आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात..
जगातील कोणत्याही भाषेत १ ते ९ आकडे असतात व ते लिहाण्याची पद्धतीही साधारणपणे सारखीच आहे. ते तसेच का लिहितात यामागे एक मनोरंजक कारण आहे. हे आकडे खरतर, आपलं पुढील आयुष्य कसं प्रवास करणार आहे याचा सांकेतिक नकाशा आहेत…
क्र १ त ९ यापैकी कमाल आठ संख्या आपल्या सर्वांच्याच जन्मतारखेमध्ये असतातच. या आठपैकी साल दर्शवणा-या दोन संख्या सोडल्यास उर्वरीत सहा संख्या आपल्या आयुष्यप्रवासाचा सांकेतीक ढोबळ नकाशा आहे. या संख्या परस्परांना विरोध करतात की सहकार्य करतात त्यावरून आपले आयुष्य जगणे सुलभ होणार की संघर्षमय, याचा अंदाज लावता येतो. त्या आकड्यांमधेही एकमेकांचे मित्र आणि शत्रू आहेत. सर्वच संख्या किंवा बहुसंख्येने संख्या मित्र असतील तर जगणे सुलभ होईल वा उलट परिस्थिती असेल तर जगणे संघर्षमय होईल. थोडक्यात आपली जन्मतारीख म्हणजे केंद्रातील सरकार आहे आणि जर का ते संपूर्ण बहुमतातील असेल तर विना अडथळा चालेल आणि जर का अनेक पक्षांचे मिळून बनलेले असेल तर मात्र रोजचा दिवस संघर्षाचा असेल..!
मी वर म्हणालो की १ ते ९ या संख्या प्रतीकात्मक आहेत. ही प्रतिकं आहेत आईच्या पोटात वाढणा-या बाळाच्या विविध महिन्यातल्या गर्भ अवस्थांची. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्याच्या गर्भाचा आकार ‘१’ सारखा तर नऊव्या महिन्यातील गर्भाचा आकार ‘९’ सारखा असतो. या दोन महिन्यांमधील गर्भाचा आकार साधारणतः त्या त्या संख्येच्या आकाराप्रमाणे असतो..वैद्यक शास्त्रातील जाणकार यावर अधिक चांगले सांगू शकतील..!
हे काहीसे नक्षत्रांच्या किंवा राशींच्या आकाराप्रमाणे आहे. उदा. सिंह रास म्हटल्यास आपल्याला आकाशात सिंहाची प्रतीमा काही नजरेस पडत नाही मात्र सिंह रास ज्या ता-यांनी तयार होते त्या ता-यांना परस्परांशी जोडणा-या काल्पनीक रेषेचा आकार साधारणत: सिंहासारखा दिसतो. तसेच या संख्यांचे आहे. आपण जर ९ व्या महिन्यातील गर्भस्थ बाळाचा आकार नजरेसमोर आणाल तर ही बाब तुमच्या चटकन लक्षात येईल.
उदा. अंकशास्त्रानुसार १ ही संख्या सुर्याच्या अधिपत्याखाली येते. सुर्य म्हणजे सर्व जीवमात्रांचा उर्जादाता. सुर्य नाहीतर जीवन नाही. आपल्याला नाही का आकाशात सुर्यदर्शन न झाल्यास, मळभ असल्यास अस्वस्थ वाटते तसेच! आता आपल्या लक्षात येईल की १ संख्या ही पहील्या महीन्यातल्या (Fetus) गर्भाचा आकार आहे म्हणजेच एका नविन जीवनास सुरुवात झाली आहे याचेचं ते द्योतक आहे.
तसेच ९ व्या महिन्याच्या गर्भाचा आकार ९ आकड्या प्रमाणे असतो. ९ ही संख्या मंगळाची आहे. मंगळ म्हणजे योद्धा, लढवैया. मंगळाला इंग्रजीत Military Planet म्हणतात. लाल रंगाच्या या ग्रहाला स्वातंत्र्याची उर्मी असते. मंगळ म्हणजे रक्तपात, वेदना. बाळाचा जन्म म्हणजे तरी दुसरे काय असते! एक नविन जीव स्वतंत्र होतो तोच आईला प्रचंड वेदना देत, रक्तपात करत.
१ ते ९ पर्यंतच्या सर्व संख्यांचा आकार म्हणजे त्या त्या महिन्याच्या गर्भाचा आकार. गर्भाच्या आकारावरून संख्या तयार झाल्यात असेही आपल्यास म्हणता येईल. या प्रत्येक संख्येवर एका विशिष्ट ग्रहाचा अंमल असतो व त्या ग्रहाच्या वैशिष्ट्यांचा आपल्या स्वभाव-मनावर प्रभाव पडतो. हा विषय खूप मोठा व तितकाच मनोरंजक आहे..पुन्हा केंव्हातरी प्रत्येक तारखेच, संख्येच वैशिष्ट्य तसेच त्याची मित्र व शत्रू संख्या यांची माहिती आपल्याला सांगेन..या संख्यांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो किंवा कसे हा अनुभव आपण रोजच्या जीवनातही घेऊ शकता..
-गणेश साळुंखे.
9321811091
Leave a Reply