एखाद्या समारंभात, प्रदर्शनात दहा पंधरा वर्षांनंतर कुणी स्नेही भेटला की, आवर्जून विचारतो, ‘तुमचं ऑफिस पूर्वी आलो होतो, तिथंच आहे ना? ‘गुणगौरव’ बिल्डींगमध्ये?’ मी त्याला होकार देतो. ‘होय, गेली पस्तीस वर्षे तिथेच आहे!’ जमाना बदल गया, हम नहीं बदले….
माझं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे झालं. तिथे मला पाचवीपासून दहावीपर्यंत सौ. विजया भानू बाई शिकवायला होत्या. पाचवीला असताना दसऱ्याच्या दिवशी सोनं द्यायला मी मित्रांबरोबर खालकर चौकातील भानू बाईंच्या घरी गेलो होतो. त्यावेळी याच जागेवर पटवर्धनांचा वाडा होता. मधे एक तप गेले. भानू बाई माझ्या घरी आल्या. त्यांना एका प्रबंधाचे काम करुन हवे होते, ते करुन दिले. त्या प्रबंधाला दिल्लीचा पुरस्कार मिळाला. बाईंनी मला घरी छोट्या जागेत काम करताना पाहिले होते. त्यांनी त्यांच्या ‘गुणगौरव’ बिल्डींगमधील कार्यालयाची जागा तुम्हाला काम करण्यासाठी चालेल का? असं विचारलं. आम्ही होकार दिला.
या जागेत कामाला सुरुवात केली तेव्हा एक टेबल व दोन खुर्च्या होत्या. सोसायटीचं एक कपाट आणि शेल्फ होतं. आम्ही दरवाजा लावून काम करत बसायचो. एकदा श्री. भानू आले आणि त्यांनी खडसावलं. ‘दरवाजा उघडून बसत जा!’
हळूहळू आम्ही ऑफिस सजवत गेलो. एका सुताराकडून दोन टेबल, शोकेस करुन घेतली. शोकेसमध्ये आम्हाला मिळालेली स्मृतिचिन्हे मांडली. बसायला एक सोफा ठेवला. कामाच्या निमित्ताने कलाकार, निर्माते येऊ लागले. अशावेळी बिल्डींगमधील सभासदाची कामवाली बाई भांडी धुण्यासाठी पाण्याच्या टाकीकडे जाताना सहज डोकावू लागली.
ऑफिसमध्ये बसलेल्या व्यक्तींना अवघडल्यासारखं वाटू लागले. त्यावर उपाय म्हणून आम्ही पार्टीशन उभे केले. दरवाजा लावला. आता ऑफिसची जागा लहान झाली.
‘गुणगौरव’ मध्ये सुरुवातीला जोशी, भानू, पटवर्धन, पानसे व ओक एवढेच होते. नंतर भानू कोथरूडला गेले तिथे पाटणकर आले. जोशी गेले तिथे लिमये आले. वरच्या परांजपेंच्या ब्लाॅकमध्ये मोहन कुलकर्णी रहात होता. लिमये काकांना हिरवाईची फार आवड. त्यांनी बिल्डींगमध्ये भरपूर कुंड्या ठेवल्या. प्रत्येक मजल्यावर कुंड्या पाहणाऱ्याला प्रसन्न वाटत असे. त्यांनीच महापालिकेला सांगून बिल्डींगला लागून व रस्त्याच्या पलीकडे झाडे लावली. जी आज रस्त्यांची शोभा वाढवीत आहेत.
आमच्या ऑफिसला लागूनच तशीच एक खोली होती. तिथे ओक पती-पत्नी रहायचे. आम्ही बाहेर जाताना त्यांना सांगून जायचो की, तासाभरात परत येत आहोत. ओक हे सरकारी नोकरीत होते. सांगितले तेवढंच काम करायचं हे त्यांच्यामध्ये भिनलेलं होतं. आम्ही गेल्यावर कोणी आलं की, ते त्यांच्याकडे असलेली वही दाखवून त्यात नाव लिहायला सांगायचे. त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीला येणारी माणसं घाबरायची, कारण ती त्या माणसाचा दरवाजापर्यंत पाठलाग करायची. आम्ही त्यावर उपाय शोधला. जाताना दरवाजावर कुलूपा शेजारी ‘आम्ही ४ वाजता परत येत आहोत’ असे लिहून खाली तारीख टाकू लागलो.
याच छोट्या जागेमध्ये अनेक मोठे कलाकार, निर्माते, साहित्यिक, मान्यवर येऊन गेले. राजा गोसावी, शरद तळवलकर, सरपोतदार बंधू, अरविंद सामंत, दत्ता गोर्ले, गिरीश घाणेकर, इ. बुजुर्गांनी इथे हजेरी लावली आहे. जे आले, त्यांनी काम करुन घेतल्यावर यशस्वी झाले. स्मिता तळवलकर, महेश मांजरेकर यांनी अफाट यश प्राप्त केले. संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशिका सुनीताराजे पवार या त्यांच्या सफारी गाडीतून आल्यावर त्यांना पहाणाऱ्या सर्वांना नावडकरांकडे कोणी सिने अभिनेत्री आल्यासारखेच वाटायचे.
डीटीपी करुन घेण्यासाठी मी हत्ती गणपती जवळील स्वोजस हाऊस मधील झेन काॅम्प्युटरकडे जायचो. राव नावाच्या व्यक्तीचे ते ऑफिस होते. त्याने आजपर्यंत शब्दशः सतरा वेळा ऑफिस बदलले. कुठेही तो वर्ष दोन वर्ष टिकला नाही. याउलट आम्ही गेली पस्तीस वर्षे जागचे हललो नाही. दोनदा प्रयत्न केला. एकदा लक्ष्मी रोडवरील अरविंद सामंत यांच्या ऑफिसमध्ये व दुसऱ्यांदा नारायण पेठेत संस्कृती प्रकाशनमध्ये.
एकदा ऑफिस उघडल्यावर दरवाजा उघडा पाहून कामासाठी व सहज येणारेही डोकावून जातात. घाईचे कामवाले बसून काम करुन घेतात. दुपार नंतर कोणी बऱ्याच दिवसांनी आल्यामुळे गप्पा रंगतात. यामध्ये कधी कधी प्रकाश घोडके, मनोहर कोलते, श्रीराम रानडे असतात तर कधी कलादिग्दर्शक सुबोध गुरूजी, चित्रकार अनिल उपळेकर, माधव राजगुरू सर असतात. संध्याकाळी मात्र बण्डा जोशी यांची हमखास चक्कर असते. या सर्व ‘गुणी’ माणसांना गुणगौरव मध्ये येऊन गप्पांचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडते.
गेले पाच महिने कोरोनामुळे ऑफिस बंद आहे. इतके दिवस काळजी घेऊन या महामारी पासून लांब राहिलो आहे, थोडक्यासाठी नुकसान नको म्हणून वातावरण शांत होण्याची वाट पहातोय…
माणसांची सवय असणाऱ्याला घरात कधीच करमत नाही. लवकरच पुन्हा सर्व काही सुरळीत होईल याची खात्री आहे. आज जरी शरीराने मी घरी असलो तरी मनाने मात्र ‘गुणगौरव’ मध्येच आहे….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१-८-२०.
Leave a Reply