातून देशभर पसरली. साठच्या दशकात कम्युनिस्ट चळवळीच्या प्रभावातून विद्यार्थी चळवळीतून ग्रिप्स चळवळ उदयाला आली. खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविंग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली. ग्रिप्स चळवळीतील नाटके इतर बालनाटकांप्रमाणे परीकथांवर आधारलेली नसतात, तर खेळाच्या मैदानांची कमतरता, पर्यावरण, अभ्यासातल्या अडचणी या मुलांना भेडसावणाऱ्या विषयांवर ती बेतलेली असतात. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांचे विविध प्रश्ना हाताळणे हे ग्रिप्सच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. सध्या पुण्यातले श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर सध्या बालनाट्यमहोत्सवाची ही चळवळ चालवत आहेत. महाराष्ट्रातले अमृता सुभाष, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, गौरी लागू, परेश मोकाशी, रसिका जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्यासारखे कलावंत या चळवळीने घडविले. ‘ग्रिप्स चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने जगभरातील रंगकर्मी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात २८ देशांतील रंगकर्मींचा सहभाग आहे. ‘चिल्ड्रन्स राइट’ हा महोत्सवाचा मध्यवर्ती विषय असून विविध उपक्रम होत आहेत. नाट्यमहोत्सवासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘जंबा बंबा बू!’ या नाटकाची निवड झाली आहे. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे लिखित आणि राधिका इंगळे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग महोत्सवात होत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply