‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!
१९८० साली मी ‘बीएमसीसी’ मध्ये शिकत असताना ‘मंथन’ या हस्तलिखिताची सजावट करीत असे. ते काम पाहून बारावीतील सुनील गटणे माझ्याकडे आला व माझ्या बंधूना भेटणार का? असे त्याने मला विचारले. मी तयार झालो. एका रविवारी मी त्याच्यासोबत प्रभात रोडवरील शरद गटणेंच्या घरी गेलो.
बेल वाजविल्यावर अंगात पांढरी बनियान व हिरव्या निळ्या पट्यांचा पायजमा घातलेल्या शरदरावांनी दरवाजा उघडला. चित्रपटातील रहमानसारखे मागे वळलेले रेशमी केस, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा असलेल्या सुनीलच्या वडील बंधूंनी माझं स्वागत केलं. घरात ते स्वतः, त्यांची पत्नी व मुलगी असे तिघेजण रहात होते. चहापाणी झाल्यावर मला त्यांनी कामाचं स्वरूप सांगितलं. शरद गटणे पुण्यातील ‘रोज सोसायटी’चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या टेरेसवर त्यांनी अनेक जातींची गुलाबांची रोपे जोपासलेली होती. गुलाब विषयावर “गुलाब का बहरती शेजारी” नावाचे एक पुस्तक त्यांनी लिहिले होते. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांना एक रेखाचित्र काढून हवे होते. त्यांनी चित्राची कल्पना सांगितली. आठवडाभरात मी त्यांना ते चित्र दिले. पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाची एक प्रत मला त्यांनी आवर्जून भेट दिली. कामाच्या पेमेंटचा चेकही दिला.
माझं काॅलेज पूर्ण झाल्यावर मी घरीच डिझाईनची कामं करीत होतो. एके दिवशी शरद गटणे पत्ता शोधत माझ्या घरी आले. त्यांना एका पुस्तकासाठी गुलाबांच्या विविध फोटोंचे पेस्टींग करुन पाहिजे होते. त्यांना काम कसं हवे आहे याची पूर्ण कल्पना असल्यामुळे ते रफ कागदावर डमी काढून दाखवत असत. सहाजिकच काम करणे मला सोपे जात असे.
दरम्यान दहा वर्षे निघून गेली. एके दिवशी शरद गटणे ‘गुणगौरव’ मध्ये दाखल झाले. खुर्चीत बसल्यावर त्यांनी कामाचे स्वरूप सांगितले. चिंचवडमधील लोकमान्य हाॅस्पिटलचे एक त्रैमासिक ते चालवत होते. ‘आलोकन’ नावाच्या त्या अंकाचे लेख, फोटो, इ. गोळा करणे, टाईपसेटच्या ब्रोमाईड पट्या काढणे. त्याचे माझ्याकडून पेस्टींग करुन घेऊन परशुराम प्रोसेसमधून प्रिंटींग करुन घेणे, अशी सर्व जबाबदारी ते एकटे पार पाडत होते.
एका अंकाचे काम आठ दिवस चालायचे. मुखपृष्ठासाठी ते फोटो द्यायचे. बरेचदा तो फोटो त्यांनीच काढलेला असायचा. मग टाईपसेटच्या काॅलमसाईजच्या गुंडाळया मला देत असत. त्या सरळ करुन मी प्रत्येक लेखाचा बंच करुन यु पीन लावून ठेवत असे. पानांचा आकार व काॅलम साईज ठरलेलाच असे. त्यांच्यासमोर बसून मी रबर सोल्यूशनने पेस्टींग करीत असे. फोटोंची पान, शीर्षकं सर्व झाल्यावर गटणे ही सर्व पानं वैद्य सरांना दाखवायला घेऊन जात असत. बहुतेक काहीएक दुरुस्ती न निघता अंक प्रिंटींगला जात असे.
आठ दिवसांनंतर शरद गटणे आपल्या काळ्या बॅगेतून ‘आलोकन’चा अंक काढून माझ्या हातात देत असत. अंक उत्तम झालेला पाहून मला हायसे वाटे. असे वर्षातून चार अंक, या प्रमाणे चार वर्षे मी ते काम करीत होतो.
काम करताना शरद गटणेंशी आम्ही दोघेही गप्पा मारायचो. ते सुद्धा दिलखुलासपणे आठवणी सांगत असत. हाॅस्पिटलमधील डाॅक्टर, पेशंट यांचे किस्से ऐकवत. पूर्वी त्यांनी मुंबईत मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांच्या सोबत अॅडफिल्मसाठी प्राॅडक्शन मॅनेजर म्हणून काम केले होते.
गिरीश घाणेकरांच्या ‘गोष्ट धमाल नाम्याची’ या चित्रपटाच्या वेळी काही काळ शरद गटणे प्राॅडक्शन मॅनेजर होते. बहुतांशी चित्रपटाच्या निर्मितीचे ते साक्षीदार होते. त्यावेळी घडलेले धमाल किस्से ते सांगत असत.
याच दरम्यान त्यांना डाव्या डोळ्याने दिसायचे कमी झाले. मजकूर वाचताना ते चष्मा काढून कागद डोळ्याजवळ धरायचे. डोळ्याच्या या व्याधीमुळे त्यांनी स्कुटर चालविणे बंद केले.
सुमारे दहा वर्षांनंतर शरद गटणेंचा मला फोन आला. त्यावेळी मी नारायण पेठेत संस्कृती प्रकाशनचं काम करीत होतो. रिक्षाने गटणे आले. त्यांनी लिहिलेल्या एका इंग्रजी पुस्तकासाठी त्यांना मुखपृष्ठ व आतील काही पानं करुन हवी होती. त्यांनीच दिलेल्या फोटोंचा वापर करुन मी मुखपृष्ठ तयार केले. काही किरकोळ दुरुस्त्या झाल्यावर त्याची पीडीएफ फाईल त्यांना दिली. ते पुस्तक ई-बुक प्रकारातले होते. पुण्यातील बुकगंगा कडून ते प्रकाशित होणार होते.
या कामाला आज आठ वर्षे होऊन गेली आहेत. शरद गटणेंशी प्रत्यक्ष भेट पुन्हा काही झाली नाही. आता सर वयाने थकले असतील. एका डोळ्याच्या अधूपणामुळे घरचे त्यांना बाहेर पडू देत नसतील. वर्षातून एकदा येणाऱ्या पंधरा ऑगस्टला माझा गटणे सरांना फोन ठरलेला असतो…त्यांना मी आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो… सरांना मी तारीख लक्षात ठेवल्याचं कौतुक वाटतं…ते हसून मला ‘धन्यवाद’ देतात…आणि मी त्यांच्या ‘गुलकंदी’ आठवणीत रमून जातो….
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१३-४-२१.
Leave a Reply