गुप्तहेर (डीटेक्टीव्ह) ही कल्पना तशी जुनीच.
गुप्तहेर हे ही कांही आपल्याला नवीन नाहीत.
मध्ययुगापासून ते तहत दोन्ही महायुध्दांपर्यंत गुप्तहेर होतेच.
पुराणांमध्येही कचाने देवांतर्फे हेरगिरी केलीच होती.
आधुनिक युगांत खाजगी गुप्तहेरांची मराठी लोकांना, विशेषतः मराठी वाचकांना, ओळख करून दिली ती कै. लेखक बाबूराव अर्नाळकर यांनी.
इंग्रजीत अॉर्थर कॉनन डायलचे जे स्थान तेच अर्नाळकरांचे मराठीतले स्थान.
शेरलॉक होम्स सारखेच खूनाचे गूढ उलगडणारे धनंजय आणि डॉक्टर वॕटसन सारखाच त्यांचा छोटू.
त्यांच्या झुंजारनेही खूप नांव कमावलं होतं.
मराठी जनांच्या दोन किंवा तीन पिढ्यांनी अर्नाळकरांच्या रहस्यकथांची मजा लुटली.
कोणी चवीचवीने, कोणी अभ्यासाच्या पुस्तकांत लपवून, तर कोणी नाके मुरडत त्या रहस्यकथा वाचल्या असे म्हणतात.
एवढे वाचक मिळूनही बाबूराव अर्नाळकरांना साहित्यिक म्हणून मान मिळाला नाही पण खाजगी गुप्तहेर ही संकल्पना मराठी माणसाला त्यांनीच परिचीत करून दिली.
त्यांच्यानंतर गुरूनाथ नाईकनीही रहस्यकथांत भर घातली.
त्यानंतर टी.व्ही. आल्यावर अनेक मालिकांतून खाजगी गुप्तहेर आले.
त्याच सुमारास अनेक गुप्तहेर कंपन्या पावसाळी छत्र्यांसारख्या अचानक उगवू लागल्या.
खाजगी गुप्तहेरांच्या चक्क पेपरांत जाहिराती येऊ लागल्या.
▪
एक दिवस गोमु माझ्याकडे आला तो अशाच एका कंपनीची जाहिरात घेऊन.
ती अशीच खाजगी गुप्तहेर कंपनी होती.
तिचं नांव होतं क्विक फीक्स डीटेक्टीव्ह एजन्सी.
“पक्या, काय थ्रीलिंग काम असेल नाही ह्या कंपनीचं ? अशा कंपनीत काम मिळालं पाहिजे.”
गोमु म्हणाला.
“रिकामं रहाण्यापेक्षा कुठलही काम बरं !”
मी गोमुला सुनावण्याची संधी सोडली नाही.
पण त्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला, “ही जाहिरात व्हेकन्सीची नाही, पण प्रयत्न करायला काय जातयं ! येतोस माझ्याबरोबर ?”
“मी कशाला पाहिजे बरोबर ? धाडसी काम करायचय ना !”
मी त्याला अडवत पुढे म्हणालो, “खजिन्याचा शोध घेतला तेवढा पुरे नाही कां झाला ? आतां गुन्हेगाराचा शोध घेणार आहेस ?”
“पक्या, मला ह्या कामातली माहिती नाही. पण मी शेजाऱ्याकडे ती ‘अस्मिता’ मालिका पाहिली होती.
ती अस्मिता एक तरूण मुलगी इतकी साहसी आहे तर मी धट्टाकट्टा तरूण कां नाही करू शकणार ? माझा इंटलीजन्सही तिच्यासारखाच आहे.”
गोमु सुरू झाला.
मी म्हणालो, “पडद्यावरचं साहस आणि हुशारी पडद्यावरच छान दिसतात.
खरे खुनी समोर आले तर रहाशील कां उभा ?”
पण गोमु ठाम होता.
त्याचा आत्मविश्वास नेहमीप्रमाणेच जबर होता.
मलाही शेवटी मैत्रीखातर बरोबर जावंच लागलं.
▪
त्या गुप्तहेर कंपनीच ऑफीस वाशीमधल्या एका फडतुस इमारतीत होतं.
इमारतीमधील एका काळोख्या बोळकंडीतून आम्ही ते ऑफीस शोधत गेलो.
त्या इमारतीतील सर्व दुकान बंद दिसत होती.
बहुदा इमारत मोडकळीस आल्याचा तो परिणाम असावा.
थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर तिथे तीन चार दुकानांमध्ये वेगवेगळी अॉफीस थाटलेली दिसली.
एकावर वकीलाची पाटी होती. दुसऱ्यावर एका ज्योतीष कन्सल्टंटची पाटी होती.
तर एक एका कंपनीने गोडाऊन केलेलं होतं.
चौथं अर्थातच आम्ही शोधत होतो त्या क्विक फीक्स डीटेक्टीव्ह कंपनीच होतं.
अॉफीसच दार उघडच होतं.
आंत प्रवेश केल्यावर चार फूट मोकळी जागा होती.
अॉफीसला डेकोरेशन वगैरे तर सोडाच पण बसायला खुर्च्याही ठेवलेल्या दिसत नव्हत्या.
पुढे एक काळा पडदा मात्र रहस्य निर्माण करत होता.
आम्ही पडदा बाजूला करून आंत डोकावलो तर तिथे एक मोठ्ठं लाकडी टेबल दिसलं.
बहुदा चोर बाजारांतून आणलेलं असावं.
टेबलाच्या मागे एक तशीच मोठी सिंहासनासारखी जुनी खुर्ची होती आणि टेबलासमोर एक लोखंडी खुर्ची होती.
टेबलाच्या मागेही एक काळा पडदा होता.
म्हणजे दोन काळ्या पडद्यांच्या मध्ये हे सर्व रहस्य होतं.
नव्हे दोन काळ्या पडद्यांच्या मध्ये रहस्य उलगडणारे क्विक फीक्स डीटेक्टीव्ह होते.
तिथे त्यावेळी आम्हाला कोणीच दिसत नव्हतं.
आम्ही मागे फिरणार होतो, एवढ्यांत एक आवाज ऐकू आला, “थांबा.”
आवाजांत हिंदी सिनेमातल्या डाॅनसारखी हुकुमत होती. त्यामुळे आम्ही थांबलो म्हणजे थिजलोच.
मागे वळून पाहिलं तर एक भीमकाय माणूस उभा होता.
त्याने पँट आणि मोठा डगला घातला होता.
त्या अंधाऱ्या खोलींतही त्याने गॉगल लावलेला होता.
डोक्यावर फेल्ट हॕट होती.
जुन्या हिंदी सिनेमातला के. एन. सिंग आठवतोय.
तसाच पण त्याचा मोठा महाकाय भाऊ.
“बसा.” पुन्हां हुकुम आला.
▪
एकच खुर्ची असल्याने गोमु बसला.
मी उभाच राहिलो.
“मी डीटेक्टीव्ह डॉक्टर चंद्रगुप्त गुपचुपे. कोणाचा खून झालाय ?”
त्यांनी मोठ्या आवाजातच विचारलं.
मी तर घाबरून थरथर कांपू लागलो.
तरीही मनांत विचार आलाच की हा खरंच माणसांचा डॉक्टर आहे, जनावरांचा आहे, दातांचा आहे की गुन्हेगारीमध्ये पी.एच.डी. केलेला आहे ?
अशा माणसाकडे नोकरी करायची म्हणजे रोज सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात जाऊन भेटायचं, अशातला प्रकार मला वाटला.
पण गोमुने मोठ्या ऐटीत सांगितलं, “डॉक्टर, सध्या तरी कोणाचा खून झालेला नाही. पण झाला तर शोधून काढायला मला तुम्हाला मदत करायची आहे. मला तुमच्याकडे काम करायचय.”
“हा-हा-हा, माझ्याकडे काम ? त्याला तेज बुध्दी पाहिजे. हिंमत पाहिजे. आधी मी सांगतो ती कोडी सोडवा.
ऐका, ‘एका परडीत सहा सफरचंद ठेवलीत. परडीभोवती सहा मुली बसल्यात. प्रत्येक मुलीने एकच सफरचंद घेतलं. शेवटी परडीत एक सफरचंद कसं राहिलं ?’
गोमुला अर्थात उत्तर आलं नाही.
मला येत होतं. शेवटच्या मुलीने परडीसकट सफरचंद घेतलं.
मग त्यांनी दुसरं कोडं घातलं, ‘एका कॉलेजमधे चार विद्यार्थी उशीरा परीक्षेला आले. प्रोफेसरनां त्यांनी कारण सांगितलं की ते चौघे ज्या कारने येत होते तिचा टायर वाटेत पंक्चर झाला. प्रोफेसरनी ते विद्यार्थी खोटे सांगताहेत, हे कसं शोधून काढलं ?’
ह्या कोड्याचही उत्तर गोमु देऊ शकला नाही.
दोन्ही कोड्यांची उत्तरे मला माहित होती पण मी सांगू शकत नव्हतो.
▪
उत्तरं आली नाहीत म्हणून गोमु जायला उठत होता तर डॉक्टर गुपचुपे हंसले, “हा-हा-हा, थांबा. जाता कुठे ?
कोड्यांची उत्तर आली असती तर मीच तुम्हाला हाकलून दिलं असतं.
मला हुशार माणूस नकोय.
माझ्यापेक्षा हुशार तर नकोच.
माझं ऐकणारा हवा आहे आणि हिम्मतवान हवा.
पगार मात्र काम पाहून मिळेल. कबूल ?”
गोमुला काम मिळणार याचा आनंद गोमुपेक्षा मलाच जास्त झाला.
डॉक्टर गुपचुपेंची पगाराची अट गोमुने तिथेच मान्य केली.
तो म्हणाला, “ठीक आहे, काम पाहून पगार द्या. मग कधी सुरूवात करायची कामाला ?”
त्यावर डॉक्टर गुपचुपे म्हणाले, “पहिली गोष्ट, कामावर म्हणजे इथे यायचं नाही. हे तुमचे मित्र ? ह्यांना इथे आणायला नको होतं. पण असो.
मी आशा करतो की हे कुठे कांही बोलणार नाहीत.
मी तुम्हांला एक फोन नंबर देतो.
त्या फोनवरून तुम्हाला सर्व सूचना मिळतील.
तुमचा नंबर द्या. त्याच्यावर व्हॉटस ॲप आहे ना ?
फोनवरच्या सूचनांप्रमाणे काम करायचं.
तुमच्या कामाचा रिपोर्टही फोनवर द्यायचा.
क्विकफीक्स डीटेक्टीव्हसाठी काम करतां, हे कुणाला सांगायच नाही.
अगदी पोलिसांनी पकडले तरी त्यांनाही सांगायचे नाही.
सर्व गुप्त राह्यलं पाहिजे.
काय कळलं ना ? तुम्हालाही ?”
गोमुने होकार भरला आणि मलाही नंदीबैलासारखी मान हलवावी लागली.
▪
“हे काम जोखमीचं असतं.
मृत्यूशी गांठ असते.
कधी कसा प्रसंग येईल ते सांगतां येत नाही.
तयारी ठेवावी लागेल.
पोलिसांनी ताब्यात घेतलं तर ह्या नंबरवर मेसेज पाठवायचा.
सोडवून घेऊ.
तुमच्या मित्राकडे हा नंबर देऊन ठेवा.
तीन दिवसांहून अधिक काळ जर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकला नाहीत, तर ह्यांनी तसं कळवायचं.”
डॉक्टर गुपचुपेंची कामांची पध्दत ऐकून मला वाटू लागलं की गोमुने हे काम स्वीकारू नये.
पण त्याच्या अंगात आता डीटेक्टीव्ह पूर्ण संचारला होता.
तो म्हणाला, “अशी वेळच येणार नाही. बरं मला सांगा, असे किती जण आपल्या कंपनीसाठी काम करतात ?”
डॉक्टर गुपचुपेंनी त्याच्याकडे बघून गडगडाटी हास्य केलं आणि म्हणाले,
“डोन्ट ट्राय टू बी टू स्मार्ट. हे सर्व गुप्ततेतच येतं.
तुम्हाला आवश्यक तितकीच माहिती दिली जाईल.
पगार जरी ठरला नसला तरी तुम्हाला खर्चासाठी म्हणून हे तीन हजार रुपये देतोय.”
डॉक्टर गुपचुपेंनी दिलेले तीन हजार रूपये आणि तो नंबर घेऊन आम्ही तिथून निघालो.
हातांत पैसे पडल्यामुळे गोमुची छाती थोडी फुगल्यासारखी वाटत होती.
शिवाय तो आता एक खाजगी गुप्तहेर झाला होता.
मला त्याच्या नजरेंत आजूबाजूने जाणाऱ्या प्रत्येकाबद्दल संशय दिसू लागला.
ते तो मला ऐकवूही लागला.
“पक्या, तो गाडीवरून फळं विकणारा मला इथे नवा वाटतो. गुप्तहेर नसेल ना ?”
मी म्हटलं, “आपल्याला कांही फळं परवडणार नाहीत. तेव्हां चौकशीच्या निमित्ताने त्याच्याकडे नको वळूस.
उद्या परवां जेव्हां डॉक्टर गुपचुपेंचा फोन येईल, तेव्हां काम सुरू कर.
▪
पुढचे चार दिवस गोमुने पूर्ण वेळ चातकासारखी वाट पाहिली पण त्याला कांही फोन आला नाही.
तेवढ्यांत त्याने डॉक्टर गुपचुपेंची गुप्तता मनावर न घेतां स्वतःच्या नांवाचे एक कार्ड करून घेतले.
त्यावर “गोमाजी गोरेगांवकर, खाजगी गुप्तहेर”, हे ठळक अक्षरांत मधोमध आणि एका कोपऱ्यात “क्विकफीक्स डीटेक्टीव्ह” असे छापलं होतं.
मला कार्ड दाखवल्यावर मी त्याला डॉक्टर गुपचुप्यांनी घातलेल्या गुप्ततेच्या अटीची आठवण करून दिली.
गोमु म्हणाला, “छ्या. कांहीतरीच काय ? तू पाहिलं नाहीस कां सिरियलमध्ये ? सगळे गुप्तहेर ऐन मोक्याच्या वेळी आपलं कार्ड काढून दाखवतात. कार्डाशिवाय मजा नाही.”
गोमुबरोबर मी वाद घातला नाही.
पांचव्या दिवशी माझ्याबरोबर असतानाच गोमुला फोन आला.
▪
गोमुने उत्साहाने फोन घेतला.
डॉक्टर गुपचुपेच बोलले त्याच्याशी.
त्यांनी त्याला एका व्यक्तींचे नांव आणि पत्ता दिला आणि त्याच्यावर नजर ठेवायला सांगितले.
त्या व्यक्तीचं नाव होतं राजन पटेल.
गोमुने रोज संध्याकाळी रिपोर्ट द्यायचा.
राजन कुठे कुठे गेला ? कुणाला भेटला ? किती वेळ कुठे होतां ? राजनवर कां लक्ष ठेवायचं, त्याचा कोणत्या गुन्ह्याशी संबंध आहे, हे विचारायचा गोमुने प्रयत्न केला.
त्यावर डॉक्टर गुपचुपे म्हणाले, ‘तुम्हांला माझ्याकडे काम करायचयं की नाही.
ही शेवटची वॉर्निग देतोय.
मला प्रश्न विचारायचे नाहीत.
मी व्हॉटस ॲपवर तुम्हाला फोटो पाठवतोय.
उद्या संध्याकाळी मी फोन करीन, तेव्हां मला उद्याचा रिपोर्ट द्या.”
(डीसकाउंटेड मोबाईल मधून बाहेर पडून आम्ही दोघांनी स्वस्तांतले पण चालणारे मोबाईल घेतले होते, हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आलेच असेल.)
तो पत्ता होता चेंबुरचा.
राजनच्या घराचा पत्ता होता तो.
सकाळी सात वाजल्यापासून त्याचा पाठलाग करायचा होता.
गोमु म्हणाला, उद्या सकाळी पत्ता शोधण्यापेक्षां आतां रात्रीच शोधलेला बरा.
येतोस ना बरोबर ?“
मी गेलो नाही पण गोमु रात्रीच जाऊन राजनचं घरं बघून आला.
▪
पुढचे चार दिवस मला गोमुची खबरबात व्हाॅटस ॲपवरून कळत होती.
मी उठलो तेव्हां त्याचा साडेपांचचा मेसेज पाहिला.
“चेंबूरला निघालो.” सहा पन्नासचा मेसेज होता.“
आता मी राजनच्या घराजवळ उभा आहे.”
साडे सातचा मेसेज होता, “राजनने पकडलेलीच बस मी पकडली.”
रात्री साडे आठला राजन घरी येईपर्यंतचे मेसेज होते.
पहिल्या दिवशी गोमुने उत्साहाने राजनचा पाठलाग केला होता.
पहिल्याच दिवशी मुंबईत एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करणे किती कठीण आहे, ते गोमुला कळले.
राजन पकडेल तीच बस बरोबर पकडायची.
त्याच्या लक्षांत येणार नाही अशा तऱ्हेने बसमध्ये त्याच्या आगेमागे रहायचं.
राजन दिसायला स्मार्ट असा पस्तीस ते चाळीसमधला होता.
गोमुला तो खुनी किंवा टोळीवाला वाटत नव्हता.
पण पाठलाग तर करायला हवा होता.
राजन बसने चेंबूरहून साकीनाक्याला गेला होता.
तिथे गेल्यावर एका मोठ्या टॉवरमधे शिरला.
टॉवर म्हटला की सिक्युरीटी आलीच.
गोमुला तो टॉवरमधे कुठल्या ऑफीसमधे जातो, ते तर जाणून घ्यायचं होतं.
गोमुचा ड्रेस छान होता कारण नेहमीप्रमाणे माझा बेस्ट शर्ट तो घालून गेला होता.
तो सरळ सिक्युरीटीच्या इनचार्जकडे गेला व अंदाजाने म्हणाला, ‘सर, आपण पोलीस कमिशनर होता ना ?”
सिक्युरीटी चीफ थोडेसे खुश होत म्हणाले, “नाही, मी डीसीपी होतो.
पण आपण कसे ओळखतां मला ?”
▪
थोडक्यांत सांगतो, डीसीपीना खूश करून गोमु टॉवरमध्ये जाऊन राजनचे अॉफीसही पाहून आला.
परत बाहेर येऊन राजन बाहेर येण्याची वाट पहात गोमुने इकडेतिकडे वेळ काढला.
जवळच्या हॉटेलात भरपूर खाऊन घेतलं.
राजन संध्याकाळी सातला बाहेर पडला आणि परत बसने सरळ घरी आला.
कोणत्याही मुंबईकरासारखाच त्याचा टीपीकल दिवस होता.
चार दिवस हेच चालू होतं.
गोमुला आता ह्या पाठलाग करण्याचा थोडा कंटाळा येऊ लागला होता.
चौथ्या दिवशी राजनने त्याला बसमध्ये “हाय” करून गोमुशी ओळखही करायचा प्रयत्न केला.
गोमु आपलं काम चोख करत होता आणि ह्या सर्वाचा रिपोर्ट रोज संध्याकाळी डॉक्टर गुपचुपेंना देत होता.
चौथ्या दिवशीचा रिपोर्ट ऐकून डॉक्टर गुपचुपे म्हणाले, “याचा अर्थ तुम्हांला त्याने नोटीस केलयं.
उद्यापासून हे काम बंद.
मी फोटो, नांव आणि पत्ता पाठवतो, उद्यापासून त्या तरूणीचा पाठलाग करा.”
चौथ्या दिवशीचं फोनवरचं बोलणं माझ्यासमोरच झालं.
थोड्याच वेळांत व्हॉटस ॲपवर पंचवीस-सव्वीस वर्षांच्या हीनल देसाईचा फोटो व पत्ता आला.
आतां गुप्तहेर गोमुला एका तरूणीवर नजर ठेवायची होती.
पाठलागाला किंचित कंटाळलेले गोमु तरुणीचा पाठलाग करण्याच्या कल्पनेने पुन्हा उत्साहीत होऊन गुप्तहेराच्या भूमिकेत शिरला.
क्रमश:
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply