५०० व १००० च्या नोटा नुकत्याच रद्द झाल्या आणि मराठी भाषेला, विमुद्रीकरण–चलनबंदी– नोटबंदी — मुद्राबंदी इ. अनेक शब्द आणि ” वैचारिक वाद” लाभले. अनेक वृत्तपत्रे आजसुद्धा फक्त याच विषयावरच्या ” हेडलाईन्स” छापतायत. पण काही वर्षांपूर्वी भारतीय चलनातील
५० रुपयाची एक नोट चलनातून अत्यंत गुपचूपपणे काढून घेतली गेली. त्याचीच ही “नोटकथा” !
१९७५ मध्ये श्री.एम.नरसिंहम यांच्या सहीने चलनात आलेल्या ५० रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूच्या चित्रात लोकसभेवरील भारतीय राष्ट्रध्वज गायब होता. नुसताच ध्वजदंड ( काठी) छापलेला होती. ही चूक फार गंभीर होती. त्यानंतरच्या आय.जी. पटेल व के. आर. पुरी यांच्या कार्यकालातही हा ध्वजदंड तसाच रिकामा राहिला. त्यानंतर गव्हर्नर पदी मनमोहनसिंग आल्यावर या नोटेवर पुन्हा ध्वज फडकला.
नंतर ५० रुपयांच्या या ध्वजविरहित नोटा अत्यंत गुपचूपपणे व्यवहारातून काढून घेण्यात आल्या. ना कसला गाजावाजा, ना कुठे परिसंवाद, हेडलाईन्स ! ही चूक झाल्यामुळे आणि ती निस्तरताना करदात्यांच्या किती कोटी रुपयांचा चुराडा झाला , हे कुणाला कळलेच नाही.
एखादी गोष्ट जर दोषपूर्ण असेल तर त्या गोष्टीला किंमत राहत नाही.जितकी चूक मोठी तितकी ती वस्तू निरुपयोगी ! पण टपाल तिकिटे आणि चलनी नोटांच्याबाबतीत हे अगदी उलटे आहे. जितकी चूक गंभीर तितकी त्याची किंमत अफाट वाढते. विविध साईट्सवर ५० रुपयांच्या या बाद नोटा, संग्राहकांसाठी आज खूप मोठ्या किंमतीला विकल्या जात आहेत.
५०० व १००० च्या नोटा जवळ ठेवायलाही बंदी आहे आणि या ५० रुपयांच्या नोटेची मात्र केवढी मिजास ? असते एकेकाचे भाग्य !
— मकरंद करंदीकर
Leave a Reply