नवीन लेखन...

गुणवत्तेपुढचे शिक्षण

आज गरज आहे ती गुणवत्तेपलीकडील शिक्षणाची म्हणजेच यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणार्याे शिक्षणाचा, प्रतिभेला न्याय व बहर आणणारं, कौशल्याचा विकास करणारं शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, आनंददायी ह्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात आणणारं शिक्षण.

गुणांचा फुगवटा, आंतरिक गुणांची उधळण थांबायलाच हवी. निकाल कमी लागेल पण पुन्हा मुले अभ्यासाकडे वळतील. आत्मचितन करतील. मुलांनी ज्ञानासाठी शिकायला हवे. कॉपी जवळ करुन पदवीपर्यंत जाणार्याआपासून काय सामाजिक लाभ होतोय.

गुणांच्या फुगवट्यातून जे डॉक्टर्स, इंजिनीअर्स होतील त्यातले काही रोग्याच्या मृत्यूस व पुल कोसळण्याचे पाईक असतील त्याचं काय? उच्च शिक्षणाचा परीघ विस्तारतोय, पण तो क्षणिक नष्ट होणारा तरंग आहे, त्यावर खुष होऊन चालणार नाही. दर्जेदार शिक्षण घेऊनच विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे. फुगवटा व सूज घातकच. बाळसं असेल तर बालक सुदृढ वाटतं. गुणांच्या फुगवट्यांमुळे उच्च शिक्षण घेणार्याजचे प्रमाण १०टक्के वरुन २३टक्के झाले हे ठिक आहे, पण म्हणून फुगवट्याच समर्थन करणं योग्य आहे कां? ज्यांची क्षमताच नाही त्यांनाही नको, ते अनावश्यक कागदी शिक्षण घ्यावं लागत आहे. ज्याचा त्यांना उपयोग नाही. शिक्षणाचा परीघ खोटी प्रतिष्ठा वाढवत असेल तर त्याचं काय?

योग्य मूल्यमापन होत नाही, प्रश्ा*पत्रिका तरी सोपी काढली जात असेल किवा गुणांची उधळण जास्त होत असेल कां? याचा गांभिर्याने विचार करायची वेळ आली आहे. गुण कमी पडले तर सगळेच आत्महत्या करणारे नसतात, काही पुन्हा अभ्यासाकडे वळतात, चितन करतात, प्रयत्नांतून यश मिळवतात. अभ्यासात मिळालेल यश त्यांना पुढील आयुष्यात तारतं. फुगवट्यातून यश मिळवलेले गुण तग धरत नाहीत, अपयशी होतात. बोर्डात पहिले आलेले पुढचा अभ्यासक्रमही पूर्ण करु शकले नाहीत अशी उदाहरणे आहेत. आम्हाला निकाल कमी लावायचा नाही कारण विनाअनुदानाचा प्रचंड वृक्ष झालाय त्याला धक्का लावायचा नाही. व्यवस्था आणि समाज, परिक्षा व गुण या पलिकडे पहातच नाही हे आजचं दुर्देव आहे. आपल्या मुलाला कोचींगच्या समुद्रात बुडवून व त्याने समुद्रमंथन करुन गुणाचे अमृत आणावे हीच पालकांची अपेक्षा असते. छंदाला तिलांजली देवून गुण मिळवणे हेच अंतिम ध्येय ठरते. केवळ पाठांतर करणारी पिढी नव्हे तर ज्ञानाचे उपयोजन करणारी पिढी हवी. अंतर्गत गुणात २० पैकी ढ मुलालाही २० व हुशार मुलालाही २० हे थांबायला हवे. १० वी पर्यंत निकाल लावले जातात. शाळेचे वार्षिक चे निकालपत्र पहा कसे बनतात. याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. परीघ इतका विस्तारु नये की केंद्रबिदूचा विसर पडावा. शिक्षण खंडीत झालेल्यासाठी मुक्तशिक्षण, मुक्तविद्यापीठ आहेच.

अनुवंशिकता व कौशल्येच माणसाला तारतात, यशाकडे नेतात. योग्य वेळी सुप्तगुण ओळखण्याची व त्याला वाव देण्याची यंत्रणा अभ्यासक्रमात हवी. आजच्या अभ्यासक्रमातून परिक्षार्थी बाहेर पडत आहेत. अभ्यासक्रमातून विद्यार्थी, माणूस बाहेर पडला पाहिजे. केवळ परीक्षा नव्हे तर जीवनात यशस्वी होणारी फळी निर्माण व्हायला हवी.

सध्याच्या अभ्यासक्रमामुळे या सर्व पैलूसाठी काहीच वेळ शिलॢक नाही किवा हे पैलू दुर्लक्षिले गेले. मुळात शाळा व शिक्षक तसेच पालक हे व्यक्तिमत्व विकासासाठी सक्षम आहेत का? किती शाळांना मैदाने, खेळाचे सामान आहे. विशेष विषयाचे किती शिक्षक प्रशिक्षित हवेत. विद्यार्थ्यांचा Aesthetic Sense वृध्दींगत करण्यासाठी शाळेकडे काय योजना आहे?

एखादी सहल काढली की शाळा कृतार्थ होतात. आता सहलींवर निर्बंध व अटी आल्या आहेत. आमचे विद्यार्थी समाजात किती मिसळतात, तशा संधी त्यांना शाळा, कुटुंबाकडून मिळतात का? मूल्ये, संस्कार, संवाद हरवलेल्या कुटुंबात मुले वाढत आहेत. कुटुंबातले संस्कार घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तग धरत नाहीत, शाळेतील संस्कार समाजात तग धरेनासे झालेत.

प्रलोभनाच्या प्रचंड ओझ्याखाली मुले वाढत आहेत, त्याच काय? टि.व्ही., नेट कार्टून यापुढे मुलांना कोणत्याच अॅक्टिव्हिटी कुटुंबात नाहीत. खेळ, व्यायाम, शिस्त याचे बोट सोडून मुले शाळेत दाखल होतात. शाळेत दप्तराचे, अभ्यासक्रमाचे ओझे, शाळेतून बाहेर पडलेल्या या कच्च्या मालाला समाजात मार्केटच नाही. यातले बरेचजण नैराश्याच्या गर्तेत जातात. मूल्य शिक्षण पुन्हा द्यायचे असेल तर कुटुंबापासून द्यावे लागेल. शाळेतले शिक्षक त्या दृष्टीने सक्षम हवेत. शिक्षक सध्या परिपाठाला न्याय देवू शकत नाहीत. किती शाळेत परिपाठ विद्यार्थ्यांना मनापासून आवडतो.

शिक्षकांना मूळात वाचनात आवड हवी. गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे हवा. परिपाठात द्यायला “आशय” त्यांच्याकडे समृध्द हवा. विना अनुदानातून लक्ष्मीला वंदन करुन आलेले शिक्षक, कॉपी, पैसे याचा सहारा घेऊन शिक्षक आले असतील तर ते कसा न्याय देणार? तुमचा अभ्यासक्रम कमी असो व जास्त कॉपी करुनच विद्यार्थी पास होणार असतील तर त्यांच काय? शाळा, महाविद्यालयात कॉपीच्या शिडीवरुन पुढे जाणार्यांहचे काय? अभ्यासक्रम कमी केला तरी कॉपी, शिकवणी, पेपरफुटी थांबणार आहेत का? कॉपी पकडली म्हणून आत्महत्या करणारे, शिक्षकांना मारणारे विद्यार्थी व त्यांची फौज तयार आहे.

या पार्श्वभूमीवर काही कुटुंब, शाळा, शिक्षक, पालक निश्चित आपले काम कर्तव्य चोख बजावत आहेत, नाही तर शिक्षणाचा डोलारा केव्हाच कोसळाला असता. स्वतःकडे स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्यायला वेळच विद्यार्थ्यांकडे नाही. उठल्यापासून विविध क्लास, सुटीतील शिबीरे, छंद यांचा भडिमार त्यांच्यावर आहे. चरकातून निघालेल्या उसाप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं चिपाड झालय. हे सर्व टाळण्यासाठी दप्तराचे, अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण परिक्षा न दिलेले, अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केलेले अनेक जण कासवाप्रमाणे पुढे गेले त्याचं काय? आता अभ्यासक्रम कमी केला तर अभ्यासात कच्चे तर विद्यार्थी राहणार नाहीत ना? हे पहावे लागेल.

थोडक्यात व्यावसायिक कौशल्ये, व मूल्यसंवर्धन, वैधानिक दृष्टीकोन बाळगणारा कृतीला प्राधान्य देणारा, यशस्वी जीवन जगण्यासाठीची कौशल्ये देणारा, ताणतणाव कमी करणारा, व्यक्तिमत्व घडविणारा, शारिरीक तंदुरुस्ती देणारा “आनंददायी” अभ्यासक्रम, तो ट्रीम ही असावा व तर्कसंगतही असावा, हा भव्यदिव्य हेतु आदर्श आहे, पण ग्रामीण भागातील शाळांमध्ये विनाअनुदानित शाळामध्ये व दर्जा खालावलेल्या शाळांमध्ये अंमलबजावणी योग्य व्हावी, नाहीतर “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” असे होऊ नये.

विद्यार्थी शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असावा, ताण तणावात असू नये, मानसिक आरोग्य चांगले असावे, त्याला दुकानात हिशोब करता यायला पाहिजे, ५० ग्रॅम जिर्या ला किती पैसे, अर्ज करणे व भरणे जमले पाहिजे, बँक व्यवहार, समाजात मिसळणे हे सर्व आले पाहिजे असे कुणाला वाटणार नाही, पण अजून दप्तराचे ओझे के.जी. पासून आहेच, अजून रिक्षामध्ये विद्यार्थी कोंबणे चालूच.

शाळेत न गेलेल्या, शाळा अर्धवट सोडलेल्यांच्या बाबतीत, आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांच्या प्रतिभा फुलल्या. शाळेतच किवा लहानपणीच मुलांमधील प्रतिभा, कल, आवड, तसेच त्यांच्यातील सूप्तगुण ओळखून हवं ते व हवा तेवढा वेळ शिकण्याची सोय आपल्या साचेबंद अभ्यासक्रमात नाही. परीक्षा पध्दतीत अमुलाग्र बदल झाला पाहिजे असे मुलांना नेमकं काय शिकवावं याबाबतीतील अब्राहम लिकननी मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र नेमकं अभ्यासक्रम कमी करतांना, कशाचा अंतर्भाव असावा याबाबत दिपस्तंभ ठरावे, थोडक्यात पत्रात ते म्हणतात,

“अजून त्याला खूप काही शिकायचे आहे, पुस्तकांमध्ये किती जादू असते हे त्याच्या लक्षात आणून द्या. तसेच, निसर्गाच्या अनाकलनीयतेबद्दल विचार करायला त्याला वेळ द्या, निसर्गाचे निरीक्षण करण्यास प्रवृत्त करा. लबाडी करुन यश मिळवण्यापेक्षा अपयशी झालेले चांगले हे त्याला शिकवा. सामान्य लोकांच्या कळपात मेंढरासारखे न राहता, त्या गर्दीपासून वेगळा एवढा त्याला कणखर बनवा. त्याने आपले मन आणि आत्मा यांची प््तसवणूक करता कामा नये. त्याच्याशी हळूवारपणे वागा, पण त्याला अवाजवी संरक्षण देऊ नका, कारण प््तत्त््त दुःखात आणि कठीण प्रसंगातच माणसातले उत्तम गुण झळाळून उठू शकतात. त्याला इतका धीट, निर्भय बनवा की प्रसंगी त्याचा आवाज उठू शकेल आणि स्वतःची मर्दुमकी गाजविण्यासाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करेल.”

‘Values are caught and not taught’ असं असलं तरी शिक्षण ही सहेतूक प्रक्रिया असल्यामुळे काही मूल्ये रुजवावी लागतील. मूल्यशिक्षण अशा घरात द्यायचं आहे तिथे पालकांनी अनेक सुविधा व प्रलोभने आंथरुण ठेवली आहेत, अशा शाळेत द्यायचय जिथे प्रतिज्ञेला न्याय दिला जात नाही, कॉपी करणार्याेला, शिकवणीला जाणार्यारला ते द्यायचे आहे.

एकच अभ्यासक्रम सर्व शाळेत असला तरी समान मूल्ये का झिरपत नाहीत? याचाही विचार व्हायला हवा. तसेच शिक्षणप्रणालीत प्रतिभेला महत्व कधी देणार? शिक्षणात प्रज्ञा ओळखून तिचा विकास करण्याचे प्रयत्न ज्या प्रमाणात होतात त्या प्रमाणात प्रतिभा ओळखणे व तिचा विकास करणं हे घडत नाही. आज शाळेत प्रतिभेला पोषक असे वातावरण आहे का? मुख्याध्यापकांना गुणवत्ता बोर्ड भरावा वाटतो. श्रमप्रतिष्ठा आजच्या शिक्षण पध्दतीतून रुजत नाही. गुण व त्याने येणारी प्रतिष्ठा महत्वपूर्ण बनली आहे. प्रवेश, प्रशासन व परीक्षा हेच शैक्षणिक संस्थाचे काम झाले आहे.

गुणाच्या पलिकडच्या शिक्षणाचा विचार करतांना गुणवत्ता व प्रतिभा एकत्र नांदल्या पाहिजेत. गुणाच्या पुढे प्रतिभा आहे ती जोपासण्यास शिक्षण हवं. तणाव नको म्हणून गुणांचा फुगवटा केवळ अनावश्यक तण वाढवेल. जे कामाचं नाही व अनावश्यक आहे. विद्यार्थ्यांना तावून सुलाखून बाहेर येऊ द्या, सुखाऊन नव्हे.

गुणवत्तेपुढचे शिक्षण म्हणजे यशस्वी जीवन जगणे. गुणवत्ताधारक जीवन यशस्वी जगण्यात अपयशी होत असतील तर शिक्षणाचा काय उपयोग? शिक्षण कमी असेल तरीही प्राप्त परिस्थिती समायोजन करुन जीवनाच्या संघर्षाला यशस्वी तोंड देणारी पिढी हवी. Merit, Career प्राप्त करण्यात जीवनाचा आस्वाद घेणंच ही पिढी विसरलीय का?खोर्याrने पैसा ओढण्याच्या नादात जीवन उपभोगायला वेळच मिळत नसेल तर काय फायदा? घरांसाठी पैसे कमावणारे घरच्यांचे राहत नाहीत, त्यांच्याशी संवाद करत नसतील तर कुटुंब दुभंगणारच. संघर्ष पेलता आला पाहिजे. गुणवत्तेच्या मागे लागून आत्महत्या, नैराश्यच, असमाधान मिळणार असेल तर त्यापैक्षा आयुष्याशी संघर्ष करुन यशस्वी जीवन जगणारी पिढीच समाजाला न्याय देवू शकेल व त्यासाठी गुणवत्तेपुढचे शिक्षण म्हणजे यशस्वी जीवन जगण्यासाठीचे शिक्षण हवे, ते केवळ अभ्यासक्रमात नाही. त्यासाठी जीवनाचा अभ्यासक्रम नीट अभ्यासायला हवा.

– डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 36 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..