अमेझॉन नदीमध्ये जहाज प्रवाहाच्या दिशेने वेगात समुद्राकडे चालले होते. अमेझॉन नदीवरील मनौस शहरात कार्गो डिस्चार्ज करून जहाज बाहेर समुद्रात नेण्याचा मेसेज होता. समुद्रात यायला साधारण अडीच ते पावणे तीन दिवस लागणार होते. सकाळीच मनौस सोडल्यापासून जहाज फुल्ल स्पीड मध्ये निघाले होते. जवळपास 18 नॉट्स चा म्हणजे ताशी 32 ते 33 किलोमीटर एवढ्या वेगाने जहाज चालले होते.समुद्रात असताना हाच स्पीड जवळपास 12 नॉट्स म्हणजे साधारण बावीस किलोमीटर प्रती तास एवढाच असतो. ज्युनियर इंजिनियर असल्याने तेव्हा सेकंड इंजिनिअरच्या वॉच मध्ये म्हणजेच पहाटे 4 ते 8 आणि मग सकाळी 9 ते 12 आणि पुन्हा संध्याकाळी 4 ते 8 अशी ड्युटी असायची. पहाटे तीन चाळीस वाजता वेक अप कॉल येत असल्याने तसेच दिवसभर इंजिन रूम मध्ये काम केल्याने रात्री नऊ साडे नऊ वाजता झोप लागायचीच.
ब्रिजवर अमेझॉन नदीमध्ये येणारे रिव्हर पायलट म्हणजेच अमेझॉन नदी मधून तिथली माहिती असणारे स्थानिक कॅप्टन प्रत्येक जहाजावर येऊन त्या त्या जहाजाला नदी मधून इच्छित पोर्ट मध्ये सुखरूप घेऊन जात असतात. अमेझॉन नदी मध्ये दिवस रात्र चालणारे जहाज नेहमी फुल्ल स्पीड मध्ये नेले जाते. पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहामुळे अमेझॉन नदी मध्ये गाळ आणि रेतीचे पुळके उभे राहिलेले असतात. जहाज त्या मध्ये रुतून अडकायला नको म्हणून नेहमी फुल्ल स्पीड मध्ये नेत असल्याची माहिती मिळाली होती. तसे पाहिले तर नदीची खोली ही जहाजा पेक्षा किती तरी जास्त होती. जहाज पाण्याखाली तीस फूट खोल आणि समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 1800 किलोमीटर पर्यंत जहाज नदी मध्ये असणाऱ्या पोर्ट मध्ये वर्षाचे बारा महिने ये जा करत असे त्यामुळे नदीचे विशाल पात्र आणि खोली ही समुद्रापासून हजारो किलोमीटर अंतरावर सुद्धा कायम आहे हे विशेष. झोपेत असताना जहाज एकदम कशाला तरी धडकल्याचे जाणवले आणि हळू हळू धक्के लागत असल्याचा भास झाला आणि तेवढयात अचानक इमर्जन्सी अलार्म वाजायला लागला. सगळ्यांच्या केबिन चे दरवाजे एका मागोमाग उघडायला लागले आणि जो तो मस्टर स्टेशन कडे पळायला लागला होता. पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम वर जहाजाची ग्राऊंडिंग झाल्याची माहिती ड्युटी ऑफिसर ने दिली. जहाजाचे ग्राऊंडिंग म्हणजे जहाज नदी पात्रात पाण्याची खोली कमी असल्याने रुतले होते. आमच्या जहाजाचा कॅप्टन पायलट सोबत ब्रीज वरून वॉकी टॉकी वर पटापट सूचना द्यायला लागला होता. चीफ इंजिनियर ,सेकंड इंजिनियर , इलेक्ट्रिक ऑफिसर , मोटर मन अशी सगळी इंजिन टीम इंजिन रूम च्या दिशेने घाई घाई मध्ये निघाली. जहाजाचे इंजिन फुल्ल स्पीड वरून अवघ्या काही मिनिटांत थांबवले गेले होते त्यामुळे इंजिनाशी संबंधित सगळ्या सिस्टीम चे अलार्म वाजत होते.
जहाज गाळात रुतल्या मुळे काही टँक डॅमेज होऊन त्यामध्ये पाणी शिरतय का किंवा फ्युएल असणाऱ्या टाक्यांमधून डिझेल किंवा ऑइल नदीच्या पाण्यात मिसळतंय का हे पाहणे अत्यंत महत्वाचे होते कारण तसे झाल्यास ऑइल पोल्युशन झाल्याची नामुष्की जहाज आणि कंपनीवर येणार होती. जहाजाच्या कोणत्या भागामध्ये स्ट्रक्चरल डॅमेज झालाय का ते सुद्धा तपासावे लागणार होते. एखादे जहाजाचे जेव्हा ग्राऊंडिंग होते तेव्हा संपूर्ण जहाजाचे इन्स्पेक्शन केले जाते तसेच जहाज कार्गो नेण्यासाठी सक्षम आहे त्यासाठी आवश्यक असलेले परवाने आणि सर्टिफिकेट पुन्हा बनवले जातात.
कंपनीच्या वरिष्ठ अधिकारयांना ताबडतोब या घटनेची माहिती कॅप्टन ने परिस्थिती नियंत्रणात आल्याबरोबर देऊन टाकली. आता पुढे काय अशा अवस्थेत असताना ब्रिज वरून इंजिन रूम मध्ये फोन आला, कॅप्टन ने चीफ इंजिनियरला इंजिन सुरु करता येईल का असे विचारले. चीफ इंजिनियरने इंजिन आणि इतर सर्व सिस्टीम व्यवस्थित काम करत असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकारात पायलट सोडून कॅप्टन चीफ इंजिनियर आणि इतर सर्वजण गोंधळले होते. अचानक काय झाले, कसे झाले आणि आता पुढे काय होईल असे सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. पायलट ने जहाजाचे इंजिनला अस्टर्न म्हणजे रिव्हर्स मध्ये सुरु करण्याची सूचना दिली. डेड स्लो मध्ये इंजिन सुरु होऊन प्रोपेलर शाफ्ट आणि प्रोपेलर म्हणजे जहाजाचा पंखा फिरायाला लागला होता पण जहाज काही हलत नव्हते. पायलट ने इंजिनचा स्पीड वाढवण्याची सूचना केली इंजिन चा स्पीड वाढत होता पण त्याचा जहाजावर काहीच परिणाम होत नव्हता. कदाचित पाण्याचा प्रवाह सुद्धा मागून येत असल्याने जहाज जागेवरुन हलत नव्हते. कॅप्टन ने पायलटला जहाज अहेड म्हणजे पुढे नेण्याची विनंती केली आणि त्यानुसार इंजिन थांबवून अहेड मुव्हमेंट दिली. सुरवातीला डेड स्लो मध्ये काही परिणाम झाला नाही पण जेव्हा हाफ अहेड मुव्हमेंट दिली आणि इंजिन चा स्पीड वाढला तसे जहाज हळू हळू सरकायला लागले होते. जहाज ज्या दिशेने जात असताना रुतले होते त्याच दिशेने पुढे काढण्याची कॅप्टन ची कल्पना यशस्वी झाली. रात्रीचे बारा वाजायला आले होते पण दोन तासामध्ये रुतलेले जहाज बाहेर निघाल्या मुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. ड्युटी वर असणारे त्यांचा वॉच संपल्यावर सुट्टी घेणार होते पण जे सुट्टीवर होते त्यांच्या सुट्टीचे आणि झोपेचे मात्र बारा वाजले होते. नदीपात्रात एका वळणावर पायलट ने जहाज वळवण्यासाठी स्टियरिंग फिरवायला मिनिटभर उशिरा सूचना केल्याने जहाज नदीत प्रवाहामुळे जमा झालेल्या गाळात रुतले होते जहाज पुन्हा तासाभरात फुल्ल स्पीड मध्ये जाईपर्यंत सगळे अधिकारी आणि खलाशी जागेच होते.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply