गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते. गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते.
बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला. तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
१९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही. हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही.
गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=j3_CkTWf5HE
Leave a Reply