आजची औषधी : गुडूची (गुळवेल)
● गुळवेल ही सर्व वयोगटात अनेक रोगांवर गुणकारी आहेच. शिवाय निरोगी व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारशक्ती आणि आयुष्यमान वाढवणारी वनस्पती आहे. म्हणुनच , आयुर्वेदात हिला अमृता म्हटले आहे.
● गुळवेल हे तापावरचे सर्वोत्तम व खात्रीलायक औषध आहे.
● बरेच दिवस अंगात राहणारा बारीक ताप , कणकण , अंगदुखी असल्यास गुळवेलीच्या काड्यांचा काढा दररोज दोन वेळा प्यावा.
● मुदतीचा , साथीचा मोठा ताप व त्या नंतर येणारी सांधेदुखी (उदा. चिकूनगुनिया) यामध्येही याच गुळवेलीचा काढा उपयुक्त आहे.
● गुळवेल पचनशक्ती वाढवते. त्यामुळे अजीर्ण , आमवात , जुलाब आणि पचनाशी संबंधित सर्वच तक्रारींवर गुळवेल गुणकारी आहे.
● आमवात , संधिवात अशा कोणत्याही सांधेदुखीमध्ये गुळवेल आणि थोडीशी सुंठ यांचा काढा रोज अगदी नियमित घ्यावा.
● गुळवेलीचे स्वच्छ पांढरे , भस्मासारखे बारीक सत्व मिळते. हे गुळवेल सत्व क्षयरोगासारख्या जुनाट रोगातही उपयुक्त आहे. ते तूप व खडीसाखरेसोबत घ्यावे.
● पित्ताधिक्य असणार्या काविळीमध्ये गुळवेलीच्या पानांचा 20 ते 30 मिली रस खडीसाखरेसोबत रोज घ्यावा.
● ताप नसतानाही तळहात-तळपाय , डोळे यांची आग , जळजळ होणे किंवा जास्त घाम येत असल्यास गुळवेलीचा रस नियमित घ्यावा.
● सांध्यांजवळ लहान-मोठ्या गाठी होऊन उद्भवणार्या वातरक्त नावाच्या सांधेदुखीच्या प्रकारात गुळवेल , शिलाजीत , गुग्गुळ , इ. असणार्या औषधांचा उत्तम परिणाम मिळतो.
● मधुमेहामध्ये गुळवेलीचा स्वरस मधाबरोबर घ्यावा.
● गुळवेल वातरोगांमध्ये तुपातून घ्यावी. पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेत गुळासोबत घ्यावी. पित्त शमनासाठी खडीसाखरेसोबत , कफाच्या रोगांमध्ये मधातून , आमवातात सुंठीसोबत घ्यावी. अशा अनुपानांचा वापर केल्यास गुळवेल अधिक उपयुक्त ठरेल.
● त्वचेवरील सुरकुत्या , केस गळणे – पिकणे , अशा अकाळी येणार्या वार्धक्याच्या खुणांवर गुळवेल खरोखरच अमृताप्रमाणे काम करते.
● गुळवेल ज्या झाडावर वाढली असेल , त्या नुसार तिचे गुणधर्म थोडेफार बदलतात. कडुनिंबावरची गुळवेल औषधोपचारांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते.
[ टीप – सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले ,
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
Leave a Reply