सकाळी उठलो, दरवाजा उघडून नेहमी प्रमाणे वर्तमानपत्र हातात घेतलं, इंग्रजी वर्तमान पत्रातील एका बातमीवर माझी नजर गेली. बातमीला जे टायटल दिलं होतं, ते वाचलं. बातमी वाचण्या अगोदरच अंगावर रोमांच उभा राहिला.
मी पोलीस खात्यात नोकरी करणारा अधिकारी असल्याने वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्या किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना माझ्यासाठी नवीन नव्हत्या किंवा त्याचं नाविन्य असं काही नव्हतं.
पण तरीही प्रत्येक माणसांमध्ये माणुसकीचा, प्रेमाचा एक कप्पा असतो. तसा माझ्यातला जागा झाला. बातमीच तशी होती. इंग्रजी टायटल होतं. Convicted and Punishment दोन्हीही शब्दांचा अर्थ पाहिला तर पहिला शब्द Convicted म्हणजे शाबीत म्हणजे न्यायालयात एखाद्या अपराध्याचा अपराध सिध्द होतो. त्याला दोषसिध्दी म्हणतात.
त्यालाच Convicted म्हणतात. Punishment या शब्दांचा अर्थ ज्या गुह्याबद्दल किंवा अपराधाबद्दल दोषसिद्धी नंतर दिलेली शिक्षा किंवा सजा असा आहे मला या ठिकाणी शब्दांचा अर्थ समजावून सांगायचा नाही तर त्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली ते पहाणे गरजेचे आहे.
काही गुन्हेगार परिस्थितीमुळे गुन्हे करतात. तर काही गुन्हेगारांचे रक्तातच गुन्हेगारी वृत्ती असते, असे गुन्हेगार समाजाला त्यांच्या कुटुंबाला लागलेला कलंक असतो. त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीचा त्यांच्या वर काहीही परिणाम होत नाही. ते सतत काहीना काही गुन्हे करत असतात.
आपण समाजात अनेक गुन्हेगार पाहिले आणि पहात आहोत. गुन्हेगारांना समाजात स्थान दिले जात नाही. पण काही गुन्हेगार आपल्या गुंडगिरीच्या ताकदीवर समाजामध्ये स्थान निर्माण करतात.
जो गुन्हेगार असतो त्याला त्याने केलेल्या गुह्याबद्दल पश्चाताप होत नाही. ज्या गुन्हेगारांकडून अपराधी भावनेतून गुन्हे झालेले नसतात, अचानकपणे अनाहुतपणे होतात, त्या गुह्याला कायद्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. अशा गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप होतो. परंतु असे काही गुन्हेगार आहेत जे कायद्याला न जुमानता वारंवार गुन्हे करतात. ज्यामुळे तो स्वत:, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, समाज, शहर, प्रांत सारेजण बदनाम होतात.
एखाद्या गुन्हेगाराने समजा अपहरण, पैशाकरीता हत्या असे गुन्हे केले तर त्यांच्या या अपराधाची शिक्षा त्यांच्या कुटुंबीयांना, पत्नी, मुले यांना भोगावी लागते. ही शिक्षा आपण समाजातील लोक त्यांना देत असतो.
कालची बातमी सुद्धा अशाच प्रकारची होती काही गुन्हेगारांनी एकत्र येवून एका असहाय्य मुलीवर पाशवी बलात्कार केला, व त्यापूर्वी सुद्धा असे अपराध त्यांनी अनेक वेळा केले असल्याचे पोलीस तपासात सिध्द झाले. पोलिसांनी अशा अपराध्यांना अटक करुन न्यायालयासमोर अनेक पुराव्यांसह हजर केले.
न्यायाधिशांनी त्या गुन्हेगारांवर रितसर खटला चालवून साक्षीपुराव्याच्या आधारे त्यांना मरेपर्यंत जन्मठेप दिली. न्यायालयाने जी शिक्षा दिली ती योग्यच आहे. अशा गुह्यांमध्ये फाशीच व्हायला हवी जेणे करून अशा प्रकारचे गुन्हे कोणी करणार नाही.
ज्या गुन्हेगारांना असा भयकंर गुन्हा गेला आहे. त्याला न्यायालयात शिक्षा मिळतेच, परंतु त्या गुन्हेगारांच्या मागे असलेले त्याचे आईवडिल, बहिण-भाऊ, पत्नी, मुले त्यांना समाजात स्थान मिळत नाही किंवा त्या पूर्ण कुटुंबाला बहिष्कृत केले जाते. मुलांना शाळेतून काढले जाते. घरातल्या कर्त्या पुरुषाला कोणी नोकरीवर ठेवत नाही. कुटुंबाची पूर्ण धुळधाण होते.
‘काय होता अपराध त्या कुटुंबाचा? ”
‘काय दोष होता त्या मुलांचा? ”
‘काय दोष होता त्या जन्मदात्या माऊलीचा? ‘
आपण त्यांचा काही दोष नसताना त्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या गुन्ह्याबद्दल सर्व कुटुंबाला शिक्षा देतो. कुटुंबाचा काही दोष नसताना, कुटुंबियाने कोणताही गुन्हा केलेला नसताना समाज त्यांना शिक्षा देत असतो. ज्या गुन्हेगारांने गुन्हा केलेला आहे. त्याने गुन्हा करताना त्याच्या आई-वडिलांना, मुलाला किंवा कुटुंबाला सांगून किंवा पूर्व कल्पना देउन गुन्हा केलेला नसतो.
त्या गुन्हेगारांला कुटुंबाची मान्यता असते का?
त्यांनी गुन्हा करण्यासाठी परवानगी दिली आहे का?
असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. कोणते कुटुंबिय, आई-वडिल अशा गुन्हेगाराला पाठिंबा देतील? याचा सारासार विचार समाजाने गांभिर्याने करणे आवश्यक आहे.
गुन्हेगाराच्या कुटुंबाला जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतात. अनेक कुटुंबामध्ये मुला मुलींचे विवाह होत नाहीत. नातेसंबंध जोडले जात नाहीत. त्या कुटुंबाकडे संपुर्ण समाज पाठ फिरवताना दिसतो.
‘खरचं आपण कधीतरी या गोष्टीबद्दल आत्मपरिक्षण केले आहे का?
एक गुन्हेगार व्यक्तीमुळे पूर्ण कुटुंबाला वेठीस धरणं माणुसकीला शोभेल का? म्हणून गुन्हेगार व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला मुलां-मुलींना आपल्याला सामावून घेऊन त्यांना समाजाध्ये एक स्थान देवून कौटुंबिक व सामाजिक संरक्षण देणे आवश्यक आहे.
गुन्हेगारांने केलेल्या अपराधाबद्दल त्याच्या कुटुंबियांना शिक्षा देण्याचा अधिकार आपणांला कोणी दिला? या प्रश्नावर खरंतर सखोल विचार होवून एक सामाजिक परिवर्तन होणे आवश्यक आहे.
समाजातील कोणीही व्यक्ती कोणी त्या कुटुंबाचा सांभाळ करु शकत नाही, किमान त्यांची अहवेलना तरी करु नका ही माफक अपेक्षा आहे.
हे अशक्य स्वप्न मला साकारायचे आहे. दुःख तर प्रत्येकाच्या जिवनात असतं. ते सहन करण्याची कोणाचीही ताकत नसते. असं दुःख आपण सहन करायला शिकलं पाहिजे. अशा लोकांचे दुःख आपण त्यांना जवळ केल्यानेच थोडं कमी होईल. म्हणूचन हा लेखन प्रपंच.
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
Leave a Reply