दिवाळीबेंन भील यांचा जन्म २ जून १९४३ रोजी गुजराथमधील अमरेली जिल्ह्यात दलखाणिया या गावात झाला. त्यांचे वडील पुंजाभाई रेल्वेमध्ये नोकरी करत होते. १९५२ मध्ये पुंजाभाई यांचा परिवार जुनागड इथे आला. त्यानंतर दिवाळीबेंन यांचा विवाह राजकोटमध्ये केला परंतु पुंजाभाई आणि त्याच्या सासरच्या माणसाशी विवाद झाल्यामुळे ते लग्न अयशस्वी झाले.
दिवाळीबेंन लग्नानंतर दोनच दिवस सासरी राहिल्या. त्या माहेरी आल्या , त्यानंतर त्या परत कधीही सासरी गेल्या नाहीत आणि त्यांनी परत कधीही लग्न केले नाही. शिक्षण नसल्यामुळे त्यांना कुठेच नोकरी मिळत नव्हती. त्या आपल्या भावाबरोबर रहात होत्या त्यामुळे त्यांना आपल्या भावाला आर्थिक मदत करावीशी वाटत होती. त्यामुळे त्यांनी एका दवाखान्यात काही काळ कामवाली म्ह्णून काम केले. मात्र त्यानंतर त्यांनी एक बालमंदिरात म्हणजे शाळेत नोकरी केली. नर्ससाठी त्यांनी जेवण देखील बनवायला सुरवात केली. त्यांना लहानपणापासून भजन , लोकगीत गाण्याची आवड होती. त्यांचा आवाज हीच खरी तर त्यांची देणगी होती . परंतु शिक्षण नसल्यामुळे त्या जास्त काही करू शकत नव्हत्या. नवरात्रीमध्ये त्या जेव्हा गरबा गात असत तेव्हा मात्र सर्वजण त्यांच्या आवाजाने तल्लीन व्ह्यायचे . भजन गाताना आणि लोकगीत गाताना त्यांचा आवाज इतका मोकळा इतक्या वरच्या सुरात सहजपणे लागायचा , परत आवाज खणखणीत असल्यामुळे तो सर्वाना स्पष्ट ऐकू जायचा.
जुनागडमधील वणझारी चौकात त्या जेव्हा गायच्या तेव्हा असे काही वातावरण व्ह्यायचे की प्रत्येकजण तल्लीन आणि मंत्रमुग्ध व्ह्यायचा . एका नवरात्रीमधील कार्यक्रमात आकाशवाणीचे अधिकारी रेकॉर्डिंग करायला आले असताना त्यांनी दिवाळीबेंन यांचा आवाज ऐकला . तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या हेमू गढवी यांनी अधिकाऱ्यांना दिवाळीबेंन यांच्या गाण्याचे रेकॉर्डिंग करायला सांगीतले.
त्यानंतर हेमू गढवी यांच्या मार्फत दिवाळीबेंन यांचे रेडिओवर रेकॉर्डिंग झाले. त्यावेळी त्या फक्त पंधरा वर्षाच्या होत्या. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर कार्यक्रम केला तेव्हा त्यांना पाच रुपये मिळाले , तेव्हा त्या खूप खूश झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे शेकडो कार्यक्रम झाले . पन्नास हजार प्रेक्षक असले तरी अत्यंत त्या गायला लागल्या की सर्वत्र शांतता पसरायची. त्यानंतीर त्यांनी सतत कार्यक्रम केले. हेमू गढवी यांच्यामुळे त्यांना खूप कार्यक्रम मिळाले. जेथे जेथे गुजराथी आहेत तेथेतेथे त्यांना बोलवले जाऊ लागले. दिल्ली , मुबई, अमेरिका , फ्रान्स , लंडन , कराची असाध्य अशा अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. त्या म्हणतात कराची मध्ये खूप गुजराथी त्यावेळी होते तेथेही माझा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यांचे जेसल तोरल चे भजन ‘ पाप तारुं परकाश जाडेजा धरम तारो संभाण रे…’ मारे टोडले बेठो रे मोर क्यां बोले, और हूं तो कागडिया लखी-लखी थाकी, कानूड़ो मारो कह्या मां नथी ..’ खूपच गाजले अर्थात त्यांची अनेक भजने , लोकगीते खूप गाजली. त्यांनी काही चित्रपटांसाठी गाणी गायली होती.
दिवाळीबेंन यांनी स्टेजवर जास्त गाणी प्राणलाल व्यास यांच्याबरोबर गायली. त्यांना गुजराथच्या ‘ लता मंगेशकर ‘ आणि ‘ गुजराथची कोकिळा ‘ म्हणत कारण त्यांचाही आवाज कोणत्याही पट्टीत जात असे, त्या सहजपणे गात असत.
स्टेजवर असो अगर कोठेही असो त्या गाण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत जात , त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच ढळू दिला नाही. आजही तुम्ही बघाल तर त्यांची असंख्य गाणी इंटरनेटवर मिळतील.
त्यांनी परिस्थितीशी खूप संघर्ष केला कारण त्यांच्याकडे शिक्षण नव्हते नव्हते आणि आर्थिक परिस्थितीही नव्हती. शिक्षणामुळेच सर्वकाही मिळते किंवा त्यापेक्षा आयुष्यात आपण जे संघर्ष करून जे शिकतो ते महत्वाचे असते हे त्यांनी दाखवून दिले. लहानपणी मी त्यांना ठाण्याला एका घरात पाहिले होते, त्या गात होत्या, त्यांचा टिपेला जाणारा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. त्यावेळी त्या गात होत्या मला त्यांची स्वाक्षरी घेता आली नाही राहून गेली . परंतु दोन-तीन वर्षांपूर्वी माझा मित्र खिमराम रायका म्ह्णून आहे त्याचा फोन आला की मी जुनागडला जात आहे तुमच्यासाठी त्यांची स्वाक्षरी आणू कां ? रायका जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा त्यांचे घर पाहिले अत्यंत साधे घर होते , घरात चूल होती , लोखंडी पलंग होता , कुठेही भपका नाही. रायकाने फोटोवर स्वाक्षरी मागितली, दिवाळीबेंन त्याला म्हणाल्या अरे मी कोण आहे मोठी , परंतु त्याने ती स्वाक्षरी माझ्यासाठी घेऊन पाठवली. एक साधे गावातले घर , साधी रहाणी , आदरातिथ्य सर्व काही तिथे त्याला मिळाले असे माझा मित्र रायका मला म्हणाला.
दिवाळीबेंन यांना भारत सरकारने १९९० मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले होते.
दिवाळीबेंन भील या वृद्धपकाळामुळे बऱ्याच आजारी होत्या , त्यातच त्यांचे १९ मे २०१६ रोजी जुनागडमध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply