ग्रोव्ह्युअर छपाई पद्धतीत प्रतिमा कोऱ्या जागेपेक्षा खोलगट भागात असते. या खोलगट भागावरून छपाई करण्याच्या पद्धतीला इंटाग्लिओ पद्धत म्हणतात. प्रथम संगणकात प्रतिमा तयार करून एक पॉझिटिव्ह तयार केली जाते. एका तांब्याच्या सिलेंडरभोवती ही पॉझिटिव्ह गुंडाळून उघडयावर ठेवली जाते.
नंतर सौम्य नायट्रिक अॅसिडने ती खरवडली (इचिंग) जाते. या खरवडण्यामुळे प्रतिमा इतर कोऱ्या भागापेक्षा खालच्या पातळीवर जाते, म्हणजेच तेथे खोलगटपणा येतो. हा सिलेंडर नंतर एका ग्रोव्ह्युअर यंत्रात बसवला जातो. या छपाईसाठी द्रवरूप शाई वापरली जाते. शाईच्या टाकीत यंत्रावर द्रव शाई ठेवलेली असते.
या शाईच्या टाकीत ग्रोव्युअर सिलेंडर एकतृतीयांश बुडून फिरत असतो. प्रत्येक फेरीत जेव्हा हा सिलेंडर द्रवशाईतून वर येतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावर एक पाते (डक्टर ब्लेड) फिरत असते. त्यामुळे खोलगट प्रतिमेवरील शाई भरलेली राहून बाकी कोऱ्या जागेवरील शाई पाते पुसून टाकते. त्याच फेरीत कागद सिलेंडरवर दाबला जातो आणि खोलगट प्रतिमेवरील शाईने या कागदावर छपाई होते. प्रकारात ज्या यंत्रांना रीळे लावली जातात फक्त ती यंत्रे येतात. वर्तमानपत्राच्या छपाईसाठी ही यंत्रे वापरली जात नाहीत. प्लॅस्टिकवरील छपाई, पातळ कागदावरील छपाई, कापड गिरणीतील कापडावरची छपाई या पद्धतीने केली जाते.
वर्तमानपत्राच्या आधुनिक उत्पादन पद्धतीत इंटरनेटचा वापर केला जातो. इंटरनेटवरून देशातील व जगातील बातम्यांमधील छायाचित्रे व बातम्या त्वरीत मिळतात व त्यांची छपाई वर्तमानपत्रात होऊ शकते. वर्तमानपत्रांच्या आवृत्यातील सामायिक पानातील मजकूर (एखाद्या वर्तमानपत्राच्या दहा ठिकाणाहून आवृत्या निघत असतील तर त्यातील काही पाने समान मजकुराची असतात व काही पाने स्थानिक बातम्यांची असतात.) व छायाचित्रे डीटीपीमध्ये जुळणी करुन ती पाने त्वरित इ-मेलने सर्व केंद्रांना मिळतात. पूर्वी दूरच्या जाहिरात एजन्सीजना जाहिरातीच्या सीडी त्या त्या वर्तमानपत्रांकडे कुरिअरने पाठवाव्या लागत. त्याला एक-दोन दिवस लागत. आता मात्र इ-मेलने त्या जाहिराती त्वरीत पाठविता येतात.
Leave a Reply