बगदाद शहराच्या खलिफाकडे अनेक गुलाम होते. त्यांच्याकडून जास्तीत जास्त अवघड काम करून घेतले जायचे. शिवाय त्यांना वागणूक कधीच चांगली मिळायची नाही. त्यांच्यात हाशीम नावाचा एक गुलाम होता. तो दिसायला कथा अतिशय कुरूप होता. त्यामुळे सहसा कोणीच त्याला जवळ करीत नसे..
आधीच गुलाम आणि त्यात कुरूप त्यामुळे सगळे त्याला टाळत असत. खलिफाची बग्गी जेव्हा रस्त्याने जाई तेव्हा रस्त्यात कोठेही अडथळे येऊ नयेत म्हणून बग्गीच्या पुढे-मागे काही गुलाम धावत असत. एकदा हाशीमकडे ते काम आले. त्याच दिवशी खलिफाच्या राजवाड्यात एक हिरे-माणके विकणारा व्यापारी आला होता. त्याच्याकडून खलिफाने आपल्या बेगमसाठी बरेचसे हिरे-माणके व पाचूंची खरेदी केला व ते सर्व एका पेटीमध्ये ठेवून खलिफा आपल्या बेगमच्या महालाकडे निघाला. हे हिरे-माणके पाहून बेगम किती खूश होईल याचाच विचार करीत खलिफा आपल्या बग्गीतून निघाला होता व त्या बग्गीच्या पुढे-मागे गुलाम पळत होते. त्यात हाशीमही होता.
आपल्याच तंद्रीत असलेल्या खलिफाने ती हिरेमाणकाची पेटी आपल्या मांडीवर ठेवली होती. रस्त्यामध्ये असलेल्या एका दगडावरून अचानक बग्गीचे चाक गेले व बग्गी थोडी तिरकी झाली. त्याचबरोबर खलिफाच्या मांडीवरील पेटी खाली पडून त्यातील सर्व हिरे-माणके रस्त्यावर उधळली गेली. त्यामुळे खलिफा भयंकर संतापला व त्याने तत्काळ सर्व गुलामांना ती सर्व हिरे-माणके शोधून आणण्याचे आदेश दिले. या निमित्ताने हिरे-माणके आपल्या हातात घेऊन पाहता तरी येतील या आशेने सर्व गुलाम आजूबाजूला पळाले. मात्र हाशीम बग्गीच्या मागे तसाच उभा होता. खलिफाच्या हे लक्षात आल्यावर तो हाशीमला म्हणाला, ‘ तू का हिरे-माणके वेचायला गेला नाहीस?’ त्यावर हाशीम मान झुकवून नम्रपणे म्हणाला, ‘ खाविंद तुमच्यासारखा हिरा जवळ असताना त्याचे रक्षण करण्याचे सोडून मी दुसरीकडे कशाला जाऊ?’ त्याच्या या उत्तरावर खलिफा खूश झाला की, त्याने तत्काळ हाशीमची गुलामगिरीतून सुटका करण्याचे आदेश दिले. हाशीमला त्याच्या स्वामिनिष्ठेचे फळ मिळाले होते.
– सुरेश खडसे
Leave a Reply