नवीन लेखन...

गृहिणीची अर्थनीती

भारतीय ‘गृहलक्ष्मी’ मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, शहरी अथवा ग्रामीण असो. शिक्षित वा अशिक्षित असो. ती मर्यादित जिन्नस वापरून उत्तम स्वयंपाक करते आणि कुटुंबाला पोटभर खाऊ घालते. तशीच मर्यादित उत्पन्नामध्ये घर चालवते. घरखर्च भागवते आणि वर बचतही करते. तो तिचा उपजतच गुण आहे. म्हणूनच अडीअडचणीला ती घरखर्चातून साठवलेले पैसे देऊन, सणावाराला थोडे थोडे घेतलेले सोने देऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरते. आता तर ती स्वतः अर्थाजन करून कुटुंबाचा आर्थिक भार उचलते आहे.

पण तरीसुद्धा बदलत्या परिस्थितीचे भान/योग्य माहिती, उपलब्ध पर्यायांची जाण तिला असावी यासाठी हा लेखन प्रपंच.

सध्याच्या काळात वाढलेली अनिश्चितता आणि नसलेली स्थैर्यता लक्षात घेता प्रत्येक स्त्रीने जपावा असा अत्यंत महत्त्वाचा असा आर्थिक मंत्र म्हणजे ‘आधी बचत मग खर्च’. आपल्या मिळकतीतला काही भाग हा बचत म्हणून बाजूला ठेवावा आणि उरलेल्या उत्पन्नात घरखर्च बसेल असे अंदाजपत्रक (बजेट) करावे. उतारवयाची तजवीज, आजारपण, अचानक उद्भवणारे खर्च, इतर उद्दिष्टे यासाठी किमान २०% उत्पन्न बचत म्हणून बाजूला ठेवावे आणि उरलेल्या ८०% उत्पन्नात आपला घरखर्च भागवावा. यासाठी आपल्या ‘गरजा’ आणि ‘इच्छा’ यांचे योग्य ते प्रमाण ठेवावे. थोडक्यात अत्यावश्यक खर्च आणि हव्या असलेल्या सोयी सुविधांवर होणारा खर्च याचा आपल्या उत्पन्नाप्रमाणे मेळ घालावा. हेच खर्चाचं बजेट सर्वसाधारणपणे ढोबळ नियमांनुसार आपला ३ ते ६ महिन्याचा घर खर्च भागेल इतके पैसे तरलता असलेल्या म्हणजे LIQUID योजनांमध्ये ठेवावेत. म्हणजे बँकेचे बचत खाते, कमी मुदतीच्या बँक ठेवी योजना हा सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय ज्यामध्ये गरज पडल्यास तत्काळ पैसे मिळू शकतात.

थोड्या जास्त किंवा दीर्घ मुदतीसाठी, निश्चित परतावा देणाऱ्या सुरक्षित योजना पण सरकारतर्फे चालू आहेत. पोस्टाच्या विविध योजना मुदत ठेव, रिकरिंग डिपॉझीट मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरीक योजना, पी.पी.एफ, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाण पत्र, सुकन्या समृद्धी योजना इत्यादी.

सोने हा भारतीय स्त्रियांचा आवडता सोन्याचे दागिने, सोन्याची गुंतवणूक पर्याय नाणी अथवा सोनाराकडे भिशी. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे तो महागाईवर मात करणारा पर्याय होऊ शकतो. परंतु सुरक्षितता, सोने सांभाळायचा खर्च (बँक लॉकर), दागिन्यांच्या मजुरीचा खर्च आणि ते विकताना सोनार करतात ती वजावट लक्षात घेता सोने अथवा सोन्याचे दागिने हा खर्चिक पर्याय आहे.

त्यापेक्षा सध्याच्या काळात सर्वात उत्तम आणि सुरक्षित सोने गुंतवणूक पर्याय म्हणजे सरकारतर्फे RBI ने issue केलेले (Gold Bonds) सुवर्ण रोखे, ह्या योजनेमध्ये प्रत्यक्ष
सोने खरेदी नसल्याने सोने ठेवण्याचा जोखीम खर्च नाही. गुंतवणुकीवर थोडे व्याजही दिले जाते आणि मुदतीअंती सोनेदरवाढीचा पूर्ण फायदा सुद्धा मिळतो. गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी सोने मिळते किंमतीत आणि मुदतीअंती बाजारभावाप्रमाणे किंमतही मिळते, पुन्हा सुरक्षेची चिंता नाही.

अशा तऱ्हेने खर्चाचे योग्य नियोजन म्हणजे ‘बजेट’ केल्यानंतर त्याचे अनुसरण करणे, ते आचरणात आणणे, वेळोवेळी खर्चाचा मागोवा घेणे आणि गरज पडल्यास परिस्थितीनुसार नियोजनात योग्य ते बदल करणे हेही तितकेच महत्त्वाचे. आपला आयुष्य/ जीवन प्रवास सुरक्षित व्हावा, सुखात सरावा आणि मर्यादित पैशात जास्तीत जास्त आनंद लाभावा यासाठी हे आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. अत्यंत गरजेचे.

आता तितकाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा तऱ्हेने बचत केलेला पैसा कुठे आणि कसा ठेवावा? गुंतवणूक कशी करावी? उत्तम गृहिणी कशी सतत कामात व्यग्र असते तसेच ह्या साठवलेल्या पैशानेही सतत काम केले पाहिजे. आपण त्याला कामाला लावले पाहिजे. पैशाला कामाला लावायचे? म्हणजे? हे बघा, समजा आपण पैसे नुसतेच कपाटात ठेवले तर काही महिन्यांनी, काय वर्षांनी तेवढेच राहतील. वाढत्या महागाईमुळे ह्या पैशांत विकत घेऊ शकू अशा गोष्टींची संख्या कमी होईल. म्हणजेच त्या ठेवलेल्या पैशाची क्रयशक्ती ज्याला Purchasing Power म्हणतात ती कमी होईल, त्याचे मोल कमी होईल म्हणून त्याला कामाला लावले पाहिजे. काम काय तर या पैशाने नवा दुसरा पैसा जोडावा आणि आपली गंगाजळी वाढावी. ज्यामुळे उद्या वाढणाऱ्या महागाईतही आपल्या पैशाची क्रयशक्ती (Purchasing Power) कमी होणार नाही त्याची किंमत अथवा मोल कमी वाटणार नाही.

चला तर मग पाहूया हा पैसा कुठे गुंतवावा? कुठले पर्याय उपलब्ध आहेत?

कंपन्यांच्या समभागाची खरेदी (shares) हा एक जास्त परतावा देणारा महागाईवर मात करणारा पर्याय आहे. परंतु योग्य कंपन्यांची निवड करण्यासाठी अभ्यासाची, सखोल ज्ञानाची अथवा तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. अर्थातच ‘उच्च जोखीम उच्च परतावा’ ह्या नियमाप्रमाणे ह्या गुंतवणुकीत जोखीम सुद्धा जास्त असते, पण असाच पण त्यामानाने
सोपा आणि थोडा सुरक्षित पर्याय म्हणजे Mutual Fund योजनांमध्ये गुंतवणूक, अनेक
Mutual Fund विविध योजना राबवत आहेत. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य अशा चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेमध्ये एक रकमी अथवा दरमहा ठराविक रक्कम गुंतवता येते. आपण केलेल्या गुंतवणुकीतून फंड व्यवस्थापक, जे अभ्यासू व तज्ञ असतात ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या समभागाची खरेदी/ विक्री करतात आणि त्यातून नफा मिळवतात. यामुळेच आपण गुंतवलेली रक्कम बिनासायास वाढत रहाते. आपली जोखीम कमी असते आणि दीर्घ मुदतीमध्ये परतावाही चांगला मिळतो.

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी Gold Mutual Fund Investment हा पण पर्याय आहे. प्रत्येक फंडाची कामगिरी पाहून त्यातल्या चांगल्या फंडाची निवड करावी अथवा तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

अल्प मुदतीसाठी Liquid Mutual Fund/ Debt Fund इत्यादी योजना सुद्धा आहेत. विविध गुंतवणूक पर्यायांची ही दिलेली तोंड ओळख. आपली आर्थिक उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, मुदत इत्यादींचा विचार करून माहिती घेऊन गुंतवणूक करावी.

चला तर मैत्रिणींनो बचत करूया, धनवृद्धी करूया. पुन्हा भेटूच.

– सीए मृदुल दामले

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..